अळी....

Submitted by संतोष वाटपाडे on 2 November, 2014 - 04:01

वाटाण्याच्या झाडावरती
अगदी हिरव्या शेंड्यावरती
स्वच्छ पांढर्‍या दांतांखाली
फ़ुले चावुनी कोमल कोमल
हिरवी हिरवी लिबलिबणारी
सुस्त भामटी जरा खोडकर
अळी कधीची खेळत होती...

वारा आला भिरभिरणारा
फ़ांदी हलली जरीही थोडी
अळी हातातील पाने फ़ेकून
भक्कम देठाभवती बिलगून
इवले इवले डोळे मिचकून
गाल गोबरे थरथरताना
उगाच छद्मी हासत होती....

वाटाण्याच्या शेंगेमध्ये
तिने बांधले होते घरटे
खिडक्या दारे रेशीमपडदे
आरामाला एकंच खोली
खेळायाला दुसरी खोली
खाणपिण्याची छान व्यवस्था
तिसर्‍या खोलीमध्ये होती...

हातात पिशवि घेऊन मोठी
जणू निघावी बाजाराला
या फ़ांदीवर त्या फ़ांदीवर
बागडताना हुंदडताना
माल कोवळा मटकवताना
जिथे जायची तिथे पावले
तिची छानशी उमटत होती...

एके दिवशी दिसली नाही
झाडावरती कुठे कुठेही
शोधून झाली पाने फ़ांद्या
नंतर दिसली घरात तेव्हा
मऊ दुलाई घेऊन छोटी
हिरव्या हिरव्या अंगावरती
अळी एकटी निजली होती....

वाटाण्याचे झाड वाळले
तेव्हा पिवळ्या पानांमधुनी
हळूच चरचर ऐकू आली
पांघरुणाला सारून आली
पंख लावूनी रंगबिरंगी
अळी वेगळे रुप ल्यायली
अगदी सुंदर भासत होती...

-- संतोष वाटपाडे (नाशिक)

Group content visibility: 
Public - accessible to all site users

ओळखलंत कां डॉक्टर मला?

"ओळखलंत कां डॉक्टर मला?" पेशंट आला कुणी
कपडे होते भिजलेले त्यात गटाराचं पाणी
तोंड आपलं वाकडं करून आधी जरा हसला
कसाबसा तोल सावरत खुर्चीमध्ये बसला
डुलतडुलत बोलला मग खाली थोडं वाकून
"अड्ड्यावरती जाऊन आलोय आत्ताच थोडी टाकून
कशी हल्ली दारू पाडतात कळत नाही काही
पहिल्या धारेची घेऊन सुद्धा मुळीच चढत नाही
नकली दारू पितोय आणि त्यातच शोधतोय नशा
लिव्हर झाली खराब आणि शरीराची होतेय दशा
'दारू सोड' म्हटलंत म्हणूनच पोटात तिला सोडली
बायको गेली पळून आणि हिच्याशी मैत्री जोडली
पोटात होतेय जळजळ जरा काळजी माझी घ्या
रॅनटॅकबरोबर दोन चमचे जेल्युसील तरी द्या
अड्ड्यावरती राडा करून मार थोडा खाल्लाय
मला वाटतं वरचा एक दात जरासा हाल्लाय
पोटावरती कुणीतरी फिरवून गेलाय चाकू
बिनधास्त घाला टाके तुम्ही करू नका का कू"
रागावलेला मला बघून बरळतंच तो उठला
"अड्ड्यावरती डॉक्टर आज तुम्ही नाही भेटला?"
खळखळून हसले सगळे पेशंट खजील मी झालोय
काय करू मी सांगा सर, तुमच्याकडे सल्ल्यासाठी आलोय
सर तुम्ही काही सांगा तुमचा सल्ला मी मानीन
'अड्ड्यावर जाणं सोड' म्ह्टलंत, तर मात्र कानफटात हाणीन
(ठाणे येथून प्रकाशित झालेल्या 'प्रतिभा' या २०१४ च्या दिवाळी अंकात ही कविता प्रकाशित झालेली आहे)

मस्तं कविता.
हत्ती स्टाईलमध्ये अळीच्या ट्रान्सफॉर्मेशनची पण मस्तं गोड चित्रे होतील.
Happy