डीडीएलजेचं गारूड

Submitted by टोच्या on 11 December, 2014 - 08:16

‘कम, फॉल इन लव्ह…’ अशी टॅगलाइन घेऊन आदित्य चोप्रानं निखळ करमणूक करणारी प्रेमकथा आणली आणि तिने अक्षरशः हिंदी चित्रपटांचे भविष्य बदलून टाकले. तो काळ अमिताभ नावाचे वादळ शांत होण्याचा होता. अमिताभने घालून दिलेल्या मार्गावरच चालण्याच्या उद्देशाने तेव्हा अक्षय कुमार, अजय देवगण, सुनील शेट्टी यांसारख्या अॅक्शन हिरोंची नव्या दमाची फळी उभी राहिली. नव्वदच्या दशकानंतर हिंदी चित्रपट एकाच वळणाने जात होता. दणकट हिरो, त्याच्यावर झालेला अन्याय, त्यासाठी त्याचे पेटून उठणे, ड्र्ग्जचा व्यवसाय करणारा व्हिलन आणि झाडांभोवती फेर धरून नाचण्यापुरती हिरोईन. दहापैकी नऊ सिनेमांचे कथानक याच प्रकारचे असायचे. त्यामुळेच सुनील शेट्टीसारखा ठोकळाही भाव खाऊन गेला. त्याच दरम्यान शाहरूख, सलमान, आमीर या खान मंडळींचाही स्ट्रगल सुरू होता. चिकने-चोपडे चेहरे आणि सुमार शरीरयष्टी यामुळे तिन्ही खान अॅक्शन हिरो वाटत नव्हते. त्यामुळे सुरुवातीला ते या भाऊगर्दीतलेच एक होते. त्यावेळचे दिग्दर्शकही तसेच. अगदी यश चोप्रांपासून, यश जोहर, राकेश रोशन यांसारखे मोठे दिग्दर्शकही टिपीकल मारधाडीच्याच मार्गाने जात होते. अभिनयात जशी नव्या दमाची पिढी उतरली, तशी दिग्दर्शकांचीही एक नवी फळी तयार होऊ लागली होती. पण तरीही टिपीकल मारधाडीच्या चित्रपटांचा मार्ग सोडून वेगळी वाट चोखाळायची हिंमत कुणी करत नव्हते. ती हिंमत केली आदित्य चोप्राने. यश चोप्रांच्याच पावलावर पाऊल ठेवत त्याने दिग्दर्शनाच्या पहिल्याच प्रयत्नात प्रेमकथा हाताळली. तोपर्यंत अनेक प्रेमकथा येऊन गेल्या होत्या. मात्र, त्यात तोच तोपणा होता. आदित्यने ‘दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे’ अशा भल्या मोठ्या नावाने ही प्रेमकथा आणली. त्याच्या एक वर्ष आधी आलेला सूरज बडजात्याचा ‘लग्नाची कॅसेट’ म्हणून हिणवला गेलेला ‘हम आपके है कौन’ तुफान चालला होता. बाजीगर, करण-अर्जुन, दिवाना असे तीन-चार हिट सिनेमे नावावर जमा असलेला शाहरूख आणि तोपर्यंत फारसा प्रभाव न दाखवू शकलेली काजोल अशा जोडीला घेऊन आदित्यने आपला ड्रीम प्रोजेक्ट हातात घेतला. तोपर्यंत हिंदी चित्रपटांमधून फारशी न दिसलेली यूरोपातील सुंदर लोकेशन्स, पंजाबमधील सरसों की खेती यामुळे सिनेमाची फ्रेम अगदी फ्रेश झाली होती. जोडीला परदेशात राहणारा गुलछबू नायक आणि भारतीय संस्कारी घरात वाढलेली नायिका यांची तितकीच ताजीतवानी प्रेमकथा. त्यात त्यावेळी फेमस असलेल्या जतीन-ललीत या जोडगोळीचं संगीत आणि उदीत नारायण, कुमार सानू, लतादिदी आणि आशा भोसले यांच्या जादूई आवाजात अजरामर झालेली गाणी. हिंदी सिनेमांतील काही गाणी पहायला चांगली वाटतात, तर काही गाणी फक्त ऐकायलाच चांगली वाटतात. मात्र, डीडीएलजेची गाणी जितकी श्रवणीय होती, तितकीच ती प्रेक्षणीयही होती.
