कंबोडियन न्यू ईयर

Submitted by सुमुक्ता on 9 September, 2014 - 08:50

बरोबर एक वर्षापूर्वी नाताळ च्या सुट्टी मध्ये फिरायला कोठे जायचं हा गहन प्रश्न आम्ही सोडवत होतो. नवीन अनुभव हवा होता नवीन प्रकारचे पदार्थ खायचे होते. आणि मला कंबोडिया चे अंगकोर वॉट (जगातील सर्वात मोठे देऊळ आणि UNESCO ची World Heritage Sight) पहायची फार दिवसापासून इच्छा होती. आम्ही थायलंड, कंबोडिया आणि चीन अशी ट्रीप ठरवली. ३१ डिसेंबर आम्ही कंबोडिया ची राजधानी फ्नॉम पेन्ह इथे साजरा करणार होतो. तेव्हा माहीतच नव्हते कि ही ३१ डिसेंबर ची रात्र आमच्या मानसिकतेमध्ये फार मोठे बदल घडवून आणेल. थायलंड मधून कंबोडिया मध्ये गेल्यावर दोन्ही देशामध्ये जमीन अस्मानाचे अंतर जाणवते. थायलंड बराच प्रगत आणि पर्यटकांसाठी खूप अनुकूल असा देश आहे. तेच कंबोडिया अतिशय गरीब आणि पर्यटनाचे महत्व अजून नीटसे न समजलेला देश आहे. तरीही कंबोडिया मध्ये पर्यटनाचा अनुभव मला फार फार वेगळा वाटला.

फ्नॉम पेन्ह विमानतळावर उतरल्यानंतर आमच्या गाईड ने आमचे स्वागत केले. हॉटेल मध्ये जाण्यासाठी गाडीत बसल्यानंतर त्याने आम्हाला कंबोडिया चा इतिहास आणि विशेषकरून कंबोडियन वंशहत्ये (Genocide) विषयी बरीच माहिती सांगण्यास सुरुवात केली. कंबोडियन वंशहत्ये विषयी थोडीफार कल्पना मला होती पण त्याचे प्रमाण आणि त्याचे तेथील लोकांवर झालेला परिणाम मला स्वत:ला बघायला मिळाला. खरतरं फारच दु:खदायक असा तो इतिहास आहे. कंबोडिया वर कम्युनिस्ट ख्मेर रूज ची सत्ता १९७५ ते १९७९ होती. पण ह्या चार वर्षाच्या कालावधीमध्ये दोन ते तीन दशलक्ष लोकांची हत्या झाली. ह्यामधून स्त्रिया, गरोदर स्त्रिया आणि अगदी लहान बाळेसुद्धा वाचली नाहीत. ह्या वंशहत्येमुळे कंबोडियाची लोकसंख्या २५% नी कमी झाली. ह्या वंशहत्येचे कारण होते शेतकी साम्यवाद (agrarian socialism). त्यासाठी अनेक लोकांना स्थलांतर करण्यासाठी भाग पाडले गेले, त्यांना कामगार म्हणून विनामोबदला वापरले गेले. दोन वेळचे अपुरे अन्न आणि अपुरी वस्त्रे तेवढी त्यांना मिळत. कुपोषणामुळे आणि निकृष्ट दर्जाच्या सोयीसुविधांमुळे अनेक कामगारांचा मृत्यू झाला. सुशिक्षित लोक अन्यायाविरुद्ध आवाज उठवतील ह्या भीती ने अनेक प्राध्यापक, अभियंते, डॉक्टर्स ह्यांना पकडून त्यांच्यावर अत्याचार करून त्यांना ठार मारण्यात आले. हेर असल्याची शंका जरी अधिकाऱ्यांना आली तरी अनन्वित अत्याचार करून त्या "हेरास" ठार मारले जात असे. आमचा गाईड आम्हाला सांगत होता कंबोडियातील जवळजवळ सगळीच कुटुंबं अशी आहेत की ज्यांचे कोणी न कोणीतरी पूर्वज ह्या वंशहत्येमध्ये मारले गेले आहेत. व्हिएतनाम हल्ल्यानंतर ख्मेर रूज ची सत्ता संपुष्टात आली पण त्यानंतर जवळजवळ २० वर्षे कंबोडिया मध्ये यादवी युद्ध माजले होते. ख्मेर रूज चे पळून गेलेले सगळे सैनिक जंगलांमध्ये राहून ह्या यादवी युद्धास साहाय्य करीत होते. १९९९ नंतर कंबोडिया मध्ये शांतता प्रस्थापित झाली.

