रिक्षावाले : मुंबईचे...

Submitted by स्वस्ति on 8 July, 2008 - 12:14

'मिल्यां'नी लिहिलेला रिक्षा की शिक्षा हा विनोदी ले़ख वाचला आणि मला काही किस्से आठवले - मुंबईच्या रिक्षावाल्यांचे.

मी मुंबईत जन्मले ,वाढले आणि अजून इथेच रहातेय ... त्यामुळे मुंबईत प्रवासाची अडचण कधीच जाणवली नाही.
ऑफिसला जायला लागल्यापासून माझा रिक्षा प्रवास जरा वाढला.
रात्री निघायला उशिर झाला की रिक्षासारखा दुसरा आरामदायी प्रवास नाही.

आमचा एक मनेजर बंगलोरवरून आला होता.
मी कधी साडेनउच्या नंतर ओफिसमधून निघाले की विचारायचा
"अब तु घर कैसे जायेगी ?"
"ऑटोसे " मी सहज म्हणायचे .
"इज इट सेफ ? बंगलोरमे तो इतने रात को लेडि़ज अकेले ऑटोसे नही जाती " त्याला फार काळजी वाटायची.
"ये मुंबई है सर . अभी मुझे हायवे पर ट्राफिक मिलेगा .और वैसेभी यहा के ऑटोवाले अछ्छे होते है" मला यात कधीच काही गैर वाटल नाही.

साडेनउ , दहा , कधी कधी पार्टी वगैरे असली की साडेबारा ..मी बिनधास्त रिक्षाने यायचे आणि अजुनही येते.
"टच वूड " घर ते ऑफिस - एका तासाच्या प्रवासात- मला आतापर्यन्त कधी वाइट अनुभव नाही आला .
पण बरेचसे मजेदार किस्से मात्र अनुभवले.

एकदा तासभर थांबुनही बस मिळाली नाही आणि मग मी रिक्शा पकडली. वाजले होते रात्रीचे साडेआठ.
अगोदरच माझ डोक तापल होत, त्यात ड्रायव्हरने गाणी लावली.
मी वैतागुन त्याला आवाज कमी करायला सांगितला.
त्याने डेक बंद करत मला काय म्हणावं
"माडम , आप के लिये ही लगाये थे . इतनी दूर जाना है ना ,अकेले बोर हो जाओगे. नही चाहिये तो बंद कर देता हूं"
मला हसावं की वैतागावं कळेना .
"थांक्यु . बजने दिजिये पर आवाज थोडी धीमी रखिये" या उपर मी काही बोलले नाही.

मी आणि माझी मैत्रिण , आम्ही रिक्षा पकडली.
त्याला म्हटल उजवीकडुन काढ त्याने डावीकडे वळवली. आता लांबचा वळसा पडनार म्हणून आम्ही वैतागलो .
थोडं पुढे गेल्यावर त्याने विचारलं "वाजले किती ?"
"साडेनाउ "
तो बिचारा अगदी कावराबावारा झाला
"माडम , बराच उशिर होइल मला परत यायला. मी तुम्हाला इथे हायवे जवळ सोडतो .तुम्ही प्लिज दुसरी रिक्षा पकडाल ? माझी सासुरवाडी इथेच आहे , मला तिकडे जायच आहे "
आम्ही दोघीही आज्ञाधारक मुलींसारख्या उतरलो आणी त्याला मीटरप्रमाणे १२ रुपयेही दिले.
पुढे येउन आम्ही दुसरी रिक्षा पकडली.
बोलता बोलता आमच्या लक्षात आलं - त्या रिक्षावाल्याला त्याच्या सासुरवाडीला जायचच होतं . त्याने आम्हाला वाटेत उतरवलं आणी आम्ही वर त्याला पैसेही दिले.

