आदिवासी जीवनशैली

Submitted by बेफ़िकीर on 22 December, 2014 - 05:05

आदिवासी जीवनशैली मस्त असते. गेल्या आठ दहा दिवसांत मी तीन आदिवासी वस्त्या आणि रानोमाळ फिरणारे काही आदिवासी अश्यांना भेटलो. आधी वाटत असे तसे ते मागास आहेत असे त्यांना भेटल्यानंतर वाटलेच नाही. असे वाटू लागले की आपणच मागास आहोत.

जमवलेली माहिती आणि काही छायाचित्रे:

शिक्षण - आदिवासी, कातकरी लोक हे सहसा रानावनाच्या जवळ किंवा एखाद्या लहान पाणसाठ्याच्या कडेला राहतात. सहसा एखादे लहानसे गाव आठ दहा किलोमीटरवर असते. त्यांना वर्षातून तीन महिने वीटभट्टीवर रोजगार मिळू शकतो. बाकीचा काळ ते लाकुडफाटा जमवणे, बकर्‍यांसाठी हिरवा पाला तोडून आणणे, मासे पकडणे असे प्रकार करत असतात. शासनाने आता चौथीपर्यंतचे शिक्षण मोफत ठेवलेले आहे. वह्या-पुस्तकेही मोफत आहेत. एक गणवेष मोफत आहे. शाळेमध्ये रोज पौष्टिक आहार मोफत आहे. ह्या आहारात आठवड्यातून दोन दिवस हरभर्‍याची उसळ आणि भात, दोन दिवस खिचडी आणि भाजी आणि दोन दिवस साधेवरण भात असतो. शिवाय शनिवारी एक राजगिर्‍याचा लाडू, एक खोबरं आणि थोडे शेंगदाणे प्रत्येक विद्यार्थ्याला दिले जातात. सहसा शाळेला एक लहानसे पटांगण असते आणि त्यात घसरगुंडी, झोपाळा आणि सी सॉ असतो. पटांगणात मुले लंगडी, कबड्डी खेळतात. शाळेतील पिण्याचे पाणी चांगले असते. मात्र एवढे सगळे असूनही कातकरी लोक आपल्या मुलांना शाळेत पाठवतातच असे नाही. शिक्षण घ्यायला पाहिजे हा विचार बराचस झिरपलेला आहे खरा! पण सोयीस्करपणे शिक्षण घेतले जात आहे. आज आपण इथे वास्तव्यास आहोत तर जाऊदेत मुलाला शाळेमध्ये, अशी भूमिका आहे. मुले नुसतीच दंगा करत असतील आणि त्यांना सांभाळणे हा एक व्याप होत असेल तर द्या शाळेत पाठवून अशीही एक भूमिका घेतली जाते. त्यात पुन्हा मुलांच्या तुलनेत मुलींच्या शिक्षणाबाबत काही विशेष स्वारस्य दाखवले जात नाही. ही मुले शाळेत गेल्यानंतर इतर मुलांच्या तुलनेत मळकट, अस्ताव्यस्त, अस्वच्छ व बावळट दिसतात. त्यांना अभ्यासात फारशी गती नसल्याचेही जाणवते. मग शिक्षकांचा संयम संपला की शिक्षकही विचार करतात की ह्यांच्यावर प्रयत्न करायचे तरी किती. शिकतील तेवढे शिकतील अशी भूमिका घेऊन शिक्षक आपले अधिक बर्‍या विद्यार्थ्यांना शिकवू लागतात. आदिवासी मुले शाळेतून घरी आली की त्यांना बकर्‍या घेऊन चरायला जा, डोक्यावर पाण्याचे हंडे धरून लांबून पाणी भरून आण अशी कामे सांगितली जातात. त्यांच्या पालकांना असे वाटते की शाळेत जो अभ्यास झाला तितकाच अभ्यास करायचा असतो. घरी आल्यावर परत कशाला अभ्यास? त्यामुळे मुलांनाही अभ्यासाशी घेणेदेणे उरत नाही. अनेकदा शाळा चुकवली जाते. शासनाने भरपूर संधी देऊनही हा समाज शिक्षणाच्या बाबतीत अत्यंत उदासीन आहे. ही बापुडवाणी मुले मग रानावनात फिरून पाणी आणणे, एखादा लहान प्राणी धरून आणणे असे प्रकार करतात. ह्या मुलांच्या पालकांना अजून हेच ज्ञात नाही की त्यांची मुले शिकली तर कुठे त्या मुलांची मुले शहरी लोकांसारख्या नोकर्‍या करू लागतील. अजून सुमारे पंचवीस ते तीस वर्षे ह्या समाजाच्या शैक्षणिक विकासाला काही विशेष चालना मिळणार नाही असे चित्र सध्या दिसत आहे.

