धर्माच्या नावाचे ब्रॅन्डींग, पण फक्त सोयीचे असेल तिथेच...

Submitted by चेतन सुभाष गुगळे on 10 December, 2014 - 01:17

जैन धर्म हा जगात आणि भारतात देखील अत्यल्पसंख्य असलेला आणि तरी देखील मोठ्या प्रमाणात आपला प्रभाव टिकवून असलेला ब्रँड आहे. होय हा ब्रँड आहे असे मी म्हणतोय कारण मी हॉटेलात मेनूकार्ड वर जैन पावभाजी पाहतो. जैन पिझ्झा देखील सर्वांना परिचयाचा असेलच. पण मी कधी बौद्ध, मुस्लिम, शीख, ख्रिश्चन आणि हिंदू असे शब्द मागे लावलेल्या नावांचे पदार्थ अजून पाहिलेले नाहीत. त्याचप्रमाणे जैन धर्मीयांमध्ये अनेक व्यक्ती आपले आडनाव जैन असे लावतात. हा प्रकार देखील मी इतर ठिकाणी पाहिलेला नाही म्हणजे महंमद मुस्लिम, रमेश हिंदू, अशोक बौद्ध किंवा डेव्हिड ख्रिश्चन मी अजून पाहिले नाहीत. पण राजीव जैन, राकेश जैन, महावीर जैन, अशोक जैन असे अनेक जैन बांधव माझ्या परिचयाचे आहेत. त्याचप्रमाणे अनेक मोठ्या उद्योगांना नाव देतेवेळी जैन शब्दाचा प्रकर्षाने वापर केला गेला आहे - जसे की, जैन टीवी, जैन इरिगेशन, इत्यादी. हिंदू ह्या वर्तमानपत्राचा अपवाद वगळता मला जैनेतर कुठल्याही धर्माचा कुठल्या ही उद्योगाकरिता फारसा वापर केल्याचे आढळलेले नाही.

जैनांनी आपल्या धर्माला (म्हणजे फक्त जैन या शब्दाला) अशा प्रकारे आपल्या रोजच्या व्यवहारातील पदार्थांना, स्वतःच्या नावाला, उद्योगाच्या नावाला जोडून त्याचा उच्चार जास्तीत जास्त वेळा कानावर पडेल अशी व्यवस्था करून ठेवलीय. डिसेंबर १९९९ ते फेब्रुवारी २००० दरम्यान मी बिहार मधील एका अतिशय प्रसिद्ध अशा जैन धर्मीयांच्या सामाजिक संस्थेत दोन महिने काम केले होते. त्यावेळी माझ्या पाहण्यात असे आले की तिथल्या जैन साध्वी वेगळ्या प्रकारची पादत्राणे वापरतात (ज्यात प्राण्यांच्या कातडीचा वापर केला गेला नाही). त्याचप्रमाणे त्या काळी वापरात असलेला रोल फिल्मचा कॅमेरा त्यांना चालत नसे. त्यांचे फोटो काढण्यासाठी डिजीटल कॅमेराच वापरला जावा असा त्यांचा आग्रह असे (तेव्हा डिजीटल कॅमेरा अतिशय महाग - साधारणत: रु.५०,०००/- च्या आसपास होता). रोल फिल्म ला प्राण्यांपासून मिळविलेले जिलेटीन लावलेले असते असे त्यांचे म्हणणे होते.

अशा प्रकारे आपल्या धर्मातील तत्त्वाचे अनुसरण करण्यात हा धर्म अतिशय काटेकोर असल्याचे इतरही अनेक प्रसंगी दिसून येते. उदाहरणार्थ, मांसाहारी व्यक्तींना आपल्या वसाहतीत जागा न देणे, महावीर जयंतीच्या दिवशी कत्तलखाने बंद ठेवण्याचा आग्रह धरणे, तसेच हा अथवा इतर कोणताही जैन सण व मुस्लिमांची बकरी ईद एकाच दिवशी आल्यास मुस्लिमांना त्यांचा सणात केला जाणारा बकर्‍याच्या आहुतीचा विधी पुढे ढकलण्याची प्रेमळ सक्ती करणे. (खरे तर हे (मुस्लिम व जैन लोकसंख्येच्या व्यस्ततेचे प्रमाण पाहता) सायकल ने ट्रक ला "मला वाट देण्याकरिता बाजूला हो" असे सांगितल्या सारखे वाटते. गंमत म्हणजे मुस्लिम बांधव ही जैनांची ही सूचना विनातक्रार मान्य करतात.)

आता या सगळ्या गोष्टींमुळे जैन धर्माची तत्त्वे या समाजात अगदी खोलवर रुजली आहेत असा भास होतो. पण यातला फोलपणा जाणवून देणार्‍या काही गोष्टी मला इथे मांडाव्याश्या वाटतात.

१. परवाच वीसीडीवर २०१० चा अतियशस्वी चित्रपट राजनीती पाहत होतो. चित्रपट जास्त कंटाळवाणा होता की त्यात ठराविक अंतराने सतत त्रस्त करणार्‍या अल कबीर च्या जाहिराती जास्त कंटाळवाण्या होत्या हे काही मी ठरवू शकलो नाही. या अल कबीर ला इतके वर्ष जाहिरातीची फारशी गरज कधी पडली नव्हती आणि तरी देखील हा आशियातला सर्वात मोठा कत्तलखाना आहे. या कत्तलखान्याच्या भागीदारांपैकी सर्वात मोठा भागीदार हा जैन धर्मीय आहे. (संदर्भ: http://visfot.com/index.php/jan_jeevan/477.html http://www.siasat.com/english/news/bjp-opposes-mechanical-slaughter-hous... http://www.daijiworld.com/news/news_disp.asp?n_id=239732 https://www.facebook.com/ALHAJASADUDDINOWAISI/posts/555436901190392). म्हणजे जैनांच्या नेहमीच्या सवयीनुसार या कत्तलखान्याच्या नावात जैन शब्द असायला हवा होता पण ते गैरसोयीचे असल्याने तसे केले गेलेले नाही.