अशी ही प्रेमकथा पडद्यावर आली आणि लोकांनी अक्षरशः डोक्यावर उचलून घेतली. ‘मेहंदी लगा के रखना’ या गाण्यासाठी चार-चार वेळा हा सिनेमा पाहिलेले लोक मी पाहिलेत. संपूर्ण कुटुंबाने एकत्र बसून पहावी अशी निखळ प्रेमकथा असल्यामुळे सिनेमागृहातल्या खुर्च्यांच्या रांगाच्या रांगा कुटुंबे, मित्रमंडळींसाठी बुक असायच्या. ‘डीडीएलजे’ मिळाला आणि शाहरूख खान ‘राज’ झाला. या राजनेच त्याला आज ‘किंग खान’ बनवलंय. अन्यथा, शाहरूखही अजय देवगण, अक्षय कुमारच्या पंक्तीत मारधाडीचे सिनेमे करत बसला असता. डीडीएलजेने रोमॅण्टिक लव्ह स्टोरीचे एक युग सुरू केले, जे पुढे ‘दिल तो पागल है’, ‘कुछ कुछ होता है’, ‘हम दिल दे चुके सनम’ यांसारख्या सिनेमांनी पुढे नेले. नव्वदच्या दशकातल्या एका संपूर्ण पिढीवरच ‘दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे’ने गारूड केलंय. आज सीडी, डीव्हीडी, इंटरनेट, केबल, डझनावारी हिंदी चित्रपट वाहिन्या यामुळे घरोघरी सिनेमे पहायची सोय झाली. हा सिनेमा इतक्या वेळा टीव्हीवर येऊनही प्रत्येक वेळी तो नवा वाटतो.
आज पस्तीशी-चाळीशीत असलेल्या पिढीला आजही या सिनेमामुळे आपले मोरपंखी दिवस आठवतात. सिनेमा येऊन वीस वर्ष उलटून गेलीत. मात्र, या सिनेमातला ताजेपणा कायम आहे. त्यानंतर सिनेमांतही अनेक ट्रेण्ड आले, स्थिरावले आणि पुन्हा बदलले. मात्र, डीडीएलजेच्या लोकप्रियतेत घट झाली नाही. ‘शोले’ न पाहिलेला माणूस भारतात दाखवा, असं म्हटलं जायचं. तसंच ‘डीडीएलजे’ न पाहिलेला माणूस दाखवा, असं म्हणावं लागेल. सुभाष घईंनाही डीडीएलजेची प्रेरणा घेऊन ‘परदेस’ बनवावासा वाटला. रोहित शेट्टीच्या ‘चेन्नई एक्सप्रेस’मध्ये राज-सिम्रनचा रेल्वे सीन, आणि करण जोहरने ‘हम्प्टी शर्मा की दुल्हनिया’तून ‘डीडीएलजे’ला दिलेली मानवंदना, ही या सिनेमाने चित्रपटसृष्टीवरही केलेल्या गारूडाची पावतीच. मुंबईतल्या मराठा मंदिर सिनेमागृहातून हा सिनेमा वीस वर्षांनंतर उतरणार आहे, अशा बातम्या माध्यमांमधून येत होत्या. मात्र, सिनेरसिकांच्या मागणीखातर तो न उतरविण्याचा निर्णय यशराज बॅनर्स आणि मराठा मंदिर थिएटरच्या प्रशासनाने घेतला. त्यामुळे रसिकांना याच थिएटरला डीडीएलजेचं आणखी काही वर्ष पहायला मिळणार आहे. तब्बल वीस वर्ष एकाच थिएटरला दररोज सुरू असणारा आणि दर रविवारी हाऊस फुल्लचा बोर्ड झळकणारा हा जगातील ‘न भूतो, न भविष्यति(?)’ असा सिनेमा ठरला आहे, असे मला तरी वाटते. आज १२ डिसेंबर रोजी हा सिनेमा रिलीज होऊन वीस वर्ष होत आहेत. हॅट्स ऑफ टू आदित्य चोप्रा अॅण्ड डीडीएलजे टीम.
--