आरोग्य - तुमच्या-आमच्यापेक्षा आरोग्य ह्या बाबतीत अतिशय सुदैवी लोक असतात हे. आपल्याला मिळणारी हवा हा आपल्या आरोग्याचा मोठा शत्रू आहे. त्यांना मात्र झाडाफुलांमधून आणि डोंगरांना कुरवाळून येणारी अतीशुद्ध हवा चोवीस तास मिळते. तेथेच त्यांच्यात आणि आपल्यात फरक पडू लागतो. दुसरे म्हणजे पाणी! कातळावरून वाहणारे नितळ शुद्ध पाणी त्यांना उपलब्ध असते. पावसाळ्यानंतर जलाशयातील पाणी आणल्यावर ते त्या पाण्याला अनेकदा गरम करून शुद्ध करतात. चूल पेटवण्यासाठी लाकडे गोळा करताना, शेळ्यांसाठी हिरवा पाला आणताना, पाणी वाहून आणताना आणि रानातून मिळणारे विविध खाद्यपदार्थ आणताला त्यांची अविरत पायपीट चाललेली असते. ढोरवाटा, टेकड्या, घाट अश्या भागातून ते सतत चाललेले असतात, तेही अनेकदा वजन उचलून! त्यामुळे त्यांचे शरीर अतिशय काटक असते. दिसायला ते फार क्षीण आणि हडकलेले दिसतील, पण प्रचंड चिवट असतात. अस्थीरोग, श्वसनरोग असले प्रकार त्यांना सहसा होत नाहीत. हृदयविकाराचा तर प्रश्नही उद्भवू शकत नाही. बराच काळ अन्नपाण्यावाचून चालत राहिल्यामुळे शरीराचा चिवटपणा अधिकच वाढतो. महत्वाचे म्हणजे आहार! आपल्या आणि त्यांच्या आहारात जमीन-अस्मानाचा फरक असतो. ते लोक बर्‍याच प्रमाणात कंदमुळे खातात. तसेच, आपल्याला शहरात सहसा मिळत नाहीत अश्या पालेभाज्यांचेही त्यांना ज्ञान असते. ते त्या पालेभाज्या खातात. नित्याचे जेवण म्हणजे डाळ-भात, कंदमुळे आणि एखादी हिरवी पालेभाजी! मांसाहार, ज्याला ते 'वशाट' म्हणतात, तो म्हणजे जलाशयातून मासे किंवा इतर काही पकडणे! हा प्रकार त्यांच्यातील काहीजण नित्य करत असतात. बर्‍याचदा आदिवासी, कातकरी लोक हे कोळी जमातीचेही असतात. अत्यंत शुद्ध हवा, चांगले पाणी, निसर्गाच्या जवळ असलेला आहार आणि सततची अंगमेहनत ह्यामुळे हे लोक आरोग्याच्या बाबतीत शहरी लोकांपेक्षा सुदैवी ठरतात. नाही म्हणायला त्यांना सर्दी, खोकला, ताप व सर्पदंश हे प्रकार होत राहतात, पण त्यांचे प्रमाण व तीव्रता कमीच असते. ह्या सर्व घटकांशिवाय आपल्या जगात असलेली स्पर्धा आणि ताण त्यांच्या जगात जवळपास नसल्याने त्यांचे मानसिक आरोग्यही खणखणीत राहते व पर्यायाने त्याचाही चांगलाच परिणाम शारीरिक आरोग्यावर होतो. त्यामुळेच हे लोक आपल्याच धुंदीत रानावनात फिरत राहतात. त्यांना अविकसित असण्याचे वैषम्य नसते, स्पर्धात्मक जीवनाचा ताण नसतो, अयशस्वी ठरण्याचे भय नसते.