२. पुण्यातील आकुर्डी येथे एक जैन स्थानक (जैन धर्मीयांचे प्रार्थना स्थळ) आहे. या स्थानकाच्या १०० मीटर परिसरात एक परमिट रूम उघडण्यात आले आहे. धार्मिक स्थळाच्या १०० मीटर परिसरात मद्य विकण्यास कायद्याने परवानगी नाही तरीही असे राजरोसपणे चालू आहे कारण या स्थानकाच्या विश्वस्तांपैकीच एक जण हा त्या परमिट रूमचा देखील भागीदार आहे. यावर कडी म्हणजे या परमिट रूमला विरोध करण्यासाठी रस्त्यावर उतरून आंदोलन करणारा स्थानिक नगरसेवक मुस्लिम धर्मीय आहे.

या दोन अतिशय प्रातिनिधिक घटना आहे. अशा अनेक घटना यापूर्वी घडल्या आहेत आणि अजूनही घडत आहेत. माझा मुख्य आक्षेप असा आहे की, जैन बांधव आपल्या धार्मिक तत्त्वांचे जिथे तिथे गोडवे गात फिरत असतात. इतरांनाही अहिंसा, सदाचार व शाकाहाराचा संदेश देतात (ज्याविषयी माझी काहीच हरकत नाही), पण मग त्यांनी वरील दोन घटनांचा तीव्र विरोध व जाहीर निषेध का केला नाहीय? जैन लोकांचे प्रसारमाध्यमात व समाजाच्या इतर क्षेत्रांमध्येही लक्षणीय प्राबल्य आहे; त्याचा उपयोग करून ते मनात आणले तर आपल्या बांधवांकडून घडणार्‍या अशा गोष्टी निश्चितच थांबवू शकतात.

मला हे ठाऊक आहे की प्रत्येक धर्माच्या लोकांपैकी काही जण अशा प्रकारे चुकीचे आचरण करत असतील पण जेव्हा आपण परधर्मीयांच्या अशा आचरणाचा निषेध करतो तेव्हा प्रथम स्वधर्माच्या लोकांकडून असे काही घडत नाहीना याची खात्री करून घ्यायला हवी आणि तसे घडत असेल तर प्रथम आपण आपल्या वाट चुकलेल्या बांधवांचा निषेध केला पाहिजे जसा की मी स्वतः एक जैन धर्मीय या नात्याने या लेखात करीत आहे.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

चेतन सर्वप्रथम तुमचे अभिनंदन तुम्ही ज्या दोन गोष्टी मांदल्या आहेत त्याबद्दल - <<१. परवाच वीसीडीवर २०१० चा अतियशस्वी चित्रपट राजनीती पाहत होतो. चित्रपट जास्त कंटाळवाणा होता की त्यात ठराविक अंतराने सतत त्रस्त करणार्‍या अल कबीर च्या जाहिराती जास्त कंटाळवाण्या होत्या हे काही मी ठरवू शकलो नाही. या अल कबीर ला इतके वर्ष जाहिरातीची फारशी गरज कधी पडली नव्हती आणि तरी देखील हा आशियातला सर्वात मोठा कत्तलखाना आहे. या कत्तलखान्याच्या भागीदारांपैकी सर्वात मोठा भागीदार हा जैन धर्मीय आहे. (संदर्भ: http://visfot.com/index.php/jan_jeevan/477.html). म्हणजे जैनांच्या नेहमीच्या सवयीनुसार या कत्तलखान्याच्या नावात जैन शब्द असायला हवा होता पण ते गैरसोयीचे असल्याने तसे केले गेलेले नाही.

२. पुण्यातील आकुर्डी येथे एक जैन स्थानक (जैन धर्मीयांचे प्रार्थना स्थळ) आहे. या स्थानकाच्या १०० मीटर परिसरात एक परमिट रूम उघडण्यात आले आहे. धार्मिक स्थळाच्या १०० मीटर परिसरात मद्य विकण्यास कायद्याने परवानगी नाही तरीही असे राजरोसपणे चालू आहे कारण या स्थानकाच्या विश्वस्तांपैकीच एक जण हा त्या परमिट रूमचा देखील भागीदार आहे. यावर कडी म्हणजे या परमिट रूमला विरोध करण्यासाठी रस्त्यावर उतरून आंदोलन करणारा स्थानिक नगरसेवक मुस्लिम धर्मीय आहे.>>

मला कुठेतरी असे वाटते जैन धर्मीय आणि मांसाहारला विरोध करणारे बहुसंख्य सर्वात मोठे खोटारडे आहेत. हिंसा टाळा. कत्तलखान्यात भागीदारी, परमिटरूम मध्ये भागीदारी ह्यासोबतच पठाणी व्याज लावून लोकांना पिळणे आणि कायद्याच्या लिमिटमध्ये राहून वेगवेगळ्या प्रकारे लोकांची फसवणूक करून त्यांना लुटणे असे करताना कुठे जातो ह्या लोकांचा जैन किंवा इतर कोणताही धर्म? मिच्छामी दुकडम म्हटलं की झालं का सगळं?

