आमच्या मुलींचे पालक ( इथे पुन्हा टाईप केलेले. लिंक नव्हे)

Submitted by स्वीट टॉकर on 13 January, 2015 - 05:47

आमच्या घरी हॉलमध्ये बर्‍यापैकी मोठ्या साइझचा एक फोटो आहे. मी, माझी पत्नी शुभदा आणि तिच्या हातात आठ महिन्यांची आमची कन्या पुनव. मूळ फोटो पंचवीस वर्षें जुना. एकदम ordinary.

आमची एक मानसकन्या देखील आहे. तिचं नाव दीपाली. तिच्याकडे हा जुना छोटासा धूसर फोटो होता. फोटोशॉप सॉफ्टवेअरची उत्तम माहिती आणि बरीच मेहनत यांच्या जोरावर तिनी या फोटोला नवजीवन दिलं, एनलार्ज केला, चांगल्या फ्रेममध्ये लावून एक महिन्यापूर्वी आम्हाला भेट दिला. अर्थातच आम्ही कौतुकानी तो हॉलमध्ये टेबलावर ठेवला.

आता उत्तरार्ध.

शुभदा छपाईची कामं करते. अनंतचतुर्दशीच्या दिवशी तिचं ऑफिस बंद होतं. एका जोडप्याला त्याच दिवशी तातडीनी त्यांचा जॉब हवाच होता. त्यामुळे हिनं त्यांना डिलिव्हरी घ्यायला आमच्या घरीच बोलावलं. ते जोडपं जेव्हां आमच्या घरी आलं तेव्हां ही आंघोळीला गेली होती. मी टिवल्याबावल्या करंत हॉलमध्ये बसलो होतो.

त्यांच्याशी गप्पा मारायला सुरवात केली. नवरा टिपिकल – म्हणजे मितभाषी. चेहर्‍यावरचे भाव म्हणजे आपण बायकोबरोबर शॉपिंगला गेल्यावर कंटाळून दुकानातल्या स्टुलावर बसल्यावर आपल्या चेहर्‍यावर जसे असतात तसे. बायको पण टिपिकल – म्हणजे बोलकी. चेहरा देखील बोलका. उत्तम निरीक्षणशक्ती. दहा मिनिटात त्यांनी हॉलमधल्या वस्तूंबद्दल बरीच माहिती मिळवली आणि स्वतःची सांगितली देखील. माझ्या लहानपणी आमच्या घरी भिंतीवरचं एक घड्याळ होतं. त्याचं डायल पारदर्शक होतं. त्यातून आतली चालणारी सर्व मशिनरी स्पष्ट दिसायची. ताईंचा चेहरा तसा होता. डोक्यात चाललेले सर्व विचार चेहर्‍यावर दिसत होते. ओघाओघात त्यांची नजर या फोटोकडे वळली.

आता अशा फोटोबद्दल थोडंसं. एन्लार्ज केलेला फोटो जर एक व्यक्ती किंवा एका दाम्पत्याचा असेल, भिंतीवर लावलेला असेल आणि फ्रेम जुनी असेल तर त्याला हार घातलेला असतो. अशा फोटोबद्दल कुठलाही विनोद करायचा नसतो. त्याबद्दल काहीही बोललं तर 'त्यांनी किती सोसलं' याबद्दल बौद्धिक मिळायची शक्यता असते. याउलट मात्र एन्लार्ज केलेला फोटो टेबलावर असेल, त्याला हार नसेल आणि फ्रेमची क्वॉलिटी उत्तम असेल तर मात्र तो नुकताच काढलेला आहे असं वाटणं स्वाभाविक आहे.

आमच्या मानसकन्येचं कौतुक करावं यासाठी मी तोंड उघडणार इतक्यात ताई म्हणाल्या, “तुमचा मुलगा, सून आणि नात वाटतं.”

मी प्रथमच अशा वेगळ्या नजरेनं त्या फोटोकडे बघितलं. आम्हाला मुलगा नाही. पण त्यांना तसं वाटणं साहाजिक होतं. तोच चेहरा. मात्र फिगर वेगळी आणि विपुल केस.

च्यायला, जाहिरातींचा कसला इफेक्ट असतो आपल्यावर ! ‘विपुल’ हा शब्द कोणी बोली भाषेत वापरतो का? पण भरगच्च केस दिसले आणि ‘विपुल’ हाच शब्द मला सुचला. असो.

मी नाहीतरी टिवल्याबावल्याच करंत होतो. मजेदार गैरसमजुतीची सुरेख संधी चालून आली होती. मी ठरवलं. अजिबात खोटं न बोलता हे संभाषण याच मार्गावर किती वेळ टिकवून ठेवता येतं ते बघू !