अतिशय क्लेशदायक इतिहासामधून कंबोडिया पुन्हा उभे राहण्याचा प्रयत्न करत आहे. मनावर अतिशय मोठे आघात झाल्यानंतर सुद्धा येथील लोक हताश दिसत नाहीत. एक नवीन उत्साहाने कार्यरत झाल्यासारखे दिसतात. कंबोडियाचा इतिहास ऐकल्यानंतर मला वाटले ह्या जगात कितीतरी लोक अनंत आघात पचवून, अनन्वित अत्याचार सहन करून सुद्धा आनंदात जगायचा प्रयत्न करत असतात. आणि मी मात्र माझीच दुःखे कुरवाळण्यामध्ये धन्यता मानते. अशा दुःखांपुढे तर आपल्याला काही त्रास आहे हे म्हणायची सुद्धा मला लाज वाटायला लागली. तर अशा ह्या कंबोडिया मध्ये आम्ही आमचे नवीन वर्ष साजरे करणार होतो. आमचा निर्णय चूक होता कि बरोबर? तेव्हा ठाऊकच नव्हते.

कंबोडियन आणि ख्मेर पदार्थांसाठी प्रसिद्ध असणाऱ्या एका छोट्याशा रेस्टॉरंट मध्ये आमच्या गाईड ने आमच्या रात्री च्या जेवणाची सोय केली होती. त्यानंतर नदीच्या (Tonle Sap आणि Mekong संगम) किनाऱ्यावर कंबोडिया च्या राजाच्या महालाजवळ रात्री १२ वाजता फायरवर्क्स होणार होते. ते पाहण्यासाठी आम्ही नदीच्या किनाऱ्यावर लोकांचा उत्साह बघत भटकत होतो. आणि हळूहळू ह्या उत्सवाचे वैशिष्ठ्य जाणवू लागले. सर्व वयोगटातील स्त्री, पुरुष अगदी लहान मुले सुद्धा ह्या उत्सवाचा आनंद घेत होते. कोठेही कानठळ्या बसवणारे संगीत नाही की मद्यधुंद तरुणतरुणी नाहीत. पाश्चात्य देशांमध्ये तर सोडाच पण भारतात देखील असे दृश्य विरळच असावे. मनमुराद पणे सर्वच जण नदीच्या किनाऱ्यावर ह्या उत्सवाचा आनंद घेत भटकत होते. आपण सुरक्षित नाही अशी भावना कोठेही मनात येत नव्हती. फिरता फिरता आम्ही कंबोडियाच्या राजाच्या महालाबाहेर असलेल्या बागेपाशी आलो. आणि तेथील दृश्य बघून तर आम्ही चक्रावूनच गेलो. फ्नॉम पेन्ह मधील अनेक कुटुंबं आपआपल्या घरून डबे घेऊन आली होती. डब्यात सुद्धा एक किंवा फार तर फार दोन पदार्थ होते. सर्व जण बागेत सतरंज्या पसरून त्यावर अगदी हसत खेळत आपआपल्या डब्यातील पदार्थांचा आस्वाद घेत होती. कोणाकडेही चिप्स ची पाकिटे, पेयांचे कॅन्स, आदी पदार्थ आम्हास दिसले नाही. अगदी पॉपकॉर्न्स सुद्धा नाहीत. यथावकाश १२ वाजता राजाच्या महालामधून फायरवर्क्स करण्यात आले आणि ते पाहून आम्ही आमच्या हॉटेलवर परतलो. गरिबीमध्ये जगत असून सुद्धा, दु:ख आणि अत्याचाराचा एवढा रक्तरंजित इतिहास असतानाही अतिशय आनंदाने येणाऱ्या नवीन वर्षाचे स्वागत करणारे कंबोडियन नागरिक बघून मला फार आश्चर्य वाटले.

आमचे नवीन वर्ष एका अनोख्या पद्धतीने साजरे झाले होते. इतकं निरागस वातावरण कोणत्याही उत्सवात मी कधीच पहिलं नव्हतं. आयुष्यभराची मोठी शिकवण ह्या वर्षाच्या सुरुवातीलाच मला मिळाली: असलेल्या साधनांतून आनंद साजरा करण्यासाठी आधी तो आनंद मनात असावा लागतो. समाधानी माणूस हा खरा श्रीमंत असतो. हा सगळा उत्सव पाहून एकदमच दिखावट सणवारांची तिडीक बसली. असले दिखावट आयुष्य जगणारे लोक ह्या कंबोडियन लोकांपेक्षा खरंतर कितीतरी पटीने गरीब आहेत ह्याची खात्री पटली. "नवीन वर्ष कसे साजरे केले?" ह्या प्रश्नाला उत्तर द्यावे लागते म्हणून काहीतरी "छान" करायलाच हवं ह्या असल्या विचारांची कीव वाटू लागली. मला वाटू लागले की मी सुद्धा समाजात राहायचं म्हणून कायम दिखावट जगण्यातच आनंद मानत असते. वाढदिवस, लग्नाचा वाढदिवस, व्हॅलेंटाइन डे, हा डे, तो डे, अगदी आपले सणवार सुद्धा एवढ्या मोठ्या प्रमाणावर साजरे करण्याची खरंच गरज आहे का? कुटुंबीयांबरोबर दिवस आनंदात घालविणे हे एवढेच पुरेसे नाही का? आनंदात असाल तर रोज उत्सवच आहे आणि आनंदात नसाल तर काय वाट्टेल ते केलं तरी समाधान होणारच नाही. प्रत्येक दिवस आनंदात राहणे आणि आपण किती नशीबवान आहोत ह्याबद्दल आभार (दैवाचे अथवा देवाचे) मानणे ही समाधानी जीवन जगण्याची गुरुकिल्ली आहे हे ह्या वर्षाच्या सुरुवातीलाच मी शिकले.

