मुक्ता मॅडम

Submitted by अतुल ठाकुर on 2 December, 2014 - 09:19

mukta-puntambekar.jpg

मुक्ता मॅडमनी भेटण्याची वेळ दिली होती तेव्हा नाही म्हटलं तरी दडपण आलं होतंच. अनेक वर्षे अनिल अवचटांचं लिखाण वाचत आलो आहे. त्यातील काही गोष्टी पालन करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यातील कित्येक तत्त्वे माझ्यासाठी मार्गदर्शक ठरली आहेत. त्याच पुस्तकांमध्ये अधुनमधुन मुक्ता मॅडमबद्दल उल्लेख असायचा. त्यामुळे मुक्तांगणमध्ये जायला लागल्यानंतर त्यांचा परिचय झाला असं म्हणणं योग्य ठरणार नाही. प्रत्यक्ष परिचय जेव्हा डाटा कलेक्शनसाठी पहिल्यांदा गेलो तेव्हा झाला. डॉ. अनिता अवचट गेल्यानंतर मुक्ता मॅडम येथे आल्या आणि त्यांनी मुक्तांगणच्या गांधीवादाला आधुनिकतेची जोड देण्याचे अतिशय महत्त्वाचे काम केले होते याची मला कल्पना होती. त्यांच्या आईवडिलांनी त्यांना इतर सर्वसामान्यांबरोबर अगदी साध्या शाळेत शिकायला पाठवले होते या एका गोष्टीसाठी तर मला त्यांच्या आईवडिलांइतकाच त्यांच्या बद्दल देखिल अतिशय आदर होता. तो विषय माझ्यासाठी फार जिव्हाळ्याचा आहे. तर अशा मुक्ता मॅडमना, ज्यांना इतकी वर्षे अवचटांच्या लेखनातुनच पाहिलं होतं त्यांना प्रत्यक्ष समोर पाहुन मी भारावुनच गेलो आणि त्या भारावलेल्या अवस्थेत एक बावळटपणाही घडला. मला त्यांची सही हवी होती. माझ्याकडे नसलेलं अवचटांचं एक पुस्तक मी मुक्तांगणमध्येच विकत घेतलं आणि त्यावर मॅडमना सही देण्याची विनंती केली. त्यांनी हसुनच पण ठाम नकार दिला. सही देण्याजोगे मी काहीही केलेले नाही. तुम्ही बाबांची सही घ्या असे सांगुन तेव्हा त्यांनी माझी बोळवण केली. त्यांच्या निश्चयी स्वभावाची चुणुक तेव्हाच दिसली. त्यानंतर मी नियमितपणे माझ्या कामासाठी मुक्तांगणमध्ये जाऊ लागलो. अनेकांच्या मुलाखती घेतल्या. मुक्ता मॅडमना भेटायचं होतंच. मुक्तांगणच्या उपसंचालिका म्हणुन त्यांचे मत, त्यांचे विचार जाणुन घेणे माझ्या संशोधनासाठी आवश्यक होते. पण त्या नेहेमी व्यस्त असत. माझे काम संपत आले. शेवटची मुलाखत मुक्तामॅडमची घ्यायचे ठरवले. त्यांना मेल पाठवली. लगेच उत्तर आले. त्यांनी दिवस आणि वेळ दिली होती. मी थोडा आधी गेलो होतो. मी येणार आहे हे केबिनबाहेर बसणार्‍यांना अगोदरच माहित होते. पाच एक मिनिटे बाहेर बसल्यावर मला बोलावणे आले. मुक्तामॅडमसमोर बसल्यावर त्यांचे बिझी शेड्युल लक्षात घेऊन वेळ न घालवता मी प्रश्न विचारायला सुरुवात केली. पण मुक्तामॅडमनी मला थांबवुन आधी माझ्या संशोधनाबद्दल बारकाईने चौकशी केली. कुठल्या पद्धतीने डेटा गोळा केला आहे ते विचारले. मुख्य संकल्पना काय आहे हेही जाणुन घेतले. उत्तरे देण्याआधी समोरचा माणुस नक्की काय करीत आहे ते जाणुन घेण्याची त्यांची जिज्ञासा मला आवडली. मी माझ्या संशोधनाबद्दल बराच वेळ बोलु शकलो असतो पण मला दिलेला वेळ त्यात घालवायचा नव्हता. आणि मुळात मला मुक्ता मॅडमना बोलते करायचे होते त्यामुळे मी लगेचच पुन्हा माझ्या प्रश्नांकडे वळलो. मुक्ता मॅडमशी संभाषण करताना हे लक्षात आले कि ज्यांना आपण "नो नॉनसेन्स" कॅटेगरीतली माणसे म्हणतो त्या तशा आहेत. टु द पॉइंट उत्तरे. पाल्हाळ नाही. फाफटपसारा नाही. त्यांची उत्तरे छोटी होती. आणि उत्तर देऊन त्या थांबत. त्यामुळे वेळ कमी होता तरी बरेच प्रश्न विचारता आले.

