"ऋतंभरा प्रज्ञा''

Submitted by स्वामी विश्वरूपानंद on 27 November, 2014 - 13:23

''ऋत''शी समांतर चालणारी विचारधारा [ऋत= नैसर्गिक]

आपल्या शास्त्राप्रमाणे वाचा ही चार प्रकारची असते, नामजप करताना साधकाला या चारी वाणीमधून जावे लागते. तेंव्हा तो जप सिद्ध होतो असे मानले जाते.

१) वैखरी: मोठ्याने जप केला जातो जो आजूबाजूच्या सर्वांना ऐकू जातो. यामध्ये श्रवण आणि कीर्तनाचा असे दोन्ही आनंद मिळतात.नामजपाची ही पहिली पायरी असते. या अवस्थेत साधकाला नामावर ध्यान एकवटण्याची शक्ती अजून प्राप्त झाली नसते. त्यामुळे मोठ्याने नामजप करून हे काही प्रमाणात साध्य होते. यातही पहिली अवस्था असते की मोठ्याने जप करूनही लक्ष चहूकडे भिरभिरत असते.

हळूहळू ते जपावर येते. प्रत्येक जपाला एक सुरेख अशी नादलय असते, ती मोठयाने जप करून साधकाने आपली आपण शोधायची असते. वैखरी मधला जाप हा काही काळ केला जाऊ शकतो कारण सर्व ठिकाणी मोठ्याने करू शकत नाही. त्यामुळे एक प्रकारची अस्वस्थता वाटते. मग साधक स्वतःच पुढच्या पायरीला जातो ,
ती आहे...

२) मध्यमा: यामध्ये ओठ हलत नाहीत आणि ध्वनी अगदी ऐकू न येण्यासारखा असतो.त्यामुळे साधक प्रवासात ,ऑफिसमध्ये,घरी ,दारी, नाटक सिनेमा बघताना कोणाला नकळत जप करू शकतो. या अवस्थेतही लक्ष सुरुवातीला इकडे तिकडे भरकटते. ते खेचून आणायला लागते. या मध्ये लयनाद तर असतेच ,पण त्याशिवाय एखाद्या embossed कागदावर हळुवार हात फिरविला की जसे त्यावरील डिझाईन हाताला जाणविते , तसेच मध्यमेमध्ये जिव्हेने जप होत असल्यामुळे त्या जपातील अक्षरावरून उच्चाराच्या वेळी त्यातील घनपण,विरळपण,चढ/उतार इ.इ. अनुभविता येतात.हळूहळू साधकच आपला आपला जगापासून विरक्त होऊन जपात रमू लागतो.

३) पश्यंती: यामध्ये जीभसुध्दा हलत नाही.जप हा घशात न होता हृदयात होतो. या अवस्थेमध्ये साधकाला जप करण्यासाठी यत्न करायला लागत नाही तर तो आपोआप होत राहतो. इथे हळूहळू डोळे मिटले की इष्टदेवता दिसणे, सुवास येणे, आनंदमय शरीर होणे आदी कुंडलिनी जागृतीच्या आधीचे अनुभव हळूहळू येऊ लागतात. बरेच साधक हे पश्यन्तिच्या पुढे जात नाहीत कारण ही फार सुखद अवस्था असते. संसारात असूनही तो नसल्यासारखा असतो.

४) परा: चवथी आणि अखेरची वाणी अवस्था असते ती परा. आपल्या शास्त्राप्रमाणे विश्वात निर्मितीच्या वेळी अनाहत नाद हा होताच, समस्त वेद हे या अनाहत नादापासून झाले. तो नाद हा परा अवस्थेत अनुभवत येतो. आत्मा बोलतो ती परा वाणी. त्यामुळे यात नामजप हा श्वासाबरोबर चालूच असतो. इथे क्वचित कधी
एखादयाची कुंडलिनी जागृत होते आणि तो आत्मा परमात्म्याचे ऐक्य अनुभवतो. आणि समर्थ रामदासांनी सांगितल्याप्रमाणे लोक ज्याला देव मानतात तो अस्तित्वात नाही हे कळते आणि “ रामरूपी अंतरात्मा दर्शने दोष नासती” याचा अनुभव येतो...

