अरे, ही तर खोट्याची दुनिया!

Submitted by कोकणस्थ on 20 January, 2015 - 22:49

नास्ति सत्यसमो धर्मो न सत्याद्विद्यते परम् ।
न हि तीव्रतरं किञ्चिदनृतादिह विद्यते ॥

सत्यासारखा दुसरा धर्म नव्हे. सत्यापलीकडे काहीच नाही. आणि असत्याहून अधिक तीव्र काहीच नाही.

एकदा अमेरिकेतील सॅन फ्रॅन्सिस्को शहरातल्या एका नाट्यगृहात चार्ली चॅप्लीन नक्कल स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. त्यात कुणालाही संशय न येऊ देता खुद्द चार्ली चॅप्लीन एक सर्वसामान्य स्पर्धक म्हणून सहभागी झाला होता. मात्र या खोट्याच्या दुनियेची गंमत बघा. स्वतः चॅप्लीन या स्पर्धेत विजयी होऊ शकला नाही. निकालांचा उल्लेख मात्र संदिग्ध आहे. काही ठिकाणी तो तिसरा आल्याचा उल्लेख आहे तर काही ठिकाणी असं म्हटलंय की तो अंतीम फेरीत देखील पोहोचू शकला नाही. मात्र स्वतः चॅप्लीन म्हणायचा की त्याला चॅप्लीनला परीक्षकांची आणि स्पर्धकांची इतकी दया आली की ती प्रसिद्ध चॅप्लीनची चाल नक्की कशी असावी याचे धडे द्यायची त्याला त्या क्षणी हुक्की आली. पण आयोजक आणि स्पर्धकांच्या उत्साहाला टाचणी लावण्याची त्याला इच्छा नसावी. म्हणून ती सुरसुरी त्याने महत्प्रयासाने आवरली. त्या स्पर्धेत चॅप्लीनच्या प्रवेशिकेचा नक्की निकाल काय लागला तो परमेश्वरालाच ठाऊक. मात्र चार्ली चॅप्लीन त्याचीच नक्कल करायच्या स्पर्धेत विजयी ठरू शकला नाही हे मात्र खरं. वरच्या सुभाषितात म्हटल्याप्रमाणे असत्याहून तीव्र काहीच असू शकत नाही. अरे, ही तर खोट्याची दुनिया!

आता अमेरिकेतून जरा भारतात येऊया. मनोजकुमार उर्फ भारतकुमारचा भगतसिंग-सुखदेव-राजगुरू यांच्या बलिदानावर आधारित चित्रपट शहीद हा १९६५ साली भारतातल्या अनेक चित्रपटगृहात प्रदर्शित झाला आणि तो पर्यंत आलेल्या सगळ्या ऐतिहासिक चित्रपटांना मागे टाकत न भूतो न भविष्यति असं घवघवीत यश मिळवलं.

प्रसिद्ध लेखक जॉर्ज बर्नार्ड शॉ यांचं एक प्रसिद्ध वाक्य आहे: Newspapers are unable, seemingly to discriminate between a bicycle accident and the collapse of अ civilization. वर्तमानपत्रांना एक सायकल अपघात आणि एखाद्या संस्कृतीचं लयाला जाणं, नष्ट होणं यात फरक करता येत नाही. शहीद या चित्रपटाबद्दल वाचलं तर वर्तमानपत्रांना निव्वळ हेच नव्हे तर खर्‍याखोट्यामधेही फरक करता येत नव्हता, अजूनही करता येत नाही हे स्पष्ट होतं. शहीद प्रदर्शित झाला आणि त्याच्याबद्दल वर्तमानपत्रातून भरभरून लिहून येऊ लागलं. एका समि़क्षकाने चित्रपटाबद्दल बरंच काही स्तुतीपर लिहून थोडीशी टीका करताना पुढे लिहीलं होतं: चित्रपटातल्या तुरुंगाची दृश्य मात्र तितकीशी खरी वाटत नाहीत.

हे वाचून मनोजकुमारने कपाळाला हात लावला. त्याला यावर हसावं का रडावं ते कळेना. मनोज कुमारने या चित्रपटासाठी प्रचंड कष्ट उपसले होते. चित्रपटाच्या पूर्वतयारीचा भाग म्हणून भगतसिंगच्या आईशी चर्चा करण्यापासून त्याला अगदी ओझरतं भेटलेल्या एखाद्या माणसाशीही बोलणं त्याने वर्ज्य केलं नव्हतं. चित्रपटातली दॄश्य परिणामकारक व्हावीत म्हणून चित्रिकरणाची ठिकाणं अत्यंत काळजीपूर्वक निवडली होती. तुरुंगातलं चित्रिकरण अधिकाधिक वास्तव वाटावं म्हणून मनोजकुमारने ते लुधियाना तुरुंगात केलं होतं. चित्रपटातले प्रमुख कलाकार वगळता तुरुंगातल्या इतर कैद्यांच्या भूमिकांमधे 'एक्स्ट्रा' कलाकार नव्हे तर त्या तुरुंगातले खरेखुरे कैदी वापरण्यात आले होते. तुरुंग खरं, कैदीही खरे. मात्र ह्या खर्‍या गोष्टी त्या समीक्षकाला 'तितक्याशा खर्‍या' वाटल्या नाहीत. कदाचित खरा तुरुंग आणि खरे कैदी त्याने कधी बघितलेच नसावेत. खरं काय ते आयुष्यभर कधीही न बघता, न तपासता जे खरं आहे हे तितकंसं खरं वाटत नाही असं त्याने ठोकून दिलं होतं. आहे की नाही गंमत?

