भारत-पाक सामना एक भावनिक गरज ...??

Submitted by ऋन्मेऽऽष on 15 February, 2015 - 13:01

सचिन आणि सिनीअर खेळाडूंच्या निवृत्तीनंतर आणि सेहवाग-युवराज-भज्जी यांच्या अनुपस्थितीत यावेळी विश्वचषकात नेहमीसारखी क्रेझ कुठेतरी मिसिंग असेल असे वाटत होते. नव्हे आहेच. तसे म्हटले तर हल्ली सोशलसाईटवर असे उत्सव फॉर्वर्डस पाठवून साजरे करायची पद्धत आल्याने तिथे तेवढे थोडीफार धामधूम दिसत होती. पण तरीही काहीतरी मिसिंग मला स्वताला तरी वाटत होते. कदाचित माझ्या आवडीचे खेळाडू संघात नसल्याने, वा गेल्या चार महिन्यातील भारतीय संघाची खराब कामगिरी, किंवा आयपीएल वगैरेमुळे एकंदरीतच वाढलेल्या क्रिकेटचा ओवरडोस झाल्याने असेल..... पण एकेकाळी जसे ऑस्ट्रेलियाचा सामना म्हटले तर अलार्म लाऊन उठायचो आणि आपली बॅटींग असेल तरच बघायचे, नाही तर परत झोपायचे, असे ठरवूनही आपली बॉलिंग देखील बघितली जायची, तसे काही या विश्वचषकात मी करणार नाही याची खात्री होती. किंबहुना गेले चार-पाच वर्षे हे करणे सोडलेय.

पण विश्वचषकाचा पहिलाच सामना पाकिस्तानशी होणार असल्याने विश्वचषक जिंकणे एकीकडे आणि पाकिस्तानशी जिंकणे एकीकडे अशी आपली स्थिती होत असल्याने या सामन्याची तेवढी उत्सुकता लागून राहिली होती. आणि ती देखील आज नाही तर जवळपास वर्ष-दोनवर्षांपूर्वी जेव्हा विश्वचषकाचा टाईमटेबल ठरवला गेला होता अगदी तेव्हापासून..

चार दिवसांपूर्वी दिल्ली निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर राजकारण एके राजकारणाच्याच विषयावर गप्पा मारणारे माझे मित्र अचानक क्रिकेटमध्ये रस घेऊ लागले. माझ्या जवळपास सर्वच व्हॉट्सप ग्रूप्सची नावे "जितेगा भाई जितेगा", "कमॉन ईंडिया" वगैरे वगैरे होत दोन दिवस आधीच त्याला अनुरूप असे प्रोफाईल पिक्चर लागले. ज्यांना क्रिकेटमध्ये मुळातच रस होता त्यांचे तर विचारायलाच नको. पण कालची १४ फेब्रुवारीची वॅलेंटाईन संध्याकाळ मावळताना उरलेसुरलेही फक्त आणि फक्त क्रिकेटच्या रंगातच रंगून गेले. अगदी ओळखीच्या काही मुलीही ज्यांना केवळ क्रिकेटर आणि बॉलीवूड अभिनेत्री यांच्या गॉसिपिंगपुरताच क्रिकेटमध्ये रस असायचा त्या देखील या सामन्याबद्दल कुजबुजू लागल्या आणि ज्या मुलांना क्रिकेटची स्पेलिंग "सी" वरून सुरू होते का "के" वरून हे देखील माहीत नाही असेही या सामन्याच्या चर्चेत उतरू लागले. बघता बघता माहौल तयार झाला.