व्यसनाच्या कारणांबाबत माणुस आणि परिस्थिती दोन्ही महत्त्वाचे आहेत. मुक्ता मॅडम सांगु लागल्या, 'एकावरच भर देता येणार नाही. शिवाय या क्षेत्रात अजुनही संशोधन सुरु आहे. काही जण व्यसनात वंशपरंपरेचाही भाग आहे असे म्हणतात पण अनुभव तसा दिसत नाही. काही विशिष्ट स्वभावदोषांमुळे व्यसनाला खतपाणी मिळु शकते आणि हे स्वभावदोष काहीवेळा हेरीडिटरी असु शकतात. पण हेही अद्याप सिद्ध व्हायचंय. मात्र काहीही असलं तरी दारु हा कुठल्याही समस्येवर उपाय नाही हे नक्की. समस्या कुणाला नसतात? प्रॉल्बेम्स सगळ्यांच्याच आयुष्यात असतात. त्यांना तुम्ही तोंड कसे देता हे महत्त्वाचे. कामाचा ताण वगैरे निमित्त आहेत. दारुमुळे ताण कमी होतो हा मोठा गैरसमज आहे. दारुमुळे वाईट परिस्थिती बदलत नाही उलट आणखि खराबच होत जाते. माणसाचे कोपिंग स्किल्स कसे आहेत यावर बरंच काही अवलंबुन असतं.' मला त्यांच्याशी प्रामुख्याने तेथिल राहण्याच्या पद्धतीबाबत बोलायचं होतं. मुक्तांगणमध्ये सर्व जण एकाच वॉर्डमध्ये राहतात, तेथे स्पेशल रुम नाही, कुणाला जास्त पैसे भरुन खास सुखसोयी मिळत नाहीत. डॉक्टर, इन्सपेक्टर आणि रिक्षावाला सारे एकाच हॉलमध्ये एकत्र राहतात आणि जेवतात. ही गांधीवादी पद्धत हा माझ्यासाठी मुक्तांगणमधला अत्यंत महत्त्वाचा अभ्यासाचा भाग होता. मुक्तामॅडम याबद्दल सांगताना भरभरुन बोलल्या. मोठ्या मॅडमच्या स्मरणाचा सुगंध आता त्यांच्या बोलण्यात मिसळला होता. सर्वांनी एकत्र राहण्याची ही पद्धत गांधीवादी विचारसरणी अनुसरणार्‍या त्यांच्या आईने सुरु केली होती. डॉ.अनिता अवचट यांनी मेंटल हॉस्पिटलमध्ये काम करताना पेशंटची जनावरासारखी झालेली अवस्था पाहिली होती. तेथे पेशंटना सदरा आणि अर्धी चड्डी हा वेष असे. त्यांनी वेडाच्या भरात गळफास लावुन घेऊ नये म्हणुन त्या चड्डीला नाडी ठेवत नसत. त्यामुळे सर्व पेशंटस दोन्ही हातांनी चड्डी पकडुनच हिंडत असत. हे पाहिलेल्या मोठ्या मॅडमनी मुक्तांगणचा वेष पांढरा लेंगा आणि पांढरा टी शर्ट हा ठेवला. पांढरा रंग हे शांतीचे प्रतिक. गांधी आश्रमात समानतेच्या तत्त्वावर राहणी होती. तीच येथेही अंगिकारलेली आहे. सर्वांना सारख्याच सोयी. सर्व एकाच ठिकाणी एकत्र राहतात. गांधी आश्रमातील साध्या राहणीचा देखिल येथे स्विकार केला गेला आहे. अन्न अनलिमिटेड आहे. पण साधे आहे. जिभेच्या चवीला प्राधान्य नाही. हे अन्न तेथिल रुग्णमित्रच शिजवतात. गांधी तत्त्वातील स्वावलंबन येथे पाळले जाते. रुग्णमित्र स्वतःची कामे स्वतः करतात. स्वत:चे कपडे धुणे हे तर आहेच. पण जेवल्यावर स्वत:चे ताटदेखिल स्वतः धुवुन ठेवावे लागते. ही झाली वैयक्तीक कामे. याबरोबरच भांडी ड्युटी असते. किचनमधील मोठमोठाली भांडी घासण्यासाठी पाळ्या ठरलेल्या असतात. येथे भाज्या कापणे यासारखी कामे देखिल करावी लागतात. या गांधीवादी आचारविचारांचा व्यसनमुक्तीसाठी उपचार म्हणुन काय उपयोग होतो या माझ्या प्रश्नावर मुक्तामॅडमनी दिलेलं उत्तर अंतर्मुख करुन गेलं.

