चलती का नाम करोला - २

Submitted by फूल on 11 November, 2014 - 23:43

पहिल्या कथेतील काही संदर्भ आलेत इथे... तेव्हा ज्यांनी वाचली नसेल त्यांनी ती कथाही वाचा... Happy
http://www.maayboli.com/node/46118

आणि एकदाची घरात गाडी आली. दिवस पिसासारखे उडत होते. मी आणि नवरा अगदी हौसेने गाडीची बाळंतपणं करत होतो. "आमची गाडी", "आपली गाडी" असं म्हटलं की अगदी मोहरून जायला व्हायचं. मीही आमच्या गाडीला अगदी जपत वगैरे होते. नवऱ्याच्या बाजूला बसल्यावर त्याचं अंगावर खेकसणं अगदी निमूटपणे ऐकून घेत होते. संभावित संयमित चर्चांच्या संधी अगदी हातच्या सोडून देत होते. म्हटलं गाडीसाठी कायपण...

पण हे असं किती दिवस चालायचं. आईला कळलं तर तिला काय वाटेल. आपण आपल्या बायको धर्माला जागून इतिकर्तव्य पार पाडायलाच हवं. मग थोडी चिड चिड, कुर कुर असं होत होत हळू हळू खटके उडायला लागले... अर्थात सगळेच संयमित वातावरणात. पण नवरा "वाण नाही पण गुण लागला" अश्या बेमालुमपणे माझ्याशी चर्चा करत होता. जणू माझ्या आईचा क्रॅश कोर्सच करून आला होता. कारण सगळ्याच चर्चांच्या शेवटी त्याला हवं ते मी मान्य करायला लागले. म्हणजे फक्त गाडीच्या बाबतीतच हं. बाकी इतर विषयांच्या चर्चांत मीच आघाडीवर होते.

इथे एक बारिकसा मुद्दा लक्षात घ्यायला हवा. माझ्या बाबांनी कधी गाडी घेतलीच नाही. त्यामुळे आईला त्याविषयीच्या चर्चांची तशी पूर्ण माहिती नव्हती. नवऱ्याला गाडीच्या बाबतीत हँडल करणं माझ्या हाताबाहेर होत चाललं.. आऊट ऑफ कवरेज एरिआ...

मग गाडी म्हणजे मला सवतच वाटायला लागली. आमचं लग्नही तसं काही नवं उरलं नाही, तेही जुनंच झालं. "तुझ्या हातात मला गाडी द्यायला भिती वाटते" असं तो बिनदिक्कतपणे मला चार-चौघांसमोर सांगायचा. हे म्हणजे अतिच झालं. पण तरिही मी शांत होते कारण थोड्याच दिवसात आई आमच्याकडे रहायला येणार होती...

"अरे, तो बघ तो निघून गेला तुझ्या आधी... काय बाई तू तरी... घुसवायचीस की गाडी मधे... केव्हढी जागा होती तिथे..." " अरे, केव्हढी जागा सोडून चालवतोयस गाडी...? थोडी या बाजूने चालव... त्या मागच्याला आज्जिबात पुढे जाऊ देऊ नको..." "अरे इकडे नको बघूस तिकडे बघ" "आमच्या बंड्याचा मुलगा... बंडू मामा ग तुझा... काय सुरेख गाडी चालवतो... त्याच्याइतकी सुरेख गाडी चालवताना मी आजवर कोणालाच बघितलं नाही... तुला सांगते बबड्या, (माझं लाडाचं नाव) बेळगाव ते कोल्हापूर प्रवास केला पोटातलं पाणीसुद्धा हल्लं नाही... असते बाई जादू एकेकाच्या हातात"

आई आली... मला पाठबळच मिळालं म्हणा ना... आईच्या वाक्या वाक्यावर नवऱ्याला चर्चा करावीशी वाटत असणार. पण खेकसणं तर सोडाच. "आई, तुम्ही आरामात बसा (कृपा करून गप्प बसा). तुम्हाला हवं तिथे मी घेऊन जातो." एव्हढच म्हणू शकत होता तो.