मला सर्वात जास्त राग येतो जेव्हा मी वेगवेगळे जैन मुनी रस्त्यात फिरताना पाहाते तेव्हा. तुम्हाला भले दिगंबर अवस्थेत राहायचम असेल पण रस्त्यत का फिरता मग? लहान मुलांच्या / मुलींच्या मनावर परिणाम होत नाही का? ती हिंसा नाही का? आणि संन्यासाश्रमात गेलेल्या ह्या जैन मुनींच्या पायाने जमिनीवरचे किडे मकोडे मरू नयेत म्हणून ते माणसाने ढकललेल्या गाडीत बसून फिरणार. त्यात हिंसा नसते का? these people are biggest hypocrites.

ह्यातल्या कोणालातरी धर्मग्रंथात सांगितलेल्या गोष्टींचे अर्थ कळालेत का माहित नाही.

तर प्रथम आपण आपल्या वाट चुकलेल्या बांधवांचा निषेध केला पाहिजे जसा की मी स्वतः एक जैन धर्मीय या नात्याने या लेखात करीत आहे.
>>>>>>>
ग्रेट, या आपल्या शेवटच्या वाक्यानंतर माझ्या मनात तयार होत असलेला प्रतिसाद मी आवरला.

माझा प्रतिसाद ह्या व्यासपीठाला शोभणारा नसल्याने तो मी स्वतःच मागे घेत आहे.

-'बेफिकीर'!

जैन सण व मुस्लिमांची बकरी ईद एकाच दिवशी आल्यास मुस्लिमांना त्यांचा सणात केला जाणारा बकर्‍याच्या आहुतीचा विधी पुढे ढकलण्याची प्रेमळ सक्ती करणे. गंमत म्हणजे मुस्लिम बांधव ही जैनांची ही सूचना विनातक्रार मान्य करतात.
>>>>>

ईंटरेस्टींग, मला याची कल्पना नव्हती.

असो,
एक प्रामाणिक मत द्यायचे तर ते स्पेशल जैन पावभाजी किंवा जैन मेनूलिस्ट बघून मानवी स्वभावाला अनुसरून हे कोण एवढे शहाणे लागून गेलेत असा विचार मनात लागलीच येतो.
पण मग वाटते ठिक आहे यार, ज्याच्या त्याच्या धर्मांच्या प्रथा. मग आधी मनात आलेल्या विचारांबद्दल गिल्ट फीलिंग येणे... कदाचित या लेखानंतर ती गिल्ट फीलिंग येणार नाही.

बाकी ज्याच्या त्याच्या धर्मप्रथा हे खरेय. पैसा हा सर्वात मोठा धर्म आहे. पण बाकीचे जैनधर्मीय कसोशीने आपल्या धर्माचे पालन करतही असतील. सरसकट निष्कर्श काढणे योग्य नाही. आता त्यांनी स्वधर्मीयांच्या अश्या कृत्याचा निषेध करायला हे ही योग्यच, पण ते बंधनकारक नसते, नसावे.

तर प्रथम आपण आपल्या वाट चुकलेल्या बांधवांचा निषेध केला पाहिजे जसा की मी स्वतः एक जैन धर्मीय या नात्याने या लेखात करीत आहे.
>>>>>>>
कशासाठी हा अट्टाहास ... ज्याला जसे वागायचे त्याला तसे वागण्याचा हक्क आहे ... generalization कशाला ?

कुठल्याच धर्मात त्यांच्या सर्वच गोष्टी तंतोतंत पाळणे शक्य नसते, प्रत्येक वेळी धर्मच योग्य ठरतो असेही नसते काही धर्मात तर आपल्या कमाईचा अमूक हिस्सा हा देवाला दिला पाहिजे असेही संकेत आहेत ज्यांना शक्य आहे त्यांनी ते जरुर करावे पण ज्यांचे पोट हातावर आहे त्यांनी मुलाबाळांना उपाशी ठेवून असल्या गोष्टी करु नये .

आपल्या धर्माचा गर्व हा प्रत्येकालाच असतो पण हा गर्व बाळगताना इतर धर्मीय लोकांना दुखावू नये. ओशोंच्या काही भाषणात त्यांनी कृष्ण हा काही देव नाही ( देव असा असतो का जो परस्त्रीयांचे कपडे पळवतो, चो-या करतो वगैरे ) असे काही फालतू विचार मांडलेत. शक्य झाल्यास लिंक देईन. आपला तो धर्म आणि आपले ते देव सर्वश्रेष्ठ असा भ्रम मनात असावा पण तो समाजाने किंवा इतरांनीही करावा असा उद्देश ब-याचदा एखाद्या समुदायाकडून होत असतो. वरुन आम्ही धर्मनिरपेक्ष असा ठेंबा मिरवायला हाच समुदाय पुढे येतो. बाकी जैन पावभाजी आणि इतर मेनू आला असेल तर त्यात त्यांना दोष देण्यात काय अर्थ आहे, तो हॉटेलवाला बघेल , मग उद्या साबूदाण्याची खिचडी हा मेनू हिंदूची खिचडी असे एखाद्याने लिहीले म्हणून त्याच्या चवीत काय फरक पडणार आहे.

आपण जी दोन उदाहरणे दिलीत ती सर्वच धर्मीय लोकांत सापडतील त्यात फक्त जैन नाहीत. धर्मांध लोकांची कमी नाही आपल्याकडे.
असो पुढील चर्चेतून कुणाच्याही धार्मीक भावना दुखावू नये हे आवाहन.