सर्वप्रथम म्हणजे एकत्र राहण्याने शेअरींग होतं. काही वेळेला ही माणसं आपल्या काउंसिलरकडे मोकळी होत नसतील पण ते आपापसात बोलतात. आपल्या पस्तीस दिवसांच्या मुक्कामात ही माणसं एकमेकांना पाहात असतात. कुणाचं व्यसन कुठलं आहे. त्याचे शरीर, मनावर परिणाम कसे झालेत हे त्यांच्या लक्षात येत असते. इतरांच्या अनुभवातुन ही माणसे शिकतात. हे एकत्र राहण्यानेच घडते. मात्र यापेक्षाही बरंच काही एकत्र राहण्याने घडत असतं. ही माणसे एकमेकांना मदत करतात. व्यसनाच्या दरम्यान त्यांचा स्वभाव पराकाष्ठेचा आत्मकेंद्रित बनलेला असतो. एकमेकांना मदत करण्याने त्या विशिष्ट स्वभावदोषावर आपोआपच काम सुरु होते. माणुस कळत न कळत दुसर्‍याचा विचार करु लागतो. मुक्तामॅडमनी स्वभावदोषावर आपले मत दिले होतेच. त्या म्हणाल्या कि सर्वसाधारणपणे विशिष्ट स्वभावदोषाची माणसे व्यसनी होऊ शकतात असं म्हटलं जातं. यात आत्मकेंद्रित स्वभावाचा भागही आहे. पण हे उलट तर्‍हेनेदेखिल घडु शकतं. व्यसनी झाल्यावर काही स्वभावदोष माणसात डेव्हलप होऊ शकतात. आत्मकेंद्रित वृत्ती हा दोषदेखिल माणसात व्यसनानंतर डोकावु शकतो. मुक्तांगणमध्ये एकत्र राहुन उपचार घेताना इतरांना मदत करण्याची आणि इतरांबद्दल विचार करण्याची सवय ही या आत्मकेंद्रित स्वभावाला आळा घालु शकते. व्यसनाच्या बाबतीत दुसरा स्वभावदोष म्हणजे तीव्र इगो असण्याचा. बीग आय. हा देखिल सुरुवातीपासुन असेल किंवा व्यसनाच्या कुठल्याही पायरीवर डेव्हलप होईल. ही जबरदस्त इगो असलेली माणसे सुरुवातीला, भांडी घासणे, भाज्या कापणे अशी कामे करायला नकार देतात. पण आपल्यापेक्षा जास्त शिकलेली, मोठ्या हुद्द्यावर असलेली माणसे ही कामे करीत असलेली पाहुन विरघळतात आणि मग निमुटपणे कामे करु लागतात. काहीवेळा भांडी घासण्याचे आपले काम आपण करायला तयार नाही म्हणुन आपला वॉर्ड इनचार्ज करणार आहे हे पाहुन भांडी घासायला तयार झाल्याची उदाहरणे आहेत. या तर्‍हेच्या कामांमुळे अहंकार कमी होतो. मुक्ता मॅडमच्या बोलण्याने ठाणे फॉलोअपचे शेअरींग आठवले. अहंकार, इगो आणि आत्मकेंद्रित स्वभाव हे दोष व्यसनासाठी घातक आहेत हे मी मुक्तांगणमध्ये आल्यापासुन ऐकत होतो. किंबहुना ठाण्याच्या फॉलोअपममध्ये जी सोबर माणसे आपले अनुभव सांगत त्यापैकी अनेक जण व्यसनाच्या दरम्यान आपल्याला सारे कळते असे वाटायचे हे हटकुन सांगत असत. अशातर्‍हेचे अनेक वर्ष वागवलेले स्वभावदोष घालवणं हे अशक्य नसलं तरी कठीण काम असतं. त्यावर स्वःहुन काम करण्याची तयारी होईल तेव्हा होईल. पण उपचारादरम्यानच भांडी घासणे, भाज्या चिरणे यासारख्या कामामधुन या दोषांवर मात करण्याची कल्पना ज्यांनी राबवली त्या डॉ. अनिता अवचटांना मनोमन दंडवत घालावेसे वाटतात.