नाही म्हणायला बंडू मामाचा घाव मात्र वर्मी लागला. नवरा कावला. "मीही बसलोय तुझ्या त्या बंडू मामाच्या गाडीत. त्यापेक्षा ट्रॅक्टर बरा. पोटातलं पाणी हालत नाही म्हणे. त्याच गाडीने आपण कोल्हापूर ते सावंतवाडी गेलो होतो. ओकून ओकून वाट लागली तुझी. पाणी शिल्लकच नव्हतं पोटात मग हलणार काय? आणि बबड्या म्हणे. तुलाही एक बेबी सीट आणतो आता. बस त्यात बेल्ट लावून. आई आलीच आहे. करेल ती कोड कौतुक"

आज बऱ्याच दिवसांनी संयमित चर्चेला अगदी मनासारखी सुरुवात झाली. आईही होती सोबतीला. बंडू मामाची गाडी किती चांगली आहे इथपासून ते चिडल्याने आरोग्याला अपाय कसा होतो इथवर सगळंच आईने शांतपणे नवऱ्याला समजावून सांगितलं. आणि नवऱ्यालाही ते पटलं. तसंच तो जे काही बोलला ते तो ऑफिस मधल्या प्रेशर मुळे आणि अतिउत्साहाच्या भरात म्हणाला त्याच्या मनात तसं काही नव्हतं हे ही त्याने मान्य केलं. आई लग्गेच म्हणाली, "बघितलंस बबड्या चर्चेने सगळे प्रश्न सुटतात."

आई यायच्या आधी गाडीला चार डोळे होते... माझे दोन आणि नवऱ्याचे दोन... पण आता ते आठ झाले... माझे दोन, नवऱ्याचे दोन, आईचे दोन आणि शिवाय तिचा चश्मा. गाडी कशी चालवावी याचं नवऱ्याला रोजच्या रोज मौलिक प्रशिक्षण मिळत होतं. नवराही तसा चतुर आहे. आईला तो सांगू लागला, " कशाला तुम्ही बाहेर पडताय आत्ता सकाळी सकाळी / उन्हाच्या वेळी / संध्याकाळच्या वेळी / रात्रीच्या वेळी...(जी वेळ असेल ती) मी आहे ना... मी आणि बाबा जातो आणि तुम्हाला काय हवं ते घेऊन येतो. तुम्ही बसा तुमच्या बबड्या जवळ गप्पा मारत" आईला अगदी हायसं वाटायचं... जावई असावा तर असा... (अरे हो, हे सांगायचं राहिलंच... आई आली म्हणजे त्यातच आई-बाबा दोघेही आले... ते वेगळं सांगायची गरज नाही...)

पण पुढे पुढे याचा विपरीत परिणामा व्हायला लागला. नवरा वीकेंडला गाडी घेऊन गायब व्हायचा. मग आमच्या शॉपिंगची पंचायित व्हायला लागली. आणि इथे खरी ठिणगी पडली. आई मला म्हणाली, " बबड्या तूच का नाही गाडी शिकून घेत?"

मला आईची ही कल्पना फारच आवडली. त्या रात्रीच मी नवऱ्याकडे विषय काढायचं ठरवलं. आईच्याच हातचे दुधातले घावन अगदी आडव्या हाती ओरपून नवरा आढारला होता... "ऐक न, मी काय म्हणते बऱ्याच दिवसात आपण गप्पा मारल्या नाहीत. झोपतोयस काय लगेच." "बबड्याची अम्मा आलीये ना... तोंड दुखत असेत तुझं... बोलून बोलून... झोप आता" नवरा त्यातल्या त्यात खिंड लढवत होता... चालायचंच... अडला हरी... मी नवऱ्याची मनधरणी करायला लागले... अशावेळी इतर गोष्टींकडे दुर्लक्ष करावच लागतं. "हल्ली, किती दमतोस तू गाडी चालवून?" नवऱ्याने खाडकन डोळे उघडून माझ्याकडे बघितलं. त्याचे अष्टसात्विक भाव वगैरे दाटून आले असणार. त्याच्या मते गेल्या दोन महिन्यात (आई आल्यापासून) इतक्या जिव्हाळ्याने कोणी बोललंच नव्हतं. नाही म्हणायला सासूबाईंचा फोन यायचा त्याला अधून मधून.

मी विषयालाच हात घातला... "मी गाडी शिकायचं म्हणतेय..." नवरा जागृती-सुशुप्तीच्या सीमारेषेवर... "झोप आता... बघू उद्या... झोप येतच नसेल अगदी तर आईशी जाऊन गप्पा मार " मग तर मला कससंच झालं. इतका काय दुस्वास... आईने आम्हाला कसं कष्टाने वाढवलंय हे मी सांगायला सुरुवात केली.. आणि आता जरा तिला सुखाचे दिवस दिसतायत... इथवर पोहोचेस्तोवर नवऱ्याच्या घोरण्याचा आवाज ऐकू आला... काय नव्हेच ते... स्त्रीजन्मा तुझी कहाणी...