मी त्यांच्याकडे बघून फक्त स्मितहास्य केलं. काय काढायचा तो अर्थ काढा.

“तुमची नात किती गोड आहे.” ताई.

बुद्धिबळात एक ‘ब्लिट्झ’ नावाचा सुपरफास्ट प्रकार असतो. त्यात दर काही सेकंदात एक चाल करावी लागते. माझ्या दृष्टीनी तसा डाव सुरू झाला होता.

“लहान मुलं इतकी निरागस असतात, सगळीच गोंडस दिसतात.” मी.

या क्षणी शुभदाची एन्ट्री झाली. “मी सगळे पॅक केले आणि तुम्हाला दाखवायला एक प्रिंट बाहेर काढून . . . . . . . .” असं जॉबबद्दलच बोलत आली पण ताईंनी तिला मधेच तोडलं. “अय्या तुमची सून कित्ती तुमच्यासारखी दिसते !” जबरदस्त निरीक्षणशक्ती !

शुभदा अवाक् ! तिला काहीच कळेना. “सून? कुठली सून?”

कुठल्याही क्षणी भोपळा फुटणार हे मला कळून चुकलं. पुढची मूव्ह लगेच करणंच आवश्यक होतं.

फोटोकडे बोट दाखवून मी म्हटलं, “या दोघांचं लग्न झालं आणि त्यानंतर आमचं दोघांचं प्रेम एकमेकावर बसलं.” एकही शब्द खोटा नव्हता. आमचं लग्न पूर्णपणे पारंपारिक. म्हणजे लग्नाआधी अगदी जुजबी ओळख. लग्नानंतर प्रेम झालं.

त्या दोघांच्याही भुवया वर गेल्या. डोक्यातल्या गोंधळामुळे ताईंची दोन बोटं तोंडाकडे गेली. दोघांनी एकमेकांकडे पाहिलं. नवर्‍यानं डोळे क्षणभर मोठे करून ताईंना दटावलं. ताईंनी चट्कन् तोंडातली बोटं काढली ! त्या आळीपाळीनी माझ्याकडे, शुभदाकडे, फोटोकडे आणि नवर्‍याकडे बघू लागल्या.

गेस्ट शुभदाचे. आणि तिला मात्र आमच्या अर्थहीन प्रश्नोत्तरांचा आणि त्या दाम्पत्याच्या आविर्भावांचा अजिबात संदर्भ लागत नव्हता. ती हैराण ! तिनी प्रश्नार्थक मुद्रेनी माझ्याकडे पाहिलं. मी तिला डोळा मारला. तिनी छताकडे बघत सुस्कारा टाकला. बायकांच्या सुस्कार्‍याचे परस्परविरोधी कित्येक अर्थ असतात हे सांगण्याची जरूरच नाही. आजचा अर्थ होता, “माझे क्लायंट आहेत. जपून.”

आता त्या फोटोकडे टक लावून बघत होत्या. फोटो आमचाच जुना असेल असं त्यांच्या स्वप्नातही आलं नाही. ताईंच्या डोक्यातल्या शंका कुशंका आणि विचार चेहर्‍यावर स्पष्ट वाचता येत होते आणि मी वाचनाचा आनंद घेत होतो. ‘सरांचा मुलगा आणि बाईंची मुलगी यांचं लग्न झालं आणि त्यानंतर सरांचं आणि बाईंचं लग्न झालं ?’ विचित्रच आहे गडे.

म्हणजे एक शक्यता
मुलांची लग्नं झाल्यावर हे व्याही-विहीण प्रेमात पडले आणि आपापल्या पार्टनर्सना घटस्फोट देऊन एकमेकांशी लग्न केलं.
शी! नालायक! अशा लोकांशी संबंध सुद्धा नको !

दुसरी शक्यता
मुलांच्या लग्नाआधीच दोघेही घटस्फोटित होते.
पहिलं निभावता आलं नाही, दुसरं काय निभावणार?

तिसरी शक्यता
दुर्दैवानी दोघांचेही पार्टनर्स देवाघरी गेल्यामुळे दोघांनी आपापली मुलं एकेकट्यानीच वाढवली. नेमकं यांच्याच मुलांचं एकमेकाशी लग्न झालं. मग यांचं.
असं असलं तर मस्त आहे. पण हा अतीच कर्मधर्मसंयोग म्हणायचा. याची शक्यता जवळजवळ नाहीच.

काय असेल बरं? फार खाजगी प्रश्न विचारण्याचं त्यांचं धाडस होत नव्हतं. पण कुतूहल तर उतू जात होतं.

