इंडोनेशियातले तरुमनगर साम्राज्य:

Submitted by उडन खटोला on 26 July, 2014 - 09:06

इंडोनेशियातले तरुमनगर साम्राज्य:
अंदाजे कालखंड इ.स. ३५८ ते इ.स. ६६९.या साम्राज्याच्या उपलब्ध इतिहासाप्रमाणे हे साम्राज्य “ महर्षी राजाधिराज गुरु जयसिंगवर्मन” या ब्राम्हणाने इ.स.३५८ या वर्षी स्थापन केले .हा जयसिंगवर्मन राजा आंध्रप्रदेशातल्या पश्चीम गोदावरी जवळील भारताच्या पूर्व किनार्‍यावर वेंगी राज्य ज्याचे राजघराणे ब्राम्हण " सालंकायन " नावाचे होते या घराण्याचा वंशज होता. [हे राज्य आंध्रप्रदेशात इ.स.२८० ते इ.स. ४०० मध्ये होते.]

आता कुठे आंध्रप्रदेश ,कुठे इंडोनेशिया की हे आपले भारतीय ब्राम्हण इतरांना घेउन, लढाऊ जहाजे घेउन तिथे पोचले आणि राज्य निर्माण केले. हा काळ होता की युरोपीयन लोक त्यांच्या नौका घाबरत घाबरत किनार्‍याकिनार्‍याने चालवत कारण त्यांना तार्‍याच्या आणि चुंबकाच्या साहाय्याने अक्षांश/रेखांश ठरवता येत नव्हते.
वेदात अणूविज्ञान होते असे बिनबुडाचे सिध्दांत मांडण्यापेक्षा हे जे ज्ञान आपल्या समाजात उघडपणाने आणि त्याकाळाच्या फ़ार पुढे होते ते का हरवले त्याचा आपण सगळेच विचार करु यात.
हे राज्य कुठे होते त्यासाठी मी खाली नकाशाची लिंक देतो आहे.

http://www.facebook.com/l/hAQCyZLUhAQBpV0N1z_zkUyq6iGd-BlvsMLMI2fipY3xlI...

या जयंसिंगवर्मनचा मृत्यु इ.स. ३९२ मध्ये झाला आणि ह्या घराण्यात पुरण्याची पध्द्त रुढ असल्याने त्याची कबर त्याकाळच्या इंडोनेशिया मधल्या “काली गोमती” नावाच्या नदीच्या काठाला आहे.याचा मुलगा धर्मवर्मन ज्याने इ.स.३८२ ते इ.स.३९५ यावर्षात राज्य केले त्याची कबर तिथल्या “काली चंद्रभागा” नदीच्या काठी होती.

याचा मुलगा पुर्णवर्मनाने इ.स.३९५-४३४ इतका दिर्घ काळ राज्य केले.याच्याकाळात हे राज्य वैभवाच्या शिखराला पोचले.या पुर्णवर्मनाच्या काळातले ७ शिलालेख मिळाले आहेत जे आंध्रच्या वेंगी लिपीत आणि सस्कृंत भाषेत आहेत. त्यापैकी एका शिलालेखाचे भाषांतर देण्याचा मोह आवरत नाही म्हणून देतो.

" पुर्वीच्या काळी राजाधिराज पुर्णवर्मनाने जो बाकी सर्व राजांपेक्षा जास्त गुणवान आहे आणि प्रजेला जास्त सुखी ठेवतो ,त्याने आपल्या राज्याच्या २० व्या वर्षी आपल्या राज्यातल्या चंद्र्भागा नदीपासुन खोद्काम करुन समुद्रापर्यंत कालवा काढण्याची आज्ञा दिली.हे खोदकाम हे फाल्गुन महीन्याच्या कृष्ण अष्टमीला सुरु झाले आणि चैत्र महीन्याच्या शुक्ल त्रयोदशीला म्हणजेच २१ दिवसाने संपले.
हा नवा गोड पाण्याचा कालवा ७ मैल लांबीचा असुन ही जी नवीन नदी तयार झाली आहे तिला राजाने नदी गोमती असे नाव दिले.ही नदी राजाच्या ब्राह्मण पुजार्‍यांच्या घराजवळून वाहते .हे ब्राह्मण राजाच्या घराण्याला आपले पूर्वज म्हणून पुजतात.”

या सात स्तुतीपर शिलालेखांना इंडोनेशियन भाषेत "प्रसस्ती चियारुतेन " असे अजुन म्हणतात ,हा मुळ शब्द "प्रशस्ती चित्रे" असावा.

