पिकलपोनी..

Submitted by रमा. on 9 September, 2014 - 07:33

एक होती पिकलपोनी..गोबरे गाल, नकटं नाक, अतिशय हट्टी.. नाकावर राग. आई-बापूची एकदम लाडकी. एकदा तिने बापूजवळ धरला हट्ट, "मला बाहेर घेऊन जा, जा म्हणजे जा.. आत्ताच्या आत्ता.. "
बापू पण लग्गेच तय्यार. म्हणाला, "चल, पटकन तयार हो, निघूया.. "

आई म्हणाली, "अहो, आता अंधारून आलय, आता कशाला जाताय ?.. अगं पिकलपोनी उशीर झालाय आता, आता उद्या जा हा" .

आई असं म्हंटल्यावर बापू जरा डळमळला, "हो, हो, उद्या जायचं का मग आपण?"

पिकलपोनीने गाल फुगवले, डोळे मोठ्ठे केले, ओठांचा चंबू केला (नेहमीप्रमाणे) एक हात कमरेवर आणि एक पाय तालावर आपटत आपलं पेटंट गाणं सुरु केलं..
"जा बाबा बापू, असच कर तू.. सगळे असच करतात.. माझे कुणीच लाड नाही करत. जा बाबा. . "

शेवटी आई म्हणाली "जा बाई, जा. . पण लग्गेच परत यायचं. . पाण्याची बाटली घेउन जा बरोबर, खबरदार बाहेरचं काही खाल्लं तर. . गप घरी वरण-भात खायचा. आणि अगडबंबूला पण न्या सोबत." पिकलपोनीने शहाण्या ताईसारखं अगडबंबू ला तयार केलं, आणि बापू, पिकलपोनी आणि अगडबंबू यांची स्वारी निघाली फिरायला. .

फिर-फिर फिरले. . आणि मग तिघांनाही लागली भूक (नेहमीप्रमाणे). . ते गेले राजभाऊ कडे, भेळबीळ खाल्ली, मग सुरेख लस्सी वाल्याकडे शिरून ३ ग्लास लस्सी रिचवली. तिथून निघतात तोच त्यांना दिसला एक फुगेवाला. .
"लेलो, लेलो, गुब्बारे. . रंगीन, हसीन गुब्बारे. . हरे, निले. पिले, लाल, लेलो लेलो गुब्बारे". . .

पिकलपोनीने हळूच अगडबंबू कडे बघितलं. त्यानेपण मानेने हळूच होकार दिला. दोघांनी एकदम पुकारा केला. .
"बापू द ग्रेट, आपण घेऊया ना हो प्लीज गुब्बारे. . "

बापू म्हणाला, "ए आता आई ओरडेल हा. . भेळ काय, लस्सी काय. . आता काय तर म्हणे फुगे. . पिकलपोनी, तू तर ताई आहेस ना? हा काय वेडेपणा, बास झाला आता "

पिकलपोनी आणि अगडबंबू वस्ताद बहीणभाऊ. . दोघांनी केविलवाणे चेहरे केले (नेहमीप्रमाणे). बापूला अगदी पाहवेना. त्याने दोघांना दोन फुगे घेउन दिले. "चला आता लवकर, नाहीतर आईचा फुगा फुटेल."
तिघे हसत हसत घरी जायला निघाले.

अचानक पिकलपोनीचा फुगा सुटला आणि ती बापूचा हात सोडून लागली की पळायला. . बापू ओरडतोय, "थांब, थांब" .. अगडबंबू ओरडतोय, "थांब, थांब". . पण ही शहाणी कुठली ऐकतेय. .

शेवटी फुगाही हरवला आणि पिकलपोनीपण . आता लागली रडायला.. भ्याSSS करून. रडता रडता एका बाकावर बसून झोपून गेली. तिथं आली काही मुलं, म्हणाली,

"हरवलीस का? बरं झालं. .
चल, ये आमच्या देशात.
वेडी-वाकडी आमची चाल,
गाण्यांना नाही आमच्या ताल..
अभ्यास आम्हाला चालत नाही,
मोठ्यांचं आम्ही ऐकत नाही .
पण आमच्या देशात असते मजा,
न कुठले बंधन, न कुठली सजा" ..

पिकलपोनी गेली हरखून. तिला वाटलं जावं यांच्या देशात. ती गेली त्यांच्यासोबत नाचत त्यांच्या देशात. तिथे खरच मजा होती. ओरडायला कुणीच नव्हतं. नुसते खेळ. . नुसता खाऊ.

पण चारच दिवसात पिकालपोनी कंटाळली. तिला अगडबंबू आठवला. आई-बाबा आठवले. घर आठवलं. ती लागली रडायला. पण हे लोक कुठले तिला सोडायला तयार. . ती अगदी घायकुतीला आली. गयावया करायला लागली. "प्लीज, प्लीज सोडा हो मला, माझी वाट बघत असतील घरी सगळे. "

शेवटी आला एक म्हातारा, "हे बघ पिकलपोनी , हा मंत्र घे, तुला हवं ते मिळेल, पण तसं वागायला पण लागेल."
ती म्हणाली हो, हो, तुम्ही सांगता तस्सच करेन मी.
तीने डोळे मिटले आणि म्हणायला लागली ,

जंतर-मंतर, जादू कलंदर,
सोडणार नाही बापूचा हात
करणार नाही कसलाच हट्ट
गप खाणार वरण-भात
मी आहे पिकलपोनी, भाऊ माझा अगडबंबु,
घरी पाठवा माझ्या मला, रडतोय माझा बापू जंबू

डोळे उघडून बघतेय तर काय? ती होती स्वता:च्या घरात. आपल्या खोलीत. आपल्या पलंगावर चक्क. बापू उठवत होता तिला,
"कित्ती वेळ झोपणार, चला, उठा बाब्या, जाउया न फिरायला? "
पिकलपोनीने आई-बापू आणि अगडबंबूला घट्ट मिठी मारली (नेहमीप्रमाणे) आणि म्हणाली.. "जाऊया. पण आता मी मुळीच हट्ट करणार नाहिये." सगळे हसले, आणि पुन्हा मिठीत शिरले.

आता तेव्हापासून पिकलपोनीने अगदी शहाण्यासारखं वागायचं ठरवलंय. बघू आता किती जमतंय. Lol

Group content visibility: 
Public - accessible to all site users

पिकलपोनीची .गोडमिट्ट गोष्ट....डोळ्यापुढे हाईडीची लोभस मूर्ती उभी राहिली . त्या कथेचा हिच्याशी काहीही सम्बन्ध नाहीतरी पण.....