समूहजीवन - सहसा एका वस्तीत चाळीसएक घरे असतात. ही घरे मातीची असतात व वर झावळ्या असतात. ह्या घरांचा आकार किती असावा हे ज्याचे तो ठरवतो. घराला कसलेही संरक्षण नसते कारण संरक्षण करायचे कशाचे हाच प्रश्न असतो. घरामध्ये चकचकीत दिसणारी भांडी असतात. एका दोरीवर धुतलेले, न धुतलेले असे सगळेच कपडे टांगलेले असतात. कपाट वगैरे प्रकार सहसा ठेवत नाहीत. चुलीवर स्वयंपाक केला जातो. आंघोळीसाठी घराबाहेर एक लाकडी काठ्या उभारून, त्यावर तीन बाजूंनी फडकी टाकून उभी केलेली बाथरूम असते. एखादा लहानसा जलाशय जवळच असतो. सहसा एकापेक्षा अधिक लग्न करत नाहीत. मात्र एखाद्याची पत्नी दगावली आणि त्याला लहान मुले असली तर वस्तीच्या एकमतानुसार त्याचे कोणाशीतरी लगेच लग्न लावून देण्यात येते व ती नवीन नवरी त्या मुलांचे संगोपन करू लागते. वस्तीला एक म्होरक्या असतो. तो बाहेरच्या जगाशी संबंध ठेवण्यास अधिकृत माणूस गणला जातो. एका कुटुंबात सहा ते सात सदस्य असतात. सहसा दोन ते तीन मुलांनंतर मुले होऊ देत नाहीत. लग्न मात्र फार लवकर लावून देण्यात येते. हे लोक सर्व सण साजरे करतात. मात्र होळी ह्या सनाला सर्वाधिक महत्व असते असे म्हणतात. साधारणपणे दोनशे ते सहाशे माणसे एकेका वस्तीत राहतात. त्यांच्या भांडणे वगैरे होण्याची कारणेच मुळात नगण्य असतात, किंबहुना नसतातच. जे घ्यायचे ते निसर्गाकडूनच घ्यायचे असल्यामुळे कोणाशी कश्यासाठी भांडायचे? ते शहरी लोकांना मित्रही समजत नाहीत आणि शत्रूही! (अर्थात, मागे मी अंदमानला गेलेलो होतो तेव्हा तिथे एक अशी वस्ती असल्याचे ऐकले होते जेथील आदिवासी हे अजूनही रानटीच असून आपले लोक दिसले तर थेट हल्लाच करतात).