समाधी चार प्रकारची असते. सवितर्क, निर्वितर्क, सविचार आणि निर्विचार . पहिल्या अवस्थेत तर्क असतो, स्थूल विषय असतो जसेें देवता,मूर्ती असे डोळ्यासमोर असते. दुसऱ्या अवस्थेत तर्काचा नाश होतो. या अवस्थेत मन निर्विकार होते

तिसऱ्या अवस्थेत विचार असतो ( विद्या) , चवथ्या अवस्थेत ज्ञानेश्वर सांगतात त्याप्रमाणे विद्या/अविद्या दोन्ही नाश पावतात आणि मन हे निर्विकार अवस्थेतून निर्विचार अवस्थेत जाते.

या अवस्थेत फक्त सत्वगुण असतो आणि योग्याची प्रज्ञा ही शुध्द आणि शुचिर्भूत होते.प्रज्ञा या शब्दाचा अर्थ इंग्रजीमध्ये सांगणे कठीण आहे. तो अर्थ हे सगळे इंग्रजी शब्द मिळून आहे.
wisdom, intelligence, knowledge, judgement ,विवेक

ऋत ह्या शब्दाचा अर्थ दर्शनशास्त्रात सत्य,सुव्यवस्थित असा आहे. आणि ऋत सिद्धांत हा फार महत्वाचा सिद्धांत आहे. ऋत हे सगळ्या जगाचे मूळ कारण मानले गेले आहे. ऋत हे सृष्ट्रीचे मुलभूत नियम आहेत जे ओलांडता येत नाहीत. (उदा. magnetism, electricity in physics.) ऋत वस्तुत: ' सत्याचा नियम' आहे. अर्थात एकदा हे नियम कळले की ऋतच्या माध्यमाने सत्याची प्राप्ति होते . हे ऋत तत्व वेदाच्या दार्शनिक स्वरूपाचे मुळ आहे.

या निर्विचार अवस्थेत योग्याला हे जग चालण्याच्या मुलभूत नियमाचे ज्ञान होते जे तो आपल्या प्रज्ञेने आकलन करू शकतो.

आणि अशी ऋत नियमांचे आकलन करून जी त्यातून सत्य मिळविते ती आहे "ऋतंभरा प्रज्ञा'' .

हे मी जेंव्हा वाचले तेंव्हा २ दिवस स्तब्ध होऊन विचार करत होतो आणि ही आहे आपली प्राचीन संस्कृती ज्यापुढे मी नतमस्तक आहे.

संपादित *

आभार- Ajit Pimpalkhare , Middle East .

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ऋतंभरा प्रज्ञा ही खरच एक चमत्कारिक सिध्दी आहे. ही फुशारकी नसुन सुरवातीच्या काळात जेव्हा ध्यानाचा अभ्यास आणि ओंकाराचा जप केला तेव्हा याचा किंचीत अनुभव आला आहे.

प्रज्ञा याच अर्थ बुध्दीचा वरचा स्तर. हा ज्याला बॅक ऑफ द माईंड अश्या पध्दतीने सातत्याने विचार चालु असतो असा स्तर म्हणता येईल. ज्याची जाणिव माणसास नसते. पण जेव्हा अपेक्षीत उत्तर येते तेव्हा मात्र आपल्याला ते सुचल्याचे जाणवते.

काही संदर्भ आपल्या मायबोलीवरच उपलब्ध आहेत त्याची माहिती खाली कॉपी पेस्ट करतो

http://www.maayboli.com/node/12263 - पातंजल योगसुत्रे व भाष्य

४८. ऋतंभरा तत्र प्रज्ञा ।
निर्विचार समाधीतील विशारद अवस्थेत योग्याची प्रज्ञा ऋतंभरा होते. म्हणजे कसल्याही विपर्यययाचा संपर्क न लागता वस्तूमात्राचे ज्ञान पूर्णत्त्वाने आणि यथार्थपणे ग्रहण करणारी अशी होते.

४९. श्रुतानुमानप्रज्ञाभ्याम् अन्यविषया विशेषार्थत्वात् ।
श्रुत म्हणजे आगम, वेद. वेदांच्या शब्दापासून जे ज्ञान होते ती श्रुतप्रज्ञा. अनुमानप्रमाणाने जे ज्ञान होते ती अनुमानप्रज्ञा. दोन्ही प्रज्ञांमुळे होणार्‍या सामान्य ज्ञानापेक्षा ऋतंभरा प्रज्ञेचा विषय खास असतो. तिच्यामुळे वस्तूमात्रासंबंधीच्या विशेषार्थाचे ग्रहण होते.

५०. तज्जः संस्कारो न्यसंस्कारप्रतिबन्धी ।
ह्या ऋतंभरा प्रज्ञेचा संस्कार इतर संस्कारांना प्रतिबंध करणारा असतो.

