उपयुक्त प्रशव काढा

Submitted by बेफ़िकीर on 18 February, 2015 - 01:46

मी हा काढा करून पितो आणि घरच्यांना प्यायला देतो. ह्या काढ्याला प्रशव हे नांव मीच दिले आहे. प्रशव म्हणजे काही विशेष नाही, प्रतिकारशक्तीवर्धक!

कृती:

माणशी एक ग्लास पाणी एका पातेल्यात घेऊन ते तापवायला ठेवावे.

पाणी तापत असताना त्यात खाली गोष्टी मिसळत जाव्यातः

हिंग - चिमूटभर
हळद - दिड चमचा
चहा - माणशी अर्धा चमचा
साखर - माणशी अर्धा चमचा
मीठ - चिमूटभर
चहाचा मसाला (ऑप्शनल व असल्यास) - अर्धा चमचा
आले किसून - एक इंचभराचा आल्याचा तुकडा
सुंठ पावडर - मी काढ्यात आले किसून घातलेले असूनसुद्धा सुंठ पूड घालतो
दालचिनी पावडर - दोन चमचे
वेलदोडा पूड - अर्धा चमचा
लवंगा - माणशी एक किंवा दोन
कढीलिंब पाने - दहा (किंवा माणशी चार वगैरे)
तुळशीची पाने - दहा (किंवा माणशी चार वगैरे)
ओवा - चिमूटभर
गवती चहा - मी भरपूर घालतो, आपापल्या इच्छेनुसार घालावा.

हे सगळे मिश्रण ढवळत राहावे व उकळवत राहावे. (इच्छुकांनी त्या तापत असलेल्या मिश्रणाची वाफ इनहेल करायलाही हरकत नाही).

अगदीच उकळले की पाव कप दूध घालून थोडे सौम्य करावे व पुन्हा उकळवत ठेवावे. तसेच ढवळतही राहावे.

नंतर साय धरल्यासारखे होते व काढा उकळून वर येतो. गॅस बंद करून तो मिनिटभर झाकून ठेवावा व नंतर गाळून प्यायला द्यावा.

ह्या काढ्याची काही वैशिष्ट्ये म्हणा किंवा उपयुक्तता म्हणा:

१. सर्दीवर चांगला उपाय
२. घसा व श्वसनमार्ग मोकळे झाल्यासारखे वाटते.
३. थंडी व पावसाळ्यात केव्हाही आणि उन्हाळ्यात अगदी सकाळी किंवा अगदी निजायच्या वेळी उत्तम
४. सर्वच घटक पदार्थ इम्युनिटी वाढवणारे असल्याने (माझ्यामते) हा काढा प्रतिकारशक्ती वाढवत असावा. नक्की दावा करता येत नाही.
५. पचनसंस्थेची स्वच्छता होत असावी. (पुन्हा, तरतरीत व उत्साही वाटते हा माझा अनुभव आहे पण पचनसंस्थेची स्वच्छता होते की नाही ह्याबाबत दावा करू शकत नाही).

काही इतर बाबी:

१. करायला सोपा.
२. सर्वच्या सर्व घटक पदार्थांची उपलब्धता असायलाच हवी असे नाही. एखादा घटक पदार्थ नसला तरी काढा चांगला होऊ शकतो.
३. घटक पदार्थांचे प्रमाण हे मी फक्त विविध प्रयोग करून ठरवलेले आहे. ते तेवढेच असावे असे काही नाही.
४. ज्यांना चहा अजिबात आवडत नाही अश्यांनी चहा पावडर (/ व दूध) नाही घातले तरी चालते.

हा काढा मी उगाच चित्रविचित्र प्रयत्न करत असताना बनला व बायकोला व वडिलांना उपयुक्त वाटला त्यामुळे जरा नीट डेव्हलप केला. ह्यात कोणतेही बदल इच्छेनुसार केले जाऊ शकतीलच! पण काढा प्यायल्यावर घसा, नाक, डोळे, पोट ह्यांच्यावर काहीतरी त्वरीत चांगला परिणाम जाणवतो हा स्वानुभव आहे.