सौंदर्य व व्यक्तीमत्व - आपल्या सौंदर्याच्या सर्व परिभाषांनुसार आदिवासी / कातकरी लोक हे अजिबात सुंदर ठरू शकत नाहीत. सततच्या मेहनतीमुळे रंग रापलेला असतो. शरीराच्या शिरा दिसत असतात. शिक्षणाचा गंध नसल्यामुळे चेहर्‍यावर सतत गोंधळल्यासारखे, बावळट भाव असतात. मात्र हे लोक अजिबात बावळट नसतात. फक्त ते आपल्याशी चलाखी करत नाहीत इतकेच. ते त्यांच्या त्यांच्या आयुष्यात चांगले हुषार असतात. रानात कुठे गेल्यावर काय भाजीपाला किंवा मुळे मिळतील हे त्यांना चांगले ठाऊक असते. रानातूनच ते त्यांची औषधेही प्राप्त करतात. लहानसहान इन्फेक्शन्स, त्वचारोग, जखमा ह्यावर त्यांच्याकडे जालीम रानटी औषधे असतात. मात्र अशिक्षित असणे, अस्वच्छ असणे, पैसा नसणे, आराम नसणे ह्या कारणांनी ह्या लोकांचे सौंदर्य बाधीत होते. अंगावर सहसा चरबी अगदीच कमी असते. पुरुषांमध्ये दंडाचे मसल्स आणि पोटर्‍यांचे मसल्स वेल डेव्हलप्ड असतात. खाली एका छायाचित्रात एक उघडा आदिवासी दिसेल, तो रोज लाकडे वाहून आणतो आणि ती स्वतःच फोडत बसतो. आपोआपच त्याचे शरीर कसे ठणठणीत झाले आहे बघा! त्याच्यामागे दिसणारी एक लालभडक मोटरसायकल उमेश कोळी नावाच्या एका आदिवासीची आहे. हा उमेश कोळी विविध वीटभट्ट्यांवर आदिवासी कामगार पुरवणारा कंत्राटदार झालेला आहे. पण त्या उघड्या इसमासारखे सगळे पुरुष ठणठणीत नसतात अनेकजण वीटभट्टीवर कामाला असतात. अनेकजण नुसतेच रानात फिरतात ते चिवट आणि काटक असतात पण ज्याला पुरुषी सौंदर्य म्हणता येईल तसे नसतात. स्त्रिया काळ्यासावळ्या असल्या तरीही त्वचा सहसा तुकतुकीत असते. स्त्रिया अंगाने भरलेल्या वगैरे नसतात. किंबहुना अगदीच बारीक अश्या अनेक स्त्रिया असतात. पैसे नसल्यामुळे कपडे किंवा दागिने ह्यांचा प्रश्न येत नाही. तसेच, जीवनशैली वेगळी असल्याने मेक-अपचाही प्रश्न येऊ शकत नाही. नाही म्हणायला आता काही स्त्रिया गाऊन घालून हिंडतात ही थोडीशी अधुनिकता! मात्र ह्या स्त्रियांच्या देहबोलीत मोठे सौंदर्य लपलेले असते. खणखणीत आवाज, ताडताड चालणे, पातळ पार मांड्यांच्यावर घेऊन खोचलेले, एका हातात कोयता किंवा डोक्यावर मोळी अश्या अवतारात रानोमाळ अती आत्मविश्वासाने हिंडणार्‍या ह्या स्त्रिया ठिणग्यांसारख्या वावरत असतात. मात्र लहानपणीच्या कुपोषणामुळे असेल किंवा कोणत्याही कारणाने, अनेकदा चेहर्‍यावरील भाव थोडे बावळट असणे, शरीर सिमेट्रिकल नसणे असे काही प्रकार आढळतात. शहरी समाजाच्या तुलनेत बहुधा ह्या समाजाने स्तनपानाला अधिक महत्व दिलेले दिसते. आपल्या वस्तीत पुरुषांवर सर्रास डाफरणार्‍या ह्या स्त्रिया वस्तीबाहेरच्या माणसांसमोर मात्र एकदम कावर्‍याबावर्‍या होतात.

स्वच्छता - हे लोक स्वच्छ मात्र राहात नाहीत. अनेकदा पाण्याचा अभाव व स्थलांतर हे त्यामागील कारण असते. लहान मुले मातीत पडलेले अन्नकण खातात. नाक वाहात असते. एका लहान मुलीच्या मनगटावर मोठी जखम होती आणि त्यावर माश्या बसत होत्या, पण कोणाचे लक्ष नव्हते. आंघोळ बहुधा पाण्याच्या उपलब्धतेनुसारच करत असावेत. म्हणजेच, रोज करत नसावेत. अन्न उघड्यावरच पडलेले असते. कपडेही स्वच्छ नसतात. भांडीकुंडी मात्र नजर लागावी इतकी चमकत असतात, हे रहस्य काही मला उकलता आले नाही. स्वच्छता, किंबाहुना ह्या लोकांची अस्वच्छता हा एक असा निकष आहे की ज्यामुळे त्यांच्यात आणि आपल्यात एक मोठी दरी पडते.