तर प्रथम आपण आपल्या वाट चुकलेल्या बांधवांचा निषेध केला पाहिजे जसा की मी स्वतः एक जैन धर्मीय या नात्याने या लेखात करीत आहे.>>.

चेतन तुमचे अभिनंदन एवढे स्पष्ट लिहल्याबद्द्ल.नाहितरी लोकांची प्रवृती स्वता:हाचे ठेवायचे झाकुन दुसर्‍याचे बघायचे वाकुन अशिच असते..

व्यक्ति तितक्या प्रकृति..

काही व्यक्तिंच्या गैरवर्तनामुळे सर्वांनाच त्या तराजूत टाकणे चुकीचे आहे.

माझ्या मते हिंदू, मुस्लिम, बौद्ध, ख्रिश्चन सर्वांनाच ईतरांना त्रास होऊ न देता आपला धर्म पाळण्याचा अधिकार आहे.

चेतन सुभाष गुगळे ,
हा लेख ज्या प्रामाणिकपणाने लिहिलाय तो प्रामाणिकपणा आवडला.
हा लेख किंवा यासारखा लेख बहुतेक एक दोन वर्षांपूर्वी तुम्ही आणखी एका संस्थळावर लिहिला होतात , तेव्हापासून मी तुमची फॅन आहे.

चेतन सुभाष गुगळे,

आजच्या युगात धार्मिक कट्टरतेला खरंच काही वाव आहे असे मला वाटत नाही. प्रत्येक व्यक्तिला त्याच्या धर्माप्रमाणे आचरण करण्याची मुभा भारतीय राज्यघटनेने बहाल केली आहे, ती आचरणात आणण्याचा प्रश्न हा व्यक्तिसापेक्ष आहे. तुम्ही दिलेल्या उदाहरणांवरून सुध्दा सिध्द होते की खाजगी जीवनात धार्मिक कट्टरता पाळणारी काही माणसे व्यावसायिक जीवनात मात्र त्या कट्टरतेला तिलांजली देतात. पण काही व्यक्ती ही कट्टरता जेव्हा सार्वजनिक जीवनात वापरण्याच्या अट्टहास करतात ते निषेधार्ह आहे. प्रत्येकाने आपला धर्म पाळावा त्यानुसार आचरण ही करावे पण त्यातील कट्टरता आपल्या घरात पाळावी ह्या मताचा मी आहे.

आता जैन पावभाजी किंवा इतर तत्सम खाद्यपदार्थांना नाव देण्याच्या मुद्याबाबत आपण बिर्याणी ह्या पदार्थाचे उदाहरण घेऊया. बिर्याणी हा खाद्यप्रकारसुध्दा अनेक नावाने ओळखला जातो उदा. हैदराबादी बिर्याणी, दम बिर्याणी, भटकल बिर्याणी इत्यादी फक्त पदार्थातील घटक आणि बनविण्याची पध्दती ही वेगळी आहे हे सुचित केलेले असते. तेच तत्व पावभाजी अथवा पिझ्झाला सुध्दा लागु झाले आहे, त्यातुन फक्त सुचित करायचे आहे कि पदार्थ बनविण्याची पध्दत सारखी आहे फक्त यातले घटक वेगळे असु शकतात. ह्यात धर्माचे ब्रॅडिंग मला वाटत नाही.

तुम्ही स्वत:च वर उल्लेख केलेला आहे कि अनेक जैन व्यक्तिंची आडनावे जैन आहेत. जर एखाद्या जैन आडनावाच्या व्यक्तीने जैन टीवी, जैन इरिगेशन या नावाने त्याच्या व्यवसायाची सुरवात केल्यावर सुध्दा वावगे काहीच नाही. देशातील अनेक उद्योगधंदे आजही त्यांच्या आडनावाने ओळखली जातात उदा. टाटा, बिर्ला, किर्लोस्कर ही केवळ प्रातिनिधिक उदाहरणे आहेत. अनेक दुकाने आणि कित्येक संस्था स्वत:च्या आडनावाचा वापर करून सुरू असलेल्या आपण पाहतच असतो. ह्यात सुध्दा मला धर्माचे ब्रॅडिंग केल्याचे वाटत नाही.

जैन टीवी, जैन इरिगेशन, इत्यादी. >> ही नावे दिलीत कारण त्या कंपन्यांच्या मालकांचे आडनाव जैन आहे. (ऑफकोर्स ते मालक जैनधर्मीय आहेत)

बाकी लेख प्रामाणिक आहे.
मला आठवतंय त्याप्रमाणं त्या कत्तलखान्याच्या मालकाविरूद्ध कत्तलखाना सुरू करायच्या आधी बर्‍याच जैनांनी आंदोलन केलं होतं पण त्याचा काही फारसा उपयोग झाला नाही. पण काही जैन लोक धर्माच्या विरूद्ध वागतात म्हणजे सगळा जैन समाज तसाच वागतो हा निष्कर्ष चुकीचा आहे (कुठल्याही धर्माच्या बाबतीत).

सगळे मुनी (अ‍ॅट लीस्ट दिगंबर) आणी जैनधर्मीय परफेक्ट वागतातच असे नाही पण वेल यांनी काही उदाहरणांवरून सगळ्यांच जैन धर्मियांबदल आणि मुनींबद्दल जे तारे तोडलेत त्याला एवढेच उत्तर देइन की 'गेट वेल सून'

चेतन,
या दोन बाबींचा किंवा त्याच्याशी संबंधित असलेल्या जैनधर्मियांचा, त्यांच्या एखाद्या व्यासपिठावरून / संस्थेतर्फे निषेध करण्यासाठी काय करता येईल ?