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त.खुप मनापासुन लिहिलेत.डीडीएलजेचं गारूड त्या काळातल्या केवळ शालेय मुलांच्यातच नव्हते तर तो सर्व वयोगटातल्या लोकांना आवडला होता.त्याची गाणी इतकी सुरेख आहेत की अजुनही ती लागली की मिनिटभरासाठी तरी पाहीली जातात. केवळ प्रेमकथा म्हणुन नव्हे तर भारतीय पारंपारिक मुल्य,कुटुंबाचे संस्कार ,वडिलधारयांचा धाकाबरोबरच त्यांच्या मर्जी शिवाय आपण सुखी राहु शकतो पण आनंदी आणि समाधानी केवळ त्यांच्या स्वीकृतीने आशिर्वादाच्या जोरावरच राहु शकतो हा संदेश मनामनात पोचवला . अगदी शाहरुख म्हणतो तसे ,त्याच्या वैयक्तिक आयुश्यातही गौरी तो चित्रपट पाहुन खुश होते ,ते यासाठीच. सामाजिक संदेशासाठी अनेक चित्रपट बनतात.पण केवळ जमुन आलेला साधीसरळ प्रेमकथा असणारा हा चित्रपट लोकं पुन्हा पुन्हा पाहतात हेच या चित्रपटाच्या यशाचे गमक आहे.सगळ्या लवस्टोरींचा बाप आहे असं म्हंटलं तर काही वावगं वाटणार नाही.

बाकी....जा सिमरन जा जी ले अपनी जिंदगी ....म्हणणारे वडिल कीतीही कठोर वाटले तरी सगळ्यांना आवडतातच .:स्मित:

मनस्मी, नंदिनी चूक लक्षात आणून दिल्याबद्दल धन्यवाद. त्यावेळी नदीम-श्रवणणं इतका धुमाकूळ घातला होता की, चुकून त्यांचे नाव टंकले गेले.

सुरुवातीला टॉम क्रुझला साईन करणार होता. पण तारखा जुळल्या नाहीत मग आदित्यने शाहरुखला घेतले त्याने देखील सुरुवातीला नकार दिलेला कारण डर, बाजीगर, करण जोहर सारखे अ‍ॅक्शन निगेटिव्ह भुमिका साकारल्या मुळे एक इमेज तयार झाली होती. ती इमेज राज नावाच्या कॅरेक्टरवर बसुन चित्रपटाला नुकसान होईल अशी काळजी वाटत होती.

शुभेच्छा.

मुगले आजम, शोले, डीडीएलजे बेस्ट ओय बेस्ट

<< . तब्बल वीस वर्ष एकाच थिएटरला दररोज सुरू असणारा आणि दर रविवारी हाऊस फुल्लचा बोर्ड झळकणारा हा जगातील ‘न भूतो, न भविष्यति(?)’ असा सिनेमा ठरला आहे, असे मला तरी वाटते. आज १२ डिसेंबर रोजी हा सिनेमा रिलीज होऊन वीस वर्ष होत आहेत >>