मुक्ता मॅडमच्या दोन ग्रुप्सना मी बसलो होतो. त्यांच्यात एक शिक्षिका आहे हे तेव्हाच जाणवले होते. आता त्यांच्याशी बोलतानादेखिल हा गुण जाणवला. आपल्या विषयात अत्यंत पारंगत असलेल्या विद्वान प्राध्यापकाने एखादा क्लिष्ट विषय सहज समजावुन द्यावा त्याप्रमाणे त्या मांडणी करीत होत्या. मुक्तांगणमध्ये व्यसनावर उपचार होतात म्हणजे नक्की काय होतं? तर ज्या स्वभावदोषांमुळे माणुस व्यसनाकडे वळतो त्या स्वभावदोषांवर काम केले जाते. विचारांवर काम केले जाते. हे काम येथील समुपदेशक तीन पातळ्यांवर करतात. सपोर्ट, सल्ला आणि समुपदेशन. सपोर्टमध्ये भावनिक मदतीचा भाग जास्त येतो. रुग्णाला भावनिक आधार दिला जातो. व्यसनाच्या दरम्यान हा आधार नेमका नाहिसा झालेला असतो. सल्ला देताना रुग्णाच्या वागण्यावर लक्ष केंद्रित केले जाते. आणि समुपदेशनात विचारांवर काम केले जाते. मुक्ता मॅडमशी बोलताना माझी गाडी पुन्हा पुन्हा गांधीवादी विचारसरणीवर येत होती. मला त्यांच्याकडुन याबद्दल बरंच काही जाणुन घ्यायचं होतं. गांधीवादाबद्दल त्या म्हणाल्या सत्य, अहिंसा, अस्तेय, अपरीग्रह आणि ब्रह्मचर्य ही गांधीची तत्वे येथे कसोशीने पाळण्याचा प्रयत्न केला जातो. काउंसिलरशी काहीही लपवायचं नाही. सत्य तेच सांगायचं. एकत्र राहण्याने रुग्णमित्र तडजोड करायला शिकतात. व्यसनाच्या दरम्यान स्वभाव हेकट झालेला असतो. आपले तेच खरे करण्याचे सवय लागलेली असते. जेव्हा माणुन वेगवेगळ्या तर्‍हेच्या लोकांबरोबर राहतो तेव्हा स्वतःच्या मनाप्रमाणे वागता येत नाही. अशावेळी घरच्यांची किंमत कळते. आणि मनात अहिंसेचा उदय होतो. छोट्याशा लॉकरमध्ये वस्तु ठेवाव्या लागतात. काटकसरीने रहावे लागते तेव्हा घरातील वस्तुंचे मोल कळते. हा अपरिग्रह आहे. अन्न अनलिमिटेड आहे पण जिभेचे चोचले पुरवता येत नाहीत. अशावेळी जे आहे ते स्विकरण्याची सवय लागते. कुणाचीही लुबाडणुक करता येत नाही. हे अस्तेय आहे. ब्रह्मचर्य म्हणजे विद्यार्थी दशेत राहणे. मुक्तांगणमध्ये माणुस आपल्या विद्यार्थीदशेत परततो आणि व्यसनमुक्तीची कला शिकतो. मुक्तामॅडमनी अतिशय सुरेख रितीने मुक्तांगणच्या उपचारपद्धतीमध्ये एकजीव झालेली गांधीतत्वे उलगडुन दाखवली. अहिंसेचे अत्यंत समर्पक उदाहरण देताना त्या म्हणाल्या कि मुक्तांगणमधुन बाहेर पडल्यावर एक मित्र आपल्या कामावर गेला. तेथे लोक त्याला "बेवडा आला" म्हणुन चिडवु लागले. तो शांतपणे म्हणाला, "कि मी बेवडा आहे याची आठवण करुन दिल्याबद्दल आभार. मला निर्व्यसनी राहण्यासाठी त्याची मदत होईल. यापुढे रोज ही आठवण करुन देत चला. " मुक्तांगणमध्ये अहिंसेचे गांधी तत्त्व कशा तर्‍हेने शिकवले जाते याचे हे एक उत्तम उदाहरण होते.

