मित्राचा शत्रू आणि शत्रूचा मित्र !

Submitted by ऋन्मेऽऽष on 23 October, 2014 - 18:12

दिवाळीच्या आठ दिवस आधीची गोष्ट !

सर्व कुटुंबवत्सल प्राण्यांची दिवाळीची खरेदी आटोपून फराळाच्या तयारीला एव्हाना सुरूवात झाली होती. तरी आमच्यासारखे सडाफटींग अजूनही यंदाच्या दिवाळीला काय घ्यायचे आणि कुठून घ्यायचे याच विचारमंथनात अडकले होते. कुठे डिस्काऊंट मिळतेय आणि कुठे नवीन व्हरायटी आलीय याच्याच चर्चा झडत होत्या. माहितीची देवाणघेवाण होत होती. अश्यातच पाईपिंग डिपार्टमेंटच्या बलविंदरसिंग रहेजा उर्फ आर बल्लूने आपला नेहमीचा टीशर्ट आणि शर्टस या रेडीमेड कपड्यांचा हंगामी स्टॉल स्वत:च्याच डेस्कवर मांडला होता. अर्थातच, ऑफिसचे कायदेकानून असल्याने खुलेआम प्रदर्शन नाही, तर त्याच्याकडील बूकलेट मधील हवे ते पसंद करून त्यानुसार ऑर्डर करायची, या प्रकारेच त्याचा बिजनेस चालतो. गेले दोन वर्षांचा प्रत्येकाचा अनुभव बर्‍यापैकी चांगला असल्याकारणाने यावेळी त्याच्याकडचे कपडे, खास करून नवीन आलेले जॅकेट्स फुल्ल डिमांडमध्ये होते. तर त्या दिवशी जेवण आटोपून त्याच्याकडचे सॅंपल पीस आणि बूकलेट चाळायला, तसेच आवडल्यास त्या नुसार ऑर्डर द्यायला म्हणून आम्ही दोघे तिघे बल्लूच्या डेस्कवर जायला निघालो, आणि जाताजाता मी माझा खास मित्र सलीमला सुद्धा एक आवाज दिला.... पण समोरून नकारघंटा आली!

"तू जा ऋनम्या, मला नाही घ्यायचे काही यावेळी.." ईति सलीम.

"ठिक आहे यार, बघायला तर चलशील" मी सहज म्हणालो.

"नको बस्स, नाही घ्यायचे. बघायचे पण नाही", त्याचा हा प्रतिसाद मात्र किंचित अनपेक्षित आणि खटकणारा. कारण सलीमला या सर्वाची खूप आवड होती.

"काय झाले रे, ठिक आहेस ना? असा काय करतोयस?" न राहवून मी विचारले.

"ऋन्म्या तुला माहीत आहे ना. आपला आणि पीटरचा काय सीन झालाय ते.."

"बरं मग?", माझी अजूनही ट्यूब पेटेना.

"बस्स मग तो बल्लू त्या पीटरचा खास आहे.."

अखेर माझी पेटली, नव्हे लख्खकन प्रकाश Light 1 पडला. सलीमची माजी प्रेमिका जान्हवी, पीटरने पळवल्याने, सलीम आणि पीटरमध्ये साहजिकच एक प्रकारचे शत्रूत्व आले होते. या पीटरचा बलविंदरसिंग रहेजा उर्फ आर बल्लू हा खास मित्र. त्यामुळे सलीमला आता कदाचित बल्लूशी देखील कसलेही संबंध ठेवायचे नव्हते. शत्रूचा मित्र तो आपला शत्रू. थोडाफार असा फंडा होता तर..

"ठिक आहे यार, आपल्याला कुठे कोणाची मेहेरबानी हवीय. पसंद पडले तर घ्यायचे आणि त्याचे रोख पैसे मोजायचे. धंदा आहे हा, फुकट तर नाही ना घेणार.."

"तसे नाही रे ऋनम्या, तू खूप भोळा आहेस..", हे वाक्य मला जवळून ओळखणारा प्रत्येक जण आयुष्यात एकदा तरी हमखास फेकतोच, सलीमने तर हाल्फ सेंच्युरी मारली होती.