वीस वर्षे चालणे हा निकष चित्रपटाला ‘न भूतो, न भविष्यति(?)’ ठरविण्याकरिता पुरेसा आहे असे वाटत नाही. अनेकदा चांगले चित्रपट पडतात तर अतिवाईट चित्रपट प्रचंड व्यावसायिक यश मिळवितात. शिवाय मुंबईतील ईरॉस येथून होणारी वितरणव्यवस्था अतिशय अन्यायकारक व ठराविक मोठ्या निर्मात्यांच्याच सोयीची आहे. यश चोप्रांसारख्या बड्या चित्रपट निर्मात्यास काही गोष्टी आऊट ऑफ द वे जाऊन किंवा सिस्टीमला हवे तसे वाकवून मॅनेज करणे शक्य होते. तिथले तिकीट दर देखील बरेच कमी होते असे कळते. व्यक्तिशः मला तरी दिलवाले दुल्हनियां ले जायेंगे हा चित्रपट आवडला नाही. अर्थात इतर कुणाचे मत यापेक्षा भिन्न असू शकते.

चेतन सुभाष गुगळे
हा सिनेमा रिलीज झाला त्यावेळी मी नववी किंवा दहावीला असेन. त्यामुळे सिनेमा आवडण्यामध्ये कदाचित त्या वयाचा परिणाम असू शकतो. आणि ही गोष्ट खरी आहे की हा सिनेमा वीस वर्ष चालला असे नाही, तर पाचशे आठवड्यांच्या नंतर तो पूर्णतः नुकसानीत चालवला. आजही या सिनेमाची तिकिटे पंधरा, सतरा आणि वीस रुपये अशी आहेत. त्यामुळे केवळ रेकॉर्ड बनविण्यासाठीच हा सिनेमा इतके दिवस न उतरवल्याचं मराठा मंदिरच्या व्यवस्थापकांनी एका मुलाखतीत सांगितलंय. पण, तरीही पाचशे आठवडे का होईना चालणे ही काही किरकोळ बाब नाही. आजच्या घडीला महिनाभर सुध्दा एखादा चित्रपट एकाच चित्रपटगृहात टिकत नाही. अपवाद काही मराठी चित्रपटांचा. त्यामुळे या सिनेमांचं तरुणाईवरील गारूड मान्य करावंच लागेल.

त्याच दरम्यान शाहरूख, सलमान, आमीर या खान मंडळींचाही स्ट्रगल सुरू होता. चिकने-चोपडे चेहरे आणि सुमार शरीरयष्टी यामुळे तिन्ही खान अॅक्शन हिरो वाटत नव्हते. >> ह्यातले सलमानचे नाव चुकून पडलय बहुधा. DDLJ यायच्या अगोदरच त्याने आपली अ‍ॅक्शन हिरो हि ईमेज सुरू केली होती. पाहा जाग्रुती, निश्चय. त्यात शर्ट काढून डिप्स मारणे वगैरे प्रकार सुरू केले होते. हे लक्षात राहाण्याचे कारण म्हणजे जिममधे त्याचे त्या सिनेमामधले व्यायाम करतानाचे पोस्टर लावलेले होते (मी नाही, तळवलकरांनी Wink )

बाकी सिनेमाच्या सेंटिमेंटसबद्द्दल एकदम सहमत. सिनेमा पूर्ण entertaining आहे ह्यात शंका नाही. आदित्य चोप्राला परत असा सिनेमा बनवता आला नाही.

हा सिनेमा रिलीज झाला त्यावेळी मी नववी किंवा दहावीला असेन. त्यामुळे सिनेमा आवडण्यामध्ये कदाचित त्या वयाचा परिणाम असू शकतो. >> +१

मी हा सिनेमा पहिला तेव्हा मला पण खूप आवडला होता पण आता आवडेल असे वाटत नाही. गाणी मात्र अजूनही आवडतात.

आपल्या सिनेमाबद्दलच्या भावना कळल्या. मलाही दिलवाले दुल्हनिया आवडतो.

