साद

Submitted by नीधप on 9 December, 2014 - 05:25

फेसबुकावर एका मित्राने साकुराच्या बहराचा एक अप्रतिम फोटो टाकला होता. आणि कुठले गाणे सुचते असे विचारले. त्यावर मी अतिशहाणपणाने गाणे सुचत नाही. मी स्वतःच काही लिहिन, उधार शब्द नकोत असे बाणेदार उत्तर दिले. तर मित्र म्हणे लिहा लवकर... आता आली का पंचाईत!! मग लिहिले.. ते हे.

----------------------------------------------
स्तब्ध निवळशंख पाणी
बर्फाळ गुलाबी आसमंत
ओलसर स्वच्छ शांतता
पहाटेची वेळ
गार पडलेले नाक
पापण्यांवर झुरझुर बर्फ
तसलेच झुरमुर वय

अशी एक साद घातली होती

तुझा प्रतिसाद
आला
की नाही आला?
आला तर कुठल्या दिशेने आला?
आठवतही नाही..

ती साद आठवते
आणि एक सुंदर शांतता मनात झिरपत रहाते
- नी

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

फोटो पण जबरी आहे तो!!<<<
येस्स.. अप्रतिम आहे तो फोटो..

पाणि वाहतं झालं का बयो?<<
कुणास ठाऊक.
थँक्स टू धीरज.. लिहिली गेली हे खरं. Happy

छान वातावरण निर्मीती आणि तरल भावनानिर्मीती झाली आहे. परफेक्ट ठिकाणी संपवलेलीही आहे.

(काही काही शब्द उच्चारताना जो ध्वनी निर्माण होतो तोही काही खास भावना निर्माण करू शकतो. उदाहरणार्थ 'झुरमुर' हा शब्द उच्चारताना काहीतरी अवखळ, थोडंसं बेभान होऊ पाहणारं आणि बावळट असं काहीतरी वाटून जातं! मला अनेकदा अश्या शब्दांचे फार आकर्षण वाटते. पाण्याच्या खळखळाटाला आपण सपसपाट म्हणत नाही आणि रात्री घाटात ट्रक्स वळताना जे ब्रेक्स लावले जातात त्याला आपण 'सपसप' ऐवजी खर्रखच्चक असे म्हणू इच्छीत नसतो).

'झुरमुर' हा शब्द उच्चारताना काहीतरी अवखळ, थोडंसं बेभान होऊ पाहणारं आणि बावळट असं काहीतरी वाटून जातं! <<
ह्म्म म्हणजे लिहिताना जे अपेक्षित होतं तेच पोचलं.

जबरदस्त!!!
>>>>तसलेच झुरमुर वय
अगदी तस्सेच असते ते वय!!! दिवस तुझे हे फुलायचे, झोपाळ्यावाचुन झुलायचे.