"अगं, साईड मिरर स्वत:चा चेहरा बघायला नाहीयेत आजूबाजूच्या गाड्या बघायच्या त्यात..." "हे पॉवर स्टिअरींग आहे... गरा गरा फिरवायची गरज नाही... हलकेच फिरवलंस तरी चालेल... म्हणजे तसंच फिरव" "ब्रेक एवढ्या जोरात नको... पोटातलं पाणीच काय सगळी गाडीच हादरतेय... " "बबड्या, असू दे गं एकदा जरा जोरात लागला ब्रेक म्हणून काही बिघडत नाही... शिकशील हळू हळू... सगळ्याच गोष्टी लग्गेच जमायलाच हव्यात असं थोडंच आहे."

या वाक्याने नवऱ्याचा तोल ढळला, "का? आता का?, मी तर दोन दिवसात गाडी शिकलो. बंडू मामाचा मुलगाही तसाच तीन-चार दिवसात शिकला... आठवतंय ना आई तुम्हाला... काल तुम्हीच सांगत होतात... ही तर इतके दिवस माझ्या बाजूला बसतेच आहे... इतक्या दिवसात मला गाडी चालवताना बघून कुणीही गाडी शिकलंच असतं...."

झाssssलं... तरी बाबा पाठीमागून नवऱ्याच्या खांद्यावर हात थोपट होते... की आता बास वहावत चाल्लायस वगैरे वगैरे... पण विनाशकाले विपरीत बुद्धी... बाबांनी तोच हात कपाळावर मारून घेतला... गाडी रस्त्यातच साईडला पार्क करून, ड्रायव्हरच्याच सीटवर मी मांडी घालून बसले आणि संयमित चर्चेला सुरुवात झाली... पुरुषांनी गाडी शिकणं हे बायकांनी स्वयंपाक शिकण्याइतकच नैसर्गिक आहे... हे मी आणि आईने शांतपणे नवऱ्याला पटवून दिलं... मधे मधे आई, "हो की नाही हो..." असं म्हणून बाबांनाही तोंडी लावत होती... आणि अर्थातच नवरा जे बोलला ते अतिउत्साहाच्या भरात आणि ऑफिस मधल्या टेन्शन मुळे बोलला त्याच्या मनात तसं काही नव्हतं हेही त्याने मान्य केलं... आणि या वेळी बाबा म्हणाले, "बघितलंस चर्चेने कसे प्रश्न चटा-चट सुटतात."

आता ठरवलं नवऱ्याकडून गाडी शिकणं... नकोच ते... सरळ ड्राईव्हिंग स्कुल मधे नाव घातलं. नवराही म्हणाला, "एकवेळ पैसे गेलेले परवडले. पण... (यावेळी बाबांनी त्याला शिताफिने थांबवलं)".

आईचेही परत जायचे दिवस जवळ आले होते. नवऱ्याच्या शीळ घालण्यातून हल्ली "पंछी बनू उडती फिरू" वगैरे गाणी ऐकू यायला लागली होती... पूर्वी "जाये तो जाये कहा" आणि तत्सम गाणी ऐकू यायची...

माझा ड्राईव्हिंग क्लास सुरू झाला... माझ्या ड्राईव्हिंग मास्तरांनी अनेक बायकांना ड्राईव्हिंग शिकवलेलं होतं... त्यामुळे स्थितप्रज्ञाची अनेक लक्षणं मला त्यांच्यात दिसायची... क्लास ला जाताना कुणालाही बरोबर आणायचं नाही अशी अटच होती त्यांची... त्यामुळे आईची मला गाडी चालवताना बघायची इच्छा तशी अपूर्णच राहीली... असो...

दिवसागणिक मी ड्राईव्हिंग तंत्रात पारंगत होत होते... आणि आईची परतीची वेळ अगदी दिवसांवर येऊन ठेपली होती... नवरा आता आधिकच तेज:पूंज दिसत होता... त्याच्या तश्या दिसण्याला एक खास कारणही होतं... माझी आई जाणार ते तर झालंच पण त्यानंतर थोड्याच दिवसात त्याची आई येणार होती...