संधी - शासनाने ह्या कातकरी लोकांना संधी देऊ केलेल्या आहेत. शिक्षण मोफत आहे. नोकरीसाठी आरक्षण आहे. उदरनिर्वाहासाठी लहानमोठे व्यवसाय उभारण्याची संधी प्राप्त करून दिलेली आहे. स्थलांतर करावे लागत असल्यास उगाच त्यांना कोणी 'येथे का राहायला आलात' असे विचारून त्रास देत नाही. (तेही अश्याच जागी राहतात जिथे राहिल्यामुळे इतरांना त्रास होणार नाही). एकाच ठिकाणी राहणार्‍यांपैकी काहींना शासनाने घरकुल योजनेअंतर्गत घरेही बांधून दिली आहेत. मात्र एक खूप मोठ्ठा प्रॉब्लेम ह्या लोकांना भेडसावतो. तो म्हणजे ह्यांच्या नावचे आरक्षण कोणी भलतेच पळवतात व हे प्रचंड प्रमाणावर घडते. ह्या लोकांपैकी कोणी खरोखर शिकला आणि आरक्षण मागायला गेला तर त्या जातीची सर्व आरक्षणे आधीच संपल्याचे समजते. नंतर छडा लागतो की ज्यांनी ते आरक्षण मिळवले ते आर्थिकदृष्ट्या चांगले भरभक्कम होते. म्हणजे बघा, शासन काहीतरी करू पाहात आहे, हे लोक शिकून सुधारू पाहात आहेत आणि आपल्याकडचे भ्रष्ट लोक ती संधी त्यांच्यापर्यंत पोहोचूच देत नाही आहेत.

IMG_4300.JPGIMG_4302.JPGIMG_4329.JPGIMG_4331_0.JPGIMG_4334.JPGIMG_4338_0.JPGIMG_4351.JPGIMG_4369.JPGIMG_4370.JPGIMG_4373.JPGIMG_4375.JPGIMG_4378.JPGIMG_4379.JPGIMG_4380.JPGIMG_4382.JPGIMG_4388.JPGIMG_4389.JPGIMG_4368.JPGIMG_4361.JPGIMG_4115.JPGIMG_4197.JPGIMG_4250.JPG

हे एक वेगळे जग आहे. ताण, स्पर्धा, मत्सर, विकार, पैसा, तांत्रिक विकास, भय, अगतिकता, संताप, विकृत स्वार्थ अश्या अनेक दुर्गंधीयुक्त घटकांनी गच्च भरलेल्या ज्या उकिरड्यात आपण राहतो त्याच उकिरड्याच्या काठाला लागून हे जग आहे. आपल्या समाजातील अनेक व्यक्ती, संस्था व प्रशासन 'ह्या जगालाही आपल्यासारखे बनवण्यासाठी केलेल्या कार्याला' समाजकार्य समजते. स्वतःचा पैसा, वेळ, कष्ट वगैरे वापरून अनेकजण ह्या जगातील घटकांचा उद्धार करू पाहतात. अनेक संस्था ह्या जगातील घटकांच्या आरोग्यासाठी, शिक्षणासाठी, राहणीमान उंचावण्यासाठी विविध उपक्रम, चळवळी चालवतात. अनेक थोर विभुती देणग्या देतात. शासन त्यांना पायाभूत सुविधा देऊ पाहते. मोफत शिक्षण देऊ पाहते. आरक्षण देऊ पाहते.

एवढी प्रचंड ताकद आणि इच्छाशक्ती त्यांच्या कल्याणासाठी सातत्याने कार्यरत असते.

तरीही ते तसेच राहतात. शिकत नाहीत. नोकर्‍या करत नाहीत. भटकत राहतात.

मग आपली चिडचिड होते. आपल्याला संताप येतो. आपण केलेल्या कार्याचे आपल्याच जगातील काहीजण कौतुक करतात, आपल्याला पुरस्कार वगैरे मिळतात. मात्र त्या काठावरच्या जगातील लोक काही सुधारत नाहीत. ते बावळटासारखा चेहरा करून आपली बडबड ऐकून घेतात आणि करायचे तेच करत राहतात. मग आपला संयम संपतो. आपण ओरडून सगळ्यांना सांगायला लागतो की ह्या लोकांसाठी मी हे केले, ते केले. ह्या लोकांना त्याचे काहीही नाही. खरे तर, आपल्यासारख्यांनी त्यांच्यासाठी काही करावे ही त्यांची लायकीच नाही, असेही आपण सांगू लागतो. हे कायम असेच राहणार, असा निष्कर्ष काढून आपण मोकळे होतो. त्यांना मागासवर्गीय, खालच्या जातीतले असे संबोधू लागतो. आपल्यापैकी काही चिवट व प्रामाणिक असतात ते त्यांचे प्रयत्न सुरूच ठेवतात. काहीजण ह्या कार्यात स्वतःला झोकूनही देतात. आयुष्यभर त्यांच्यासाठी काम करत राहतात.

