आता कशाला शिजायची बात - मनीमोहोर - सेलर बोट्स ( Sailor Boats) - शिडाच्या होड्या

Submitted by मनीमोहोर on 6 September, 2014 - 05:33
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
२० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

ही स्पर्धा जाहीर झाल्यापासूनच काहीतरी डोकोरेटिव तरी ही सोपे असे सॅलड सादर करावे असे खूप मनात होते.
नकळतच त्या दृष्टीने विचार सुरु होते. त्यातून तयार झालेल्या ह्या शिडाच्या होड्या.

साहित्य:
काकड्या - जेवढ्या बोटी करायच्या असतील तेवढ्या . ( काकड्या लहान पण जरा जाड आणि सारख्या आकाराच्या घ्याव्यात. ) , मूळा शिड बनवण्यासाठी.

स्टफ करण्यासाठी
पनीर, काकडी, लाल पिवळी ढोबळी मिरची, कोवळा पातीचा कांदा ( पांढरा आणि हिरवा भाग दोन्ही ) सर्व पाव पाव वाटी बारीक चिरुन
थोड्या चारोळ्या किंवा अक्रोड बारीक करुन

सिझनिंग साठी : ऑलिव्ह ऑईल, मिरपूड, मीठ, ड्राय मिक्स हर्ब्ज, बारीक चिरलेली हिरवी मिरची आवडीनुसार, थोडा लिंबू रस, चवीपुरती साखर किंवा मध
टूथ पिक

क्रमवार पाककृती: 

प्रथम काकडी धूवून घ्यावी. सालं काढू नयेत. काकडीची लांबीमध्ये एक स्लाईस काढावी. आता काकडीचा आतला भाग दिसायला लागेल. नंतर काकडीतल्या बिया काढून घेऊन काकडी आतून मोकळी करावी ( कार्व करुन घ्यावी) गरज असेल तर खालच्या बाजूने तासून बेस व्यवस्थित करुन घ्यावा. मुळ्याचा एक पातळ काप काढून प्रकाश चित्रात दाखवल्याप्रमाणे त्यास शिडाचा आकार द्यावा आणि टुथ पिक च्या सहाय्याने ते शिड काकडीवर टोचावे. आपली काकडीची शिडाची होडी तयार आहे.

नंतर काकड्याना आतून बाहेरून सिझनिंगचा हात लावावा म्हणजे काकडी सुद्धा जरा चवदार होईल. आता स्टफिंगच्या साहित्यात सिझनिंग मिसळावे आणि हलक्या हाताने मिक्स करावे ( टॉस करावे )

आता हे स्टफिंग काकड्यात भरावे. आजूबाजूने सजावट करावी . मी बोटी आहेत म्हणून मासे बनवले आहेत. आपल्याला आवडेल तशी सजावट करावी. सजावट न करता नुसत्या होड्या ठेवल्या तरी छान दिसते .

काकडीच्या होड्या आपल्या पोटात बुडण्यासाठी तयार आहेत. (स्मित)

From mayboli

वाढणी/प्रमाण: 
काय सांगू ? पण प्रत्येकी एकेक लागेल.
अधिक टिपा: 

१) मी आधी टोमॅटो मध्ये स्टफ केले होते. पण त्यात सॅलड दिसतच नव्हते. म्हणून ते दिसण्यासाठी काय करता येईल याचा विचार करता काकड्या चांगल्या दिसतील असे वाटले आणि त्याचा आकार होड्यांसारखा दिसत असल्याने वर शिड लावले आणि म्हणून सेलर बोट्स असे नाव दिले.
२) स्टफिंग आयत्या वेळीच मिक्स करावे आणि भरावे. मीठामुळे पाणी सुटते. होड्या तुम्ही करुन ठेऊ शकता. शिड न लावता सुद्धा छान दिसतात.
३) स्टफिंग तुम्ही काहीही आवडीप्रमाणे किंवा घरात असेल त्या प्रमाणे करु शकता. फक्त ते कलरफुल , थोडेसे क्रीमी आणि थोडेसे दाणेदार (नटी टेस्ट) हवे. चीज किसून, मक्याचे दाणे वाफवून, डाळिंबाचे दाणे, भाजलेले शेंगदाणे , चेरी टोमॅटो अगदी वर सजावटी साठी, कोथिंबीर, गाजराचा कीस, टोमॅटो बिया न घेता बारीक चिरुन अस काहीही करु शकता. तुम्ही जर कृत्रिम रंग वापरत असाल तर खोबरा कीस निळा करुन तो प्लेट वर शिवरुन पाण्याचा आभास निर्माण करु शकता. मग मासे नाही केले तरी चालतील. होडीचा नावीन्यपूर्ण आकार हीच मुख्य बाब आहे ह्या रेसिपीत.
४) ह्या होड्यांकडे लहान मुले नक्कीच आकर्षित होतील आणि त्यांना त्या नक्कीच आवडतील.
५) एखाद्या पार्टी साठी तुम्ही इतर सर्व जिन्नस बाहेरून ऑर्डर केले आणि ह्या होड्या तेवढ्याच घरी बनवल्या तरी पाहुण्यांच्या नजरेत तुम्ही नक्की सुगरण लेवल तीन वर जाल. ( स्मित)
६) ह्या करायला अगदी सोप्या आहेत.
७) संयोजक, प्लीज ही रेसिपी स्पर्धेसाठी ग्राह्य धरावी त्यात मासे असले तरी ही ( स्मित)

पाककृती प्रकार: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान!

माझ्या होड्या बडवुन न टाकता विजेत्या पाकृ मध्ये तरंगत ठेवल्या बद्दल ज्यांनी ज्यांनी मला मते दिली त्या सर्वांचे मनापासून आभार.

ही स्पर्धा जाहीर झाल्यापासून काय पाकृ करता येईल ह्यावर विचार करणे, प्रत्यक्ष कृती करणे, फोटो काढणे, पाकृ माबोवर टाकणे, मिळालेले प्रतिसाद वाचणे आणि निकालाची वाट बघणे यात माझा वेळ अतिशय चांगला गेला. मी एवढी स्वयंपाकात निपुण नसताना ही ह्या स्पर्धेच्या निमित्ताने विचारांना चांगली चालना मिळाली ह्या बद्दल संयोजकांचे खूप खूप आभार.

पारितोषिक पत्राचं डिझायनिंग अतिशय सुंदर झाले आहे, ज्यांनी केले आहे त्यांचे मनापासून कौतुक.
ह्या स्पर्धेच्या निमित्ताने नवीन नवीन पा़कृ समजल्या. त्याबद्दल संयोजकांचे आभार....

Pages