मुक्तांगणच्या उपचारपद्धतीबद्दल बोलताना त्या म्हणाल्या की मुक्तांगणची उपचरपद्धती हा मिक्स अ‍ॅप्रोच आहे. त्यात एए चाही काही भाग आहे. आमच्याकडे शिकुन काहींनी व्यसनमुक्ती केंद्रे उघडली आणि ती चांगली चालताहेत. मुक्तांगणची उपचारपद्धती जशीच्या तशी सगळीकडे चालेल असं नाही. परिस्थितीनुरुप बदल करावे लागतात. उदाहरणार्थ अभय बंग चालवत असलेल्या व्यसनमुक्ती केंद्रात आदिवासी रुग्णाचे प्रमाण मोठे आहे. त्यामुळे त्यांना त्यानुसार काही बदल करावे लागले असतील. या क्षेत्रात काही ठिकाणी पैसा मिळवण्याची जी प्रवृत्ती वाढत आहे त्यावर कसलंही भाष्य मुक्तामॅडमनी केलं नाही. हे आता सार्‍याच क्षेत्रात आहे आणि तो त्या त्या लोकांचा प्रॉब्लेम आहे. असं म्हणुन त्या पुन्हा आपल्या आवडत्या मुक्तांगणकडे वळल्या. व्यसनमुक्तीसाठी कुटुंब, समाज दोन्हीची आवश्यकता आहे. एकटा माणुन निर्व्यसनी राहु शकत नाही असे सांगुन त्यांनी फॉलोअपचे महत्त्व अधोरेखित केले. जेथे फॉलोअप मिटिंग्ज होतात त्या भागातला सोबराईटी रेट खुप चांगला अशी पुस्तीही त्यांनी जोडली. माणुस जितका ओपन आऊट होतो तितकी व्यसनाची तीव्रता कमी होते असे त्या म्हणाल्या. मुक्तांगणच्या सक्सेस स्टोरीज त्यांच्या तोंडुन ऐकणे हा संभाषणातील आनंदाचा भाग होता. मुक्तांगणच्या उपचारांमध्ये फॅमिलि काउंसिलिंग हा अतिशय महत्त्वाचा आणि जिव्हाळ्याचा भाग असतो. व्यसन हा कुटूम्बाचा आजार मानला गेला आहे. त्यामुळे कुटुंबाला झालेल्या वेदनांचा निचराही येथे होतो. आपल्या माणसाने व्यसनमुक्त राहावे म्हणुन आपण काय करावे या बरोबरच आपल्या प्रकृतीची काळजी घेऊन आपणही कसे निरोगी राहावे यावर या समुपदेशनात भर दिला जातो. बरेचदा येथे दाखल होणार्‍या रुग्णाचे घर तुटलेले असते. बायको सोडुन गेलेली असते. दुर्दैवाने जेथे कायदेशीर कारवाया पार पडलेल्या असतात तेथे फारसे काही करता येत नाही. मात्र जेथे बायको सोडुन गेलेली असते, फक्त सेपरेशन झालेले असते, तेथे मुक्तांगणची माणसे रुग्णमित्राला एक संधी मिळावी यासाठी प्रयत्न करतात. याला बरेचदा यश येते. काही वेळा घटस्फोट झाल्यावर देखिल व्यसनमुक्तीमुळे पुन्हा लग्न केल्याची उदाहरणे आहेत. त्यांनी बोलताना एक महत्वाचे निरिक्षण नोंदवले. मध्यमवयीन लग्न झालेला व्यसनी पुरुष हा लवकर रिकव्हर होतो. याचं एक कारण त्याच्याकडे व्यसनमुक्तीसाठी आवश्यक ती मॅच्युरीटी असते. पत्नी सहकार्य करते. आणि जगण्यासाठी आपल्या मुलांचे आयुष्य त्यांच्या समोर असते. यामुळे रिकव्हरी लवकर होते. सहजीवन किती महत्त्वाचे आहे हे यातुन दिसुन आले आणि मुक्तांगणमध्ये कुटुंबाच्या समुपदेशनावर का भर दिला जातो हे ही लक्षात आले. मुक्तामॅडमबरोबर व्यसनाच्या आणखि अनेक पैलुंबद्दल बोलावसं वाटत होतं पण त्यांचा आणखि वेळ घेणे मला बरोबर वाटले नाही. मी अनेकदा वरच्या मजल्यावर त्यांच्या केबिनजवळ आलो आहे आणि त्यांना सतत बिझी असलेलं पाहिलं आहे. त्यामुळे त्यांचे आभार मानुन मी बाहेर पडलो.