माझा रविवारचा एक नियम आहे. आईने अकरा वाजल्यापासून हाका मारायला सुरुवात केल्यावर मी बाराला उठतो. पण तो नियम झुगारून नऊच्या सामन्यासाठी म्हणून आठ वाजताचाच अलार्म लावला. कारण टॉस, पिच रीपोर्ट आणि प्रत्यक्ष सामना सुरु व्हायच्या आधी तास-दीड तास एक्स्पर्ट लोकांची चर्चा, जी इतरवेळी माझ्यामते बाष्कळ बडबड असते, ती देखील या सामन्याच्या आधी चुकवायची नव्हती. ‘मॅच बघायला बरोबर उठतोस’, अशी आईने दरवेळची किटकिट आज केली नाही, कारण तिला देखील या सामन्याचे महत्व माहीत होते. आज नाही उठणार तर कधी उठणार, झोपायला उरलेला अख्खा दिवस पडलाय. याबदल्यात आईचा त्रास कमी करावा या हेतूने नाश्त्याला झटपट सॅंडवीच आणि दुपारचे जेवण बाहेरून मागवायचे ठरवले. थोडक्यात तहानभूक हरपून आज आपण सामना एंजॉय करणार याची स्वत:लाच खात्री होती. एवढेच नव्हे तर या नादात आंघोळही राहिली. कारण पहिली बॅटींग आपलीच असल्याने आंघोळीसाठी पंधरा मिनिटे वेळ काढायची संधी धवन-कोहली-रैना या त्रिकूटाने दिलीच नाही. दोन इनिंगच्या मधील लंचब्रेकलाच काय ती आंघोळ उरकली आणि माझ्यामते आज असे करणार कित्येक जण असावेत.

गंमत म्हणजे, गर्लफ्रेंडला ना सकाळपासून कॉल होता ना मेसेज!. आणि यापेक्षा मोठी गंमत म्हणजे, याबाबत तिचीही काहीच तक्रार नव्हती. किंबहुना ती असू नये याची काळजी घेतच कालचा वॅलेंटाईन डे त्या हिशोबाने साजरा केला होता!..

पण मित्रांचे बोलाल तर ते सारे व्हॉट्सपच्या माध्यमातून हाताशी होते. एकीकडे सामना बघत बॉल टू बॉल चर्चा करणे हे व्हॉटसपच्या इतिहासात प्रथमच घडत होते.

दुसर्‍या इनिंगला मात्र त्यांची तिसरी-चौथी-पाचवी विकेट पाठोपाठ पडल्याने क्षणार्धात सामना असा काही पलटला की घरात पाय टिकणे शक्यच नव्हते. एव्हाना नाक्यावर फटाके फुटू लागले होते. दर विकेटगणिक त्यांचा आवाज वाढतच होता. गेल्या विश्वचषकात पाकिस्तानविरुद्ध विजय मिळवल्यावर आमच्या नाक्यावर निघालेल्या मिरवणूकीतील धमाल अजूनही आठवणीत ताजी होती. आंघोळीचे अंग सुकल्याने आता घराबाहेर पडायला हरकत नव्हती. उरलेला सामना कुठेतरी मित्राच्या घरात वा मित्रांचे टोळके बनवून गल्लीतल्या दुकानात बघूया म्हणत बाहेर पडलो, तर एक सुखद धक्का बसला. ग्राऊंडफ्लोअरच्या घरातला टीव्ही पॅसेजमध्ये काढून आधीच गर्दी जमली होती. पुढचा सामना तिथेच साजरा झाला. शेवटी शेवटी तर पाकिस्तानचा लांबणारा डाव सुद्धा सर्वांना हवाहवासा वाटू लागला, कारण हा सामना बघण्याची धमाल आणखी अनुभवायची होती. शेवटपर्यंत सामना गेला तर तो देखील काही जणांना हवा होता कारण त्यातलाही थरार अनुभवायचा होता. पण त्या नादात हरणे कोणालाही मंजूर नव्हते. अन अखेर जिंकलोच ...