असो, पुढे म्हणाला, "त्या बल्लूकडून आता काही घ्यायला नको. तो कश्या ना कश्यात तरी मला चुना लावणारच. क्वालिटीमध्ये तरी फसवणार नाही तर किंमतीला तरी गंडवणार.."

"कश्यावरून?" माझा खरोखरच साळसूदपणे प्रश्न!

"कारण तो पीटरचा मित्र आहे. संधी मिळाली की पीटरच्या मैत्रीखातर तो माझी ठासणारच. कोणी सांगितलेय विषाची परीक्षा घ्यायला.."

........... शत्रूचा मित्र तो आपला शत्रू. माझा अंदाज खरा निघाला तर!

यावर मी सलीमला म्हणालो, "वोक्के बॉस! मग आता मला सांग, तू नाही का ऑफिसच्या बसने सर्फराझच्या बरोबर जातोस?"

आता हा ‘सर्फराझ सिद्दीकी उर्फ एसएस’ आणि माझी दुश्मनी बरेपैकी पुरानी. अर्थात माझ्या मनात त्याच्याबद्दल कधीच फारसे किल्मिष नसले तरी तो मात्र माझ्यावर बरेपैकी खार खाऊन. आता हे, का? कसे? कधीपासून? हे पुन्हा कधीतरी वेगळ्या लेखामध्ये सांगतो. पण रोज सकाळी ऑफिसला येताना आणि रोज संध्याकाळी ऑफिसहून घरी जाताना, कंपनीच्या कल्याण-डोंबिवली बसमध्ये, जुन्या गाण्यांच्या सामाईक आवडीपोटी, सलीम आणि सर्फराझ नेहमीच एकत्र एकाच सीटवर बसून प्रवास करतात हे मला ठाऊक होते. फक्त आजवर मी कधी याला चर्चेचा विषय बनवला नव्हता ईतकेच. पण आज माझ्या तोंडून हा प्रश्न ऐकताच, सलीम माझ्याकडे थोडावेळ बघतच बसला. आणि मग सावरून म्हणाला,

"अरे पण त्याची आणि तुझी दुश्मनी आहे, मी का उगाच त्याच्याशी वाकड्यात जाऊ. मित्राचा शत्रू आपला शत्रू बनलाच पाहिजे असे गरजेचे आहे का? पण शत्रूच्या मित्रापासून आपण सावध राहिलेले केव्हाही चांगलेच ना?"

खरे तर इथे सलीमने आपल्या सोयीने पलटी खाल्ली होती, पण असो! आता सलीम नावाचा ऊंट माझ्या वळचणी खाली आला होता,
"तर देख बॉस सलीम, तू त्याच्याशी वाकड्यात जावे असे मी देखील कधीच बोलणार नाही. पण तुझ्याच लॉजिकनुसार सांगायचे झाल्यास तुझ्यासाठी सर्फराज तुझ्या मित्राचा शत्रू असल्याने तू त्याच्याशी उगाचच शत्रुत्व घेत नाहीयेस. कबूल. पण सर्फराजसाठी मात्र तू माझा, म्हणजेच त्याच्या शत्रूचा मित्र आहेस, हे कायम ध्यानात ठेव! तो तुझ्याबद्दल तसाच विचार करत असणार जसे तू आज बल्लूबद्दल, म्हणजे तुझ्या शत्रूच्या मित्राबद्दल करत आहेस.
......आणि हो, मग सावधच राहा!"

बस्स!, सलीमला तसेच विचारात पाडून मी निघून गेलो. त्याच्याकडून काही उत्तराची अपेक्षा मला नव्हतीच. ना त्याची सारवासारव ऐकायची होती.

पण किस्सा इथेच संपत नाही!