बर्‍याच अवधीनंतर त्या काठावरले काही धाडसी लोक एकदाचे उकिरड्यात पाय ठेवतात. मग आपण आपले झेंडे मिरवतो. 'बघा आणला की नाही त्याला आपल्यात' असे म्हणत! काहीवेळा त्या काठावरच्या जगातील एक समूहच्या समूह आपल्याकडे येतो आणि आपल्यासारखे व्हायचा प्रयत्न करतो. मग आपल्या आनंदाला उधाण येते. पण आपल्याला सत्य माहीत असते. आत आलेला हा समूह त्या जगाचा एक नगण्य भाग आहे. ते जग अजूनही तसेच आहे. त्यात फारसा फरक पडलेला नाही.

आपण आपल्या उकिरड्याला विकसित जग असे नांव ठेवतो.

......आणि त्या काठावरच्या जगाला आपण 'आदिवासी' म्हणतो.

आदिवासी, कातकरी समाज!

ह्या समाजाच्या जीवनशैलीची जमेल तसा परिचय करून देण्याचा प्रयत्न केला. आपापले अनुभव, ज्ञानकण त्याखाली लिहून आपण सगळे हा धागा समृद्ध करू शकता.

ही माणसे ग्रामीण विभागात फिरत असताना रस्त्याकडेच्या घनदाट अरण्यातून, डोंगरांमधून, ढोरवाटांवरून, एखाद्या कालव्याशेजारी अशी वावरताना दिसतात.

आपण तेथून भर वेगात निघून जातो.

आपण त्यांना पास करत असतानाच्या क्षणापुरती त्यांच्यातील आणि आपल्यातील एक भीषण, प्रचंड दरी दृष्यमान होते. त्या एका क्षणापुरती त्यांची आणि आपली झालेली नजरानजर ही भावनाहीन असते, कोणालाच दुसर्‍याविषयी काहीच वाटलेले नसते. आपण त्यांना पास करून गेलो की ही दरी अदृष्य होते. सगळे विस्मरणात जाते.

पण दोन समांतर विश्वे एकाच भूभागावर अस्तित्त्वात आहेत ही जाणीव तेवढी आपल्या मनात दीर्घकाळ राहते.

धन्यवाद!
========================

-'बेफिकीर'!

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

बेफिकीर यांनी स्थूलमानाने दिलेला आदिवासी समाजाचा अल्पपरिचय आवडला. या विषयावर अजून माहिती कविता महाजन यांच्या ब्र या पुस्तकात देखील मिळेल.

फक्त ८ दिवस बघून/ त्यांच्याबरोबर राहून लिहिलेल्या या लेखात बर्‍याच गोष्टी जनरलाइज केल्यासारख्या वाटल्या, विशेषतः आरोग्याबद्दल.

कुपोषण, व्हिटॅमिन्सची कमतरता, आमांष, टीबी, डाय्ररिया, त्वचेचे आजार, सर्प्/विंचूदंश, कॉलरा आणि दूषित पाण्यामधून होणारे अनेक संसर्गजन्य रोग हे आणि इतर अनेक असे खास आदिवासींचे प्रॉब्लेम्स आहेत त्याबद्दल फारसे लिहीलेले नाही तुम्ही.