एकदा असचं आम्ही एकत्र येत असताना रिक्षावाल्याने मधेच रि़क्षा थांबवली आणी गायब झाला .
वाटेतच रिक्षा थांबलेली ,ड्रायव्हर गायब, आम्ही दोघी वाट बघतोय , येणारे जाणारे आमच्याकडे बघतायेत ...आमचा पारा चढला.
परत येताच त्याला जरा घुश्शातच विचारलं
"कुछ नही माडम , जरा गुटखा खानेकी तलफ आयी ."
त्याने शांतपणे गुटख्याची पुडी (स्वतःच्या) मुखात उपडी केली आणि आमची तोंड बंद झाली.

आतापर्यन्त मला एकच प्रसंग मला आठवतोय , जेव्हा मी रिक्षा पकडताना प्रचंड चरकले होते ....
रात्री साडे दहा - अकराची वेळ . मी मेन रोडला रिक्षा शोधत होते. जरा पुढे वीस पावलांवर एक दिसली.
झपाझप चालत तिच्यापाशी पोचले आणी ड्रायव्हरला विचारलं .
त्याने हो म्हणायला मागे वळुन पाहिलं आणी माझ्या पायापासून मस्तकापर्यंत थंड लहर सळसळली . मला काही सेकंद काही सुचेचना. अर्थात दोष त्याचा नव्हता .माझ्या मनाचे खेळ ... .
त्या सुमारास काजोल (डबल रोल ) आणी आशुतोष राणा यांचा चित्रपट बराच चर्चेत होता - दुश्मन.
त्यातला आशुतोष राणा चा 'गोकुळ' आज ही अंगावर शहारे आणतो
गळ्यात काळा दोरा , तेल लावलेले केस आणि डोळ्यात काजळ , असा रिक्षावाल्याचा अवतार पाहुन मी प्रचंड हादरले होते. आज आठवलं की हसु फुटतं.

वाटेत रिक्षा बंद पडली किंवा इथपर्यंत सोडेन असं ठरलं असेल तर दुसरी रिक्शा बघुन देणं, कोणी दुसरा तयार होइ पर्यंत थांबण इतकी माणुसकी तर नेहमीच पहायला मिळते.

आणि शेवटी एक टाक्सीवाल्याचा किस्सा ...
मी , माझी मैत्रिण आणि एक मित्र आम्ही एका लग्नावरून परत येत होतो .
वाशी ते सायन टाक्सी आणि मग पुढे रिक्षा असा आमचा पैसे वाचवण्याचा प्लान.
रात्री साडेबारा वाजता ,आम्ही सायनला पोचलो.
रिक्षांची भली मोठी रांग उभीच होती.
आम्ही त्याला थांबायला सांगितल.
तो म्हातारासा ड्रायव्हर आम्हाला म्हणाला
"यहां से नही , थोडा आगे छोडता हुं. ये लोग बडे बदमाश है .इतनी रात, दो लडकियोंको लेके जाओगे ,थोडा संभालके"
त्याने आम्हाला पुढे नेउन व्यवस्थित चांगलासा रिक्षावाला बघुन , येणार का विचारुन मगच सोडलं .
यातला रिस्क फाक्टर सोडला तर त्याचा चांगुलपणा मी आयुष्यात कधी विसरणार नाही.

मी मुंबईत बिन्धास्त असते अस मी मनापासुन म्हणते ते अशा लोकांमुळेच.

गुलमोहर: 

स्वाती .. मस्त आहेत किस्से !
मुंबईत वाढलेले माझे काही मित्र आणि आते-मामे भावंडही म्हणतात की मुंबई एकदम सेफ आहे .
(मी पुण्याचा असल्याने त्यांचं म्हणणं अजून तरी मान्य केलं नाहीय ;))

माझा पण अनुभव चांगला आहे मुंबईतल्या रिक्षांचा. माझी कंपनी विक्रोळीला होती तेव्हा जवळ-जवळ रोजच शेवटची बस (८:३०) चुकायची एव्हढे काम होते. मग मी रिक्षाने घरी जायचे. कंपनीसमोरच रिक्षा उभ्या असायच्या. साधारण १-१.५ महिना झाल्यावर लक्षात आले की त्यातले एक आजोबा खुप मागे असले तरी रिक्षा पुढे काढायचे. बाकीचे रिक्षावाले पण "चाचा" करुन त्यांना हाळी द्यायचे. रोज यायचे पण रस्त्यात काही बोलणे नाही की काही नाही. काही काही रिक्षावाल्यांना फार सवय असते. एक दिवस मीच त्यांना विचारले की त्यांचे घर मुलुंडला आहे की काय. तर फक्त "हा बेटी यही रेहता हु पास मे" इतके म्हणाले.