ज्यांना धर्माचे खाण्यापिण्याचे नियम पाळायाचे आहेत, तिथे असे शब्द वापरले जातात. प्रख्यात विमानकंपन्या हिंदू मील, कोशर मील आपल्या मेन्यूवर ठेवतात. "हलाल" हा शब्ददेखील मुस्लीम लोकांना मार्गदर्शक ठरावा अश्या रितीने वापरला जातो..

देवाच्या नावाने व्यवसाय / संस्था उघडले जातात तसेच धर्माच्या नावानेही ! गोव्यात शिरता शिरता एक रुक्मिणी बार लागतो ! तशी ब्रँड नावे घेण्यात काय अडचण आहे ?

धन्यवाद सातीजी,

होय हा लेख इतर काही संकेतस्थळांवर आणि माझ्या ब्लॉगवर देखील आहे.

इतरही सर्व प्रतिसादकांचे आभार. परंतु खेदाने असे म्हणावे लागत आहे की बहुतेकांना लेखाचा उद्देशच कळला नसावा. उदाहरणार्थ च्रप्स यांचा प्रतिसाद. यांनी माझ्या लेखातील शेवटच्या परिच्छेदातील निवडक शब्दच उद्धृत करून त्यावर आक्षेप नोंदविला आहे. खरे तर लेखातला शेवटचा संपूर्ण परिच्छेद हाच लेखाचे उद्दिष्ट स्पष्ट करतो व ते 'सुरेख' यांना व्यवस्थित समजले असल्याचे त्यांच्या प्रतिसादावरून जाणवते. याबद्दल सुरेख यांचे विशेष आभार.

त्याचप्रमाणे ब्रँड नावे घेण्यात अडचण काय असाही प्रश्न प्रतिसादकांकडून आलेला आहे त्यावर माझे उत्तर असे की, ब्रँड नावे घेण्याबाबत मी आक्षेप घेतला नसून केवळ ब्रँडिंग आणि तेदेखील सोयीस्कर असेल तिथेच करून प्रत्यक्षात धर्माची तत्त्वे (जेव्हा की ही अहिंसापालन व मद्यपाननिषेधासारखी तत्त्वे इतरधर्मियांनीदेखील पाळावीत असा कधी उघड तर कधी छुपा आग्रह जैन धर्मियांचा असतो) पायदळी तुडविणार्‍या स्वधर्मबांधवांबाबत सोयीस्कर मौन बाळगणे यास माझा आक्षेप आहे.

जाता जाता धार्मिक कट्टरतेविषयी थोडेसे:-
एका धर्माचा अनुयायी दुसर्‍या धर्माला व त्याच्या अनुयायांना जाहीररीत्या नसले तरी खासगी गप्पांमध्ये कमी लेखतो हा अनुभव आपल्यापै़की अनेकांना आला असेलच. मला त्याहूनही विलक्षण अनुभव आला तो असा की, एक जैन धर्मियच दुसर्‍या जैन धर्मियाला कमी लेखतो. का? तर दुसरा जैन धर्मिय पहिल्या जैन धर्मिया इतका कट्टर नाही. आता ही कट्टरता मोजतात कशी? तर रोटीबेटी व्यवहारांवरून. आम्ही मारवाडी जैन महाराष्ट्रातील पुणे, अहमदनगर, औरंगाबाद व मुंबई शहरांत मोठ्या प्रमाणात वसलो आहोत. मराठी संस्कृती सोबत बर्‍याच प्रमाणात समरस झालो आहोत. आमच्या बांधवांपैकी काहींच्या मुली या इतर धर्मात विवाह करून जातात तेव्हा फारसा गहजब होत नाही. या विवाहास फारसा विरोध न करता स्वीकारले जाते. यावरून मला दक्षिण भारतातील एका जैन बांधवाने कमी लेखणारी प्रतिक्रिया दिली. त्याचे विधान असे की इथले (पक्षी महाराष्ट्रातले - आमच्यासारखे मारवाडी श्वेतांबर स्थानकवासी जैन) हे काही खरे जैन नाहीत. यांच्या मुली परधर्मात विवाह करून जातात तरी हे गप्प कसे? यावर मी या महोदयांना विचारले की मग काय करायला हवे. त्यांचे म्हणणे असे की, आमच्यात (पक्षी दक्षिण भारतातील मूर्तपुजक दिगंबर जैन) असे काही झाले तर आम्ही मुलीला अगदी माझी सख्खी मुलगी असली तरीही उभी चिरू, इतके आम्ही कट्टर जैन आहोत. त्यावर मी उत्तरलो की कदाचित आमच्या एका बांधवाची मुलगी परधर्मात गेल्याने कदाचित जैन लोकसंख्या एकने घटत असेल पण तुम्ही जे काही करता त्याने तर जैन लोकसंख्या किती कमालीची घटते ते तुम्हाला कसे चालते? त्यांनी आश्चर्यचकित होत माझ्या विधानाचे स्पष्टीकरण मागितले. मी म्हणालो," तुम्ही मुलीला चिरल्यावर ती मेली म्हणजे जैन लोकसंख्येतली एक व्यक्ति कमी झालीच शिवाय तिला चिरणारे तुम्ही आणि तुमचे कुटूंबीय तरी जैन कुठे राहिलात? अहिंसा तत्त्वास तुम्ही पायदळी तुडविलेच की." अर्थात तो वाद फारसा न लांबविता आम्ही दोघेही तिथून उठलो अन्यथा आधी त्याचेकडून आणि नंतर प्रत्युत्तरादाखल माझ्याकडूनही जैन धर्माची तत्त्वे परस्परांविरुद्ध पायदळी तुडविली गेली असती व आधीच अत्यल्पसंख्य असलेल्या आमच्या समाजाची लोकसंख्या अजून दोन ने घटली असती.