सलीम माझी हि शिकवणी नकारात्मक घेतो की सकारात्मक हे मला समजायचे होते. म्हणजेच तो सर्फराझपासूनही सावध होत त्यालाही दूर सारतो, की बल्लूवर भरवसा टाकतो हे मला बघायचे होते. पण माझा मित्र सलीम, चूक पटली तर कबूल करणे हे त्याचे वैशिष्ट्य! आमच्या पाठोपाठ पाचच मिनिटांत तो देखील बल्लूच्या डेस्कवर हजर झाला. यथावकाश एक जॅकेट आणि दोन टीशर्ट पसंद करून ऑर्डर दिली गेली. पुढे कुठल्याही प्रकारची फसवणूक झाली नाहीच. कारण आर बल्लू कसलाही गंड मनात ठेऊन सलीमला गंडा घालेल याची शक्यताही टेन्डस टू झिरो होती.

किस्सा इथेच संपला! पण लेख मात्र अजून बाकी आहे!

मायबोलीवर तुलनेत मी नवीन आहे. पण इत्र तित्र सोशलसाईटसवर बरेपैकी उंदडलोय. या शत्रूचा मित्र आणि मित्राचा शत्रू प्रकारात मोडणारे बरेच अनुभव घेतलेत. कित्येक सोशलसाईटसवर मित्र कंपू आणि शत्रू कंपू अशी गटागटांची रेलचेल अनुभवलीय.

एखादा सभासद आपल्याला बरेपैकी जवळचा वाटत असतो, पण अचानक एके दिवशी आपल्या विरोधी कंपूचे स्नेहसंमेलन झाल्याचे आणि त्यात त्यानेही हजेरी लावल्याचे समजते अन अचानक तो सभासद आपल्याला खुपू लागतो.

कधीतरी आपल्या मित्राचा कुठे एखाद्या धाग्यावर वाद चालू असतो, आपल्याला ना त्यामागची पार्श्वभूमी माहिती असते, ना कोण चूक आणि कोण बरोबर याची खबर असते. पण मित्रकर्तव्य(?) म्हणत दातओठ खात आपणही त्या वादात उतरतो आणि आपल्या परीने तो वाढवूनच जातो.

बरेचदा आपलाच एखादा मित्रच आपल्याकडून वर उल्लेखलेले मित्रकर्तव्य(?) आपण निभवावे अशी अपेक्षा ठेऊन असतो आणि आपण काय करतो, तर दहा नवीन शत्रू झाले तरी चालतील मात्र एक बनाबनाया मित्र गमावता कामा नये असा उदात्त विचार करून त्याच्या हाकेला साद देतो.

वगैरे वगैरे .. हि दोनचार उदाहरणे झालीत, पण अशी खोर्‍याने विविध प्रकारची उदाहरणे मी आजवर अनुभवली आहेत.

मायबोली या सर्वाला अपवाद असेल तर आनंदच आहे. नसेल तर हे फार सामान्य आहे. जे सलीम समजून चुकला ते सर्वांनी आचरणात आणले की काम झाले. अर्धे टेंशन तिथेच खल्लास. आपल्या प्रत्येक मित्राच्या प्रत्येक शत्रूला, किंवा आपल्या प्रत्येक शत्रूच्या प्रत्येक मित्राला, आपलाही शत्रू समजण्याची चूक जर का आपण केली, तर आपले शत्रू चक्रवाढ पद्धतीने वाढतच जातील. त्यामुळे आयुष्य साधे ठेवा, सोपे ठेवा, काहीच नाही जमले तर नाकासमोर जगा Happy

जाता जाता शेवटच्या ओळीत एकच प्रार्थना करू इच्छितो,
हि दिवाळी आणि हे नूतन वर्ष, माझ्या सर्व मित्रांना आणि सर्व मायबोलीकरांना स्नेहाचे आणि सौख्याचे जावो !!

ऋन्मेऽऽष

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ऋनम्या, तू खूप भोळा आहेस पण आहेस तसाच रहा ..>>>
हर्पेनब्वॉ लै मोठा गैरसमज हाय बर्ं हा, (hya wyaktiche kontehi) दोन धागे वाचुन ही व्यक्ति भोळी तर निश्चितच नाही पण लै चालु हे. हे कळायला पाहिजे हुतं.. असो.