“या मुलांचं काही ऑब्जेक्शन नव्हतं तुमच्या लग्नाला?” ताई.

मी बुद्धिबळ बरा खेळतो पण इतका एक्सपर्ट नाही. मला काही उत्तर सुचेना. मी फक्त भुवया उंचावल्या.

“तसं नाही. प .... ण..... दुसरं करण्यासाठी या वयात पहिलं मोडायचं म्हणजे ...............”. ताई.

नवर्‍यानी चमकून ताईंकडे बघितलं आणि डोळे वटारले पण त्यांनी लक्ष न दिल्यामुळे तो खिडकीतून बाहेर बघायला लागला.

बायकोच्या अनाहूत प्रश्नांनी कधीही embarrass झालेला नाही असा मनुष्य तुम्हाला दिसला तर खुशाल समजावं की एक तर तो ठार बहिरा तरी आहे किंवा त्याची बायको मुकी तरी आहे.

Now I was on solid ground. “छे छे. आमच्याकडच्या कोणाचाही घटस्फोट वगैरे झालेला नाही. (फोटोकडे बोट दाखवून) यांच्या लग्नाआधी बरीच वर्षं आम्ही दोघेही एकेकटेच होतो. त्यामुळे सगळ्यांचाच आमच्या लग्नाला पाठिंबा होता.”

राजा हरिश्चंद्रदेखील एका दमात इतकं खरं बोलला नसेल.

ताईंचा चेहरा एकदम् खुलला ! Against all odds तिसरी शक्यताच खरी ठरली होती. आमच्याबद्दल प्रचंड आदर त्यांच्या डोळ्यात दिसला. इतकंच नव्हे तर इतक्या unique situation बद्दल खूपच कुतूहल कोणालाही वाटणारच. त्यामुळे आता प्रश्नांचा पूर येईल त्याच्या आतच ही भंकस थांबवावी आणि त्यांचा गैरसमज दूर करावा असं मी ठरवलं.

मात्र प्रश्नांऐवजी या वस्तुस्थितीच्या एका corollaryनी त्यांचं लक्षं वेधून घेतलं. “आई हीच सासू !” आणि त्या सुखद विचारानी मोहूनच गेल्या. कल्पना आहेच ती गोजिरवाणी. त्यांना आनंदाचा उमाळा आवरताच आला नाही. “अय्या ! कित्ती कित्ती मज्जा ! धम्माल !” जोडाक्षरांचा नुसता पाऊस. “आईच सासू !” आळीपाळीनी फोटोकडे आणि शुभदाकडे पहात – “अय्या आई म्हणजेच सासू !”

Corrollary भन्नाट होती. त्यामुळे मला आणि तिच्या नवर्‍यालाही खूपच मजा वाटली. पण फारच पटकन् त्याचा चेहरा गंभीर झाला. बहुदा ‘आई म्हणजेच सासू’ हे बर्‍याच वेळा ऐकू आल्यावर त्या दुधारी statement ची दुसरी धार टोचायला लागली असावी.

शुभदाच्या दृष्टीनी हा सबंद संवाद म्हणजे असंबद्धतेचा कळस होता. त्यात आता ताई आनंदानी का होई ना, पण बर्‍यापैकी animated झाल्या होत्या. त्यामुळे तिनी हस्तक्षेप करायचं ठरवलं. “यांच्या गप्पा ऐकत राहिलात तर सबंद दिवस पुरणार नाही. तुमचा जॉब तपासून घेताय ना?”

“हो. हो. विसरलेच मी.” असं म्हणत त्यांनी सँम्पल हातात घेतलं आणि डोळ्यासमोर धरलं खरं, पण नजर कागदातून आरपार जाऊन ‘आईच सासू’ या स्वप्नातच अडकली होती. आणि का अडकू नये?

त्या जाण्याआधी त्यांना खरं काय आहे ते सांगायचं मी ठरवलं होतं पण कोणालाही गोड स्वप्नातून आणून वास्तवात दाणकन् आपटणं चूकच. त्यांचा आनंद मला हिरावून घेववलाच नाही. त्या तरंगतच दारातून बाहेर पडल्या.

माझा महाभारताचा अजिबात अभ्यास नाही. मात्र आता मी कृष्णनीतीवर ग्रंथ लिहू शकेन.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

Proud

Lol
पण त्या काकूंना असं नाही का वाटलं की यामुळे नवरा बायको बहिण भाऊ होतायेत .
वेड्या कुठल्या Proud Light 1

तो दुसरा धागा डिलिट करून घ्या ना प्लिज Happy