मनाच्या अडगळीमधले

Submitted by जयदीप. on 4 February, 2015 - 02:51

मनाच्या अडगळीमधले बिलोरी आरसे शोधू
तुझ्या हातून घडलेल्या चुकांची कारणे शोधू!

प्रवाहाधीन झालेल्या लुळ्या नावेतले आपण...
"कसे पोहायचे?" यावर नव्याने पुस्तके शोधू!

पिकांच्या राखणीसाठी तुला मी नेमले होते...
तुला जमणार नसले तर नवे बुजगावणे शोधू!

तुझ्या नाजूक प्रश्नांना नकोशी उत्तरे माझी...
तुला समजावण्यासाठी करारी तोडगे शोधू!

किनारा गाठल्यावरती, बढाया मारणे टाळू ..
तुला जिंकायला ज्यांनी दिले ती वादळे शोधू!

...जयदीप

Group content visibility: 
Public - accessible to all site users

वा वा छान गझल
पुस्तके बुजगावणे वादळे हे शेर छान नेमके झाले असे वै.म
तोडगे चा शेरात विरोधाभास चपखल बसवलात
मतल्यातला दोन ओळीतला प्रस्पर संबंध मला लक्षात घेता आला नाही आहे क्षमस्व पण मनाची अडगळ आणि बिलोरी आरसे ह्या कल्पना तरल आहेत दुसरी ओळ छान जमून आली आहे

धन्यवाद

पिकांच्या राखणीसाठी तुला मी नेमले होते...
तुला जमणार नसले तर नवे बुजगावणे शोधू!<<< व्वा व्वा! काय सहज शेर आहे.

किनारा गाठल्यावरती, बढाया मारणे टाळू ..
तुला जिंकायला ज्यांनी दिले ती वादळे शोधू!<<< मस्त

(तुला जिंकू दिले ज्यांनी अशी ती वादळे शोधू - असे एकदा वाचून पाहिले, कृ गै न)

........ तिसरा शेर आवडला..
तुला जिंकायला ज्यांनी दिले ती वादळे शोधू! >>>>>>..
यात जिंकणारा कोण आणि जिंकले कोणाला असा संभ्रम होतोय वाचताना !

सर्वांचे मनापासून आभार

बेफिजी, या पेक्षा मोठी compliment मला आजवर मिळाली नाही

डोळ्यात पाणी आहे माझ्या आत्ता Happy

__/\__

प्रवाहाधीन झालेल्या लुळ्या नावेतले आपण...
"कसे पोहायचे?" यावर नव्याने पुस्तके शोधू! >>>> क्या बात है ...
सुर्रेख गजल ... Happy