निर्मल - मलाही कोतबो: भागीरथी गोखले

Submitted by निर्मल on 5 September, 2014 - 12:34

केव्हापासून बोलायचय मला. तसं बोलत असतेच म्हणा मी नेहमी आणि सगळे चुपचाप ऐकत सुद्धा असतात. पण हे बोलणं त्यांच्याजवळ नाही बोलता येत. त्यांच्याजवळ म्हणजे आमच्या कुटुंबातले हो. एवढं मोठं कुटुंब आहे आमचं. दोन मुलगे, एक मुलगी, तीन सुना, एक सुनेची बहिण, एक नातू, एक नातसून आणि आमचा गृहउद्योगाचा पसारा.

मीच काढला आमचा गृहउद्योग. आमचे हे गेल्यावर चार लहान मुलांना सांभाळत हा गृहउद्योग एवढा वाढवला, एवढा वाढवला, एवढा वाढवला की बक्कळ मालमत्ता जमा केली. आमचा राहता बंगला, झालंच तर आणखी ५-६ घरं, फार्महाऊस, ४-५ गाड्या. इतके कष्ट पडले मला एकहाती सगळं करताना, पण तरी कशी तब्येत राखून आहे मी. वाटते का तुम्हाला पंचाहत्तरी पार केली आहे असं? तशी मी सुगरण आणि खाण्यापिण्यात, वागण्यात नियमित, म्हणून जमलं हो सगळं. नाहीतर माझी मुलबाळं. काय दिवे लावलेत एकेकाने बघताय ना.

मोठा रमाकांत, निघूनच गेला घरातून. तसाही आधी नव्हताच तो गृहउद्योगात. मधला उमाकांत आणि त्याचा मुलगा अमृत बिचारे अपघातात गेले. लक्ष्मीकांतला व्यसन लागलं आणि मीच त्याला घराबाहेर काढलं. मग काय, घरात मी, हे सगळं महिलामंडळ आणि आमचा श्रीबाळ.

माझ्या सुना, मुलगी आणि अत्यानंदी सरू ह्यांना मी माझ्या गृहउद्योगात घेतलं असतं तर कठीणच होतं सगळं. म्हणून त्यांना गृहातच बसवलं. एक फायदा झाला त्यामुळे, घरात कोणी कामवाली ठेवायला लागली नाही. गृहउद्योगात मला खंबीर साथ दिली ती आमच्या शिवदे बाईंनी. त्यांची फार निष्ठा हो माझ्यावर. अगदी उद्योगाची सगळी सूत्र आमच्या श्रीबाळाकडे गेल्यावर पण त्यांनी माझी साथ इमाने इतबारे निभावली. आता मात्र श्रीने त्यांना निरोप दिलेला दिसतोय. मनीष आलाय ना आता त्याची सगळी कामं करायला. चहा करून देणे इ. सटरफटर कामांना नंदन आहेच. झालंच तर आता आमचा कांता पण सुधारला आहे. कुकीच कुकी बनवत असतो आता. त्याची अर्धशिशी पण पळूनच गेली बघा. शरयू पण न विसरता कॅन्टीनचं काम बघते. मी तर म्हणते की गोखल्यांच्या गृहउद्योगात जाह्नवीच्या आईला घेऊ शिवदे बाईंच्या जागी, बरोब्बर लक्ष ठेवतील त्या सगळ्यावर. मी बघितली आहे नं त्यांची नजर.

जाह्नवीने बरं बेबी आणि इंदूला पण उद्योगाला लावलं. नाहीतर मला काय काय करायला लागायचं. आमच्या इंदूला इंग्रजी शिकवणं काय सोपं काम आहे का. माझंच इंग्रजी बिघडायची वेळ आली होती. सरुने स्वतःचं लग्न जमवता जमवता अत्यानंद वधू-वर सूचक मंडळ सुरु केलं, नाहीतर तिचा सगळा “अत्यानंद”च होता. या सगळ्या महिलामंडळाला सांभाळता सांभाळता माझ्या बाई नाकी नऊ यायचे. किती ते नियम घालून द्यावे लागले. रोज स्वयंपाक कोणी करायचा इथपासून ते श्रीची बेडशीट कोणी बदलायची इथपर्यंत. आजपर्यंतच्या आयुष्यात मनात एकच रुखरुख आहे की त्यांची चोरून ऐकायची सवय काही घालवता आली नाही मला.

श्रीने जाह्नवीची निवड केली हे मला काही आवडलं नव्हतं. आधी माझा रागच होता जाह्नवीवर पण नंतर माझं मन जिंकलं तिनं मुगाचे डोसे करून. माझ्या एकाही सुनेला आजतागायत जमले नव्हते. पण सगळं सुरळीत चालू होतं तर हा अपघात झाला आणि स्मृतीच गेलीन् तिची. आता श्रीने तिला आणलंय ना घरात आणि ते पण माझ्याच खोलीत. मी निवांतपणे ‘रमा आणि लक्ष्मी’कांताने दिलेल्या CDs ऐकत बसायचे, तर आता ही बया आली मध्ये-मध्ये लुडबुड करायला. चांगलं तेल थापटीन आता तिच्या डोक्यावर. काय बिशाद तिची आठवण परत येत नाही. नाही तर मग श्रीचे परत लग्न लावीन तिच्याशी. चंद्रहारांची ऑर्डर दिलीच आहे – जाह्नवी साठी, जाह्नवीच्या आईसाठी, पिंट्याच्या होणाऱ्या बायकोसाठी, मनीषच्या होणाऱ्या बायकोसाठी, मि. बोरकरांच्या स्मितुडी साठी आणि असेच एक्स्ट्रा ४-५. गृहउद्योगवाले गोखले आम्ही. विघ्नेश्वराच्या कृपेने आम्हाला काय कमी आहे !!

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

चंद्रहारांची ऑर्डर दिलीच आहे – जाह्नवी साठी, जाह्नवीच्या आईसाठी, पिंट्याच्या होणाऱ्या बायकोसाठी, मनीषच्या होणाऱ्या बायकोसाठी, मि. बोरकरांच्या स्मितुडी साठी आणि असेच एक्स्ट्रा ४-५. गृहउद्योगवाले गोखले आम्ही. विघ्नेश्वराच्या कृपेने आम्हाला काय कमी आहे !!

>> Lol

चंद्रहारांची ऑर्डर दिलीच आहे – जाह्नवी साठी, जाह्नवीच्या आईसाठी, पिंट्याच्या होणाऱ्या बायकोसाठी, मनीषच्या होणाऱ्या बायकोसाठी, मि. बोरकरांच्या स्मितुडी साठी आणि असेच एक्स्ट्रा ४-५. गृहउद्योगवाले गोखले आम्ही. विघ्नेश्वराच्या कृपेने आम्हाला काय कमी आहे !!>>>>>> मस्तच.

Lol Lol :