वाह! बरं वाटले वाचून. असे काहीसे वाचले की जगात चांगुलपणा आहे हा विश्वास दृढ होतो.
Happy
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
आनंद या जीवनाचा सुगंधापरी दरवळावा
पाव्यातला सूर जैसा ओठातूनी ओघळावा

मुंबईत खरेच सेफ वाटते... ऑडिट्च्या वेळेस मीही रात्री अकरानंतर वरळी ते बेलापुर टॅक्सीने एकटी गेले आहे ब-याच वेळा, पण कधीच भीती वाटली नाही. मस्तपैकी ड्रायवर शी गप्पा मारत जायचे. आमच्या ऑफिसने मात्र ऑफिससमोर उभ्य असतात त्याच टॅक्सी करायच्या असे सांगुन ठेवले होते...

______________________________________
आला दिवस गेला दिवस - ही रे कसली जिंदगी?
घे उराशी स्वप्न एक, उजळू दे तुझी जिंदगी!
उचल पावले, अन घे तळहातावर तुझी जिंदगी-
पुढेच टाकत तंबू जगणे - हीच खरी जिंदगी!

वाशी ते सायन टाक्सी आणि मग पुढे रिक्षा असा आमचा पैसे वाचवण्याचा प्लान>>
सायनच्यापुढे रिक्शा?
बाकी मस्त लिहिलय ह!
मला पण मुंबईत एकदम सेफ वाटत.

हे मराठी लिहिताना मध्ये ईंग्रजी कस लिहायच ?

सायनच्यापुढे रिक्शा?>>>
सायनवरून उपनगरात यायच तर रिक्शा चालते Happy

ओह मला वाटले वाशी ते सायन टेक्सी आणि त्यापुढे सिटीमधे [साउथ मुम्बएत]जायला रिक्शा म्हणुन नवल वाटल.

आतापर्यंत एकदाही वाईट अनुभव नाही आला. आणि चांगला आठवत नाही पण वयस्कर रिक्षावाले थोडे बडबडे असतात हे मात्र खर. ते सिग्नल ला वैगरे बोलायला सुरुवात करतात ते अगदी थेट आपल (गिराहीकाचे) घर येयीपर्यंतच. Happy

आमच्या दिल्ली अंन इतर गुड़गाव वगैरे च्या बॅच मेट्स ना जेव्हा मी सांगतो की आमच्या मुंबई मधे पोरी एकट्या खुशाल रात्री बारा एक ला सुद्धा एकट्या रिक्षा ने जाणे येणे करतात तेव्हा ते लोकं विशेष हरखलेले पाहिले आहेत, माझ्या एक मैत्रिणीला मुंबई ला कस्टम्स एंड सेंट्रल एक्साइज इंस्पेक्टर म्हणुन पोस्टिंग आले तेव्हा सत्यनिकेतन ते धौला कुँवा (दिल्ली) इतक्याश्या अंतरात ही तिला घ्यायला जाणाऱ्या तिच्या वडलांनी सहज पाठवले तिला!! कारण काय "मुंबई सेफ है हमें कोई चिंता नहीं है"

छान आहेत किस्से अनुभव, असेच माझेही कित्येक आठवले, थोड्याफार फरकाने सारखेच असतील. अर्थात सुरक्षिततेबाबत पुरुष महिलांचे विचार वेगवेगळे असले तरी सोबत मैत्रीण असताना तो विचार पुरुषांनाही करावा लागतोच..
पण मुंबईत रिक्षा-टॅक्सी हे नक्केच सेफ आहेत, आमच्याकडेही मुलींना सांगायचे की रात्री काही प्रॉब्लेम झाला, उशीर झाला तर सरळ टॅक्सी पकडायची आणि घरी यायचे. भले पैसे नसले तरी.. ते इथे आल्यावर देता येतात..