अग्निपंख,
कोणते दोन धागे?

रीया,
प्लस वन
मला भोळे म्हटले जाते पण तशी वस्तुस्थिती नाहीये. किंबहुना माझी लहानपणीपासूनची इच्छा हिच होती की आयुष्यात ईतके धूर्त, चलाख, कपटी व्यक्ती बनावे की इतिहासात कैकयी, शकुनी, चाणक्य नंतर ऋन्मेषचे नाव घेतले जावे. ईतकेच नव्हे तर माझी ग'फ्रेंड सुद्धा मला लोमडी बोलते. अर्थात ती हे दिसण्यावरून बोलते. तिच्यामते मी आणि प्रियांका चोप्रा (हॉलीवूड तारका) आम्हा दोघांचा चेहरा लोमडीसारखा दिसतो. असो Happy

हर्पेन,
तुम्हालाही शुभेच्छा!

मस्त लेख.

त्यामुळे आयुष्य साधे ठेवा, सोपे ठेवा, काहीच नाही जमले तर नाकासमोर जगा >>> ++१

कोणीतरी कोणाचा तरी मित्र अथवा शत्रु आहे ह्या आधरावर आपण आपली मैत्री किंवा शत्रुत्व ठरविणे हे आत्मविश्वास कमी असल्याचे लक्षण आहे.

<< माझी लहानपणीपासूनची इच्छा हिच होती की आयुष्यात ईतके धूर्त, चलाख, कपटी व्यक्ती बनावे की इतिहासात कैकयी, शकुनी, चाणक्य नंतर ऋन्मेषचे नाव घेतले जावे. >>

यादीत घड्याळ काकांचे नाव कसे काय नाही?

<< तिच्यामते मी आणि प्रियांका चोप्रा (हॉलीवूड तारका) आम्हा दोघांचा चेहरा लोमडीसारखा दिसतो. असो >>

प्रियांका हॉलीवूड स्टार कधी झाली?

बाकी तुम्हा दोघांचेही चित्रतार्‍यांविषयीचे अभिप्राय वाचून इतर रसिकांना भोवळ येईल. एकाला सई अप्रतिम लावण्यवती वाटते तर दुसरीला प्रियांका लांडग्याच्या मादीसारखी वाटते.

अग्नीपंख,
आधी तुम्ही "दोन धागे" म्हणालात, मग "कोणतेही दोन धागे" असे संपादित केले, काय राव ऋ भोळा आहे याचा एवढा फायदा उचलायचा का?

चेतनजी,
सर्वप्रथम लेख सोडून प्रतिसादांवरच धाड घातलीत याबद्दल अभिनंदन Wink Light 1

घड्याळकाका राजकारणाशी संबंधित असतील तर नो कॉमेंटस!

प्रियांका चोप्रा बद्दल म्हणाल तर तिचे नाव आणि हॉलीवूड स्टार हे दोन शब्द एकत्रितपणे गूगलकाकांना पुरवलेत तर पुढची माहीती तेच देतील.
शोध वेगवान करण्यासाठी I can't make you love me हे टाका Happy

कोणीतरी कोणाचा तरी मित्र अथवा शत्रु आहे ह्या आधरावर आपण आपली मैत्री किंवा शत्रुत्व ठरविणे हे आत्मविश्वास कमी असल्याचे लक्षण आहे.
>>>>

सुमुक्ता प्लस वन १

मागे एका धाग्यावर (सईच्या) तुझ्यावर कोणीतरी (तू अनेक प्रतिसाद देऊन तुझेच धागे दिवसभर पहिल्या पानावर ठेवतो असा) आरोप केलेला. त्यावर तू उत्तर दिलेलेअस कीए तू असं काही करत नाहीस पण तो धागा महत्वाचा असल्याने त्यावर उत्तर देणं हे तुझं कर्तव्य असल्याने तसं करणं तुला भाग पडतं वगैरे उत्तर दिलेलस.
आता या धाग्याबाबत मला तुझी मजबूरी ऐकुन घ्यायला आवडेल. का बरे तू एका मागोमाग एक स्वतःच प्रतिसाद देऊन तुझा हा धागा वर ठेवतोयेस?