हळूहळू कंबोडिया प्रगती करेल. येथील गरिबी दूर होईल. येथेही समृद्धी येईल. आणि पाश्चात्य संस्कृती कदाचित येथे सुद्धा आक्रमण करेल. मग दिखावट सणवार, एकमेकांशी स्पर्धा हे सगळं इथे सुद्धा चालू होईल. कानठळ्या बसवणारे संगीत आणि मद्यधुंद तरुणतरुणी येथील संस्कृतीचाही एक भाग होऊन बसतील. इथली निरागसता कायमची नष्ट होईल. तशी ती होऊ नये म्हणून कोणी विशेष प्रयत्नही करणार नाही. पण सुदैवाने त्याआधीच इतक्या निरागस उत्सवाची साक्षीदार मी होऊ शकले आणि त्यामुळे आयुष्याचे फार मोठे मर्म मला कळले.

Kambodia New Year 1.JPGKambodia New Year 2.JPG

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आवडलं.

माझा नवरा नुकताच ४ महिने कंबोडियात ( ऑन साईट ) राहून आला.त्यामुळे बरेचसे संदर्भ लागले.

त्याच्याकडून खूप कौतुक ऐकल .
क्लाईंट कडचा एक उच्चपदस्थ अधिकारी वंशहत्येच्या काळात काय काय भोगले त्याचे वर्णन करत होता . अगदी जंगलात रहाणे , हालाखित दिवस काढणे , सगळ करून आता स्वकर्त्तुत्वावर वर आला.

पण नवर्याच्या म्हणण्यानुसार आता हळूहळू पाश्चात्य पगडा तिथेही दिसू लागला आहे .

( नवर्याने इतक इतक इतक कौतुक केलं की मला वाटायला लागलं आता हा तिक्डेच जाउन सेटल होउ सांगतो की काय ?? )

छान लिहिलंय.. माझा विश लिस्ट वरती आहे तो.
त्या जिनोसाईड बद्दल काही फिल्म्स बघितल्या आहेत मी.. अगदी बघवत नाही ते.
कंबोडीया, सर्बिया, गाझा, इराण, अफगाणिस्तान, लेबनॉन... सगळ्या देशांच्या इतिहासावर अत्यंत प्रभावी चित्रपट
बनलेले आहेत. तरी कुणी त्यातून धडा घेतलेला दिसत नाही.

छान लिहिलंय. तुमच्या ट्रीपच्या बाकिच्या अनुभवाबद्दलही लिहा आणि फोटोज प्लीज Happy

<<पण सुदैवाने त्याआधीच इतक्या निरागस उत्सवाची साक्षीदार मी होऊ शकले आणि त्यामुळे आयुष्याचे फार मोठे मर्म मला कळले>> बघु, आम्हालाही असच साक्षीदार होता येते का ते.

सर्व प्रतिक्रियांबद्दल धन्यवाद. दोन फोटो टाकले आहेत. रात्र असल्यामुळे फोटो फार स्वच्छ आले नाहीत.

कंबोडिया आणि थायलंड च्या खाद्यपदार्थांबद्द्दल आणि विशेषत: थायलंड च्या street food बद्द्ल लिहायचे आहे. दिवाळी अंकासाठी जमेल कि नाही माहित नाही पण कधीतरी नक्की लिहीन.

ह्या ट्रीप चे इतर अनुभव पण लवकरच लिहीन.

सुमुक्ता, हे लिहिल ते फार आवडल. तुझा अनुभव स्पर्शून गेला.. आणि काहीतरी शिकवून सुद्धा गेला.

मी सिंगापुरला नोकरी करतो. आम्हाला कंबोडिया जवळ आहे. मी चार दिवस सियाम रिपला होतो. मला सुद्धा कंबोडिया प्रचंड आवडले. तिथल्या लोकांचे पाय अजून जमिनिवार आहे असे वाटले. अतिशय सभ्य आणि गोड संस्कृतीचा देश. खूप काही लिहायचे आहे मला सुद्धा कंबोडियावर पण हवी ती शिस्त आणि हवासा वेळ मिळत नाही Happy

सुमुक्ता, छान लिहिलं आहेस. कंबोडिया म्हटलं कि गरीबी आठवायची, तुझ्या मुळे या देशाची श्रीमंती आम्हाला कळली..

मस्त लिहीले आहे...विशेषतः "आनंदात असाल तर रोज उत्सवच आहे आणि आनंदात नसाल तर काय वाट्टेल ते केलं तरी समाधान होणारच नाही. प्रत्येक दिवस आनंदात राहणे आणि आपण किती नशीबवान आहोत ह्याबद्दल आभार (दैवाचे अथवा देवाचे) मानणे ही समाधानी जीवन जगण्याची गुरुकिल्ली आहे हे ह्या वर्षाच्या सुरुवातीलाच मी शिकले."

(स्वगतः आमची काउ, हे कधी शिकणार?)