क्षण

Submitted by मयुरेश साने on 25 November, 2014 - 09:19

परतुनी ना यायचा कुठलाच क्षण
आठवांचा कोवळा राहील व्रण

फक्त उरलो मी मला भेटायचा
भेटुनी गेले मला कित्येक जण

ना हतोडा ना कुठे छिन्नी तरी
घालते घण एक नाजुक आठवण

वाळवंटा सारखे जगणे इथे
आसवांनी साजरे होतात सण

पापण्यांना भार झाली आसवे
केवढे ओझे तुझीही आठवण

मयुरेश साने

Group content visibility: 
Public - accessible to all site users

फक्त उरलो मी मला भेटायचा
भेटुनी गेले मला कित्येक जण

छान. घणही चांगला झालाय.
मत्लामध्ये पहिली ओळ बढिया आहे.
शुभेच्छा.

ठिक

आवडली
आठवण हा आशयासाठीचा एकसमान धागा गझलभर राखल्याचे जाणवले
कित्येकजण << अतीशय थेट , बोलका ,सहजसोपा आणि सर्वात प्रभावी झाला आहे . व्वा !

<वाळवंटासारखा> असा एकसंध शब्द आणि <घालतो घण> असा "लिंगबदल" (चावटा ! चांगला अर्थ घेतजा जरा Wink ) इतक्या बदलाच्या जागा तूर्तास तरी लक्षात आल्या मला.

असो धन्स रे !!