परंतु या आवडण्याच्या भरात तुम्ही त्याला खुप मोठे करत आहात. याच्या आधीही बरेच मारधाड नसलेले सिनेमे आले. खुद्द यश चोप्रा यांनीच नव्वदी नंतर तसे चित्रपट करणे बंद केले होते. चांदनी, लम्हे हे प्रेम पटच होते. अमिर तर कयामत से कयामत तक, दिल, हम है राही प्यार के अशा अनेक चित्रपटांत चमकला होता. सलमान सुद्धा प्रेमपटांचा राजा होता. उलट शेट्टी मंडळींचे चित्रपट फक्त पिटातल्या प्रेक्षकांचे राहिले होते.

आता तुमच्या तिकिटांच्या किंमती बद्दल सांगायचे तर तो मराठा मंदिर मध्ये मॉर्निंग्/मॅटिनी ला होता/आहे. आणि त्या वेळांचे एक पडदा सिनेमाग्रुहांचे तिकिट कमीच असतात. मी २००८ मध्ये तिकडे पाहिला तेव्हा तो हाऊस फुल होता. चित्रपट चांगला आहे पण आपण उगिच खुप मोठे करत आहात त्याला.

असामी,
ह्यातले सलमानचे नाव चुकून पडलय बहुधा. DDLJ यायच्या अगोदरच त्याने आपली अ‍ॅक्शन हिरो हि ईमेज सुरू केली होती. पाहा जाग्रुती, निश्चय. त्यात शर्ट काढून डिप्स मारणे वगैरे प्रकार सुरू केले होते. हे लक्षात राहाण्याचे कारण म्हणजे जिममधे त्याचे त्या सिनेमामधले व्यायाम करतानाचे पोस्टर लावलेले होते (मी नाही, तळवलकरांनी डोळा मारा )>> सहमत. पण तरीही तो शेट्टी, देवगण, अक्षय यांच्या मागेच होता.

धनि,
चांदनी, लम्हे हे प्रेम पटच होते. अमिर तर कयामत से कयामत तक, दिल, हम है राही प्यार के अशा अनेक चित्रपटांत चमकला होता. सलमान सुद्धा प्रेमपटांचा राजा होता. उलट शेट्टी मंडळींचे चित्रपट फक्त पिटातल्या प्रेक्षकांचे राहिले होते. >>
यातला लम्हे सोडला तर सर्वच प्रेमकथा जवळपास एकाच अंगाने जाणाऱ्या आणि मारधाड असलेल्या होत्या. सलमानचे सिनेमेही त्याच अंगाने जाणारे होते.

मराठा मंदिरला हा सिनेमा एवडा चालण्यामागे त्याचे लोकेशनदेखील कारणीभूत आहे. बॉम्बे सेंट्रल आणि बस स्टँड ही दोन्ही इथून्जवळ आहेत. ट्रेन तीन चार तास लेट आहे, बस चुकली, चला वीस पंचवीस रूपये देऊन एसीमध्ये बसू. पिक्चर पण चांगलाच आहे या विचारानं बरीच लोकं येतात. मराठा मंदिरला काही प्रॉब्लेम नाही, कारण त्यांना प्रेक्षक मिळतातच आहेत. नुकसानीमध्ये वगैरे काही चालू नाही.

डीडीएलजे बर्‍यापैकी ट्रेण्ड सेटींग आणि फ्रेश सिनेमा होता यात वाद नसावा. मलादेखील हा सिनेमा आवडतो. पण नंतर शाहरूख याच इमेजमध्ये अडकला याचं फार वाईटसुद्धा वाटतं. Sad

मी complete DDLJ fan! त्यावेळी मी शा.खा., आणि काजोलच्या प्रेमात होते फुल्ल! अजूनही त्या वेळेच्या प्रेमात आहेच! अर्थात (त्यामुळेच कदाचित) आता तो बघताना कसा वाटेल असा विचार करून बघितलाच नाहीये! पण गाणी मात्र सदाबहार आहेत! मेरे ख्वाबोंमें आणि न जाने मेरे माझी अत्यंत आवडती गाणी! उद्या खास ती गाणी ऐकायचा विचार आहे!