जरा हा आयडीचा वापर बंद कर आणि तुझ्या ओरिजनल आयडीने लिहायला घे काही तरी मस्त!
तुझं आवडेलास, वारंवार वाचावंस वाटेल असं लिखाण वाचून बरेच दिवस झालेत.
एक फुकट पण प्रेमाचा सल्ला Happy

मागे एका धाग्यावर ..........
>>>>>>>>>>>>

किती हे पूर्वग्रह दूषित मत Happy

वरती मोजून माझे ३ प्रतिसाद असले तरी पुढचे दोन प्रतिसाद एकापाठोपाठ एक दिलेत म्हणजे इफेक्टीवली २ च प्रतिसाद.
पैकी एकात अग्नीपंख यांचा प्रतिसाद मला वैयक्तिक असल्याने चौकशी केली.
आणि चेतनजींना पडलेल्या दोन प्रश्नांची उत्तरे दिलीत.

आणि धागा वर आणायला प्रतिसाद हा तर किती हास्यास्पद आरोप,
जुना धागा वर आणण्यापेक्षा मी नवीन धागा काढणे जास्त पसंद करतो Proud

.............

जरा हा आयडीचा वापर बंद कर आणि ..............
>>>>>>>

यावरून समजतेय की आपण अजूनही चुकीच्या गृहीतकांवर माझे विश्लेषन करत आहात Happy

<< चेतनजी,
सर्वप्रथम लेख सोडून प्रतिसादांवरच धाड घातलीत याबद्दल अभिनंदन >>

ठीक आहे. आता धाग्याकडे वळतो.

सुरुवातीला शीर्षकाविषयी -

आधी असलेलं भलंमोठं शीर्षक बदललं ते का बरं?

मधला किस्सा साधारणच आहे आणि फारसा नावीन्यपूर्ण देखील नाही, तेव्हा त्याविषयी चर्चा करीत नाही. महत्त्वाचं आहे ते आपण मांडलेलं तात्पर्य. त्याविषयी -

<< एखादा सभासद आपल्याला बरेपैकी जवळचा वाटत असतो, पण अचानक एके दिवशी आपल्या विरोधी कंपूचे स्नेहसंमेलन झाल्याचे आणि त्यात त्यानेही हजेरी लावल्याचे समजते अन अचानक तो सभासद आपल्याला खुपू लागतो. >>

नुसती हजेरी लावल्याने एखादा सभासद आपल्याला खुपू लागतो हे काही पटत नाही. उलट मी मागे एक संकेतस्थळ सोडले त्याच्या विविध (उघड आणि छुप्या) कट्ट्यांना माझे अनेक मित्र हजेरी लावत आणि मला "आतली" खबर देत.

<< कधीतरी आपल्या मित्राचा कुठे एखाद्या धाग्यावर वाद चालू असतो, आपल्याला ना त्यामागची पार्श्वभूमी माहिती असते, ना कोण चूक आणि कोण बरोबर याची खबर असते. पण मित्रकर्तव्य(?) म्हणत दातओठ खात आपणही त्या वादात उतरतो आणि आपल्या परीने तो वाढवूनच जातो. >>

पार्श्वभूमी माहिती नसते तरीही आपण त्या वादात उतरतो; असं खरं तर होऊ नये. संपूर्ण लेख आणि त्याखालचे प्रतिसाद वाचून वस्तुस्थिती कळतेच की. मग आपल्या सदसद्विवेकबुद्धीला जी बाजू योग्य वाटते त्या बाजूने उतरण्यात काहीच हरकत नाही. फक्त मित्र आहे म्हणून त्याची बाजू चुकीची असताना तिकडून खिंड लढविण्याचं मात्र समर्थन करता येणार नाही.