स्वस्ति,

>> त्याने आम्हाला पुढे नेउन व्यवस्थित चांगलासा रिक्षावाला बघुन , येणार का विचारुन मगच सोडलं .

त्या भल्या टॅक्सीवाल्याने शीवच्या थोडं पुढे जिथे तुम्हाला सोडलं तिथे रिक्षातळ होता का? असल्यास तो धारावी पोलीस ठाण्यासमोरचा तळ आहे. तो बराच सुरक्षित असावा असा माझा अंदाज आहे. Happy

आ.न.,
-गा.पै.

दोन वेळा रिक्षा केली होती. तर बिल द्यायच्या वेळी रिक्षावाला मागे वळुन म्हणाला ... सर मैं आपका पेशंट हूअँ ... पैसा मत दो !

Happy

मुंबई तील रिक्षावाले आणि टॅक्सीवाले खरोखर चांगले आहेत. व्ही. टी ला तर एकदा एका ड्रायवर सरदारजी ने कमी डिस्टन्स चे पैसे पण घेतले न्हवते. वॉकेबल डिस्टन्स आहे हे मला माहीत न्हवते आणि तरीही त्यांनी मला सोडले आणि मीटर प्रमाणे पैसे देऊ केल्यावर म्हणाले "ठी़क है बेटा इतने डिस्टन्स के लिये क्या पैसा लेना. "
मी खूप मागे लागले पण त्यांनी पैसे घेतले नाहीत , मला खूपच आस्छर्य वाटले होते तेव्हा.

रिक्षा, टॅक्सी थांबवून आत सामान ठेवून वाटेत दुकानात काही घेताना , टॅक्सी वाला पळून जाईल असे कधीच मनात येत नाही आणि असे ऐकले ही नाही.

रिक्षा, टॅक्सी थांबवून आत सामान ठेवून वाटेत दुकानात काही घेताना , टॅक्सी वाला पळून जाईल असे कधीच मनात येत नाही आणि असे ऐकले ही नाही. >>>>>>>>>>>>>> माझा नवरा रिक्षात मुलीची स्कूल ब्याग आणि बेबी सिटींग ची ब्याग विसरला .....परत मिळेल हि अपेक्षा होती नाही मिळाली ..... पुन्हा नव्याने सगळे विकत घ्यावे लागले शाळेचे अगदी दोन महिने उरले होते तरी. Sad

नवीन वाचक तुमचा अनुभव दुर्दैवी आहे पण मला वाटते त्या रिक्षावाल्याला ते सामान मिळालेच नसेल किवा मिळाल्यावर कोणाचे ते लक्षात आले नसेल.
मला चांगला आणि वाईट दोन्ही अनुभव आलेले. छत्री हरवते म्हणून एकदम स्वस्त १५० रु. ची घेतली. अपेक्षेप्रमाणे एकदा रिक्षात राहून गेली. अर्ध्या तासाने रिक्षावाला घेऊन आला. मालाडपासून केवळ छत्री द्यायला दहिसरला आलेला. १५० रुच्या छत्रीसाठी त्याला ५० रुची बक्षिसी दिली!! Happy
मोबाईल राहिलेला आणि ५ मिनिटात लक्षात आले. पण रिक्षावाला निघून गेलेला. परत परत फोन केला. सुरुवातीला दोनदा वाजला आणि मग स्वीच ऑफ झाला. माहित नाही रिक्षावाल्याने ढापला कि पुढल्या गिऱ्हाईकाने... :-०