सलमानच्या प्रेमपटात मैने प्यार किया कसा नाही आठवला कुणाला?

बाबूजी ठिक कहते है सिमरन, मै एक आवारा किसम का लडका हू.. तो क्या हुआ अगर येह आवारा तुम्हे दिवानो की तरह प्यार करता है....... तो क्या हुआ!!!.. प्यार सब कुछ तो नही होता ना.. बस्स रे बस्स.. तूच रे तू शाहरूख.. बस्स तूच तू.. नाहीतर हा सिनेमा कधी असा बनलाच नसता, कधी असा गाजलाच नसता.. बस्स चौधरी साहब बस्स.. मेरा बेटा मेरा गुरूर है.. जिओ मेरे शारूख!!!

आपण काय या सिनेमाला मोठे करणार... या सिनेमाने आपल्याला मोठे केलेय!!

>>मुगले आजम, शोले, डीडीएलजे बेस्ट ओय बेस्ट <<
डिडिएलजेला मुगले आझम, शोलेच्या पंक्तीत प्लीज बसवु नका. कहां राजा भोज कहां गंगु तेली...

>>मुगले आजम, शोले, डीडीएलजे बेस्ट ओय बेस्ट <<
डिडिएलजेला मुगले आझम, शोलेच्या पंक्तीत प्लीज बसवु नका.
--------- शोले आणि डीडीएलजे या दोन्ही चित्रपटान्चा मी फॅन आहे. पण शोले सर्वार्थाने Outstanding आहे.

शोले आणि डीडीएलजे एकाच पठडीतले सिनेमे आहेत. मनोरंजक भारतीय ब्लॉकबस्टर.. का एका पंक्तीत बसवू नये..
हवे तर शोले जास्त आवडतो हे विधान बिनधास्त मांडू शकतात..
मुघले आजम खूप लहानपणी पाहिला असल्याने, आठवतही नाही, नो कॉमेंटस..

मला आणि माझ्या मित्राला तरी हा चित्रपट आवडला नाही. आम्ही दोघांनी वेगवेगळ्या वेळी पाहिला होता.
हिरो आपल्या प्रेयसीच्या होऊ घातलेल्या नवऱ्याशी आधी मैत्री करतो आणि नंतर त्याचाच विश्वासघात करतो, हे खटकलं. प्रेमासाठी एखाद्याशी तुम्ही मैत्री करून त्याचा विश्वासघात करण्यात काहीही गैर नाही अशा प्रकारची विचारसरणी आम्हाला तरी आश्चर्यकारक वाटली.
शिवाय हिरो बऱ्याचदा हिरोईनला गटवण्यासाठी जे चाळे करतो, ते आम्हाला अतिशय 'चीप',किळसवाणे वाटले होते.
त्या मानाने मैने प्यार किया, हम आपके है कौन, कयामत से कयामत तक हे चित्रपट खूप सुंदर होते. कुछ कुछ होता है सुद्धा चांगला वाटला होता.

टोच्या...
सुंदर कलाकृती विषयी लिहिलेला तुमचा ही तितकाच सुंदर लेख.