लेख वाचला… आदिवासी लोकांचं जीवन खरंच इतकं सुरळीत चालू असेल तर खरंच ह्या वस्तीतले लोक खूप भाग्यवान आहेत असं मी म्हणेन.
पण दुर्दैवानं परिस्थीती इतकी साधी, सोपी सरळ नाहीये.
गेली अनेक वर्ष मी ह्या आणि अश्या अनेक वस्त्या, पाडे, गावं कधी वैद्यकीय सर्व्हेसाठी, कधी अजून काही कारणासाठी किंवा कधी त्यांच्यात राहून काम करायचं म्हणून पहात आली आहे.
लहान मुलांत कुपोषण आणि त्यामुळे होणारे आजार ( कमजोर हाडं, डिसअ‍ॅबिलीटीज, मेंदूची कमी वाढ), तरूणांमधे वाढती व्यसनाधिनता, आणि एच आय व्ही च्या वाढणा र्‍या केसेस, आणि म्हातार्‍यांमधे व्यसनाधिनता, टीबी , कॉलरा सा रखे साथीचे रोग यांचं प्रमाण प्रचंड आहे.
सरकारच्या शाळा आहेत, यो जना आहेत, पण तरीही शि क्षणाचा अभाव आहेच.
त्याहीशिवाय दोन टोकाचे मानसिक आजार , एकतर खूप aggressive वागणं किंवा खूप न्युनगंडातून depression ह्याचं प्रमाण दर ५-६ माणसामागे १ इतकं आहे. मुळात जिथे शहरातही अजून मानसिक आजाराकडे पाहण्याचा दृष्टीकोन तयार झालेला नाही, तिथे इतक्या रानावनात राहणार्‍या लोकांना मानसिक पीडा असतील ही बाबच अजून विचारात घेतली जात नाही.
स्त्रीयांच्या आरोग्याच्या प्रश्णावर लिहावं तितकं कमीच… पण जे पाहिलंय ते विचारांच्या पलिकडचं वाटू शकतं इतकं धक्कादायक आहे.

असे एक ना अनेक प्रोब्लेम्स आहेत… तुम्ह्याला ते ह्या वस्त्यात दिसले नसतील, तर परत एकदा ह्या वस्त्या खूप 'लकी' आहेत असंच मी म्हणेन.
ह्या सगळ्याला 'सिस्टीम' कुठे ना कुठे प्रचंड प्रमाणात जबाबदार आहे.
शहरी किंवा ग्रामीण अमूक एक सोसायटी म्हणजेच योग्य, अशी जी सरसकट व्याख्या आपण करतो आणि आचरतो, माझं राहणीमानच परफेक्ट आणि योग्य असं जे आपण वागतो, ह्यातूनच कुठे तरी ही दरी वाढत जाते.
ह्या लोकांत राहून एक गोष्ट मला सतत जाणवत गेली, की ह्यांची प्रगती योजताना, करताना शहरातल्या प्रगतीचे, शिक्षणाचे parameters लावणं हेच मुळात चूक आहे, आणी वर्षानुवर्ष आपली सिस्टीम हेच करत आली आहे… ह्या लोकांना झाडापालांची इतकी माहिती असते, प्राण्यांची इतकी माहिती असते - किती शैक्षणीक यो जनांमधे त्यांच्या ह्या abilities चा वापर करून, त्याचा पुढे त्यांना रो जगारासाठी उपयोग होईल म्हणून त्या दृष्टीने 'योग्य' ते शिक्षण, सुविधा पुरवल्या जातात ?. ह्या लोकांच्या फिजिकल काटकपणाचा, चांगले खेळाडू तयार करण्यासाठी किती उपयोग केला जातो ?
हा विषय खूप विचार करायला लावणार आहे… सुदैवानं अनेक लोक यावर मनापासून काम करताना पाहिलेत आणी काही लोकांबरोबर काम करायची संधीही मिळाली आहे.
पण कळकळीनी काम करणारे लोक आहे ही आशावादी गोष्ट आहे… कारण गरज प्रचंड जास्त आहे.

खूप लिहिण्यासारखं असूनही मोह टाळतीये…. हे ही जास्तच लिहिलं गेलंय. त्याबद्दल क्षमस्व.