मुक्तामॅडमच्या केबिनमधुन बाहेर पडल्यावर एखाद्या फायरब्रशमधुन बाहेर पडल्यासारखं मला वाटलं. त्यांच्या प्रत्येक उत्तरात विचारांची स्पष्टता दिसली. त्यांचा बायोडेटा मी आधी वाचला होता. बारावीला बोर्डात क्रमांक, एमएला मानसशास्त्रात सुवर्णपदक. त्यांच्याशी बोलताना शिक्षणाकडला त्यांचा कल दिसला होताच. प्रसंगी मुक्तांगणमधल्या आपल्या सहकार्‍यांचा विरोध पत्करुन त्यांनी मुक्तांगण तंबाखुमुक्त केले होते. त्यांच्या करारीपणाच्या अनेक कथा मुक्तांगणमध्ये ऐकल्या होत्या. त्याचबरोबर रुग्णमित्रांचा ग्रुप घेताना त्यांच्यातला प्रेमळ शिक्षकही पाहीला होता. मुक्तांगणची धुरा सांभाळताना त्यांच्याकडे वारसा चालुन आला होता तो आईवडिलांच्या प्रचंड कार्याचा आणि ध्येयवादाचा. आज एकविसाव्या शतकात मानसशास्त्रासारख्या विषयाचे शिक्षण घेतलेल्या मुक्ता मॅडम गांधीवादाच्या पायावर मुक्तांगण चालवित आहेत हा मला वाटलेला त्यांच्या व्यक्तीमत्वातला अत्यंत विस्मयकारक आणि तितकाच आकर्षक भाग. ज्या तर्‍हेने त्या गांधीवादाबद्दल बोलत होत्या त्यावरुन हे जाणवत होते कि कुठेतरी गांधीवाद त्यांच्या व्यक्तीमत्वात आहे. काहीवेळा अतिश्रीमंत व्यक्ती मुक्तांगणमध्ये उपचाराला येतात आणि तेथिल कामे करण्यास स्पष्टपणे नकार देतात. अशावेळी आपल्यासारख्यांना कदाचित त्यांना "खडे बोल" सुनवण्याची इच्छा होईल. पण मुक्तांगणच्या माणसांना मुक्तामॅडमने ती परवानगी दिलेली नाही. त्यांच्याशी आम्ही आदरानेच वागतो. मात्र आपली तत्व सोडत नाही. हळुहळु ती माणसे येथील तत्वे अंगिकारतात. असे त्या म्हणाल्या. मला तरी हे सत्याग्रहाचेच उदाहरण वाटले. एकाचवेळी करारीपणा आणि आईच्या वात्सल्याची सौम्यता असा दुर्मिळ संगम मला त्यांच्यात आढळला. येथिल जेष्ठ समुपदेशक दत्ता श्रीखंडे यांनी एका प्रसंगी सांगीतले होते कि मुक्ताताईंच्या केबिनबाहेर ते उभे असताना एक स्त्री आत बसली होती. आणि दु:ख अनावर होऊन ती रडु लागली. आता मुक्ताताई काय करतील असा प्रश्न दत्ता श्रीखंडेंना पडला. तेव्हा आपल्या जागेवरुन मुक्तामॅडम उठल्या आणि त्या बाईजवळ येऊन त्यांनी त्यांना जवळ घेतले होते. त्याच मुक्तामॅडमनी मुक्तांगणमध्ये एकदा काही जणांकडून एका सेलेब्रीटीकडे जरा जास्त लक्ष दिले जात आहे हे पाहिल्यावर मिटींगमध्ये कुण्या एकाशीच नव्हे तर आपल्या सर्वच रुग्णमित्रांशी आपण ते सेलेब्रिटी असल्याप्रमाणेच वागायला हवे अशा कानपिचक्याही दिल्या होत्या. काही माणसांच्या सहवासात मनाची जळमटं धुवुन निघतात. आपला अहंकार वितळुन जातो. मुक्तांगणमधली ही मुलाखत मला स्वतःला फार काही शिकवुन गेली होती.

अतुल ठाकुर

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

चांगला लेख!
समाजसेवकांची, समाजसेवेला वाहून घेतलेल्या डॉक्टरांची, आडगावात रहाणार्या ध्येयवंतांची पुढची पिढी फ्रस्ट्रेटेड, भोगवादी , आईवडिलांना नावे ठेवणारी अशी बहुतेक नाटकासिनेमात रंगवलेली असते .प्रत्यक्षात मात्रं अवचट, आमटे , बंग यासारख्या ध्येयवाद्यांची पुढची पिढीसुद्धा समाजसेवेला वाहून घेणारी /आईवडिलांनी अंगिकारलेल्या किंवा इतर मार्गाने सामाजिक बांधिलकी जपणारी दिसते . ही मला खूपच दिलासादायक आणि अभिनंदनीय बाब वाटते.

चांगला लेख!! जिथे अतिश्रीमंतीत किंवा अतिलाडात वाढलेली मुले आईवडिलांची कदर करत नाहीत तिथे अशा ध्येयवाद्यांची पुढची पिढी आपल्या आईवडिलांचा वारसा पुढे नेताना दिसली की खरचं कौतुक वाटते!!

