कहाणी माझ्या क्रोशेकामाची

Submitted by मनीमोहोर on 11 February, 2015 - 12:18

मायबोलीवर माझ्या क्रोशे कामाचं वेळोवेळी खूप कौतुक झालं आहे . त्याबद्दल सर्व माबोकरांना परत एकदा धन्यवाद. ही आहे माझ्या क्रोशेकामाची कहाणी.

लेकीच्या लग्नानंतरचा पहिला अधिक महिना होता आणि माझी जावयांना वाण द्यायच्या तयारीची लगबग सुरु होती. आता तुम्ही म्हणाल की माझ्या क्रोशेचा अधिक महिन्याच्या वाणाशी काय संबंध? पण आहे..... वाचा तर खरं !!

ताट, निरांजन, अनारसे, लेकीला साडी, दोघांच्या आवडीचा मेन्यु असं सगळं मस्त प्लॅनिंग चाललं होतं.
वाण द्यायचा दिवस ही नक्की झाला होता. कन्या आणि जावयांना अधिक महिन्यात लक्ष्मी- नारायणाचा मान असतो म्हणून कार्यक्रमात काही कमी राहु नये यासाठी माझी धडपड चालली होती आणि त्यात मला खूप मजा ही येत होती.

सगळी तयारी झाली पण बाकी रहिला होता तो वाणावर घालायचा जाळीचा रुमाल !! तो काय अधिक महिन्यात बाजारात गेलं की नक्की मिळेल या खात्रीने तो आणायला मी बाजारात गेले खरी. पण हाय.... पांढरा शुभ्र, नाजुक विणीचा, जाळीदार रुमाल बाजारात उपलब्ध नव्हताच. होते ते जाडे भरडे आणि भडक रंगाचे. त्या वेळी मी मायबोलीची वाचक होते पण सभासद नव्हते त्यामुळे वि.पु. वगैरे मला काही माहित नव्हतं , नाहीतर मायबोलीवर एकसे एक क्रोशे एक्सपर्ट आहेत त्यांना केली असती विनंती मला रुमाल करुन देण्याची. निराश होऊन मी घरी यायला निघाले पण रस्त्यात मला एक आयडिया सुचली आणि त्याच क्षणी माझ्या क्रोशेकामाच्या छंदाचा जन्म झाला. रुमाला ऐवजी भरतकामाचं सामान मिळत त्या दुकानातुन मी एक खूप जाडा दोर्‍याचा गुंडा आणि क्रोशेकामाची सुई आणि मॅजेस्टिक मधुन एक दोर्‍याच्या विणकामाच पुस्तक घेऊन घरी आले. नेट आणि यु टुय्ब होतचं जोडीला.

मला तर हातात सुई कशी धरायची हे ही माहित नव्हतं पण यु ट्युबचा फार उपयोग झाला. खूप परिश्रमाने दोनचार दिवसांनंतर काही साखळ्या घालण्यात मी यशस्वी झाले तेव्हा मला खूप म्हणजे खूप आनंद झाला. कोणी शिकवणारे असेल तर हे काही फार कठीण नाहीये पण मी स्वतःची स्वतःच शिकले म्हणुन जास्त झाला असावा. आता या पुढची पायरी म्हणजे छोटस फुल ( क्रोशेच्या भाषेत मोटिफ ) वगैरे तयार करणे. नेट वर फ्री मधे खूप पॅटर्न होते पण यासाठी पॅटर्न वाचायला शिकणे आवश्यक होते. पॅटर्न नाही वाचता आला तर डिझाईन नीट नाही जमतं. तिथे ही मला नेट चा खूप फायदा झाला. हळूहळु चेन, स्लिप . एस्सी डीसी, मॅजिक रिंग, शेल, पिकॉट , म्हणजे काय ते मला समजायला लागलं आणि एक छोटस फुल करण्यात मी यशस्वी झाले. तो होता एक अगदीच छोटा चार ओळीचाच पॅटर्न पण माझ्यासाठी ती फार मोठी अचिवमेंट होती. त्या काळात क्रोशे माझ्या अंगात भिनलं होतं अगदी. सतत मनात त्याचाच विचार असे.

इकडे वाण द्यायचा दिवस पण जवळ येत होता, हातात वेळ कमी होता पण तरीही रात्री जागून वगैरे मी तीन छोटे छोटे रुमाल विणलेच वाणावर घालण्यासाठी. मी स्वतः विणलेल्या पांढर्‍या शुभ्र जाळीदार रुमालानी झाकलेले वाण जावयांना दिले तेव्हा माझ्या डोळ्यात होता आनंद आणि मुलीच्या डोळ्यात होते आश्चर्य !! मी स्वतःच शिकुन स्वतः विणले याचे तिला नवल आणि कौतुक वाटले होते. मुलीच्या चेहर्‍यावरचे ते भाव पाहुन मला माझ्या सार्‍या कष्टांचे चीज झाल्यासारखे वाटले.

आता क्रोशेकाम हा माझा विरंगुळा झाला आहे. अशी ही माझी क्रोशेकामाची साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी सफल संपूर्ण.

हे आहेत मी केलेले काही नमुने
हे काही सुरवातीचे
१)

From mayboli

२)
From mayboli

३)

From mayboli

हे सरावानंतरचे
४) पायनॅपल आणि पीकॉक पॅटर्न

From mayboli

५)

From mayboli

६) आणि हा अलीकडे विणलेला खूप मोठा ( ४' बाय ३' मापाचा )

From mayboli

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

बाप रे! तुमच्या चिकाटी आणि मेहनतीला सलाम! स्वतःचं स्वतः शिकलात हे तर सगळ्यात भारी! आणि सर्व नमुने सुरेख आहेत!

नवीन गोष्ट शिकण्याचा घेतलेला ध्यास - त्याचा अनुभवपूर्ण अभ्यास आणि त्यातून साकार झालेल्या या एकसे बढकर एक अशा अप्रतिम कलाकृती ...... केवळ ग्रेट आणि ______/\______

मस्त !!!!!

वाह!

Pages