(काही वर्षापूर्वी 'ब्र' पुस्तक वाचूनच मी माझे काही अनुभव लिहिणारा लेख मायबोलीवर लिहिला होता…. कुठे सापडेल बघायला हवा)

फारएण्ड, सिनी, धन्यवाद!
वरदा, रार तुमच्या मतांशी सहमत! अनिल अवचट यांच्या कार्यरत ह्या पुस्तकातला पहिलाच लेख सुरेखा दळवी यांच्यावर आहे ज्या पनवेल भागात कातकरी समाजासाठी काम करत होत्या. अर्थात त्या लेखातले सगळे संदर्भ हे बरेच जुने संदर्भ आहेत (९०च्या दशकातले).

आपण आपल्या उकिरड्याला विकसित जग असे नांव ठेवतो. >> सुपर बेफी....
युट्युबवर अ‍ॅमेझॉन मधल्या आदीवासीची एक डॉक्यूमेंट्री बघितली होती. त्यात देखिल डॉक्यूमेंट्री करणरा म्हणाला होता ही माणस येवढी सुखी आहेत की ह्या लोकांचा पत्ता सांगण उचित होणार नाही कारण, स्ट्रेस, मानसिक आजार, संस्कृती, यश, अपयश, पैसा, संपती अशा गोष्टीपासुन अनभिज्ञ असणार्‍या लोकांना आपल्या जगा पासुन दुर ठेवणेच जास्त उचीत आहे.

रार, सुरेख लिहीलेस! शाळा पाच मैल लांब, पाणी एक माइल लांब पण तरी वस्तीवर गुत्ता आणि एखाद्या 'घरात' केबल टीव्हि सापड्तो Sad मिसप्लेज्ड असलेल्या प्रायोरिटिज. दोष कुणाच्या पारड्यात टाकायचा?

दोष आपलाच सगळ्यांचाच खरं तर. कारण केबल टीव्ही, सेलफोन असलं म्हणजेच 'सफल, संपन्न' आयुष्य अशी धारणा आपणच तर करून ठेवलीये आप्ल्याही मनात नकळत का होईना !
आदिवासीच कशाला आपल्यातलेच अत्यंत साधी लाईफस्टाईल असणारे, चैनीच्या किंवा महाग गोष्टी न वापरणारे लोकही आपोआप 'वेगळे' समजले जातातच की….

वरदा, चेतन, त्रिशंकू, रार, सत्यजित, दूरान्त व इतर!

माफ करा आपल्या सर्वांच्या मौल्यवान प्रतिसादांचे आभार मानायला उशीर होत आहे. आपण सर्वांनी चपखल किंवा माहितीपूर्ण / वेळेनुसार जमतील तितके विस्तृत प्रतिसाद देऊन ह्या जीवनशैलीच्या इतर काही महत्वाच्या बाजू दाखवल्यात ह्याबद्दल हार्दिक आभार!

अजूनही काही माहिती द्यायची इच्छा असल्यास अवश्य द्यावीत.

त्रिशंकू - मी आपल्या मताशी सहमत आहे. आठ दिवसांत असे काय समजणार मला त्या लोकांबद्दल! त्या लोकांनी जे सांगितले तेवढे इथे लिहिले. Happy

पुनश्च आभार!

आपला लेख आवडला पण आपण बऱ्याच ठिकाणी बावळट हा शब्द वापरला आहे तो कितपत योग्य आहे आदिवसी समाजात आशा किती तरी चांगल्या गोष्टी आहेत ज्या आपल्यासारख्या सुशिक्षित लोकांमध्ये नाही आदिवासी मध्ये आपले आई वडील कधीच वृद्ध आश्रमात पाठवत नाही हुंडा पद्धत अस्तित्वात नाही वेळोवेळी आपल्या सारख्या सुशिक्षित लोकांनी या वर अनेक अत्याचार केले आहेत ते या देशाचे मूळ मालक आहे आणि ज्या दिवशी त्यांना समजेल त्या दिवशी आपले सर्व संपलेले असेल आणि ते होणारच आहे पाचवी व सहावी अनुसूचित वाचा त्यांना कोणतेही कायदे लागू होत नाही आदिवासी ने शिक्षण घेतले तर ते जागरूक होतील व आपले हक्क मागतील म्हणून त्याचा पर्यंत योजना व शिक्षण पोहचू दिले जात नाही

Pages