<< बरेचदा आपलाच एखादा मित्रच आपल्याकडून वर उल्लेखलेले मित्रकर्तव्य(?) आपण निभवावे अशी अपेक्षा ठेऊन असतो आणि आपण काय करतो, तर दहा नवीन शत्रू झाले तरी चालतील मात्र एक बनाबनाया मित्र गमावता कामा नये असा उदात्त विचार करून त्याच्या हाकेला साद देतो. >>

असा अनुभव मला तरी अजून आला नाही. म्हणजे अमूक एका धाग्यावरच्या वादात 'माझ्या बाजूने उतर' अशी साद मला तरी अजून कुठल्याही मित्राने या किंवा कुठल्याही संकेतस्थळावर घातली नाही. याउलट एखाद्या धाग्यावर वाद चालला असेल आणि योग्य मुद्दा मांडणारा आणि तरीही एकाकी पडलेला एखादा सदस्य असेल अनोळखी तरीही मी त्याच्या मदतीला नक्कीच धावून जातो. अशा वेळी दहा नवीन शत्रू तयार होतातही, इतकेच काय ज्याची बाजू घेतलीय तो देखील मित्र होईलच असे नाही. पण हे सारे निरपेक्ष वृत्तीने केवळ सदसद्विवेकबुद्धीची साद ऐकून केलेले असते, त्यामुळे दु:ख होत नाही.

<< वगैरे वगैरे .. हि दोनचार उदाहरणे झालीत, पण अशी खोर्‍याने विविध प्रकारची उदाहरणे मी आजवर अनुभवली आहेत.

मायबोली या सर्वाला अपवाद असेल तर आनंदच आहे. नसेल तर हे फार सामान्य आहे. जे सलीम समजून चुकला ते सर्वांनी आचरणात आणले की काम झाले. अर्धे टेंशन तिथेच खल्लास. आपल्या प्रत्येक मित्राच्या प्रत्येक शत्रूला, किंवा आपल्या प्रत्येक शत्रूच्या प्रत्येक मित्राला, आपलाही शत्रू समजण्याची चूक जर का आपण केली, तर आपले शत्रू चक्रवाढ पद्धतीने वाढतच जातील. त्यामुळे आयुष्य साधे ठेवा, सोपे ठेवा, काहीच नाही जमले तर नाकासमोर जगा >>

मायबोलीचा यात काय संबंध? अशी कंपूबाजी करा, किंवा करू नका हे काही मायबोली सांगत नाही. हा ज्याचा त्याचा (किंवा जिचा तिचा) वैयक्तिक प्रश्न आहे. प्रत्येक जणाचं स्वतःचं असं एक जीवनविषयक तत्त्वज्ञान ठरलेलं असतं. तो / ती त्याप्रमाणे वागत असतो / ते.

थंब रूल किंवा ढोबळ मानाने वाईट लोकांचा कंपू हा जास्त सामर्थ्यशाली / चिवट असतो. त्यांच्यात मित्रासाठी कायपण अशी वृत्ती असते. आपके लिए जान देभी सकते है और किसी और की जान ले भी सकते है असं ह्यांचं तत्त्वज्ञान. अर्थात ह्या डोळसपणाचा भाग नसतो. ही आंधळी भक्ती असते, किंवा त्यात कुठलं तरी अमिष असू शकतं, जसे की श्रीमंत मित्रासोबत राहिल्याने होणारी चंगळ इत्यादी.

जो जीता वही सिकंदर हा चित्रपट पाहा. त्यात नायकाचा चार जणांचा एक समूह असतो तसाच खलनायकाचाही चार जणांचाच समूह असतो. पण नायकाचे मित्र एका मर्यादेपर्यंतच त्याच्यासाठी काही करतात. खलनायकाचे मित्र त्याच्यासाठी कुठल्याही थराला जाऊ शकतात. शेवटची सायकल शर्यत पाहा. खलनायकाचे मित्र त्याला शर्यतीत जि़ंकविण्याकरिता इतर स्पर्धकांना अडथळा करणे, मारहाण करणे असे उद्योग करतात. नायकाचे मित्र मात्र असे काही करत नाहीत.