मला असे वाटते की DDLJ चालण्या मागचे एक प्रमुख कारण त्याची पटकथा हे पण होते.
यश जींच्या चित्रपटात तसे ही प्रेमाला अनन्यसाधारण महत्व होते. त्याच्या एक वर्ष आधी आलेला सूरज बडजात्याचा ‘लग्नाची कॅसेट’ म्हणून हिणवला गेलेला ‘हम आपके है कौन’ तुफान चालला होता हे तुम्ही नमुद केलेलेच आहे, पण HAHK मध्ये एक मला वाटते मोट्ठा Drawback होता, तो म्हणजे HAHK मिट्ट गोड होता...चित्रपट पाहुन एखाद्याला Diabetes होईल इतका....सगळेच कसे goody goody अर्थात त्या वेळच्या तद्दन मारकाट, हिंसा, बलात्कार, तुझे मेरी कोख की कसम....टाईप अतिसारावर HAHK उत्तम ईलाज होता, पण DDLJ च्या कथानका मध्ये सगळेच घटक योग्य प्रमाणात होते..
त्यात थोडासा ड्यांबीस पण लवेबल नायक होता, तद्दन भारतिय संस्कारात मढलेली नायिका होती; जी उत्तम शिकलेली आहे, फारीन मध्ये राहते, कविता करते, आपल्या आणि खानदान कि इज्जत ची पर्वा करते, मुलांना समजुन घेणारी आई होती जी आपल्याला आयुष्यात काही choice नव्हता पण म्हणुन मुली ने तसे आयुष्य घालवु नये म्हणुन मुली च्या प्रियकराला तिच्या बरोबर पळुन जायला सांगते, आणि नायकाने मुली च्या वडिलांनी रितसर पणे लग्न लावुन दिल्या शिवाय, त्यांनी संमती दिल्या शिवाय नायिकेला घेउन जाणार नाही हे सांगितल्यावर चिंतीत ही होते, चित्रपटात उत्तम गाणी होती, उत्तम संगीत होते, नयनरम्य लोकेशन्स होते आणि मुळात ह्या सगळ्याची भट्टी उत्तम जमली होती.. HAHK मध्ये ग्रे किंवा निगेटीव्ह असे काहीच नव्हते... DDLJ च्या क्लायमेक्स मध्ये आदित्य चोप्रा नी नायिकेचा होणारा नवरा, त्याचे रांगडे मित्र आणि काही प्रमाणात नायिकेचे वडिल ह्यांना ग्रे शेड मध्ये उभे केले...आणि शेवटी नायकाच्या प्रेमाचा विजय होउन नायिकेच्या वडिलांना..."जा सिमरन जा...जि ले अपनी झिंदगी म्हणायला ही भाग पाडले.."
मला वाटते हेच DDLJ च्या या यशाचे गमक आहे Happy

Prasann Harankhedkar ,मस्त .म्हणुनच तर हा काजोलचा सर्वांत बेस्ट रोल आहे .जो तीने ताकदीने आणि तीतकाच सुंदर केलाय या चित्रपटात. दिल तो पागल है’, ‘कुछ कुछ होता है’, ‘हम दिल दे चुके सनम’ हे चित्रपट आपआपल्या जागी छानच आहेत त्यांची तुलना एकमेकांशी होउ शकत नाही . मला तर हम्टी शर्मा .. पण चांगला वाटला. त्यातलेपण काही संवाद मजेशीर आहेत. Happy

>>>आपण काय या सिनेमाला मोठे करणार... या सिनेमाने आपल्याला मोठे केलेय!!<<<

सुंदर विधान ऋन्मेष!

लेख आवडला. (पॅरा पाडले असते तर जरा वाचायला थोडे सोपे गेले असते, पण तो स्ट्रक्चरल भाग).

हिंदी चित्रपटांच्या त्या काळातील प्रवासात ह्या चित्रपटाचे महत्व नोंदवताना विषयाला चांगला न्याय दिला गेला आहे.

मला हा पिक्चर अगदी खूप वगैरे नाही आवडत, पण पिक्चर सुंदर आणि महत्वाचा आहे हे नक्कीच! (व्यक्तीशः मला काजोल फारशी आवडलीच नाही कधी! Sad तसेच करिष्मा, करीना, प्रियांका, रवीना, श्रीदेवी वगैरेही नाही आवडल्या विशेष. त्यामुळे त्यांचे अनेक चित्रपट चांगले असूनही विशेष आवडायचे नाहीत.)