खुप छान व्यक्तीचा परिचय करून दिलात.
तुमच्या मुक्तांगण लेखमालिकेतला हा सर्वात आवडलेला लेख. तुम्ही नेहमीच उत्तम लिहिता, पण या लेखाची मांडणी आणि मुद्दे खुप जास्त परिणामकारक आहेत. स्वभावअभ्यास, कुटुंब, समाज, गांधीवाद या सा-या बाबी रुग्णाच्या दैनंदीन जीवनात किती महत्वाच्या ठरतायत ते अगदी पटतंय. या सा-या बाबींमागे किती सखोल विचार केला गेलाय-जातोय ते बघूनही नतमस्तक व्हावेसे वाटते. मध्यंतरीच्या एका चर्चेत समाजाच्या रुग्णांप्रती जबाबदारीच्या भानाचा मुद्दा तुमच्या बोलण्यात आला होता. तो चौथ्या परिच्छेदात शेवटी स्पष्ट अधोरेखित झाला आहे. लेखात आलेल्या कित्येक सवयी, विचारांच्या पद्धती आपल्यासारख्या सर्वसामान्यांनीही आवर्जून घेण्या-शिकण्यासारख्या आहेत असं प्रकर्षाने वाटलं.

मुक्ता पुणतांबेकरांना कार्यक्रमांमधून पाहिलं आहे, रेडिओवर वगैरे अनेकदा ऐकलंही आहे. पण तुम्ही त्यांना जे उलगडून दाखवलं आहे ते त्या सर्वापेक्षा प्रभावी आहे. त्यांच्या व्यक्तिमत्वाचा चौफेर आढावा आला आहे. मानसशास्त्राचा अभ्यास असलेले कितीतरीजण असे पाहण्यात आले आहेत ज्यांचं वर्तन त्यांच्या अभ्यासाशी विरोधाभास दर्शवतं. इथे त्या अभ्यासाशी सुसंगती दिसते. आणखी कौतुक म्हणजे तसं बघायला गेलं तर औदासिन्यच असलेल्या वातावरणात सतत राहून, अखंड समुपदेशन करून, त्याच संदर्भात विचार करूनही कायम हसतमुख आणि सर्वांसाठी आत्मिय रहाणं ही महाअवघड गोष्ट आहे. मुक्तामॅडमचं आजूबाजूला नुसतं वावरणंदेखिल रुग्णांमधे चैतन्य निर्माण करणारी गोष्ट असेल असं दिसतंय.

खुप अभ्यासपूर्ण लेखाबद्दल अभिनंदन.

साती, अनुमोदन.

खूप छान लिहिताय अतुल ठाकूर. मुक्तांगणबद्दल वाचायला आवडतंच. तिथे चालणार्‍या कार्याबद्दल अत्यंत आदर आणि ऋणात्मक भावना आहेत.

साती, मस्त प्रतिसाद लिहिला आहेस.

सई....अगदी सविस्तर आणि योग्य असाच तुझा प्रतिसाद आहे. समाधान वाटले...यासाठी की जवळपास सर्वच वाचकांचे अगदी असेच मत आहे, अतुल ठाकुरांच्या या व्यक्तिचित्रणाचे.

अतुल जितके आपुलकीने आणि दीर्घ लिहितात तितकीच त्यांची कार्यकर्त्याची मुलाखत घेण्याची आणि संबंधितांच्या कार्याची माहिती घेण्याचीही हातोटी विलक्षण अशीच आहे.

धन्यवाद.
अनिल अवचटांची पुस्तके वाचताना नेहमी वाटायचं ह्या मुलींचं पुढं काय झालं असेल.
घराजवळच्या साध्या शाळेत जाणार्या, गरीबांच्या वस्तीत जावून खेळणार्या, बर्याच बाबतीत त्यावेळच्या इतरांसारखे चाकोरीतले बालपण न मिळालेल्या या मुलींनी पुढिल आयुष्यात काय अचिव्ह केले असेल?
मुक्ता यांनी तर मुक्तांगणाची पूर्ण धूरा सांभाळली आहे. यशोदा यांनी एपिलेप्सी हेल्प ग्रूपच्या माध्यमातून एक वेगळ्या प्रकारचे कार्यं चालवले आहे. त्यात एपिलेप्टीक पेशंट्सकरिता मॅरेज ब्यूरो तसेच एका एपिलेप्सीच्या पेशंटचे औषधोपचार (खर्चं) दत्तक घेणे असे उपक्रमही आहेत.
त्यांच्या बालपणाविषयी इतके वाचलेले असल्याने आपल्या ओळखीच्या कुणी मुलींनीच एवढी अचिवमेंट केलीय अशी भावना होते.

