संवेदनशील संगीतकार

Submitted by सुमुक्ता on 18 August, 2014 - 06:19

सुप्रसिद्ध संगीतकार श्री कौशल इनामदार ह्यांचा अमेरिकेचा दौरा चालू असताना माझ्या बऱ्याच मित्रमैत्रिणींनी त्यांच्या "कौशलकट्टा" ह्या कार्यक्रमाचे कौतुक केले. मला आठवले ते मराठी मंडळ अॅबर्डीन च्या दिवाळी कार्यक्रमामध्ये मध्ये त्यांनी दाखविलेली "कौशलकट्टा"ची झलक. श्री कौशल इनामदार काही कामानिमित्त इंग्लंड मध्ये येणार असल्याचे कळले आणि मराठी मंडळ अॅबर्डीनच्या कार्यकारिणी समितीने लगेचच त्यांच्याशी संपर्क साधून त्यांना अॅबर्डीन, स्कॉटलंड येथे दिवाळीचा कार्यक्रम करण्याची विनंती केली. मराठी मंडळ अॅबर्डीन तसं लहानच, ७५-१०० मराठी लोकांचं. परंतु ह्या सर्व लोकांच्या प्रेमळ आग्रहाखातर श्री इनामदार ह्यांनी इथे कार्यक्रम करण्याची आनंदाने तयारी दर्शविली. कार्यक्रमाचे नाव होते "एका संगीतकाराची मुशाफिरी".

कार्यक्रमाआधी २ दिवस श्री इनामदार अॅबर्डीन ला येणार होते. तेव्हा त्यांना भेटण्याची संधी मिळाली. त्यांच्या "चिन्मया सकल हृदया"ने आणि "मराठी अभिमान गीता"ने माझ्या मनावर आधीच गारूड केले होते. तेव्हा त्यांना भेटायची आणि त्यांच्या कार्यक्रमास उपस्थित राहण्याची संधी मी सोडणारच नव्हते. मी त्यांना प्रथम भेटले तेव्हा कळले की संगीतकारचे मन अतिशय संवेदनशील असावे लागते तेव्हाच चिन्मया आणिअभिमान गीतासारखी गाणी जन्माला येतात. "शास्त्रीय संगीताच्या शिक्षणाची आवश्यकता" पासून "तुम्हाला चाल कशी सुचते?" पर्यंत आमच्या अनंत प्रश्नांना त्यांनी न कंटाळता अतिशय आपुलकीने उत्तरे दिली. गाण्यामध्ये शब्दाचं महत्व, आधी चाल कि आधी शब्द, विविध गायकांच्या शैली, ह्यासारख्या विषयांवर अभ्यासपूर्ण भाष्य केले. नुसतीच संगीताची जाण असून भागत नाही तर वाचन, चिंतन आणि निरीक्षण हे कोणत्याही संगीतकारास किती आवश्यक असते हे मला कळले.

अॅबर्डीन चा दिवाळी कार्यक्रमात तर त्यांनी मोठीच रंगत आणली. त्यांच्याकडे सांगण्यासारखं आणि ऐकविण्यासारखं खूप काही होतं. त्यांच्या चित्रपटांमधील विविध गाणी, त्या गाण्यांच्या जन्मकथा, ती गाणी करण्यासाठी त्यांनी घेतलेली मेहनत, आदी अनेक अनुभव त्यांनी आम्हाला ऐकविले. अडीच तीन तासाचा हा कार्यक्रम अॅबर्डीनकरांना मोठीच मेजवानी होता. सर्वांनीच खूप उत्साहाने ह्या कार्यक्रमास दाद दिली. कार्यक्रमाच्या शेवटी मराठी अभिमान गीताची जन्मकथा आम्हा सर्वांना ऐकायला मिळाली. कोणत्याही आर्थिक फायद्याची अपेक्षा न ठेवता केवळ मराठी भाषेला दर्जा प्राप्त व्हावा ह्या ध्यासापोटी एवढ्या भव्य गाण्याची निर्मिती श्री इनामदार ह्यांनी केली. अनेक आव्हानांना कौशल सामोरे गेल्यानंतरच ह्या भव्यतेचा अनुभव आपल्यासारख्या रसिकांना मिळाला. अभिमान गीत ऐकताना जे रोमांच उभे राहते तेच त्या गीताची जन्मकथा ऐकताना अनुभवायला मिळाले.

सुप्रसिद्ध झालेल्या प्रत्येक माणसामध्ये घेण्यासारखे खूप असामान्य गुण असतात. कौशल ह्यांची संवेदनशीलता, त्यांची जिज्ञासू आणि अभ्यासू वृत्ती, त्यांना चाहत्यांविषयी वाटणारे प्रेम आणि मराठी भाषेविषयीची तळमळ पाहून निश्चितच ह्या गोष्टी त्यांच्याकडून शिकण्यासारख्या आहेत असे वाटते. मराठी कलेस, चित्रपटास आणि नाटकास पुन्हा सुवर्णकाळ येण्यासाठी कौशल ह्यांच्यासारखे मराठी विषयी तळमळ असणारे कलाकार कारणीभूत आहेत. श्री कौशल इनामदार ह्यांच्याशी भेट झाली , ओळख झाली, त्यांचे अनुभव ऐकता आले आणि त्यांच्याकडून नवीन काही शिकता आले; ही निश्चितच खूप मोठी ठेव आहे.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

दोन्ही माझी फेवरिट गाणी आहेत. पण त्यामागच्या संगीतकाराची काहीच माहिती नव्हती. ती ह्या लेखात मिळाली. धन्यवाद. तुम्ही छान लिहीताहात.