"अगं, जरा हळू चालव... मन्या बघ कसा चालवतो... शिकून नाही का घ्यायचीस त्याच्याकडून नीट. मन्या आठवतंय ना रे आपली ताई तीन दिवसात गाडी शिकली... ड्राईव्हिंग स्कुल ला पैसेही नाही हो घालावे लागले... तशी ती जात्याच हुशार आणि काटकसरी... अगं हळू... मन्या गाडी चालवतो तेव्हा पोटातलं पाणी सुद्धा हालत नाही..."

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त धमाल आहे पुर्ण लेख . Biggrin
पण आपली गाडी स्वतः पेक्शा दुसर्यांना दाखवण्यात जास्त मज्जा असते. हेही खरच आहे. Happy

आणि अर्थातच नवरा जे बोलला ते अतिउत्साहाच्या भरात आणि ऑफिस मधल्या टेन्शन मुळे बोलला त्याच्या मनात तसं काही नव्हतं हेही त्याने मान्य केलं...>> Lol

हलकंफुलकं लिखाण!

गाडी रस्त्यातच साईडला पार्क करून, ड्रायव्हरच्याच सीटवर मी मांडी घालून बसले आणि संयमित चर्चेला सुरुवात झाली>>> Rofl अगदी डोळ्यांसमोर जस्साच्या तस्सा उभा राहिला हो हा प्रसंग. मस्त लिहिलंय. हसून हसून अगदी बेजार झालो. Happy

मस्त जमलंय !
बऱ्याच दिवसांनी संयमित चर्चेला अगदी मनासारखी सुरुवात झाली >> Lol
".. ड्राईव्हिंग स्कुल ला पैसेही नाही हो घालावे लागले... तशी ती जात्याच हुशार आणि काटकसरी.." >>> हा टोला पण सो टिपिकल Lol

ध मा ल लिहिलंय! ह ह पु वा Happy

नवरा आता आधिकच तेज:पूंज दिसत होता... त्याच्या तश्या दिसण्याला एक खास कारणही होतं... माझी आई जाणार ते तर झालंच पण त्यानंतर थोड्याच दिवसात त्याची आई येणार होती...

हे तर भारीच!

मॅड हसले... फुला... खरच धम्माल लिहिलय.
..जे काही बोलला ते तो ऑफिस मधल्या प्रेशर मुळे आणि अतिउत्साहाच्या भरात म्हणाला त्याच्या मनात तसं काही नव्हतं हे ही त्याने मान्य केलं>> हे आणि <<संयमित चर्चा... >> भारी आहे.
आता तुझं चक्रधारी लायसण हाती आलं की, त्यावर येऊदे अजून एक...

खरच नेमानं लिहित जा गं... मस्तं लिहितेस.
(आणि हे घरात खरच असेल तर... नवर्‍याला किस चक्की का आटा खाऊ घालतेस ते एक मेहरबानी करून सांग बाई... )
Happy

गाडी रस्त्यातच साईडला पार्क करून, ड्रायव्हरच्याच सीटवर मी मांडी घालून बसले आणि संयमित चर्चेला सुरुवात झाली .... मस्तच..हसून हसून डोळ्यात पाणी आल...

मस्त मस्त... खूपच धमाल लेख. पंचेस सॉलिड मारलेत.

आमच्या केस मधे उलटे होते. नवर्‍याला भयंकर आवड कारची. आधी स्वतःची नव्हती तेव्हा रेंटच्या गाड्या ऊडवायचा दर वीकेंडला. मग स्वतःची आली तेव्हा परिक्षेला पण एवढा अभ्यास केला होता का माहित नाही पण गाडीबद्दल प्रचंड अभ्यास करूनच नवीन गाडी घेऊन आला. मी आपलं कशाला गाडी हवीये... बस, ट्रेन आहेत की म्हणत बसले. कारण पुढचे सगळे चित्र दिसत होते... मला तो गाडी कशी यावीच लागते हे लेक्चर देणार, क्लास लावायला लावणार, मग मी ती चालवताना कशी भांडणे होणार Proud
असो...:)

मजा आली ...........................मस्त .....घरोघरी मातीच्या चुली.

अतिशय भारी.. प्रचंड भारी.. Biggrin
लिहित रहा. तुमचं लिखाण खरच दर्जेदार आणि सहज असतं. काहीही ओढून-ताणून लिहिलेलं नसतं हे फार आवडतं.

Pages