चला, भाषासमृद्ध होऊया !!!

Submitted by दक्षिणा on 24 September, 2014 - 08:27

महाराष्ट्रात दर मैलागणिक मराठी भाषा बदलते असे म्हटले जाते. यात अतिशोयोक्ती नाही हे महाराष्ट्राच्या भटकंतीत लक्षात येतेच. मराठी भाषा आपल्या या अनेक सख्ख्या, चुलत, मावस, सावत्र बहिणींच्या प्रभावामुळे वेळोवेळी बदलत गेली आहे. हिंदी, इंग्रजीसह महाराष्ट्रातल्या अनेक बोलीभाषातील शब्द विनासायास मराठीच्या पंक्तीत मानाने जागा अडवून आहेत.

चला तर मग या शब्दांना जाणून घेऊ या आणि त्यांचे नेमके मराठी अर्थ शोधूया.

उदाहरणार्थ, पेन या शब्दाचा मराठी शब्द तुम्हाला माहीत असेलच, पण रिफिलला मराठीत काय म्हणतात ?
ताबडणे, खुंदलणे ही क्रियापदे किती जणांना माहीत आहेत ?

आपण सर्रास टेबल खुर्ची म्हणतो. पण टेबल चेअर म्हणत नाही. का बरे ?
विदर्भात तर हिंदीभाषिक मराठी की मराठी भाषिक हिंदी हा वेगळाच घोळ आहे.
अनवट, विमल, उन्मन, कैवल्य, अद्वैत असे शब्द कवितेत जागोजागी बागडत असतात. पण साध्या सरळ मराठी भाषेत यांचे अर्थ काय आहेत, हे प्रत्येकाला माहीत आहे का ? या शब्दांनी कविता उच्च होत असली तरी ती सर्वसामान्यांना कळत नसली तर काय उपयोग ?

इथे कुणाला कमी लेखायचा किंवा हिणवण्याचा विचार मनात नाही. फक्त मराठी बोलीभाषेत येणार्‍या शब्दांची नव्याने ओळख करून घेण्याचा एक प्रयत्न आहे.

असेही जे शब्द आपण इंग्रजी असूनही सर्रास वापरतो आणि त्यांचे मराठी अर्थ आपल्याला पटकन आठवतात का?

कोणताही मराठी शब्द जो नेहमी सहजपणे वापरला जात असेल पण शब्दकोषात सापडणार नाही असा.

चला तर मग करायची का सुरुवात ?

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

धेडगुजरी म्हणजे विचित्र सरमिसळ झालेली - सहसा भाषेसाठी वापरला जाणारा शब्द.
धगुरडी म्हणजे वयाने वाढलेली.

नारळ वाढवणे हा शब्दप्रयोग तितकासा योग्य नसावा.
कुंकू पुसणे, बांगडी फुटणे हे शब्द नक्कीच अशुभसूचक आहेत. विवाहितेचा नवरा मरणे हा त्याचा अर्थ. ह्या अशुभाचा उच्चारही नको म्हणून हे थेट अशुभ अर्थाचे शब्द टाळले जात.एव्हढेच नव्हे तर त्याच्या बरोबर उलट अर्थाचे म्हणजे वाढ होणे(वाढवणे), अधिक होणे असे शब्द मृत्यूशिवाय एरवीच्या प्रसंगी बांगडी फुटली किंवा कुंकू पुसटले तर वापरले जात. यातून त्या विवाहितेकडे कुंकू, बांगड्या यांची रेलचेल असो, असे म्हणावयाचे असे. पतिनिधनाच्या वेळी मात्र 'पूस ते कुंकू, फोड त्या बांगड्या' असेच दरडावले जात असे.
नारळ फोडण्याची बाब जरा वेगळी आहे. शुभ कार्याच्या सुरुवातीला नारळ फोडणे ही प्रथा म्हणजे पूर्वीच्या बळी देण्याच्या प्रथेचा अवशेष असावी. बळी देणे म्हणजे दैवी किंवा आसुरी शक्तींना काही तरी देऊन संतुष्ट राखणे ज्यायोगे त्यांची नजर किंवा मोहरा आपल्याकडे वळू नये आणि आपले कार्य, प्रवास निर्विघ्नपणे पार पडावा. आपले विघ्न किंवा नुकसान त्या बळीवर जावे. म्हणजे नारळ फोडणे हे फारसे शुभसूचक नाही. जारण मारणादि कृत्यात आजही नारळ, लिंबू, कोंबडी, बकरे वगैरे कापतानाचे मंत्र हे 'आम्ही हे तुला देतोय ते मान्य करून घे आणि आम्हाला सुरक्षित राख' अशा अर्थाचे असतात. एखाद्याला मृत्युयोग वगैरे असला तर त्या माणसाऐवजी दुसर्‍या कोणाला ठार मारून आपले आयुष्य सुरक्षित करण्याचीआदिम भावना आणि प्रथा होती. आता इथे नारळ अधिक वाढवावे लागले तर एका नारळाने विघ्ननाशन झाले नाही म्हणून आणखी बळी पाहिजेत असा अर्थ होईल. किंवा तितक्या अधिक माणसांची आयुष्ये धोक्यात आहेत असाही होईल. म्हणून नारळ फोडणे हेच बरोबर वाटते. १९५०-६० सालापर्यंत लिखित साहित्यामध्ये (आणि मौखिकही) फोडणे हाच शब्द प्रचलित होता. हळूहळू या शब्दाचे उगीचच 'पावित्र्यीकरण' होत गेले आणि 'श्रीफल वाढवणे' हा शब्दप्रयोग अस्तित्वात आला.
पु.लं.च्या लेखनात हा शब्दप्रयोग बरेच वेळा आला आहे. आजही 'प्रचाराचा नारळ फुटला' असेच म्हणतात.
स्वयंपाकासाठी 'नारळ फोडणे' हेच नैसर्गिक आहे.

