साट्याच्या करंज्या

Submitted by शलाका पाटील on 28 October, 2014 - 06:54
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१ तास
लागणारे जिन्नस: 

कव्हर-
१/२ कप मैदा
२ टेस्पून रवा
२ टेस्पून तूप, मोहनासाठी
चिमुटभर मीठ
खायचा रंग (लाल किंवा हिरवा)
२ ते ४ टेस्पून दुध
सारण-
१/२ कप किसलेले सुके खोबरे, भाजलेले
१/४ कप पिठी साखर
२ टेस्पून बारीक चिरलेले बदाम, पिस्ते, चारोळ्या
१/२ टीस्पून वेलची पूड
साटा-
३ टेस्पून तूप
२ टेस्पून कॉर्न फ्लोअर
इतर साहित्य-
तळण्यासाठी तूप/तेल

क्रमवार पाककृती: 

कृती:
१) मैदा आणि रवा एकत्र करून २ टेस्पून कडकडीत गरम तुपाचे मोहन घालावे. चमच्याने ढवळून मीठ घालावे. दुध घालून मध्यमसर मळून घ्यावे. २० मिनिटे झाकून ठेवावे.
२) तोवर सारण बनवावे. किसून भाजलेले खोबरे हाताने चुरून घ्यावे. त्यात पिठीसाखर, बदाम-पिस्ते, आणि वेलचीपूड घालून मिक्स करावे.
३) तूप हाताने फेसून घ्यावे. तूप हलके झाले कि कॉर्न फ्लोअर एकत्र करून फेसावे.
४) भिजवलेले पीठ तीन समान भागात विभागून घ्यावे. दोन भागात २-३ थेंब रंग घालून मळून घ्यावे.
५) पांढऱ्या रंगाचा गोळा घेउन एकदम पातळ लाटून घ्यावे. त्यावर बोटाने खळगे करून घ्यावे. त्यावर फेसलेला साटा लावावा.
६) रंगीत गोळ्यांची पातळ पोळी लाटून घ्यावी. हि पोळी पहिल्या पोळीवर ठेवावी. त्यावर बोटाने खळगे करून घ्यावे. यावर साटा लावावा.त्यावर तिसरी पोळी ठेवावी त्यावर बोटाने खळगे करून घेवुन यावर साटा लावावा. घट्ट रोल करावा. थोडावेळ हा रोल हवेवर ठेवावा. साट्यातील तूप सुकले कि रोल थोडा घट्ट होईल.
७) रोल घट्टसर झाला कि त्याचे १ इंचाचे तुकडे करावे. लेयर असलेली बाजू वर ठेवून पुरी एवढे लाटावे. त्यात एक-दीड चमचा सारण भरून कडा सील कराव्यात. कातणाने जास्तीची कड कापून घ्यावी.
८) कढईत तूप गरम करून करंज्या मध्यम आचेवर तळून घ्याव्यात.

वाढणी/प्रमाण: 
ह्या प्रमाणात ८/१० मध्यम करंज्या होतात
अधिक टिपा: 

मोहन कडकडीत गरम पाहिजे नाहीतर करंज्या नरम पडतील.

माहितीचा स्रोत: 
जाऊबाई
पाककृती प्रकार: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

माझी आत्ता आत्ता पर्यंत हा घाट घालत होती. अजिबात रंग न पलटवता खमंग तळत असे ती.
फक्त ती साटा लावायच्या आधी थोडे गरम तूप लावत असे.

कॉर्नफ्लोअर मिळत नसे त्यावेळी, तांदूळ भिजवून, सावलीत वाळवून त्याचे वस्त्रगाळ पिठ वापरत असे.

मला हा प्रकार बालुशाही सारखा वाटत आहे फक्त आकार करंजीचा आहे. करंजीचे केवढे नाना विविध प्रकार आहेत खरच! पण पिठीची करंजी सर्वात बोअर Happy

सुंदर जमली आहे करंजी. अगदी खावेश.

शलाका
७ नंबर ची स्टेप - लेयर असलेली बाजू वर ठेवून - म्हणजे कशी?
मी तो कापलेला १ इंचाचा तुकडा... थोडा तिरका ठेउन प्रेस करते नि लाटते. म्हणजे निम्मी कापलेली नि निम्मी प्लेन बाजु वर येते नि पुरी लाटली की फुटायची भिती नाही.

मी यावेळी नाही केल्यात करन्ज्या... त्या फोटोतल्या सगळ्या पळवाव्यात असे वाटतेय. Happy

namaste, mi ithe navin aahe pan mazyakadehi karanjichi ek chan resipi aahe. Ti ithe lihili tar chalel ka?

छान पदर सुटलेत खारीसारखे . ते कॉर्न फ्लोअर मुळे का ? आमच्याकडे साध्याच करतात करंज्या .त्यामुळे माहीत नाही. हा त्या गुलाबाच्या चिरोट्यासारखाच प्रकार वाटतो आहे फक्त यात सारण भरले आहे.
दिनेशदा तांदळाच्या पिठाने असेच पदर सुटतात का? की क्रीस्पीनेस कमी होतो?