भारतीय क्रिकेटसंघाचे सारे अपराध एका क्षणात माफ केले या विजयाने. कोहली हा भारतीय संघाचा सुपर्रस्टार होताच आणि आजच्या त्याच्या सामनावीराच्या कामगिरीने यावर शिक्कामोर्तब केले, कारण तो भारतीयांसाठी सर्वात महत्वाच्या असलेल्या सामन्यात खेळला होता. हो सर्वात महत्वाचा सामना, अगदी विश्वचषकाच्या अंतिम सामन्यापेक्षाही किंवा त्याच तोडीचा. कारण असे कित्येक क्रिकेटरसिक असतील ज्यांना विश्वचषक किंवा पाकिस्तानविरुद्ध विश्वचषकातला विजय असे दोन पर्याय दिले तर ते दुसरा पर्याय निवडतील. भारतीय क्रिकेट रसिकांचा निव्वळ आजचाच दिवस सार्थकी लागला नसून आता पुढच्या विश्वचषकापर्यंत पुन्हा ते हा अभिमान बाळगू शकणार होते की आपल्याला पाकिस्तान विश्वचषकात हरवूच शकत नाही. याउलट जाहिरातीत दाखवल्याप्रमाणे पाकिस्तानी क्रिकेट रसिकांचे १९९२ साली विकत घेतलेले फटाके आणखी चार वर्षांसाठी तसेच पडल्या जागी सडणार होते. कारण पाकिस्तानविरुद्ध विश्वचषक विजयाचा भारताचा आज षटकार लागला होता!.

.......

पण ..
विजयाची धुंदी अजूनही पुर्णत: उतरली नसली तरी आता घरी आल्यावर लॅपटॉप उघडत चार ठिकाणी अभिनंदनाच्या पोस्ट टाकाव्यात असा विचार करतानाच एक विचार आणखी डोक्यात आला. पाकिस्तान विरुद्ध मिळवलेल्या या विजयाचा आनंद नेमका का आणि कश्यासाठी? ते आपले पारंपारीक शत्रू आहेत म्हणून? पण हे पारंपारीक शत्रूत्व आले कुठून? याचे उत्तर ईतिहासात शोधायला गेले तर नक्कीच ते क्रिकेटशी संबंधित नाही सापडणार. म्हणजे आपले शत्रुत्व हे क्रिकेटवरून झाले नसून ते शत्रुत्व निभवायाचा क्रिकेट हा केवळ एक मार्ग आहे. पण मग क्रिकेटच का? कारण तो दोन्ही देशांतील बहुतांश लोकांच्या आवडीचा खेळ आहे, आणि त्यात विजय मिळवल्याने आपण एकाच फटक्यात आपल्या शत्रूदेशाच्या लाखोकरोडो लोकांना निराश करू शकतो. पण मग तेच शत्रुत्व निभवायला म्हणून दुसरीकडे आपण पाकिस्तानशी क्रिकेट खेळण्यावर बहिष्कार टाकतो ते का? भले त्यांच्याशी मैत्रीपुर्ण खेळ करणे शक्य नाही हि यामागची भुमिका असावी, पण....

........पण मग असा कधीकाळी विश्वचषकात होणारा भारत-पाक सामना बघायची उत्सुकता, हि हुरहूर, या सामन्याची वाट बघणे, आणि तहानभूक हरपून, हातातली कामे टाकून या सामन्याचा आनंद, येस्स आनंद, उचलणे हे सारे करताना आपल्या पारंपारीक शत्रुत्वाच्या भावनेवर आपले या खेळावरचे प्रेम मात तर नाही ना करत ??

कि आपल्या मनात कितीही शत्रूत्वाच्या भावना असल्या तरी सीमेवर जाऊन प्रत्यक्ष युद्धात सहभाग नोंदवणे आपल्याला शक्य नसल्याने केवळ त्या भावनांचा निचरा होण्यासाठी म्हणून आपण या सामन्यांकडे बघतो?

विचार करा आणि विचारांशी प्रामाणिक राहणे शक्य असल्यास मांडा, जर तो विचार आपल्या आनंदात खडा टाकणारा असेल तर सोडून द्या Happy

सर्वांना भारतीय विजयाच्या हार्दिक शुभेच्छा आणि भारतीय संघाचे अभिनंदन!!

- ऋन्मेऽऽष

Group content visibility: 
Public - accessible to all site users

ऋन्मेष सही लिहीलयस रे !!! सुरवातीला हलक फुलक वाटलं तरी शेवट विचार करायला लावणारं.

