माझे गाणे...

Submitted by मुग्धमानसी on 26 August, 2014 - 01:50

अंदाज तुझे, अनुमान तुझे
हि तुझी वाट, अपघात तुझे
हे पाय तुझे अन् दिशा तुझ्या
विश्वात तुझ्याविण नाही दुजे

वाटले तुला अन् वाट तुझी
गेलीच नं माझ्या वाटेला?
होतेच असेही कधी कधी...
भिजवले धुळीने लाटेला...

अंगार तुझ्या नजरेमधला
कधी धुसमुसतो, कधी गहिवरतो
मी फक्त जराशी हसते अन्
अश्रूही अपमानित होतो!

नादिष्ट जरी... मी भ्रमिष्ट जरी...
मी खुशाल माझ्या यात्रेत...
मी वाईट गाते तुझ्यामते
जे गीत तुला न अभिप्रेत!

मी गुणगुणते माझे गाणे
अन् थिरकत देते दाद मला
कधी तान लांबवून स्वप्नांची
समेवरी गाठते असण्याला!

मी तुझ्या समोरून जाताना
अन् तुझ्या घरी वावरताना
जो दिसला नाही कधी तुला
तो बहर मीच मोहरताना!

घे भरून मजला छातीत
नाहितर जाशील गुदमरूनी
कितीजरी स्वयंभू कर्तृत्व...
ते पेलाया लागे अवनी!

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

'मी गुणगुणते..'पासून पुढे सुरेख ओघवती, अर्थवाही होत गेली..
त्या आधी मात्र बरीच अडखळत वाचली.. सूर जुळत नसल्यासारखी वाटली.

सुरुवातीला असलेली लय हळुहळु निसटत गेली असे जाणवते..... खुप जोरदार सुरुवात केलीत पण नंतर एकाग्रता भंग झाली कल्पनेची.... धाधा धाधा धाधा धाधा असा ठेका अजुनही मिळवता येऊ शकेल