शेतकरी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी मा. शरद जोशी

Submitted by अभय आर्वीकर on 8 December, 2014 - 03:52

शेतकरी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी मा. शरद जोशी

नमस्कार मित्रहो,

           आज जाहीर करताना अत्यंत आनंद होतोय की, पहिल्या अ.भा. मराठी शेतकरी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष म्हणून स्थान भूषविण्यास शेतकरी संघटनेचे प्रणेते, दुसर्‍या स्वातंत्र्याच्या अर्थवादाचे क्रियाशील जनक व थोर अर्थतज्ज्ञ मा. शरद जोशी यांची स्विकृती मिळालेली आहे. उद्घाटन सत्राला प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहण्याची सुप्रसिद्ध कवी श्री इंद्रजित भालेराव आणि गझलनवाज श्री भिमरावदादा पांचाळे यांची सुद्धा स्विकृती मिळालेली आहे.
           कल्पनाविश्वात रमणार्‍या आभासी शेतीसाहित्याचा प्रत्यक्ष शेतीक्षेत्राशी काही संबंध उरला आहे किंवा नाही याचा आढावा घेण्यासाठी, मराठी साहित्यविश्व व शेतीमधली वास्तविकता याचा उहापोह करण्यासाठी, नवसाहित्यिकांना सशक्त व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी आणि शेतीक्षेत्राला मराठी साहित्यक्षेत्राप्रती असलेल्या अपेक्षांची जाणीव करून देण्यासाठी शनिवार २१ व रविवार २२ फ़ेब्रुवारी २०१५ ला सेवाग्राम, वर्धा येथे दोन दिवसाचे पहिले अ.भा.मराठी शेतकरी साहित्य समेलन आयोजित करण्यात आलेले आहे.
           शेतकर्‍यांचे युगप्रवर्तक आंदोलक नेते शरद जोशीं यांनी शेतीविषयाची अर्थशास्त्राशी सांगड घालून शेतीला मुक्तीच्या मार्गावर नेणारे विपूल लेखन करून मराठी साहित्यविश्व समृद्ध केलेले आहे. पिढोनपिढ्या अडगळीत पडलेल्या शेतीविषयाला त्यांनी आपल्या कृतीशिल आंदोलनासोबतच निर्विवाद वैचारीक लेखनीची साथ देऊन वैश्विक क्षितीजावर स्थापित केलेले आहे. त्यांच्या लेखनीने निद्रिस्त जनमानसाला केवळ जागविण्याचेच नव्हे तर त्याला मुठ आवळून ताठ मानेने जगायचे शिकविले आहे. लाचारीचे जगणे संपवून सुखाच्या व सन्मानाच्या ध्येय्यप्राप्तीसाठी जीवाची बाजी लावून झुंजणारे लढवय्ये पाईक लाखांच्या संख्येने गावागावात निर्माण झाले ही त्यांच्या लेखनीची किमया आहे. मराठी साहित्यातील त्यांचे योगदान अनमोल असल्याने या पहिल्या शेतकरी साहित्य संमेलनाचे अध्यक्षस्थान त्यांनी भूषवून जन्माला येऊ घातलेल्या शेतकरी साहित्य चळवळीस दिशा देण्याचे मान्य करावे, ही अ.भा.मराठी शेतकरी साहित्य चळवळीला पहिल्याच टप्प्यावर मिळालेली फ़ार मोठी उपलब्धी आहे, असे मी समजतो.
* * * *
शरद जोशी यांची मराठी ग्रंथसंपदा

१. शेतकरी संघटना : विचार आणि कार्यपद्धती
२. प्रचलित अर्थव्यवस्थेवर नवा प्रकाश
३. चांदवडची शिदोरी - स्त्रियांचा प्रश्न
४ . शेतकर्‍यांचा राजा शिवाजी आणि इतर लेख
५. स्वातंत्र्य का नासले?
६. खुल्या व्यवस्थेकडे - खुल्या मनाने
७ . अंगारमळा (महाराष्ट्र शासनाचा सन २००८-०९ चा उत्कृष्ट वाङ्मय निर्मिती पुरस्कारप्राप्त)
८. जग बदलणारी पुस्तके
९. अन्वयार्थ - १,२
१०. माझ्या शेतकरी भावांनो आणि मायबहिणींनो
११. बळीचे राज्य येणार आहे
१२. अर्थ तो सांगतो पुन्हा
१३. पोशिंद्याची लोकशाही
१४ . भारतासाठी
१५ . राष्ट्रीय कृषिनीती

शरद जोशी यांची इंग्रजी ग्रंथसंपदा

1. Answering before God
2. The Women's Question
3. Bharat Eye view
4. Bharat Speaks Out
5. Down To Earth

शरद जोशी यांची हिंदी ग्रंथसंपदा

१ . समस्याए भारत की
२ . स्वतंत्रता क्यों नाकाम हो गई?

मा. शरद जोशी यांचा संपूर्ण जीवनपरिचय येथे वाचा.

- गंगाधर मुटे
अध्यक्ष, अ.भा. मराठी शेतकरी साहित्य चळवळ
---------------------------------------------------------------------

Group content visibility: 
Public - accessible to all site users