कबीर,
भारत-पाक विश्वचषक सामन्यावर मी धागा काढू शकलो नसतो तर येती चार वर्षे हि खंत मनात कायम राहिली असती. Happy

असो, जोक्स अपार्ट, तुम्ही आपले प्रामाणिक मत नक्की मांडा. मी उद्या पुन्हा नवीन मूडमध्ये ( आजच्या भावनांचा आवेग ओसरल्यावर) पुन्हा यावर विचार करून बघतो.

ऋन्मेष,

कृपया हा प्रतिसाद विचारात घ्या अशी विनंती.

१. भारत पाकिस्तानमधील फक्त विश्वचषकीय सामनेच भारताने अधिक (म्हणजे पूर्णच्या पूर्ण) जिंकले आहेत. मात्र आजवरचा एकदिवसीय सामन्यांचा दोन्ही संघांचा डेटा बघितला तर नक्कीच पाकिस्तान जास्तवेळा जिंकलेले असेल. ह्याचे कारण त्यांनी कायम दाखवलेली जिगर आणि आपण न दाखवलेली जिगर! ह्याशिवाय तुफानी गोलंदाजी, जिहाद समजून फलंदाजी करणारे मियाँदाद, अईद अन्वर, इंझमामसारखे फलंदाज ही त्यांची बलस्थाने! आपण कधीच त्यांची गोलंदजी मॅच करू शकलो नाहीत. फलंदाजीतही चक्क चक्क श्रीकांत आणि नंतर सचिन येईपर्यंत आपले बरेच खेळाडू दिव्यच होते. ते सेटल वगैरे होत असत एक दिवसीय सामन्यात! ह्या सर्वावर कडी म्हणजे पाकिस्तान हा राजकीय शत्रू! आणि त्या सर्वावर कडी म्हणजे भारताला पाकिस्तानने विश्वचषकात एकदाही हरवलेले नसणे! ह्या सगळ्याचा एकत्रीत परिणाम म्हणून मीडियाकडून हे पेटवले जाते आणि त्यामुळे पेटून उठणारा एक स्तर नेहमीच समाजात असतो.

२. भारताच्या १२० कोटी जनतेच्या क्रिकेटप्रेमावर आज क्रिकेट तरले आहे असे म्हणता येण्यासारखी अवस्था आहे. सगळा पैसा, व्यापार, व्यवहार, क्रेझ, जाहिराती हे प्रामुख्याने भारतीय प्रेक्षकांना केंद्रस्थानी ठेवल्याप्रमाणे घडताना दिसतात. अश्यात जर पाकिस्तानशी किंवा ऐन महत्वाच्या सामन्यात आपण हरलो तर ते जिव्हारी लागून जर लोकांनी स्वारस्य काढून घेतले तर हा क्रीडाप्रकार नष्ट होण्याच्या मार्गाला लागू शकेल. हे सगळे बोलण्याइतकी कोणाचीही टाप / अधिकार / माहिती असू शकत नाही, पण अतिशय (पुन्हा लिहितो, अतिशय) वरच्या वर्तुळांत काय ठरत असेल आणि कोण कसे जिंकत असेल हे सामान्यांना समजणे अशक्यप्राय आहे. पण म्हणून तसे ते ठरत नसेलच असेही नाही. Happy

शेवटी ह्यावर लाखो लोकांचे 'चांदी होणे' अवलंबून आहे.

Absolutely! मी विश्वचषकात भारत पाक सामना पाहिल्याशिवाय राहू शकत नाही! It's in my blood! इथे सारासार विचार, संघाची स्थिती, आपली स्थिती (परीक्षा, अभ्यास, नोकरी वै.) सगळं सगळं थोडा वेळ बाजूला ठेवून मी माझ्या देशाच्या टीमला चीयर करते! It's a sport and it's "the rival team"! I just can not "not watch it"!
कालची match पाहताना मला का कोण जाणे unhealthy खुन्नस कमी आणि healthy sporty rivalry जास्ती वाटली. मैदानात आणि मैदानाबाहेर देखिल! आपण फार काही ग्रेट खेळत नाहीयोत पण तरी इथे १००% द्यायचे आहेत हे दोन्ही टीम्सना आणि प्रेक्षकांना माहिती असल्याने खरा खेळ झाला!