चेतन, या सर्वाचे मूळ " अल्पसंख्येतून आलेली / वाटणारी असुरक्षितता " यात आहे असे नाही वाटत ? कुठे तरी आपले वेगळेपण जपायचा, केविलवाणा वाटेल असा प्रयत्न केला जातो. आणि हे सगळ्याच अल्पसंख्य गटांबद्दल म्हणतोय मी.

तुमचा लेख प्रामाणिक तत्वावर आधारीत आहे.
तुम्ही म्हणत/दाखवत असलेली "लोका सांगे ब्रह्मज्ञान, आपण कोरडे पाषाण" अशी उदाहरणे अन्य धर्मियात शेकड्यानी आढळतील.
असे होऊ नये हा झाला आदर्श. पण बाह्य व्यावहारीक जगाच्या दबावापुढे जैन धर्मियांचे रिवाजही त्यांचेतील काही मोजक्या मागिल पिढ्याच केवळ अनुसरताहेत की काय असे वाटण्यासारखी परिस्थिती नक्कीच आहे, व तशी ती बाकी धर्मातही आहेच आहे. हे स्थित्यंतर होतच असते. मात्र तरीही, कालौघात जे उत्कृष्ट ते ते टीकून रहातेच रहाते. जसे की अहिंसा (भले जैन/बौद्ध धर्मिय अहिंसा इटसेल्फ अतिरेकी वाटते) /सत्याचरण/ शाकाहार इत्यादि बाबी कोणत्याही अन्य धर्मिय सूज्ञ व्यक्तिस आपल्याश्या वाटू शकतातच. पण व्यवहारि जग, तुम्हास भूरळ पाडणारे जग, तुम्हास तुमच्याच तत्वापासून दूर खेचून वावगे वागावयास भाग पाडू शकते.
असो. हे असेच चालणार.. शेवटी कलियुग आहे. चोर सोडून सन्याशाला फाशी आहे....

>>>> चेतन, या सर्वाचे मूळ " अल्पसंख्येतून आलेली / वाटणारी असुरक्षितता " यात आहे असे नाही वाटत ? कुठे तरी आपले वेगळेपण जपायचा, केविलवाणा वाटेल असा प्रयत्न केला जातो. आणि हे सगळ्याच अल्पसंख्य गटांबद्दल म्हणतोय मी. <<<<
दिनेश, समहाऊ मी याच्याशी सहमत होऊ शकत नाही. अशी गरज नाही की वैचारिक/आचारविषयक पुर्वापार परंपरा/नियम पाळण्यातील कट्टरता केवळ वरील कारणामुळेच येते व ती केविलवाणीच असते.
किंबहूना, साधे उदाहरण घ्या, रस्त्यात झेब्रा क्रॉसिंगवर गाडी नेऊन थांबवू नये हा "नागरीकधर्म" झाला, पण सर्रास बहुसंख्य तो धुडकावून झेब्रा क्रॉसिंगच्याही पुढे जाऊन थांबतात. एखादाच "कट्टर" क्रॉसिंगच्या अलिकडे थांबतो तेव्हा अन्य बहुसंख्य त्याला वेड्यात काढतात....
अन्य बहुसंख्य, नागरिकधर्म पालनात अल्पसंख्य असलेल्या त्यास वेड्यात काढतात व सर्रास नियम तोडतात म्हणून हा नियम पाळणारा तो अल्पसंख्य "केविलवाणा" ठरवावा काय?
उलट सर्रास नालायक/मूर्खांच्या दरबारात, आपल्या कृतीला/अक्कलेला काडीचीही किम्मत नाही हे माहित असूनही नागरिकधर्म पालण्याच्या तत्वाखातर एकलेपणे ते ते तत्व पाळत रहाणे यास जबरदस्त मानसिक ताकद लागते जी खरोखरीच्या "केविलवाण्या' प्राण्यात असूच शकत नाही!
म्हणून मला तुमची वरील उपपत्ती पटली नाही.

मनीष - गेट वेल सून ह्याबद्दल आभार. अशा हार्दिक शुभेच्छांची खरच गरज असते.

रच्याकने मी तोडलेले तारे काय चुकीचे आहेत जरा नीट समजावून सांगा की?

तुमच्या न कळत्या वयातल्या मुलीने दिगंबरावस्थेतल्या मुनीला बघितलं नाहीये असं वाटतं. मुलींना काय शॉक बसू शकतो ह्याची तुम्हाला कपना नसावी.

अध्यात्माचा अभ्यास करा हिंसा अहिंसा काय ते समजून घ्या आणी मग इतरांना त्रास देणे हे हिंसा का अहिंसा ते समजेल.

