जून २००९ - लक्षवेधी कवितांचे दालन

Submitted by Admin-team on 23 July, 2009 - 18:26

निवड समितीने सर्वोत्तम कवितेबरोबरच इतर काही लक्षवेधी कविताही निवडल्या आहेत. त्या कवितांचे दालन आपल्या आस्वादासाठी.

विस्कळीत पलटे -
एखाद्या कड्याच्या टोकाशी गेलो असता वाटते, 'टाकावी का उडी ?' हे कधी कधी इतक्या तीव्रतेने वाटते की, आता "खरंच 'तोल ढळून' उडी मारू की काय!" ही अगम्य भीती सर्वांग वेढून टाकते. हे कसले गारूड ? हे कुठले संमोहन ?
'कड्याचे टोक' ही सूचक प्रतिमा... कड्याच्या टोकाशी जाऊनही तोल ढळू न देणारी बकरी म्हणजे आपला विवेक, आपले स्वतःवरचे नियंत्रण, स्वतःवरील काबू. आपण कधी त्या खुणावणार्‍या झाडावर तर कधी त्या बकरीवर... लगाम आणि बेलगाम, जागृती आणि सर्वनाशक संमोहन, यांच्यात विस्कळीत पलटे घेत.

वारी चुकलेल्या वारकर्‍याचा अभंग -
वारी चुकलेला वारकरी त्याची वेदनासुद्धा अभंगात मांडतो... इथेच त्या वारकर्‍याच्या लेखी असलेले वारीचे महत्त्व कळायला सुरुवात होते.
स्वतःला कोषातल्या किड्याची समर्पक उपमा देत वारकरी एका बाजूला स्वत:ला वाटत असलेली भीती दाखवतो आणि त्याचवेळी स्वतःच्या द्विधा आणि हताश मनस्थितीचे थोड्याच शब्दांत वर्णनही करतो. संत 'पुढे' जात आहेत... हे पुढे जाणे केवळ लौकिकार्थाने नव्हे. हे लक्षात घेतले तर वारीचे वारकर्‍यालेखी स्थान आणि ती चुकल्याने होणारी त्याची तळमळ तीव्रतेने जाणवते.
देवद्वार छंदात लिहिण्याचा उत्तम यत्न. (याला 'मोठा अभंग' असंही म्हणतात.) पहिल्या तीन चरणांत ६ अक्षरे आणि शेवटच्या चरणात ४. दुसर्‍या आणि तिसर्‍या चरणात यमक. (येथे पहिल्याच ओवीत 'वारीचा योग' अशी ५ अक्षरे आल्याने छंदबद्धतेस थोडी बाधा येते.)
काही हरकत नाही -
सुंदर बोलगाणे. नात्यामध्ये असलेल्या इश्यूंकडे नकारात्मक दृष्टीने बघता येते आणि सकारात्मक दृष्टीनेही... तसेही बघता येते आणि 'असे'ही. कुठले प्रश्न गांभीर्याने घ्यावेत ? कुठले प्रश्न हे प्रश्नच नसतात ? हे फक्त त्या नात्यात असलेल्या व्यक्तींनीच सांगावे.
या गोष्टींकडे बाहेरून बघणार्‍यांकडे ते नात्याबाहेरील असल्याने मुळातच अपुरी जाण असते.
साधे सत्य, पण सांगण्याची, पटवण्याची पद्धत सुरेख.

मग हार कुणाची सांग मला? - http://www.maayboli.com/node/8531
कवितेचा घाट जुना. त्यातील अंमळ अतिरंजकतासुद्धा (मेलोड्रामा) जुन्या वळणाची. पण त्यामुळेच कविता ताजी.
'हे शरीर सजले जखमांनी, पण वाया त्यांचे वार किती?' या ओळींमधील विरोधाभासाचा समर्थ वापर बघा. 'अंधारगर्भ झाल्या राती, मनतळात समई उरलेली' या ओळींमधील जिगीषा (जिंकण्याची दुर्दम्य इच्छा) बघा.
माणासाच्या अंगातली अस्सल रग दाखवणारी अशी ही रगेल कविता आहे.
शरद पाटील यांच्या बहुतेक कविता छंद/वृत्तबद्ध असतात. हे मात्रावृत्त. प्रत्येक ओळीत ३२ मात्रा. १६ मात्रांनंतर यती पडतो.