वाईट लोक आपल्या मित्रांकरिता चोरी, मारहाण, खून अशी गुन्हेगारी स्वरूपाची कृत्येदेखील करतात. चांगले लोक (पांढर पेशे / व्हाईट कॉलर) मात्र मित्रांकरिता असे काही करत नाहीत, करू शकत नाहीत. सोनी टीवीवरील क्राईम पेट्रोल, रोजच्या वर्तमानपत्रातील चोरी, खून, खंडणी, सामूहिक बलात्कार अशा बातम्या वाचल्या तरी याची प्रचिती येईलच.

प्रतिसादाबद्दल धन्यवाद चेतनजी

भलेमोठे शीर्षक बदलले कारण मी मनात आले की पटकन लिहितो आणि इथे प्रकाशित करून ऐनवेळी जे सुचेल ते शीर्षक देतो. यंदा मला दोनतीन शीर्षक एकाच वेळी सुचली म्हणून मी ती सर्व एकसाथ दिली आणि आता त्यातील हवे तेवढेच ठेवून उरलेली उडवली.

त्याखाली मी दिलेले सोशलसाईटवरचे अनुभव आपल्याला आले नसल्यास चांगलेच आहे, मात्र ते मी माझ्या गेल्या ८-९ वर्षांच्या म्हणजे २००६ सालपासूनच्या अनुभवांवरून लिहिलेय. आणि मायबोली हि देखील एक सोशलसाईट आहे एवढाच तिचा यात संबंध Happy

नायकाचा चार जणांचा कंपू आणि खलनायकांचा चार जणांचा कंपू हे जे आपण जो जिता वही सिकंदर मधील उदाहरण दिले आहे त्यात मला सांगा, नेमके एकाच कॉलेजातील चार मित्र चांगले आणि नेमके दुसर्‍या कॉलेजातील चार मित्र वाईट असे का घडते? कोणत्याही ग्रूपमध्ये चांगले वाईट मिक्स मित्र नसतात का?

<< अ‍ॅडमिननी साफसफाई करण्याआधी बघा >>

बघितलं. त्यावरून तर असं दिसतंय की कुणाच्या बाजूने लढायला त्याचे मित्र येण्याऐवजी तोच स्वतःचे ड्यूआयडी काढून लढतोय... निदान असा आरोप तरी इतरांकडून होतोय खरा.

सर, हे तर मी इथे सहज नजरेस पडले म्हणून लगेच लिंक दिली, इथे कदाचित आपण म्हणता तसे असेलही. पण मायबोलीवर मी तुलनेत नवीन असलो तरी या आधीही इतर सोशलसाईटवर मी कित्येक टोळीयुद्ध वा कंपूंचे युद्ध पाहिले आहेतच. त्यात आपण म्हणता तसे एखाद्या हिरोच्या कंपूत सारेच चांगले आणि एखाद्या व्हिल्लनच्या कंपूत सारेच वाईट असे तर नसते ना. बस्स आपला हा अमुकतमुक गट आहे मग त्या बाजूनेच वादात उतरले पाहिजे अशीच सर्वसाधारण धारणा असते.

<< एखाद्या हिरोच्या कंपूत सारेच चांगले आणि एखाद्या व्हिल्लनच्या कंपूत सारेच वाईट असे तर नसते ना. बस्स आपला हा अमुकतमुक गट आहे मग त्या बाजूनेच वादात उतरले पाहिजे अशीच सर्वसाधारण धारणा असते. >>

माझ्या मते चांगले लोक तत्त्वाकरिता लढतात, स्वतःला पटणार्‍या विचारांकरिता वादात उतरतात; कंपूगिरीकरिता नव्हे. तर वाईट लोकांना तत्त्व, विचार, सदसद्विवेकबुद्धी यांच्याशी काहीच घेणेदेणे नसते ते गटबाजी, कंपूगिरी (यातूनही त्यांना काहीतरी लाभ अपेक्षित असतोच) यामुळे वादात उतरतात.