मुंबईच्या रिक्षावाल्यांचे जेवढे चांगले अनुभव आहेत तेवढेच अगणित वाईट अनुभवही आहेत गाठीला.
देवनार भागात रिक्षावाल्यांनी मिळून एका मुलीवर अत्याचार आणि खून वगैरे केल्याच्या बातम्या, घाटकोपरच्या आसपास वृद्ध महिलेला रिक्षावाल्याने थपडावल्याच्या बातम्या भरपूर आहेत.
मीटर फास्ट करून ठेवणे व मुद्दामून लांबच्या रस्त्याने नेणे वगैरे करणारे रिक्षावालेही आहेत.
जवळच्या अंतराला तुच्छतेने नाही म्हणणारे रिक्षावाले कधी पाह्यले नसतील मुंबईत तर पार्ला इस्टला स्टेशनच्या इथे संध्याकाळी ६:३० ते ८ दरम्यान स्टेशनपासून बिस्किट फॅक्टरी, हनुमान रोड किंवा पार्ला इस्टात कुठेही जायला रिक्षा पकडायचा प्रयत्न करा. एकगठ्ठा भरपूर अनुभव जमा होतील.

सांगायचा मुद्दा हा की मुंबईचे रिक्षावाले म्हणले की अचानक त्यांच्यावर सोन्याचा शिक्का मारू नका. चांगलेवाईट सगळीकडेच असते.

लेख आणि प्रतिसाद आवडले.
रात्रिची ,रिक्शाने मालाड ते मानखुर्द ब-याच वेळा आले. छानपैकी ड्रायवरशी गप्पा मारत बसायचे.एक -दीड तास सहज निघून जायचा.बरेचदा रिक्शावाले घरगुती गोष्टी सहज बोलत असत.कदाचित परक्या व्यक्तीबरोबर बोलताना
मोकळे,सेफ वाटत असेल.
जवळच्या अंतराला तुच्छतेने नाही म्हणणारे रिक्षावाले कधी पाह्यले नसतील मुंबईत >>>>>>> मालाड गोरेगाव ह्या भागात हा प्रकार भरपूर आहे.म्हातारें माणूस वगैरे हे लोक( जास्त करून भैय्या) पहात नाहीत.याउलट चेंबूरला उलटा अनुभव आला आहे.

पार्ल्यातच शाळा, कॉलेज असल्याने तिथल्या रिक्षावाल्यांचा माजुरडा अनुभव आहे.
पण चांगल्या रिक्षेवाल्यांचा अनुभव ही खूप घेतलाय मुंबईत Happy

जवळच्या अंतराला तुच्छतेने नाही म्हणणारे रिक्षावाले कधी पाह्यले नसतील मुंबईत >>> पाहिले आहेत ना . रोज सन्ध्याकाळी बोरिवली स्टेशनला लाईन असते अशा लोकान्ची .
म्हनून मी हल्ली स्टेशन ते घर चालत जाते , रिक्शासाठी हात दाखवत उभं रहाणं पटत नाही.

माझे वरचे अनुभव साधारण ८-१० वर्शापूर्वीचे आहेत. हल्ली रिक्शाचा लाम्बचा प्रवास फार कमी झाला.तेन्व्हा अन्धेरी-बोरीवली ९० रूपयात येता यायचं . आता २०० रूपये परवडत नाही Sad .

चान्गली माणसं भेटली म्हणजे वाईट भेटली नाहीत असे नाही .
पण वर म्हटल्याप्रमाणे , मी मुंबईत जन्मले ,वाढले आणि अजून इथेच रहातेय. म्हणून एकट्याने प्रवास करताना कधी भीती वाटली नाही , ईतकचं Happy

.

स्वस्ति तुमच्या लेखापेक्षा माझ्या प्रतिसादाच्या वरती असलेल्या प्रतिसादांवर माझी प्रतिक्रिया होती. Happy

तुम्ही जी सुरक्षितता अनुभवली आहेत ती मी पण मुंबईत राह्यल्या आल्यापासून अनुभवते आहे. माझ्या कामामुळे मला विचित्र वेळांना येणे जाणे करावे लागते. हातात भरपूर ओझेही असते कित्येकदा त्यामुळे किंवा ट्रेन न जाणार्‍या भागात जाणे खूप असते त्यामुळे ट्रेन शक्य होतेच असे नाही.
या सगळ्या दरम्यान मी ही भरपूर फिरलेय रिक्षा-टॅक्सीमधून. ती सुरक्षितता आहेच.