ह्या चित्रपटात शाहरुखचे मूळ व्यक्तीमत्व कथेला शोभेल अश्या पद्धतीने खुलवण्यात दिग्दर्शकाने कमाल केलेली आहे असे वाटते. (म्हणजे मुळातच शाहरुख असाच असावा, वरवर उथळ वागणारा, कायम फसफसलेला, पण आत कुठेतरी चांगली मूल्ये जीवापाड जपणारा इत्यादी! जसा कभी हां कभी ना मधे होता तसा काहीसा).

ह्या चित्रपटातील क्लायमॅक्समध्ये अमरीश पुरीचे क्षणार्धात झालेले मतपरिवर्तन आणि मग काजोलने धावणे आणि शाहरुखने हाताचा आधार देऊन तिला ट्रेनमध्ये घेणे वगैरे खूप सुखद आणि रोमांचकारी असले तरी ते बर्‍यापैकी 'अ आणि अ' आहे. एखाद्या ज्येष्ठ व खडूस खोडाचे असे अचानक मतपरिवर्तन होणे अवघड असते. पण अश्याच गोष्टींनी हिंदी चित्रपट युनिक ठरत आलेले आहेत.

डीडीएलजे ह्या चित्रपटाने अश्लीलता, बीभत्सता, विकृती, अंगविक्षेप, भडक / उत्तान नृत्ये / सीन्स, अनावश्यक मारामार्‍या / बाँबस्फोट वगैरे काहीही न दाखवताही एक अत्यंत दर्जेदार प्रेमकथा हिंदी चित्रपटाच्या इतिहासाला दिली. कयामतसे कयामत तक आणि मैने प्यार किया ह्या प्रेमकथाही तेव्हाच्या काळी ट्रेंडचेंजरच होत्या. त्याही दर्जेदार होत्या.

उत्तम कलाकृतीला केव्हाही प्रेक्षक उचलून धरतोच आणि बाजारूच निर्मीती करायची गरज नसते हे मात्र डीडीएलजेने (पुन्हा एकदा) सिद्ध केले (इतकेच).

चु भु द्या घ्या

-'बेफिकीर'!

>>शोले आणि डीडीएलजे एकाच पठडीतले सिनेमे आहेत. मनोरंजक भारतीय ब्लॉकबस्टर<<
शोले भारतीय सिनेस्रुष्टीतला मैलाचा दगड आहे, डिडिएलजे नुस्ताच दगड... Happy

>>का एका पंक्तीत बसवू नये..<<
कहां राजा भोज कहां गंगु तेली...

आपण पण फुल शाहरूख फॅन .
मला डर , अंजाम अन बाजीगरचा शाहरूख जास्त आवडत असला तरी हाही आवडला .
फक्त नंतर वर नंदिनीने म्हटल्याप्रमाणे त्याच्या राज अन राहुल व्हायची सुरूवात इथून झाली हेही खर . Sad

बाकी शोले चांगला म्हणायला डीडीएलजे ला वाईट का म्हणाव लागत हे कळल नाही Happy

. ‘शोले’ न पाहिलेला माणूस भारतात दाखवा, असं म्हटलं जायचं. तसंच ‘डीडीएलजे’ न पाहिलेला माणूस दाखवा, असं म्हणावं लागेल>>>
I want to nominate for this one...
शोले चिकार वेळा पाहिला, DDLJ गाणी पाहिलित सिनेमा नाही पाहिला.. Uhoh

‘शोले’ न पाहिलेला माणूस भारतात दाखवा
>>>>>>>
बाईमाणूस आहे माझ्या पाहण्यात, जिला अ‍ॅक्शन आवडत नाही, म्हणून शोलेच्या वाटेला गेली नाही.

असतात अपवाद काही ,त्यात काय एवढं .. सगळ्यांनी सगळं पाहायलाच हवं असा काही रुल नाहीये Proud (हे वाक्य वरच्या दोन आयडींसाठी आहे)

Pages