जिज्ञासा १००% माझ्या मनातली बोललीस बघ!

पण ऋन्मेषच्या मुळ प्रश्नाचे उत्तर प्रत्येकाचे वेगवेगळे असु शकेल.

माझ्यापुरते सांगायचे तर भारत पाकिस्तान क्रिकेट सामना बघणे ही माझ्यासाठी भावनिक गरज आहे का किंवा कुठलीही क्रिकेट मॅच मी का बघतो किंबहुना कुठलाही स्पोर्ट्स इव्हेंट मी का बघतो व ते बघण्याची मला गरज का वाटते व ते बघताना मला आनंद का होतो या प्रश्नाचे उत्तर मी माझ्या ऑलिंपिक्स बीबी च्या गोष्टी लिहीताना एकदा कधीतरी लिहीले होते ते परत इथे लिहीतो..

मी कुठलाही स्पोर्ट्स इव्हेंट बघत असताना त्या स्पोर्ट्स मधल्या जबरी अ‍ॅथेलेटिसझम असलेल्या स्पोर्ट्समन्/वुमन मधे कुठेतरी आपल्या स्वतःला शोधत असतो. त्यांच्यामधल्या ट्राय टु बी द बेस्ट या प्रयत्नामधे आपल्या स्वतःच्या प्रतिबिंबाला शोधत असतो... आपण सगळेच खर म्हणजे आपल्या स्वत्:च्या निजी आयुष्यात आपापल्या क्षेत्रात व आयुष्यात ट्राय टु बि द बेस्ट असण्याचा प्रयत्न करत असतो व जर तुम्हाला स्पोर्ट्स ची आवड असेल तर अश्या स्पोर्ट्स्मन/वुमन ना बघताना त्यांच्या ट्राय टु बि द बेस्ट प्रयत्नाला दाद द्यावीशी वाटते.. व ते जेव्हा त्यात यशस्वी होतात तेव्हा आपल्याला स्वतःला त्यांच्यात आयडेंटीफाय व्हायला होते व आपणच काहीतरी अचिव्ह केले असा आनंद होतो.

आणी लेट्स फेस इट.. जगामधे गावस्कर, द्रविड, लक्ष्मण, तेंडुलकर व आता कोहली सारखे क्रिकेट खेळाडु , बोर्ग्,मॅकॅन्रो,कॉनर्स्,बेकर्,अ‍ॅगॅसी,सँप्रास, फेडरर, नदाल, जाकोव्हिक,ख्रिस एव्हर्ट लॉइड, मार्टिना नवरातिलोव्हा सारखे टेनिस खेळाडु, जो माँटॅना, टोम ब्रेडि सारखे फुटबॉल प्लेयर्स, टायगर वुड ,जॅक निकलस सारखे गॉल्फ प्लेयर्स.. ही यादी जरी खुप मोठी होउ शकेल.. पण असे यांच्यासारखे सगळेच बनु शकत नाही..पण अश्या वर्ल्ड क्लास अ‍ॅथलिट्सचा खेळ बघताना आपण स्वतःला त्यांच्यामधे शोधत असतो.. निदान मी तरी!