<< साधना | 9 July, 2008 - 13:28

मुंबईत खरेच सेफ वाटते... ऑडिट्च्या वेळेस मीही रात्री अकरानंतर वरळी ते बेलापुर टॅक्सीने एकटी गेले आहे ब-याच वेळा, पण कधीच भीती वाटली नाही. >>

सेफ आणि सेक्युअर या दोन इंग्रजी शब्दांचा अर्थ वेगळा आहे. इथे त्याची गल्लत केलेली दिसतेय. वरचा प्रतिसाद जरी टॅक्सीबद्दल असला तरी धागा रिक्षांविषयीचा आहे आणि रिक्षाप्रवास हा सेफ कधीच असू शकत नाही. हे तीनचाकी वाहन कधीही उलटू शकते. शिवाय चांगले शॉक अ‍ॅब्सॉर्बर्स नसल्याने हाडे खिळखिळी होण्याची शक्यता. शिवाय दारे नसल्याने प्रवासी वळणावर वेग जास्त असल्यास खाली पडू शकतात. ऊन, पाऊस, थंडी, वारा व प्रदुषण यांपासून पुरेसे संरक्षण मिळत नाही. डोक्यावर व पाठीमागे केवळ रेक्झिनचे हूड असते त्यामुळे अपघात झाल्यास मोठी प्राणहानी होण्याचा संभव. स्टीअरिंगच्या ऐवजी हँडल असल्याने वळण घेण्याची पद्धत बरीच धोकादायक असते. अर्थात यामुळे वाहतूक कोंडीतून वाहन बाहेर लवकर निघत असले तरी यांच्या बेशिस्त चालवण्यामुळेच अनेकदा वाहतूक कोंडी होते हे देखील लक्षात घ्यायला हवे.

बाकी, वर जे काही चांगले अनुभव आहेत ते रिक्षावाल्यांच्या चांगल्या स्वभावाविषयी असल्याने प्रवाशांना एकवेळ सेक्युअर वाटु शकत असले तरी त्यास सेफ नक्कीच म्हणता येणार नाही.

अर्थात हे मुंबईतील रिक्षाचालकांविषयी असल्याने माझा अनुभव फारसा नाहीच. मुंबईत बेस्टची सेवा ही नावाप्रमाणेच अतिशय उत्तम असल्याने मी मुंबईत फिरताना रिक्षाचा वापर केलाच नाही. तसेच जवळच्या अंतराकरिता पायी चालणे सोयीस्कर वाटले आणि लांबच्या अंतरावर तातडीची गरज असल्यास क्वचित प्रसंगी टॅक्सीचा वापर केला आहे.

पुण्यातील रिक्षावाल्यांच्या अनुभवावर मात्र एक स्वतंत्र लेख लिहीलेला आहे.

http://www.at-least-i-think-so.blogspot.in/2010/12/blog-post_6774.html

रोज सन्ध्याकाळी बोरिवली स्टेशनला लाईन असते अशा लोकान्ची .म्हनून मी हल्ली स्टेशन ते घर चालत जाते , रिक्शासाठी हात दाखवत उभं रहाणं पटत नाही. >>>>>>>>>>>

स्वस्ति,
मी सकाळी डॉन बास्को कडून रिक्षा पकडते अगदी शिस्तीत लाइन मध्ये उभे राहिले कि मिळते रिक्षा नाहीतर त्या बस च्या मागे कोण धावेल. संध्याकाळी मात्र मीही चालतच येणे प्रिफर करते.

मला एकदा जटा शंकर प्रसाद नावाचा उत्तर भारतीय रिक्षावाला भेटला होता. जुनी गोष्ट आहे. १९९७ ची.
तर खूपच बोलत होता. व बोलता बोलता त्याने दोन खून पाडल्याचे सांगितले. मी कसे बसे हां हां करत घरा परेन्त आले. व पैसे देउन गायब.

इथे परत आल्यावर माझ्याकडे नेहमीच छोट्या अत्तराच्या बाटल्या असतात. एकाला चुकून दिल्या. तेव्हा महाराश्ट्रात परत आल्याचा व सर्वांशी संवाद साधण्याचा फार उत्साह होता. असे देणे चूक आहे हे माहीत असूनही लावेल की. अश्या भोळसट पणाने दिल्या. गावी जाताना घेउन जातो म्हटला. पण मग त्याने फारच मागे लागल्यासारखे केले. व खूप चौकश्या. साहेब कुठे राहता कूठे फोन करतो रोज तुम्हाला सोडतो इत्यादि.