अरे, ही तर खोट्याची दुनिया!!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

'पहावे मनाचे' काय आहे व कुठे आहे?

यातिल सत्य हेच आहे की खुद्द चार्ली चॅप्लीन एक सर्वसामान्य स्पर्धक म्हणून सहभागी झाला होता व स्वतः चॅप्लीन या स्पर्धेत विजयी होऊ शकला नाही.

हेमामालिनी आणि शत्रुघ्न सिन्हा यांची प्रमुख भुमिका असलेला १९७९ -१९८० सालातला एक स्वातंत्र्य संग्रामावर आधारीत सिनेमा आठवतो. यात ज्या स्थळावर शुटींग झाले ते स्थान नक्कीच एखादे जेल व त्या समोरचे मैदान असावे. सिनेमातला प्रसंग आहे की देशभक्त आणि वेशांतरीत चणे वाल्याकडुन चणे घेऊन इंग्रजांचे शिपाई ते चणे खाऊन बेशुध्द पडतात. ( मेरा चना है अपनी मर्जी का असे काहीसे गाणे ) मग तुरुंगात डांबलेले देशभक्तांना तुरुंगातुन सोडवले जाते.

हा प्रसंग आठवला की मराठी काय किंवा हिंदी काय चित्रपटातील संवाद / प्रसंग ( अनेक वेळा ) फारसा विचार न करता बनवलेले असतात. हा अ‍ॅक्सीडेंट रस्त्यावरच्या सामान्य प्रेक्षकांना चांगला समजतो. यासाठी मोठ्या सिनेमा समिक्षकाची अजिबात आवश्यकता लागत नाही.

कोकणस्थ, दुसरी काही कामे नाहीत का? Light 1

लेख आवडला. अजून असे काही किस्से असतील तर वाचायला आवडतील.

खऱ्याची दुनिया राहिली नाही आजकाल साहेब.
नाम्या अरे तुझा आणि खऱ्याच्या दुनियेचा काय संबंध?
मी डायलॉग म्हटला साहेब.

असं काहीतरी अंधुकसं आठवलं एकदम Happy

लेख मस्त! चार्लीचा किस्सा खूप फेमस आहे.

चार्ली चाप्लीनचा किस्सा प्रसिद्ध आहे!

चित्रपट्सृष्टी ही मुळातच केवळ करमणूक असल्याने खोट्याचीच दुनिया या गृहितकावर आधारलेली असते.

बाकी, मारणार्‍याचा हात धरता येतो, पण बुरख्याआडून बोलणार्‍याचं तोंड धरता येत नाही!

छान लेख

अशीच एक बेंबें बकरीच्या आवाजाच्या मिमिक्रीची कथा ऐकलेली, खर्‍या बकरीला कपड्यात लपवून चिमटा काढला तर तिच्या आवाजानेही प्रेक्षकांना मजा नाही आली.. अशी काहीशी..

पण ...

माझ्या मते नक्कल हि एक कला आहे... त्याला खोट्याची दुनिया म्हणने तितकेसे पटत नाही.. यातून निघणारे तात्पर्य गंमतीशीर असले पाहिजे, नकारात्मक नसावे.

असे माझ्या बाबतीत तर अनेकदा होते.
माझी मते काय आहेत हे मी सांगितले तरी माझ्या बायकोच्या मते माझी मते काय आहेत यावर लोक जास्त विश्वास ठेवतात.

ये दुनिया अगर मिल भी जाये तो क्या है असं म्हणत एका उमद्या माणसाने जगणंच थांबवलं आणि नंतर तीच त्याच्यावर फिदा झाली . काय किती आणि कसं म्हणावं हिला?

लेख आवडला..

थोडे अवांतर - या बाबतीत डॉ लागू आणि विजया मेहता म्हणतात, कि कलाकृती या वास्तव नसतातच तर तसा आभास असतो. आणि हा आभास जास्तीत जास्त वास्तवाच्या जवळ न्यायचा प्रयत्न करायचा असतो.

खर्‍या-खोट्या चा भाग नाही, पण मनोज कुमारांच्या चित्रपटाचा भाग वाचुन मल कमलहासन च्या हे राम ची आठवण झाली. हे राम मधले त्याचे कास्टींग आठवा....प्रत्येक व्यक्ती चे कास्टींग त्याने तो कुठल्या भागातला आहे, काय जाती-धर्माचा आहे त्या नुसार केली होती, जास्त ऑथेंटीक वाटावे म्हणुन. उदा: शाहरुख हा खरोखर चा पठाणी आहे, त्याला नायकाचा पठाणी मित्र अमजद अली खान ची भुमिका दिली होती. अतुल कुलकर्णी ला श्रीराम अभ्यंकर ची मराठमोळी भुमिका होती, राणी मुखर्जी ला अपर्णा ह्या साध्या बंगाली स्त्री ची भुमिका दिली होती. तर हेमा मालिनी स्वतः अयंगार आहेत त्यांना तशी भुमिका होती. पण तो चित्रपट चालला नाही. मे बी तो लोकांना जरा अतिरंजीत वाटला.