इतर गोष्टी:

मी दिवसातून हे खालील पदार्थ अगदी नक्की व कच्चे खातोचः

आले - लहानसा तुकडा
लिंबू - प्रत्येक जेवणात (/न्याहारीत) पदार्थावर पिळून
मिरची (तिखट) - एक (न्याहारी किंवा दुपारच्या जेवणासोबत किंवा दोन्हीसोबत एकेक)
लसुण - चार पाकळ्या
कांदा - एक पूर्ण
टोमॅटो - एक पूर्ण व मोठा आणि लालभडक
मुळा - नॉर्मल मुळ्याचा अर्धा किंवा एक तृतीयांश भाग

तसेच, जमतील ती फळेही खातो. आजकाल पोळी कमी करून नुसत्याच भाज्या खायचा एक प्रयोग सुरू केलेला आहे. त्यानेही बरे वाटते. हे उगीचच इथे लिहिले. किंवा असे वाटले की ह्या सर्व बाबीही प्रतिकारशक्ती वाढवतात म्हणून आपण खातो हे येथे नोंदवावे.

सकाळी ज्यांना कफ होतो, ज्यांना अनेकदा सर्दी असते, थंडी वाजते वगैरेंसाठी हा काढा चांगला आहे.

वाचकांकडे काही इतर कल्पना किंवा अनुभव असतील तर कृपया अवश्य शेअर करावेत.

धन्यवाद!

============

-'बेफिकीर'!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मी अनूभवी आहे यातली.:स्मित: त्यामुळे वाचकानी अनूभवायला काहीच हरकत नाही. फक्त मी त्यात हळद,ओवा, कढिलिम्ब व मीठ घालत नाही इतकेच. मी चहाप्रेमी असल्याने नुसता काढा पिववेना म्हणून त्याचा चहाच बनवला. यात मी तुळशीची पाने सुद्धा घातली होती. काही वर्षापूर्वी लागोपाठ २ दिवाळ्यान्च्या आधी मला सर्दी, खोकला आणी सायनस ने वैताग आणला होता. म्हणून मी हे करुन प्यायले. एकदम गुण आला. आता तुळस नाहीये.:अरेरे:

धन्यवाद बेफिकीर आठवण करुन दिल्याबद्दल.

ह्याला 'काढा' न म्हणता (हाताला लागेल ते) 'घाला' असे म्हणणे जास्त संयुक्तिक होईल. Happy

काढ्या तील बाकी पदार्थ ठिक आहेत पण दुधा चे प्रयोजन कळले नाही.
मल वाटते कढीलिम्ब, मीठ, आणि ओवा हे दुधा बरोबर मिसळु नयेत.
आवडत नाही त्यांनी न घेणे बरोबर आहे परंतु मुळात घालवेच कि कसे हे अयुर्वेदिय पदधति नुसार हि खात्री करावी
माहीति उपयुक्त आहेच! धन्यवाद!

कळावे,
निरा

कफ असेल तर दूध न घालता घेतात, पण ज्याना काढा आवडत नाही त्यानी चहाच करुन घ्यावा. खरे तर दूधात सुन्ठ घातल्याने दूधाचे दोष जायला हरकत नसावी.

एक ग्लास पाण्यात आले टाकून उकळत ठेवावे. नंतर त्यात साखर व गुलाबी मीठ टाकावे. नंतर छोटे अर्धे लिंबू पिळावे. गाळण्याने गाळून गरम गरम प्यावे

एक बेसिक प्रश्न - असे घरगुती प्रयोग करत काढा बनवणे यात रिस्क नाहीये, किंवा असल्यास किती? एखाद्या गोष्टीचे अर्धवट ज्ञान हे जास्त धोकादायक असते याला अनुसरून हे विचारतोय.