चेतन, अहिंसेचा खरा अर्थ समजणे खूप महत्त्वाचे असते. तुम्हाला तो खूप चांगल्या पद्धतीने समजलाय असे दिसते. <<अर्थात तो वाद फारसा न लांबविता आम्ही दोघेही तिथून उठलो अन्यथा आधी त्याचेकडून आणि नंतर प्रत्युत्तरादाखल माझ्याकडूनही जैन धर्माची तत्त्वे परस्परांविरुद्ध पायदळी तुडविली गेली असती व आधीच अत्यल्पसंख्य असलेल्या आमच्या समाजाची लोकसंख्या अजून दोन ने घटली असती.>> हे सगळ्यांना समजेल तर किती चांगले.

तुमच्या न कळत्या वयातल्या मुलीने दिगंबरावस्थेतल्या मुनीला बघितलं नाहीये असं वाटतं. मुलींना काय शॉक बसू शकतो ह्याची तुम्हाला कपना नसावी. >> माझ्या न कळत्या वयातल्या मुलीने दिगंबर मुनी बघितले आहेत. तिला काही शंका होत्या त्या आम्ही दूर केल्या. मुनींच्या फक्त दिगंबरत्वाकडं बघू नका, मुनी बनण्यासाठी त्यांनी काय कष्ट घेतलेत, काय त्याग केलाय आणि ते मुनी का बनलेत ते जर मुलींना समजावून सांगितलंत तर त्यांना शॉक नक्कीच बसणार नाही.

संन्यासाश्रमात गेलेल्या ह्या जैन मुनींच्या पायाने जमिनीवरचे किडे मकोडे मरू नयेत म्हणून ते माणसाने ढकललेल्या गाडीत बसून फिरणार. >> हा तुमचा दुसरा तारा. प्रत्येक गोष्टिचे कृपया जनलायझेशन करू नका

चेतन्,तुमचा लेख सुंदर आहे.

अवांतर : हिंदू धर्मातील भस्मचर्चित, कषायपट्टी धारण केलेले साधू (!) आणि दिगंबरपंथातील मुनी दोनी सारखेच तिरस्करणीय आहेत.

लेख मुद्देसूद आहे.

>> आपल्या बांधवांकडून घडणार्‍या अशा गोष्टी निश्चितच थांबवू शकतात.
तरी 'ह्या' गोष्टी थांबवण्याचे कारण समजले नाही. उल्लेखलेली दोन्ही उदाहरणे कायदेशीर आहेत. संबंधित केवळ जन्माने जैन आहेत म्हणून त्यांनी त्या धर्माचे काटेकोर पालन करायलाच हवे असे थोडीच आहे? Happy

>> न कळत्या वयातल्या मुलीने दिगंबरावस्थेतल्या मुनीला
ह्यात धर्माचा संबंध कुठे येतो? कुंभ व तत्सम ठिकाणी हिदू साधू सुद्धा असतात दिगंबर अवस्थेत.
कोणत्याही वयातल्या मुला/मुलीला लैंगिक अवयवांची साधी माहिती हवी. अनपेक्षितरित्या निर्वस्त्र अवस्थेतील मनुष्य पाहिल्यास वाईट वाटणे (उदा. थंडीने कुडकुडत असेल, गरिबीने कपडे नाहीत) शक्य आहे. धक्का का बरे बसावा?

लिंबू... झेब्रा क्रॉसिंग ही धार्मिक बाब कधीपासून झाली ? ते नागरिकांचे कर्तव्य आहे. आणि झेब्रा क्रॉसिंगवर थांबणारे काही विषिष्ठ देशांतील विषिष्ठ शहरातच असतात Happy

धर्माच्या बाबतीत कपडे, टोप्या, त्यांचे रंग, आहार पद्धती अश्या बाबी मला अपेक्षित होत्या आणि आहेत. गर्दीत वेगळे उठून दिसण्यासाठी किंवा गर्दीत "आपला" कोण हे कळण्यासाठी ते केले जाते.
शीख धर्मातही याच कारणासाठी ती झाली होती.

मूळ तत्वे विसरली जाऊन, या अशा दिखाऊ गोष्टींनाच जास्त महत्व येत चालले आहे.

मृदुला, अगदी पटलं.
धर्म ही खाजगी बाब आहे. सार्वजनिक रित्या वावरताना देशाचे कायदे पाळणे, एवढीच अपेक्षा असावी.

लेखकाचे, दाक्षिणात्य मित्रदेखील त्यांच्या आंतरजातीय विवाहाच्या मतांबद्दल असा लेख लिहू शकतील.

अगदी सामाजिक जाणीवा देखील जर धर्माच्या आड येत असतील, तर धर्म नव्हे, त्या पाळाव्यात असे मी म्हणेन.
सई परांजपे यांनी एका लेखात उल्लेख केलेला प्रसंग मला मुद्दम इथे लिहावासा वाटतोय.

एका पारशी गृहस्थांचे निधन झाले. त्यांच्या पत्नीला त्यांचे नेत्रदान करायचे होते. पण त्या धर्मानुसार कुणाही बिगर पारशी व्यक्तीला पारशी मृतदेहाचा चेहरा पाहता येत नाही.

त्या स्त्रीने चौकशी करायला सुरवात केली, हॉस्पिटलमधे कुणी पारशी डॉक्टर आहे का ? किमान वॉर्डबॉय तरी ?
कुणी पेशंट अ‍ॅडमिट आहे का ? डॉक्टर सगळ्या प्रश्णांना नकारात्मक उत्तरे देत होते..

त्यावर ती स्त्री म्हणाली.... मग बिनधास्त डोळे काढून घ्या !

