थिरुवल्लुवर

Submitted by निमिष_सोनार on 9 January, 2015 - 03:51

मला हे "व्होट्स एप" वर मिळाले. खूप छान वाटले म्हणून शेअर केल्यावाचून रहावले गेले नाही.

कृपया..प्रत्येक पालकाने व शिक्षकाने हे वाचावे..

"थिरुवल्लुवर" ही पाच हजार वर्षांपूर्वी लिहिली गेलेली तामिळ संहिता आहे.. मानवी वर्तणुकीवरचे हे एवढे जुने शास्त्र, पण त्यातील तत्वे आजच्या विज्ञान-तंत्रज्ञानाच्या युगातही जशास तशी लागू होतात.

विचार करावा अशा काही बहुमोल गोष्टी ....

1. तुमचे मूल तुमच्याशी नेहमी खोटे बोलते याचा अर्थ त्याच्या प्रत्येक चुकीच्या वागण्यावरची तुमची प्रतिक्रिया अतिशय कठोर असते..

2. तुमच्या मुलाला तुमच्याशी मनातले सर्व बोलायला, मन मोकळे करायला तुम्ही नाही शिकवू शकलात तर तुमचे मूल तुमच्या हातातून गेले असे समजा..

3. तुमचे मूल कोणासमोरही अनावश्यक पणे दडपून जात असेल, नको तिथे एखाद्याचे वर्चस्व स्वीकारून त्याच्या अपेक्षेनुसार वागत असेल, तर समजा की तुमच्या मुलामध्ये आत्मप्रतिष्ठेची कमतरता आहे आणि त्याचे कारण तुम्ही त्याला प्रोत्साहन कमी आणि सल्लेच जास्त देता..

4. कधी कधी आपले योग्य असूनसुद्धा जग आपल्याला चूक ठरवते; अशा वेळी ठाम राहून स्वतःच्या भूमिकेचे समर्थन करता आले पाहिजे. तुमचे मूल इथे कमी पडत असेल तर त्याचा अर्थ असा आहे की तुम्ही त्याला सर्वांच्या देखत शिस्त लावायचा सातत्याने प्रयत्न केला आहे..

5. तुमचे मूल दुसर्‍यांच्या वस्तू घेते याचा अर्थ त्याच्यासाठी तुम्ही वस्तू तर घेता कदाचित पण त्याला ती वस्तु स्वतः निवडण्याचे स्वातंत्र्य देत नाही..

6. तुमचे मूल भित्रे आहे कारण तुम्ही नेहमी जरा जास्तच तत्परतेने त्याच्या मदतीला धावून जाता..

7. तुमचे मूल इतरांच्या भावनांचा अनादर करते याचा अर्थ तुम्ही त्याच्याशी संवाद साधण्याऐवजी सतत सूचना करत राहता आणि त्याच्या वागण्या बोलण्याचे नियंत्रण कायम स्वतःकडे ठेवता, त्यावर नेहमी अधिकार गाजवत राहता..

8. तुमच्या मुलाला फार पटकन राग येतो याचा अर्थ त्याच्या चुकीच्या वागण्याकडे तर तुमचे प्रचंड लक्ष असते पण त्या मानाने त्याच्या चांगल्या वागण्याची तुम्ही आजिबात दखल घेत नाही..

9. तुमच्या मुलाला इतर कुणाबद्दल असूया आहे याचा अर्थ त्याने एखादे काम यशस्वी पणे पूर्ण केले तरच तुम्ही त्याचे कौतुक करता; मात्र त्याने त्याच्या धडपडी दरम्यान स्वतःमध्ये पूर्वीच्या मानाने नक्कीच काही सुधारणा केलेल्या असतात - भले ते काम त्याला तुमच्या अपेक्षेप्रमाणे पूर्ण करता आले नसेल पण अशा सुधारणांबद्दल तुम्ही त्याचे मोकळ्या मनाने कौतुक करू शकत नाही..

10. तुमचे मूल तुम्हाला मुद्दाम त्रास देते, खोड्या काढते, तुमच्या भावनांचा विचार न करता तुमच्या कामात व्यत्यय आणून असुरी आनंद मिळवायचा प्रयत्न करते याचा अर्थ तुमचे मूल म्हणून त्याला हवी असलेली शारिरिक जवळीक व त्या आपुलकीच्या स्पर्शातून व्यक्त होणारी तुमची माया कमी पडली आहे..

11. तुमचे मूल तुम्हाला मुळी जुमानतच नाही, अगदी उघडपणे तुम्हाला धुडकावून लावते, याचा अर्थ तुम्ही बर्‍याचदा नुसत्या पोकळ धमक्या देता पण त्याप्रमाणे कृती कधीच करत नाही..

12. तुमचे मूल तुमच्या पासून गोष्टी लपवते, तुम्हाला कळूच नये म्हणून प्रयत्न करते याचा अर्थ तुम्ही त्याला समजून घ्याल याचा त्याला विश्वास वाटत नाही उलट तुम्ही राईचा पर्वत करून आकांडतांडवच जास्त कराल याची त्याला खात्री आहे..

13.तुमचे मूल तुम्हाला उलटे बोलते, दुरुत्तरे करते कारण तुम्हांला त्याने इतरांशी असेच करताना अनेकदा पाहिले आहे; त्यामुळे त्यात काही गैर आहे असे त्याला अजिबात वाटत नाही..

14. तुमचे मूल तुमचे तर ऎकत नाहीच; उलट इतरांचे जास्त ऎकते आणि त्यांच्या सल्ल्यानुसार वागण्याचा प्रयत्न करते कारण तुम्ही फार पटकन निर्णय सांगून किंवा आपले मत देऊन मोकळे होता हे त्याला माहीत आहे..

15. तुमचे मूल तुमच्याशी बंडखोरी करते कारण त्याने हे पक्के ओळखलेले आहे की काय योग्य आहे यापेक्षाही लोक काय म्हणतील , हे तुमच्या लेखी जास्त महत्वाचे आहे..

Group content visibility: 
Public - accessible to all site users

"थिरुवल्लुवर" ही पाच हजार वर्षांपूर्वी लिहिली गेलेली तामिळ संहिता आहे..>>>>
नाही, निमिष. थिरू म्हणजे श्री आणि वल्लुवर हा थोर तामिळ संत होऊन गेला. त्यानेच थिरू कुरल नावाचा पवित्र ग्रंथ लिहिला. वरील वाक्ये कदाचित त्यातील असतीलही. मला निश्चित कल्पना नाही. मात्र आहेत विचारणीय!

भारताच्या दोन महापुरुषांच स्मरण करण्यासाठी प्रेरणा घेण्यासाठी कन्याकुमारी ला विवेकानंद स्मारकाच्या जवळच थिरुवल्लुवर यांचा ही भव्य पुतळा उभारला आहे. http://2.bp.blogspot.com/_XyjT1g7t0-E/TDCyzi29WaI/AAAAAAAAAIo/jU8SDvSYQc...(1).jpg

हे मागे मी वाचलेले बहुधा..
एकूण एक मुद्दे चोकस आहेत, आणि पाल्याशी कसे वागायचे याचे बेसिक्सच आहेत.

15. तुमचे मूल तुमच्याशी बंडखोरी करते कारण त्याने हे पक्के ओळखलेले आहे की काय योग्य आहे यापेक्षाही लोक काय म्हणतील , हे तुमच्या लेखी जास्त महत्वाचे आहे..
>>>>
हे तर वरील सर्वांचे सार आहे, हे कधीही होऊ देऊ नका, एवढेच म्हणेन.