बंब:
पूर्वी जेव्हा फायर-एन्जीन्स प्राथमिक अवस्थेत होती तेव्हा आग विझवण्याच्या गाडीवर पाण्याची एक मोठी टाकी उभारलेली असे. तिचा आकार आपल्या पाणी तापवायच्या बंबासारखा पण मोठा असे. नंतर जेव्हा ही पाणी तापवायची तांब्याची नळकांडी प्रचारात आली तेव्हा आकारसाम्यामुळे तिला 'बंब' म्हणू लागले असावेत.
जाता जाता : या गाडीवर एक मोठी घंटा असे. ती मोठ्याने वाजवून लोकांना आणीबाणीची जाणीव करून देत आणि आपली वाट मिळवत हा बंब रस्त्यावरून जात असे.

छानच धागा आणि चर्चाही. बरीच मनोरंजक माहिती कळत आहे.

कवितेबद्दलच्या वाक्यांचे प्रयोजन कळले नाही आणि धाग्याच्या उद्दीष्टाशी विसंगतही वाटले थोडे. तसे ते शब्द कवितेत 'जागोजागी' बागडणारेही नव्हेत! बरेचसे मूळ अध्यात्मिक संदर्भ असलेले आहेत.

सहज आठवणारी भाषावैचित्र्ये

कोकणात शेवग्याच्या शेंगाना "डांबे" म्हणतात
सांडग्यांना "फेण्या" (चिपळूणची आत्या वापरते हे शब्द)
आत्याला आत्ते म्हणतात ते पण ऐकायला आवडते.

लहानपणी खट्याळपणा केला की मोठी माणसे 'येडबम्बू' म्हणायची, छान वाटायचं. एक काका "व्यंक्याच" आहेस म्हणायचे ते मात्र आवडायचं नाही.

बर आता जरा मला खालिल शब्दांचे मराठी अर्थ सांगा.

रबर
बटण
हँगर
बॉक्स
स्टँड
मग -
शार्पनर
टाईल्स
आईस्क्रिम
गॅस स्टोव्ह
स्विच
बल्ब
ट्युबलाईट
वायर
कप
मिक्सर
ज्युसर
ओव्हन
फ्रिज
होम थिएटर

गवारीला बावचा म्हणतात बरेच जण कोकणात<<< गवारी सदृष 'चिटक्या' ही मिळतात कोकणात... रंग थोडा वेगळा आणि त्यावर बारीक लवेसारखे धागे असतात...

दक्षिणा.. तुझ्या यादीत बहुतेक शब्द हे इंग्रजांकडून आलेले आहेत त्यामुळे त्याला मराठी शब्द मिळणे कठिण.

बटण - गुंडी (पूर्वी सुताच्या गुंड्या असायच्या बटणाच्या जागी.. त्यामुळे 'काज' मराठीत आहे पण बटण नाही).
बॉक्स = खोका.
स्विच = गुंडी (बटण या अर्थाने).
वायर = तार
कप = प्याला

इन्ना आणि अन्जू....इकडे कोल्हापूरात सापाला "लांबडं" असही संबोधिले जाते.....म्हणजे एखादी आक्काताई शेजारच्या बायाक्काबाईला डोळे मोठे करून सांगते, "काय सांगू बायाक्का...कसलं लांबडं गेलं सळ्ळंकन शेजारून....आंगाचं पाणी पाणी झाल बगा..."

शार्पनर = टोकयंत्र (आम्ही सर्रास हा शब्द वापरायचो)

ट्यूबला काही ठिकाणी विजेची नळी म्हणल्याचे वाचले आहे (उदा: बटाट्याची चाळ)
टॉर्च ला विजेरी म्हणतात. (हाही बर्‍यापैकी प्रचलित होता शब्द)
फ्रीज ला शीतकपाट
पु.भा.भावे कार ला स्वयंप्रेरिका म्हणायचे.

बाकी प्रत्येक आधुनिक यंत्राला मराठी प्रतिशब्द असेलच किंवा असलाच पाहिजे असं अजिबात नाहीये, नाही का?