बाकी आमच्याकडेही खोकल्यावर उपाय काढा असतो, त्यात काय असते हे मात्र आईलाच विचारावे लागेल. गरमागरम मस्त गोड कोरा चहा प्यायलाचा फील येतो, म्हणून आवडीने पितो. आणि येस्स, खोकल्याला आरामही मिळतोच. किंवा मग त्याहून सोपा उपाय खडीसाखर चघळणे.

Cinnamon, cardamom, cloves, tulsi, amla, curry leaves have polyphenols which are responsible for the medicinal properties. These polyphenols bind with the protein in the milk and are rendered useless. Hence ideally milk should not be added to tea or any such concoction.

छान काढा.... पुष्पा त्रिलोकेकर / फ्रेनी वर्मा यांच्या एका लेखात याला "कषाय" असे नाव दिले होते असे आठवतेय. पण या शब्दाचा अर्थ मात्र माहित नाही मला.

कढीलिम्ब, मीठ, आणि ओवा हे दुधा बरोबर मिसळु नयेत.
<< +१
चिनूक्स ह्यांनी लिहिले आहेच.
पण दूध घालूच नये.

कषाय, हा सहा रसांमधला एक रस, म्हणजे तुरट.
संस्कृत मध्ये शिकलेलं आठवतंय, (धड लिहिता येत नाहीये, सॉरी)
षड्रस: पुरुषेणेह भोक्त्व्या बलमइचछस:
अम्ल तिक्त: कशायश्च मधुरो लवण: कटू.

हे एक आणखी वेगळे पेय बघा:

IMG_6915.JPG

ह्यातः

माणशी एक ग्लास पाणी
माणशी एक चमचा मध
माणशी अर्धे लिंबू पिळून
इंचभर आल्याचा तुकडा किसून
चिमूटभर हळद
चिमूटभर हिंग
एक लहान तिखट मिरची बारीक तुकडे करून
चिमूटभर मीठ
चिमूटभर दालचिनी

असे सगळे आहे. हे गरम पेयच आहे. उकळी आल्यावर गाळून प्यावे. Happy

ह्यात इतर घटकही घालून पाहता येतील. ह्यात अल्कोहोलिक ड्रिंक मिसळल्यास कसे लागेल बघायला हवे.

पण हे जे वर दिलेले आहे ते पिऊन अतिशय ताजेतवाने व हलके हलके वाटते असा स्वानुभव!

धन्यवाद!

-'बेफिकीर'!

हो, मिर्चीच्या दोन तीन तुकड्यांचाही तिखटपणा (आले सोबत असल्यामुळे) जाणवत राहतो.

पण हे मस्त लागते राव!

ह्यात एकदा केशर टाकून बघणार आहे.

कोणी घरी आले की हेच देऊन मी एकदा बघणार आहे काय म्हणतात पब्लिक्स!

१)डाळींब सोलून साल वाळवून ठेवावी २)औषधि दुकानातूत गुलाबकळी (=वाळलेली सुगंधी गुलाबफुले)आणावी ३)संत्र्याची साल वाळवून ठेवावी ४)बेलाची पिकलेली फळे उघडून गर वाळवावा
यापैकी कोणतेही एक टाकून केलेला चहा (दुध घालूनही)फारच चांगला लागतो आणि उन्हाळ्यात उपयोगी आहे.

पावसाळ्याकरिता १तुळस २पुदिना ३आल्याची पाने ४गवती चहा यांचा चहा करावा घरातल्या बागेत लावता येते.

थंडीसाठी आवळा ,
बेफिकिर प्रयोग आवडला.

वरचा पिवळा चहा सकाळी करुन घेतला. काळ्या कपात घेतल्याने पिवळा झालेला की कसे ते कळले नाही पण चवीला चांगला होता. सध्या सर्दिने घसा धरलेला असल्याने जरा बरे वाटले पिउन.

तुरट चवीला कषाय म्हणतात काय? नविन माहिती.

काढ्यातही एक प्रकार असतो कषाय चा हे माहित होते. मी एक आयुर्वेदिय औषध आणलेय ते कषाय आहे.

Pages