आणखी एक महत्वाची बाब म्हणजे अश्या खेळाडुंना बघत असताना आपण त्यांना फुकटचा सल्ला(त्यांनी न मागीतलेला) टिव्हीवर त्यांना बघत असताना देउ शकतो..व आपण काय केले असते हे त्यांच्यावर घरी बसुन लादू शकतो... उदाहर्णाथ.. अरे नदाल असा बॅकहँड शॉट मारायला पाहीजे होता...किंवा आता ड्रॉप शॉट मारायला हवा होता.. किंवा तेंडुलकर सारख्या बॅट्समनला अरे मॅक्ग्राथला असा एवढ्या आधी पुल करायला नको होता वगैरे वगैरे... व तसे करत असताना आपल्याला आपणही टेनिस प्लेयर किंवा क्रिकेट प्लेयर आहोत व तो शॉट किंवा ती टुर्नामेंट खेळत आहोत असा व्हायकॅरिअसली त्याचा अनुभव घेउ शकतो.. म्हणजे सोफ्यावर बसुन बसुन रोलँ गॅरा किंवा २००३ ची वर्ल्ड कप फायनल खेळ्त असल्याचा अनुभव घेउ शकतो..:) असो.

बेफिकीर.. तुमच्याशी असहमत की भारत जर काल हरला असता तर भारतात यापुढे क्रिकेट ओस पडले असते,, माणसे स्पोर्ट्स का बघतात या सायकॉलॉजीची व्याप्ती जर एव्हढी कोती असली असती तर आपण या आधी पाकिस्तान कडुन कमी वेळेला का हार्ट ब्रेकींग रित्या हरलो आहोत? १९८६ मधल्या शारजाहच्या त्या मियांदादच्या फेमस सिक्सर नंतर मला १-२ आठवडे जेवण जात नव्हते.. भले मी मनातल्या मनात चेतन शर्माला... शेवटच्या बॉलवर ४ धावा हव्या असताना कसा बॉल टाकायचा याचे १०० वेळा प्रशिक्षण दिले होते त्या बॉलच्या आधी...पण म्हणुन मी (व तमाम इतर भारतियांनी !)क्रिकेट बघायचे सोडुन दिले का?

राहीली बाब पैशाची..अहो क्रिकेटच काय.. पण जगातल्या इतर खेळांमधेही पैशाचे एक्सप्लॉयटेशन होते पण म्हणुन क्रिडाप्रेमींनी त्यांना आवडत असलेले स्पोर्ट्सच बघायचे सोडुन द्यायचे काय?मला मान्य आहे की क्रिकेटमधेही स्पॉट फिक्सिंग सारखे प्रकार होत आहेत व होत राहतील.. पण माझ्यासारखा प्युरिस्ट क्रिडाप्रेमी... जोपर्यंत तेंडुलकर, फेडरर, नदाल, ब्रेडि सारखे... असामान्य अ‍ॅथलीट्स या जगात निर्माण होत राहतील तो पर्यंत अश्या वर्ल्ड क्लास अ‍ॅथलिट्स च्या ट्राय टु बि द बेस्ट या त्यांच्यातल्या वृत्तीला सलाम करायला स्पोर्ट्स बघतच राहतील......

>>>भारत जर काल हरला असता तर भारतात यापुढे क्रिकेट ओस पडले असते<<<

माझे मत इतके टोकाचे नव्हे. ग्रॅज्युअली जर स्वारस्य कमी होत गेले तर मोठा फटका बसू शकतो हे त्या क्षेत्रातील व्यापार्‍यांना ज्ञात असेल. तुम्ही आत्ताही बघितलेत तर एक बराच मोठा स्तर क्रिकेटपासून आधीच लांब गेलेला आहे. किंबहुना कालच्या सामन्याबाबत काहीही विशेष उत्सुकता नसलेले खूप जण मलाच भेटले. फक्त कालचा सामना जिंकल्यानंतर त्यांच्या मनात पुन्हा थोडासा इन्टरेस्ट निर्माण झाला.

ही एक प्रक्रिया आहे व ती हळूहळू परिणाम दाखवते असे मला म्हणायचे आहे.

"क्रिकेट" या खेळापेक्षाही जास्त "क्रिकेट" या व्यापाराविषयी मला वैयक्तिकरीत्या जास्त माहिती आहे. आयपीएलच्या इन्सेप्शनपासून सीझन ३ पर्यंत मी त्यावर बरंचसं काम केलेलं आहे. त्या अनुभवाच्या जोरावर इतकं नक्कीच म्हणू शकते की, भारतात क्रिकेटला मरण नाही, इतकंच काय पण क्रिकेटइतकाच प्रोफेशनलिझ्म इतर खेळांत आणल्यास त्याही खेळांना उत्तम प्लॅटफॉर्म मिळू शकतो. नुकत्याच चालू झालेल्या हॉकी, फूटबॉल आणि कबड्डी लीग त्याचे पुरेसे उदाहरण ठरावेत.