मिठी - http://www.maayboli.com/node/8593
आवाहनात्मक कविता, पण तरलपणे व आब राखून केलेले आवाहन.
'वेढी गंधगोफ, लहरे निमंत्रण, नकळत न्यास पदी गुंतताना' यांसारख्या अलवार प्रतिमांमध्ये वाचक हळूहळू गुरफटत जातो. 'ये बाहूपाशी चिंब विसावा' ही ओळ मनात घुमत असतानाच आपण 'नखशिखांत कुरवाळ भेटी' या खुल्या सुंदर आवाहनाकडे येतो... आणि 'आवेगी स्पर्शावी पाऊसमिठी' सारखा सुंदर शब्दविलास त्या भेटीला अत्त्युच्च पातळीला नेतो.
'आवेगी स्पर्शावी' या दोन शब्दांतला रोमांच बघा. आवेग आहे, पण तरीही घुसमटून टाकणे नाही, कुस्करणे नाही, तर 'स्पर्श' आहे... तोही 'पाऊसमिठीचा' (शब्दाचा तिहेरी वापर अतिशय प्रभावी !)... पाऊस आवेगाने कोसळतो आणि चिंब करून जातो... तशी ही अत्यंत रोमांचक पाऊसमिठी !

सौभाग्य - http://www.maayboli.com/node/8289
आर्त आवाहन. शब्दांची अचूक निवड. दिलके आरपारवाला अनुभव. चपखल शीर्षक.
"या अक्षता म्हणू की फुटकी बिलोर स्वप्ने
.....झोळीत घाल माझ्या अस्तित्व फाटलेले"
हे आनंदकंद वृत्त.

फसवणूक - www.maayboli.com/node/8801
किती नाही म्हणलं तरी मनाच्या तळाशी ओल सापडतेच. सुरेख मांडणी.
वाचकालाही "सचैल स्नात" वाटते.

कधी रस-रंग-गंधांनी ऋतूंच्या माखले नाही - http://www.maayboli.com/node/9012
कधी रस-रंग-गंधांनी ऋतूंच्या माखले नाही. सुरेख गझल. "तसे हळूवार का मजला कुणी वेचले नाही ?"
तृषार्ताची कहाणी.
हे 'वियद् गंगा' वृत्त.

न लाजता - http://www.maayboli.com/node/8260
न लाजता. नात्याच्या घट्ट वीणेत दरवेळेस मनाची सैरभैर अवस्था शांत होत गेली आपोआप. पण आता मात्र ?

याव्यतिरिक्त,
'कविता वाचणे हीसुद्धा एक कला आहे. ती कशी बघावी, कशी समजून घ्यावी, याविषयी बापू करंदीकर यांनी सध्या जे प्रयत्न सुरू केले आहेत ते स्तुत्य आहेत. त्यांच्या विवेचनामागे अभ्यास आहे हे जाणवतेच, शिवाय त्यांचे कवितावाचन समृद्ध आहे हेही प्रकर्षाने लक्षात येते. हे असूनही त्यांची विद्यार्थीवृत्ती शाबूत आहे हे स्पष्टच आहे. अशी प्रगल्भ दृष्टी इथे मांडल्याबद्दल त्यांचे आभार मानावेत तितके थोडेच.'

Group content visibility: 
Public - accessible to all site users

माझी कविता ह्या यादीत समाविष्ट करण्या सारखी वाटली त्याबद्दल अ‍ॅडमिन टिमचे धन्यवाद आणि ललिता आणि छाया देसाई ह्यांचे सुद्धा त्यांच्यामुळे ही कविता काहिच्या काहीतून हलवुन कवितेच्या विभागात टाकली. Happy

-------------------------------------------------------------------------
इतक्या सुंदर ववी करिता संयोजकांचे व सांस्कृतिक समितीचे आभार Happy

निवडसमितीला धन्यवाद!
थोडा गर्दीचा दोष, थोडी टीपीची ओढ! बर्‍याच कविता राहून जातात वाचायच्या. तुम्ही चिकाटिने सर्व वाचून, त्यांचं रसग्रहण, परिक्षण, वृत्त इत्यादि माहिती आमच्यासाठी संकलित करता याबद्दल तुमचे आभार मानावे तेव्हडे थोडेच.

धन्यवाद!
माझी कविता लक्षवेधी यादीत निवडल्याबदृल मनापासून आभार.

निवड समितीचे शतशा: धन्यवाद ......:) इतक्या सुंदर कविता निवडल्या बद्दल