मग मी पटकन स्कूटर घेउन टाकली व हळू हळू त्याला तोडून टाकले. तेव्हा पासून कानाला खडा. मुंबईत किंवा कुठे ही वाहन चालकाशी जरुरीपेक्षा जास्त बोलायचे नाही. माहिती द्यायची नाही. पुण्यातले रिक्षावाले फारच आगाउ असतात त्यामानाने मुंबईतले जरा प्रॅक्टिकल असतात. परवा रात्री आम्हाला साडेदहाला पण रिक्षा मिळाली व त्याने नीट बांद्रा ते सायन सोडले. गर्दीही खूपच होती अर्थात.

मद्रासचे तर लै चोरपणा करतात. एकदा अगदी कमी अंतराला ५० रु घेतले होते.
बंगलोरास एकदा अगदी रात्री ९ वगिअरे वाजता एका रिक्षेत होतो. हॉटेलात परत जात होतो. तर आटोतला गॅस संपला. त्याने वस्तीत जाउन आणतो म्हटले. व आम्ही तसेच तिथे अंधारात. जाम भीती वाटत होती. पण तो ग्यासचे कायते घेउन आला व नीट सोडले त्याने. व्हाइट फील्ड मधील जिंजर हाटेलापाशी.

म्हातारे टॅक्सिवाले जास्त डेंजर. कारण काही लोक्स ना वयाप्रमाणे दिसत नाही तरी पैसे मिळवायला करतात काम पण आपला जीव धोक्यात येउ शकतो.

पैशात, अंतरात फसवणे, हे ही कॉमन आहे. अगदी देवमाणूस नसतात ते. त्यामुळे फार विश्वास टाकू नये हे मा वै म. काम झाले कि ओके. बाय.

सांगायचा मुद्दा हा की मुंबईचे रिक्षावाले म्हणले की अचानक त्यांच्यावर सोन्याचा शिक्का मारू नका. चांगलेवाईट सगळीकडेच असते.
>>>>
अर्थातच सहमत,
लेखात चांगले अनुभव आल्याने बरेच लोकांचे चांगले अनुभव आठवणे सुरू झाले इतकेच असावे.

पण येस्स मला ज्या दोनचारपाच शहरातील रिक्षांचा बरेपैकी अनुभव आहे त्यापैकी तुलनेत मुबईच परवडली हे नक्की. (वादाला आमंत्रण नको म्हणून त्या गावशहरांचे नाव घेत नाही.) आणि रिक्षाचेही सोडा, सुरक्षित म्हणाल तर ती मुंबई तुलनेत आहेच.

पण मग त्याने फारच मागे लागल्यासारखे केले. व खूप चौकश्या. साहेब कुठे राहता कूठे फोन करतो रोज तुम्हाला सोडतो इत्यादि. मग मी पटकन स्कूटर घेउन टाकली व हळू हळू त्याला तोडून टाकले. <<सीरीयसली??? हसावे का रडावे ते कळेना!!!

मूंबईमध्ये फिरताना कधीच भिती वगैरे वाटत नाही हे खरंय.

मद्रासमधले ऑटोवाले एकजात चोर आहेत. पब्लिक ट्रान्स्पोर्ट हा प्रकारच इथं धड नाही. तो शेअर ऑटोचा अजून एक अगम्य प्रकार आहे. सामान्य उंचीचा माणूस त्यात बसूच शकत नाही. शिवाय इतकुश्या अंतरासाठी पण पन्नास रूपये मिनिमम. परिणामी मद्रासमध्ये फिरायचे असेल तर कायम टॅक्सी ठरवूनच फिरावे. मागे अम्मानं काय तरी मीटर रिक्षा चालू केल्या होत्या त्यांचा यथास्थित बोर्या वाजलेला आहे.

Pages