कबड्डी लीगच्या टीआरपीचे आकडे सरप्राय्झिंग आणि तितकेच इंटरेस्टिंगही होते.

असेच काही नाही !!! आमच्या सारखे बॉर्डर वर खुन्नस ने एलएम्जी वर मजबुत पकड़ ठेवणारे सुद्धा ह्या मैच खुप एंजॉय करतात!! सरळ युद्धात सहभाग होणे न होणे हा मुद्दाच नसे/नाही/नसेल!!!! कारण?

पाकिस्तान म्हणजे दुश्मन! क्रिकेट असो वा कारगिल, लोळवलाच पायजेल!!!!, भारत जिंकल्यावर 2 मॅगझीन हवेत फायर करायचा आनंद अवर्णनीय असतो! टेक माय वर्ड्स ऑन इट Happy

खूप छान लेख!!

कारण असे कित्येक क्रिकेटरसिक असतील ज्यांना विश्वचषक किंवा पाकिस्तानविरुद्ध विश्वचषकातला विजय असे दोन पर्याय दिले तर ते दुसरा पर्याय निवडतील. >> मी सुद्धा त्यातीलच एक. पण आमच्या घरी केबल नसल्याने ह्या वर्षी सामना पाहू शकले नाही ह्याचे सतत वाइट वाटत राहिल!!

धन्यवाद, मनीमोहोर, बी, सुमुक्ता Happy

बेफिकीर,
आपण अप्रत्यक्षपणे (की प्रत्यक्षपणे?) फिक्सिंगचाच आरोप करत आहात, फक्त हि फिक्सिंग काही खेळाडूंनी वा टीमने केली नसून बिग बॉस चाहते है टाईपची आहे असे म्हणत आहात. एकेकाळी भारताच्या विश्वसुंदर्‍या वरचेवर होऊ लागल्या तेव्हाही असे बोलले जायचे ते आठवले. अर्थात यात तथ्यही असू शकते, गेल्या भारत-पाक सामन्यात सचिनला जसे जीवदान मिळत होते ते पाहून एखाद्याला शंकाही यावी कारण पाकिस्तान म्हटले की फिक्सिंगचा पहिला डाऊट येतो. पण भारताचा जागतिक क्रिकेटमध्ये दरारा गेल्या काही वर्षांत झाला आहे आहे, त्याआधी अशी काही स्थिती नसतानाही आपले जिंकणे याला वरील मुद्द्याच्या आधारे संशयाच्या पिंजर्‍यात नाही उभे करू शकत.

मान्य आहे ऋन्मेष. प्रत्येक विजयी संघाला नेहमीच दूषित नजरेने पाहणे हीच एक खरे तर गंभीर व्याधी म्हणावी लागेल. तसे केल्याने तसे प्रत्यक्षात झालेले नसले तरीही वातावरण गढूळ होते हेही मान्य आहे.

पण तरीही असे अनेक प्रसंग घडून गेल्यापासून काही वेळा ते मनात आल्याशिवाय राहात नाही.

२००७ सालचा विश्वचषक वरच्या गृहीतकांना अपवाद ठरतो. भारत-पाक दोघेही फक्त ३ सामने खेळत स्पर्धेच्या बाहेर आणि बांग्लादेश आयर्लंड वगैरे पुढे गेले आणि एकंदरीतच खूपच निरस विश्वचषक झाला.

कारण असे कित्येक क्रिकेटरसिक असतील ज्यांना विश्वचषक किंवा पाकिस्तानविरुद्ध विश्वचषकातला विजय असे दोन पर्याय दिले तर ते दुसरा पर्याय निवडतील. >> नक्कीच. Happy