<<मला हे ठाऊक आहे की प्रत्येक धर्माच्या लोकांपैकी काही जण अशा प्रकारे चुकीचे आचरण करत असतील पण जेव्हा आपण परधर्मीयांच्या अशा आचरणाचा निषेध करतो तेव्हा प्रथम स्वधर्माच्या लोकांकडून असे काही घडत नाहीना याची खात्री करून घ्यायला हवी आणि तसे घडत असेल तर प्रथम आपण आपल्या वाट चुकलेल्या बांधवांचा निषेध केला पाहिजे जसा की मी स्वतः एक जैन धर्मीय या नात्याने या लेखात करीत आहे.>.लेखकाला हे सांगायचे आहे.

उल्लेखलेली दोन्ही उदाहरणे प्रातिनिधिक घटना म्ह्णुन दिलेल्या आहेत.किती लोक आपल्या धर्मबांधवाबद्द्ल उघड्पने एवढे प्रामाणिकपणाने लिहिण्याची हिमंत करु शकतिल. लेखातिल सार घ्यावा छिलके सोडुन द्यावेत.

दिगंबरावस्थेतील मुनी हा तर वेगळ्या धाग्याचा विषय बनेल. मुळात त्याने कोणा मुलीला धक्का बसतो का नाही हे नंतर आले मुळात ते तसे करतातच का? हा नक्की काय धर्म आणि काय प्रथा?
कायद्याचे बोलाल तर माझ्या माहितीप्रमाणे पुरुषाने सूचकपणे एखाद्या महिलेचे लक्ष वेधत केलेले कोणत्याही प्रकारचे अंगप्रदर्शन हा गुन्हा आहे. उदाहरणार्थ उद्या तुम्ही समोरच्या बाल्कनीमधील बाईसमोर आपल्या बाल्कनीत मुद्दाम अंतर्वस्त्रावर येऊन उभे राहाल तर हा गुन्हा आहे. मग हा नियम इथेही लागू व्हायला हवा. कायदा गंडला तरी तो नैतिकतेचा निकष तरी लागू व्हायला हवा. चूक ते चूकच!

लेख पुर्ण वाचला . लेखाचा शेवटचा पॅरा पटला.
जैन धर्मा विषयी मला कमी माहीती आहे. आजपर्यंत धर्म ,जात या गोष्टी एका मर्यांदे पलीकडे जाणुन घ्यायची कधी गरजच वाटली नाही.कदाचित आजुबाजुला सगळ्या धर्मांचे जातीचे लोक इथे लहाणपणीपासुन पाहिल्यामुळे असेल. जैन धर्मा विषयी उलट इथे मुंबईत वेस्टर्न भागात खुप मंदिरे आहेत जैन समाजाची आणि तरी त्याबद्दल मला फारशी माहीती नाही याचं नवल वाटतय आज. कधी खोलात जाउन माहिती काढण्याची गरज वाटली नाही .प्रत्येक धर्मांची प्रार्थना स्थळे ,सण ,म्रुत्यु नंतरचे विधी हे वेगळे आहेत हे नंतर समजलच. धर्म (सगळे)कोणताही असेल कुणाचाही असेल फक्त त्या धर्मांचा एक व्यक्ती म्हणुन आदर करायचा हे माहीत आहे फक्त. म्हणुन तर जेव्हा माझ्या धर्मां तील चुकीच्या गोष्टींचा विरोध मी माबोवरच केला होता (रामपालबाबा या धाग्यावर).जसा तुमच्या<< "तर प्रथम आपण आपल्या वाट चुकलेल्या बांधवांचा निषेध केला पाहिजे" >> या वाक्यात दिसतो.

<<प्रत्येक व्यक्तिला त्याच्या धर्माप्रमाणे आचरण करण्याची मुभा भारतीय राज्यघटनेने बहाल केली आहे,>> +१

जैन खाद्यपदार्थांबाबतही माझे मत हेच आहे की केवळ त्या धर्मांत सांगितले आहे म्हणुन जर का काही पदार्थ (कांदा ,लसुन वगैरे)वगळुन मिळत असतील तर उलट ते चवीच्या बाजुने बघायला गेलं तर दयाच येते की यांना या पदार्थांशिवाय खाण्याची सक्ती आहे.जरी ती स्वत: च्या मर्जीने असली तरी.त्यामुळे जैन पदार्थ आता हॉटेलात मेनु कार्डावर असले तरी वावगं वाटत नाही.

<<जैन साध्वी वेगळ्या प्रकारची पादत्राणे वापरतात (ज्यात प्राण्यांच्या कातडीचा वापर केला गेला नाही). त्याचप्रमाणे त्या काळी वापरात असलेला रोल फिल्मचा कॅमेरा त्यांना चालत नसे. त्यांचे फोटो काढण्यासाठी डिजीटल कॅमेराच वापरला जावा असा त्यांचा आग्रह असे (तेव्हा डिजीटल कॅमेरा अतिशय महाग - साधारणत: रु.५०,०००/- च्या आसपास होता). रोल फिल्म ला प्राण्यांपासून मिळविलेले जिलेटीन लावलेले असते असे त्यांचे म्हणणे होते>> या विषयाला अनुसरुन एक फार चांगला "अवयव दान" या विषया वरचा चित्रपट आठवतोय "Ship Of Theseus" . यातली दुसरया कथेचा काही संदर्भ आहे का ?हेही चेतनजी तुम्हीच जास्त चांगले सांगु शकता .मला कीती समजलाय ते माहीत नाही पण चित्रपटाचा शेवट आवडला .चित्रपटाचा शेवट योग्य वाटला आणि तो तसाच असायला हवा .