साती, अगदी खरं आहे. यशोदाचं कामही खुप झोकून देऊन, फार मनापासून चालू असतं. तीही अशीच मुद्देसूद, सौम्य बोलणारी, प्रसन्न व्यक्तिमत्वाची आहे. इतर अनेक कामांसोबत ती दर वर्षी एपिलेप्सीसंदर्भातल्या परिषदांनाही हजेरी लावते आणि तिच्या स्वमदत गटाचं प्रतिनिधित्व करते.
स्वतःच्या मेहनतीबरोबरच दोघींनाही मूळचं खतपाणीसुद्धा इतकं सकस मिळालंय की आता त्या आपापल्या कार्यक्षेत्रात छानपैकी बहरल्या आहेत. दोघींच्याही कामात कुठेही आई-बाबांच्या नावा-वलयाचा संदर्भ, वापर नसतो हेही उल्लेखनीय आहे.

अतिषय अभ्यासपुर्ण लेख. सई म्हणतेय त्याप्रमाणे लेखमालेतला आवडलेला लेख आहे. मुक्तामॅडमचे व्यक्तिमत्व थोडक्यात पण व्यवस्थित उलगडायला मदत करतो हा लेख.

खुप छान लेख. अवचटांच्या लेखात या मुली भेटायच्या.. पण त्या लहान मुली म्हणूनच.. आता त्या किती "मोठ्या" झाल्या आहेत हे छान उलगडून दाखवले आहे.

खूप छान लेख तितकेच छान सई अन सातीचे प्रतिसाद! मी पण अनिल अवचट फॅन ! त्यांच्या लेखनातून मुक्ता यशोदा व डाॅ आनंद नाडकर्णींची भेट होते. आज लेख वाचून प्रत्यक्ष भेटल्यासारखे वाटले. तुमच्या संशोधनाविषयी वाचायला आवडेल.

मस्त लेख. Happy
साती>>> +१०००
सई....अगदी सविस्तर आणि योग्य असाच तुझा प्रतिसाद आहे. समाधान वाटले...>>>+१००० Happy
खुप छान लेख. अवचटांच्या लेखात या मुली भेटायच्या.. पण त्या लहान मुली म्हणूनच.. आता त्या किती "मोठ्या" झाल्या आहेत हे छान उलगडून दाखवले आहे.>>>> अगदी अगदी!! पूर्ण अनुमोदन!! Happy

अतुल सुन्दर लेख!आता लेखमलिका संपली.याची हळहळही वाटली.मुक्ताचा सेतुमुळे सन्पर्क आला होता.मुक्तांगणच्या कामाविषयीही सर्वसाधारण महिती होती.पण तुमच्या लेखामुळे त्यांच्या विचारातिल स्पष्टता,आचारविचारातील समतोल,कामाचा अवाका यांची नव्याने ओळख झाली.विविध लेखातुन तुम्ही मुक्तांगण उभ केलत त्याबद्दल धन्यवाद!

अतूल ठाकूर,

तुम्हाला तुमच्या प्रोजेक्ट साठी अजून डाटा हवा असेल तर, नागपूरला "मैत्री" नावाची एक उत्तम संस्था आहे.

तिथे पण तुम्हाला अजून माहिती मिळेल.

अजून काही मदत लागली तर जरूर सांगा,

बंदा हाजीर हय.....

मी माबोवर फार कमी असतो, त्यामुळे माझा मेल आय.डी. देवून ठेवतो.

jayant.phatak@rediff.com

खूप चान लेखमला होती ही.

साती आणि सईचे प्रतिसाद आवडले.

मी पण अनिल अवचट फॅन ! त्यांच्या लेखनातून मुक्ता यशोदा व डाॅ आनंद नाडकर्णींची भेट होते. आज लेख वाचून प्रत्यक्ष भेटल्यासारखे वाटले. >>> + १

तुमच्या संशोधनाविषयी वाचायला आवडेल.>>> खर आहे हे पण मनावर घ्याच Happy

अतुलने हा लेख फेसबुकवर प्रसिद्ध केला आहे....तो मुक्ता मॅडम यानी वाचल्यावर अत्यंत विनयाने त्या म्हणाल्या आहेत...."थॅन्क्स अतुल जी...तुम्ही जरा जास्तच कौतुक केले आहे..."

त्यांचा हा स्वभाव खूप काही सांगून जातो.

शक्य झाल्यास अतुलने मायबोलीवर आलेले सारे प्रतिसाद मुक्ता मॅडम याना पोच करायला हवे...त्यानाही इथल्या सभासदांची आपुलकीची मते कळतील.

_________/\________

खरच आजच्या आत्मकेन्द्रित जगामधील जगावेगळी माणस.

लाज वाट्ते स्वत:ची

आपणा सर्वानी आपल्या परिने समाजासाठी काय करता येऊ शकते हे तपासून पहावे

Pages