वाट (शतशब्दकथा)

Submitted by आतिवास on 25 December, 2014 - 16:33

त्याची वाट पाहायची तिला सवय झाली होती. नेहमी.

येणं नक्की झालंय म्हणताम्हणता किती वेळा रद्दही व्हायचं.

आणि मग तो आला की भरपूर गर्दी.

ओळखीचे आणि अनोळखीही त्याला भेटायला यायचे.

येणा-या गर्दीच्या डोळ्यांत अभिमान असायचा; चेह-यावर हसू असायचं; वातावरणात आनंद भरून जायचा.

ते पाहताना ‘तो फक्त आपला नाही’ याचं दु:ख ती विसरून जायची.

एक दिवस तार आली.

तो गेला होता. युद्धभूमीवर.

मग तर प्रचंड गर्दी.

अधिकारी, पत्रकार, छायाचित्रकार, राजकीय नेते, सामान्य माणसं.

रीघ नुसती.

त्याच्या शौर्याबद्दल, देशभक्तीबद्दल, त्याने निर्माण केलेल्या आदर्शाबद्दल खूप बोलले ते.

आणि मग कुणीच नाही आलं.

कधीच.

दु:खाने, आशेने आता ती वाट पाहतेय.

त्या दुस-याची.

मृत्युची.

(अन्यत्र पूर्वप्रकाशित)

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ओह्ह Sad

मस्त लिहिलंय पण ह्याला 'वा!' तरी कसे म्हणावे >>> तेच

तुमचा हातखंडा आहे शतशब्दकथांमध्ये अतिवास. कमी शब्दांत खुप काही सांगुन जातात या कथा.