मोती मी सावडते

Submitted by निशिकांत on 8 January, 2015 - 00:36

तुझा चेहरा बालपणीचा अनूनही आठवते
शाळेमधल्या रम्य क्षणांचे मोती मी सावडते

एकावरती नाव तुझे अन् दुसर्‍यावरती माझे
नावा पाण्यामधे सोडल्या, आठव अजून ताजे
तरल्या, गेल्या भिन्न दिशेने, खंत मना जाणवते
शाळेमधल्या रम्य क्षणांचे मोती मी सावडते

समज यायच्या अधीच वाटा वेगवेगळ्या झाल्या
आज वाटते वळून बघता, तारा होत्या जुळल्या
आठवणींची पाने चाळत, आत खोल ओघळते
शाळेमधल्या रम्य क्षणांचे मोती मी सावडते

रंगलास तू तुझ्या प्रपंची, मीही नांदत आहे
आज भेटता नजर तुझी का अशक्य सांगत आहे?
शंका येते तुला कदाचित अजून मी आवडते
शाळेमधल्या रम्य क्षणांचे मोती मी सावडते

बालपणीचे प्रेम मखमली मोर पिसासम असते
गंध वासनांचा नसतो पण मनात ते दरवळते
एक अनामिक ओढ जिवाला हळूवार जोजवते
शाळेमधल्या रम्य क्षणांचे मोती मी सावडते

सांगत असता प्रेम कहाणी गाज पाळते संयम
युगे लोटली पण उत्कटता अजून आहे कायम
चंद्र, सागरामधील अंतर प्रेमाला वाढवते
शाळेमधल्या रम्य क्षणांचे मोती मी सावडते

निशिकांत देशपांडे. मो.क्र. ९८९०७ ९९०२३
E Mail--- nishides1944@yahoo.com

Group content visibility: 
Public - accessible to all site users

निशिकांत _/\_
फार म्हणजे फारच सुंदर, ज्यांना अनुभव असेल त्यांच्या काळजाला हात घालून डोळ्यातुन पाणीच काढेल.

छन. पण सावडते म्हणजे काय ? दुसरा एखादा शब्द चपलख बसला असता का ? सावडते हा शब्द मी वेगळ्याच context मध्ये ऐकला आहे

सर्वांच्व मनापासून आभार प्रतिसादासाठी.
सारिका-- आवडते म्हणजे गोळा करते या अर्थाने हा शब्द वापरलेला आहे.