टाईल्सला लाद्या /फरश्या.
ओव्हन ला भट्टी
गॅस किंवा कुठल्याही स्टोव्हला शेगडी. मी तर सरळ चूलच म्हणते.
कप ला प्याला हा हिंदी/फारशी शब्दं तर चषक हा संस्कृत शब्द मराठीत रुढ आहे.
स्विचला सर्रास खटका म्हणतात.
बाकी ज्या कन्सेप्टच आपल्याकडे इंग्रजीतून प्रथम आल्या उदा रेफ्रिजरेटर, कार इ. त्याना काय आपण देवू/रूढ करू ती नावे.

अमेय हो आम्हीपण आत्या न म्हणता आत्तेच म्हणतो, आमच्या आत्यांना आत्या म्हटलेलं आवडतं नाही त्यांनी लहानपणापासून आम्हाला शिकवून ठेवलं 'आत्ते' म्हणा असं.

साती सेम पिंच आम्ही पण गिरमिट

शक्यतो असे शब्द जे आपण फक्त इंग्रजीच वापरतो आणि त्यांचे मराठी अर्थ विचारले तर पटकन आठवणार नाहीत.

दिनेश चा पावाचा बीबी वाचताना अचानक आठवलं.

कोल्हापूरला ब्रेडच्या स्लाईसला 'फाक' म्हणतात.
किंवा पेरू कापला तर त्याच्या एका फोडीला सुद्धा 'फाक' म्हणतात.

धेड्गुजरी... हा मी वाचल्याप्रमाणे अधेड्गुजरी पासून आलाय. महाराष्ट्र आणि गुजराथच्या सीमेवरच्या बायका
कमरेच्या खाली आपल्याप्रमाने नऊवारी नेसतात पण पदर मात्र गुजराथी पद्धतीने घेतात. त्यांना उद्देशून हा शब्द वापरतात.

कोल्हापूरातल्या गुजरीचा मात्र संदर्भ वेगळाच...

गुजरीत बसून, सोन्याचा साज तूम्ही घडवा
चला उठा दाजिबा, कोल्हापूरला चला ...

रोंबाट.. हा एक रस्सेदार पदार्थ आहे. माझ्या माहीतीप्रमाणे त्या रस्स्यात बाजरी भाजून वाटून घालतात. तसेच खदाकन पण . ( कदाचित तो कदान्नचा अपभ्रंश असावा. ) त्यात शिळ्या भाकरीचे तूकडे, भात वगैरे मटणाच्या रस्स्यात एकत्र शिजवतात.

भाताची पेज, देशावर नाही.. त्यामूळे त्यातून आलेले "पेजेला महाग झाला", किंवा " पेजेला देणार तो शेजेला घेणार" असले वाक्प्रचार नाहीत देशावर. "भाविण नाचते म्हणून न्हावीण नाचते.". हे पण नाहीच.
तसेच "खंडोबाला मिळंना बायको आणि म्हाळसाईला मिळंना नवरा.". हे संदर्भ पण कोकणातल्या लोकांना कळत नाहीत.

रोंबाट.. = गोंधळ (मालवणीत म्हणतात.. एकाद्याला 'रोम्बटी' = गोंधळेकर म्हटले जाते. )
होळीच्या दिवसात वेगवेगळी मंडळे 'रोंबाट' घेऊन दारात येतात..

बॉक्स -डबा
शेल्फ /स्टॅन्ड -घडवंची मांडणी
फ्रीज शीतकपा ट
ओव्हन - तंदूर ?
गॅस स्टोव्ह - शेगडी
फोन दुरभाष
मोबाइल भ्रमण्ध्वनी

आम्ही शार्पनरला गिरमीट म्हणायचो.>>>>>>>>> येस्स्स्स...........आम्हीसुद्धा. पण गिरमिट हा शब्द कधी जाऊन मुलांबरोबर शार्पनर हा शब्द तोंडात कधी बसला कळलं नाही. आणि आत्ता सातीचा प्रतिसाद वाचेपर्यंत वाटत होतं...आठवतय आपण गिरमिट म्हणायचो ते....पण खात्री नव्हती.

आम्हीही शार्पनरला गिरमिट म्हणायचो.

आणि हे आठवलं : लाकूड ड्रिल करायला सुताराकडे लोखंडी सळीला स्पायरल धार असलेले आडव्या लाकडी मुठीचे एक हत्यार असायचे त्याला किकरे म्हणतात. (सळीला काटकोनात मूठ असते.). आणि दुसरे एक लाकूड तासायला वापरतात ते वाकस. Happy

लाकूड ड्रिल करायला सुताराकडे लोखंडी सळीला स्पायरल धार असलेले आडव्या लाकडी मुठीचे एक हत्यार असायचे त्याला किकरे म्हणतात. >>> ह्यालाच मी गिरमिट शब्द ऐकलाय.

आम्हीही शार्पनरला गिरमिट म्हणायचो >> कोणि सारखं नाकात बोट घालत असेल (आणि फिरवत असेल) तर त्याला पण आम्ही गिरमिट म्हणतो Wink

वटकन लावणे - ताटात एखादा पातळ पदार्थ असेल तर तो इकडे तिकडे जावू नये म्हणून ताट तिरके राहण्यासाठी एखादा Support लावणे

Pages