ऎरावत ,इंद्र,वरुण इ.देवतांची नावे आढळतात .पण हे राज्य मुख्यतः विष्णुची उपासना करत असे.

या साम्राज्याच्या सम्राटांची नावे खालीलप्रमाणे होती
Jayasingawarman (358-382) |
Dharmayawarman (382-395) |
Purnawarman (395-434) |
Vishnuwarman (434-455) |
Indrawarman (455-515) |
Chandrawarman (515-535) |
Suryawarman (535-561) |
Kartawarman (561-628) |
Sudhawarman (628-639) |
Harivanshawarman (639-640) |
Nagajayawarman (640-666) |
Lingawarman (666-669)
इ.स. ४१३ मध्ये फ़क्सीयान नावाचा चिनी प्रवासी भारतप्रवास करुन परत जातांना समुद्रमार्गाने जावाला जाउन मग चीनला गेला.म्हणजे तोपर्यंततरी आपला या प्रदेशाशी संपर्क आणि दळणवळण होते. या फ़क्सीयानने तरुमनगर राज्याचा उल्लेख केला आहे आणि जावा बेटाचे त्याकाळचे नाव यवद्वीप म्हणजेच जोंधळा अथवा मका पिकवणारे बेट होते हेही नमुद केले आहे. यवद्वीप हे नाव रामायणातही आढळते.यवद्वीपाचा अपभ्रंश जावा असा झाला . तसेच सदेंग जंबु या नावाच्या गावी पल्लव लिपीमध्ये संस्कृत शिलालेख सापडले आहेत.

यातल्या लिंगवर्मन [इ.स. ६२८ ते ६५०] या राजाच्या शोभाकंचना या एकुलत्या एक मुलीने शेजारच्या श्रीविजय साम्राज्याचा संस्थापक श्रीजयन्यास राजाशी लग्न केले. तरीही खूद्द जावयाने हल्ला करुन
इ.स. ६६९ मध्ये शेजारच्या श्रीविजय या हिंदु साम्राज्याने तरुमनगरचा पराभव केला त्यानतंर ह्या राज्याचे दोन तुकडे झाले.त्यातील एक तुकडा सुंद हे राज्य १२ व्या शतकापर्यंत अस्तित्वात होता.
ह्या राज्याचा,त्याच्या इतीहासाचा,त्यांच्या शिलालेखाचा अभ्यास,त्यांच्या चालरीतीचा,त्यांच्या भाषेचा अभ्यास हा नेहमीप्रमाणे पाश्चात्य संशोधकानी केला. आपल्या समाजाला त्या पाश्चात्यांची ही निष्ठा, कर्तव्यासाठी परभाषा शिकुन त्या परमुलखात राहुन आयुष्य वाहून घेणे,प्रत्येक मजकूर तपासणे हे समजत नाही आणि समजून घेण्याची इच्छाही नसते.

नौकानयनात आपण हजार वर्षे पुढे असलेले लोक नौकादल असते हेच शिवरायांच्या जन्मापर्यंत विसरुन गेलो. अंधकाराच्या आणि मूर्खपणाच्या गर्तेत पडलेले युरोपीयन लोकांनी ज्या क्षणाला विज्ञानाची उपासना सुरु केली तेव्हा नुसते नौकानयन नाही तर अणुशक्तीवर चालणार्‍या विमानवाहु नौका ज्यावर १२०/१५० विमाने असतात अशी जहाजे बनवण्यापर्यंत पोचले,मग अमेरिका ,रशिया,चीन इ. राष्ट्रे जर महासत्ता बनल्या तर नवल काय.
रहाता राहीली आपली गोष्ट ,आपल्या विमानवाहु नौकेपेक्षा गणपती दुध पितो या अफ़वेने शिकलेल्या सवरलेल्या लोकांना इतक्या आनंदाच्या उकळ्या फुटतात की कसले शास्त्र आणि कसले काय.

इतीहासाचा आदर म्हणजे आजही जकार्तामधली सगळ्यात मोठ्या विद्यापिठाचे नाव " Tarumanagar university”आहे. त्या विद्यापिठाची लिंक आहे

http://www.facebook.com/l/kAQDyrcz6AQANm4DjnYgB036kyPc7fDUq1kiwnBrRSRIHo...

सन्ग्राहित -मूळ लेख व संशोधन -अजित पिम्पळखरे ,दुबई

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users