५१. तस्यापि निरोधे सर्वनिरोधान् निर्बीजः समाधिः ।
ऋतंभरा प्रज्ञेचा संस्कारांचासुद्धा निरोध झाला म्हणजे सर्व वृत्तींचा निरोध झाल्याने निर्बीज समाधी सिद्ध होतो.

पहाटेला झोप पुर्ण झाल्यावर याचा खासा अनुभव येतो.

मोठे कलाकार, शास्त्रज्ञ आणि कुटनितीज्ञ यांची प्रज्ञा सतत जागरुक असते. त्यांना ह्यासाठी जप करावा लागतोच असे नाही. एकांतात ते निर्विचार होतात. प्रश्नाच्या विचारावर त्यांचे ध्यान लागते असे म्हणले तर सुध्दा योग्य ठरेल.

शास्त्रीय पातळीवर मेंदुच्या काही विषीष्ठ कंपने ( अल्फा, गॅमा ) इ या पातळीवर पोहोचल्याने ही अवस्था प्राप्त होते आणि प्रज्ञा प्रकट होते असे म्हणतात. सामान्य माणसाला हुकमी हे साधण्यासाठी मात्र वर वर्णिलेल्याप्रमाणे सुरवात करावी लागते. ह्या पातळीत मनुष्य पोहचला हे विज्ञानाने खात्री करता येते. पण ही पातळी आली म्हणजे उत्तर मिळाले असे मात्र नाही. सातत्याने अभ्यास हाच त्यावर मार्ग आहे.

सामान्य माणसाला ही प्रज्ञा प्राप्त करायला योगाभ्यास करावा लागतो मात्र सर्वच कलाकार, शास्त्रज्ञ इ. तो लागत नाही याचा अर्थ त्यांनी तो आधीच्या जन्मी केला असे म्हणायला वाव आहे. याचे कारण पतंजली यांनी लिहलेल्या योगसुत्रे ग्रंथात पुर्वजन्म ही संकल्पना आलेली आहे किंवा योगशास्त्राला ही मान्य संकल्पना आहे.

http://www.maayboli.com/node/12291

३९. अपरिग्रहस्थैर्ये जन्मकथंतासंबोधः ।
अपरिग्रह (सुखसाधनांचा साठा न करण्याची वृत्ती) स्थिर झाला असता पूर्वीचे जन्म कसकसे होते आणि त्यापुढील जन्म कसकसे होतील ह्याविषयीचे ज्ञान होते.

प्रज्ञा याचा अर्थ हे ज्ञान या जन्मीच्या अनुभवातुन प्राप्त न होता अन्य मार्गाने केवळ निर्वीचार अवस्थेने प्राप्त होते.

अन्यथा कोणतेही ज्ञान स्वतः च्या किंवा इतरांच्या अनुभवाने प्राप्त असायला हवे.

ह्या प्रज्ञेमुळे व्यवहारीक जगात न सुटलेले अनेक प्रश्न सुटु शकतील असे ज्ञान प्राप्त झालेले असते. अनेक वेळा आपल्याला सापडलेले उत्तर / शोध याकडे लोक आश्चर्य्कारक रित्या पहातात. हे उत्तर कसे मिळाले असा प्रश्न विचारतात. याला कोणतेही लॉजीकल उत्तर सापडत नाही.

अर्थात हा काही औषधाचा कोर्स नाही. ही प्रज्ञा कायमची रहात नाही. जेव्हा निर्वीचार अवस्थेपासुन माणुस लांब जातो तशी ही प्रज्ञा ही लांब जाते.

चुकभुल देणे

नितीनचंद्र,

>> प्रज्ञा याच अर्थ बुध्दीचा वरचा स्तर.

मननीय विधान! बोध करून देते ती बुद्धी, तर ज्ञान (=जाणीव) करून देते ती प्रज्ञा.

आ.न.,
-गा.पै.

गा.पै.

धन्यवाद,

माझा वरचा प्रतिसाद योगसुत्रातले काही श्लोक आणि अनुवाद जो मायबोलीवर उपलब्ध आहे तो लिहुन संपादन केले आहे.

मंदारजी,

योग हा अनुभुती घेण्याचा मार्ग आहे. केवळ ज्ञान मार्ग नाही. जेव्हा आपण योगाभ्यास करु लागतो या सोबत मिळणारा शारिरीक/ मानसीक आनंद या सोबत मी कोणीतरी वेगळा हा अनुभव शब्दरुप न रहाता त्याची अनुभुती देऊन जातो. सोबत या मार्गावर या सगळ्या गोष्टी घडतच रहातात.