संमिश्र गट असू शकतातही; पण आधी सांगितल्याप्रमाणेच गटातील व्यक्तिंचे मग उद्देश देखील वेगवेगळे असू शकतात.

कोकणस्थ,
मला पण समजवा त्यातील विनोद,
आधीच मी दहावीला अर्धेच संस्कृत घेतलेले त्यामुळे अर्धेच संस्कृत समजते.

मला वरचे प्रतिसाद विनोदी वाटले. काही प्रमाणात लेखही. का ते विचारू नका.

बाकी त्या "शत्रुबुद्धी विनाशाय" याचा अर्थ की शत्रूचा नाश नको. त्याच्या मनातल्या वाईट बुद्धीचा (शत्रूबुद्धी)चा नाश व्हावा. म्हणजेच व्यक्ती नाश नको पावायला. तिच्यातला वाईटपणा नाश पावावा.

डू आयडीबद्दलही असंच काहीसं आहे ना..
काही आपला डूआयडी उघडपणे सांगतात. काहीजण आपल्या पोस्टना आपल्याच डूआयडीद्वारे समर्थन करतात.

काहीजण अगदी उलट. एक आयडी अगदी सिरीयस, गंभीर लेखन, स्पर्धांमध्ये भाग घेऊन बक्षिस मिळवणारा असा ठेवतात. तर दुसरे एक-दोन आयडी केवळ टीपी, दुसर्‍याला बोअर करणं आणि मनाला येईल ते पोस्ट करत राहणं यासाठी वापरतात. आणि लोकांना 'तोमीनव्हेच' सांगतात. या आयडीने कधी त्या आयडीची पोस्ट वाचली आहे, कमेन्ट केली आहे असं दिसत नाही.

मायबोलीची क्वालीटी घसरत चाललीये का? किती बोर, भारंभार धागे आणि स्वतःच प्रत्येक प्रतिसादावर २-३ रीप्लाय द्यायचे म्हणजे काय ते हास्यास्पद रिकामपणाचे उद्योग...
अहो जरा दुसर्या ब्लॉग्स वर पण जाऊन बघा, ईथल्यांना जरा आराम द्या की राव Angry

मायबोलीची क्वालीटी घसरत चाललीये का? किती बोर, भारंभार धागे आणि स्वतःच प्रत्येक प्रतिसादावर २-३ रीप्लाय द्यायचे म्हणजे काय ते हास्यास्पद रिकामपणाचे उद्योग...>>>
ती तर कधिच घसरलिये, चांगले कथा लेखक होते ते आता येत नाहित, जे अजुनही आहेत ते कथा सोडुन बाकी सगळं काही लिहित असतात Light 1
मायबोली आता wwf मैदान झालय, अगदी फ्री ष्टाइल कंपु युद्ध सुरु असतय... घ्या मजा..

यापुढे जाउन
मित्राच्या शत्रुचा मित्र आणि
शत्रुच्या मित्राचा शत्रु

मित्राच्या शत्रुच्या मित्राचा शत्रुचा मित्र
शत्रुच्या मित्राचा शत्रुच्या मित्राचा शत्रु

अश्या सिरीज निर्माण केल्या तर काही टप्यात सर्व जग शत्रु आणि मित्र याच्यात विभागता येइल.
बरेच जण श्त्रु आणि मित्र दोन्ही असतील.
ऋन्मेऽऽष यावर नक्की अधिक संशोधनाची तुझ्याकडुन अपेक्षा आहे.

निलिमा Proud
हेच जर आपण बंधुत्वाबाबत केले तर शेवटी आपण सारे अ‍ॅडम आणि इव्ह किंवा मनूचे वंशज आहोत म्हणून भाऊभाऊच निघू, म्हणून मित्राचा शत्रू आणि शत्रूचा मित्र पर्यंतच थांबूया.

रिया,
आपण कोणाला प्लस वन देऊन हा धागा परत वर आणू नका प्लीज. नाहीतर लोकांना वाटेल पडद्याआड आपलीच युती आहे. Proud

Pages