तुझे आहे तुजपाशी.... अर्थात् एका देवदूताची कहाणी !

Submitted by SureshShinde on 11 August, 2014 - 15:02

cvsSurg.png

"सुरेश, या बाळाचे आईवडील दोघेही गोरे पान पण मग बाळ असे काळे कसे?"
आमच्या सोसायटीमधील वाडेकरांचे बाळ पाहून येत असताना माझी आई मला म्हणत होती.
"अग आई, तू पण न ..जरा जास्तच स्पष्टवक्ती आहेस. बरे तरी त्या दोघांच्या समोर म्हणाली नाहीस हे नशीब!" मी थोडेसे चिडूनच म्हणालो.
"अरे मला जे दिसले ते तुला सांगितले. मी त्यांना सांगायला काय मूर्ख आहे की काय?"
आमचे हे संभाषण येथेच संपले आणि मी तर लगेच विसरूनही गेलो. पण माझ्या आईची निरीक्षणशक्ती आणि अनुभव किती जबरदस्त होता याची प्रचिती मला अजून येणार होती.

सुमारे शहाण्णव सालातील गोष्ट आहे ही ! त्यावेळी आम्ही सिंहगड रस्त्यावरील रक्षालेखा सोसायटीमध्ये राहत असू. माझे वर्गमित्र अशोक देशपांडेंनी ही सोसायटी बांधली होती. मित्राच्या नात्याला जागून त्याने मला या सोसायटीमध्ये एक फ्लॅट अगदी स्वस्तामध्ये दिला होता. आमची ही सोसायटी म्हणजे जणू एक कुटुंबच होते. दिवाळी,गणेशोत्सव असे सण मोठ्या उत्साहाने साजरे व्हायचे. उपेंद्र भट, चंद्रकांत काळे, नंदू पोळ अशी गुणवान कलाकार मंडळी आणि कितीतरी भावी कलाकार येथे आपले गुणदर्शन करीत असत. त्यामुळे आम्ही सर्व सोसायटीकर एकमेकांना चांगलेच ओळखत असू. अशोकचे शेजारी शेवाळे यांची मुलगी, शीतल, ही एक राष्ट्रीय खेळाडू होती. तेथेच वाडेकर नावाच्या एका उमद्या खेळाडूशी परिचय,परिणय आणि कालांतराने विवाह झाला होता. श्री वाडेकर सरकारी नोकरीत तर शीतल बँकेमध्ये नोकरी करत असे. थोड्याच दिवसात शीतल गरोदर राहिली. शीतलचे सासरे मुंबई मध्ये राहत असत. आपल्या सुनेचे बाळंतपण उत्तमात उत्तम ठिकाणी व्हावे अशी त्यांची इच्छा होती व त्यासाठी त्यांनी तिला मुंबईच्या सुप्रसिद्ध बीच कँडी हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते.

बीच कँडी हॉस्पिटल, मुंबई.

हॉस्पिटलचे स्त्रीरोग तज्ञ डॉक्टर शीतलच्या आईला सांगत होते, "सोनोग्राफी रिपोर्ट नुसार बाळाची तब्ब्येत चांगली आहे. शीतलची आता तीनचार तासांतच प्रसूती अपेक्षित आहे. काळजीचे काही कारण नाही."
शीतलची ही बाळंतपणाची पहिलीच वेळ होती पण एक खेळाडू असल्यामुळे तिची सहनशक्ती चांगली होती. थोड्याच वेळात शीतल प्रसूत झाली.
"अभिनंदन, पेढे द्या ! मुलगा झाला आहे. बाळ आणि बाळंतीण दोघेही सुखरूप आहेत. काही काळजी करू नका, थोड्याच वेळात सिस्टर त्यांना बाहेर आणतील." एवढे सांगून डॉक्टर दुसऱ्या कामासाठी निघून गेले.
थोड्याच वेळाने शीतल आणि तिच्या बाळाला प्रायव्हेट रूम मध्ये हलविण्यात आले. डॉक्टरांच्या सूचनेनुसार दर चार तासांनी सिस्टर खोलीत येऊन बाळाला तपासत होत्या.
तो दिवस असाच निघून गेला, पण दुसऱ्या दिवशी सकाळीच बाळाला त्रास होऊ लागला. पोट जोराने उडू लागले, हातपाय निळे पडले. शीतलने पटकन इमर्जन्सी बेल दाबली. बेलच्या आवाजाने डॉक्टर्स आणि सिस्टर्स भरभर गोळा झाले. बाळाला ऑक्सिजन सुरु केला आणि नेहेमीचे ठरलेले उपचार ताबडतोब चालू केले. पण बाळाची तब्ब्येत काही सुधारत नव्हती. नशिबाने हॉस्पिटलचे बालरोगतज्ञ देखील येऊन पोचले. त्यांच्या सल्ल्याने उपचारांत बदल केले गेले.
"डॉक्टर, काय होतंय माझ्या बाळाला? ह्या सर्व घटना पाहून घाबरलेल्या शीतलने डॉक्टरांना विचारले.
"हे पहा आमचे प्रयत्न चालू आहेत. हळूहळू आपल्या बाळाची तब्ब्येत सुधारत आहे. माझी खात्री आहे की बाळाला नक्की बरे वाटेल." बालरोगतज्ञ डॉक्टर म्हणाले.
"डॉक्टर, आणखी कोणी तज्ञ डॉक्टर अथवा कार्डीओलोजिस्ट बोलावयाचे असतील तरी चालेल, पैशांची मुळीच काळजी नाही. पण माझ्या नातवाला उत्तम ट्रीटमेंट मिळावी अशी आमची इच्छा आहे." शीतलचे सासरे म्हणाले.
"हे पहा, आता बाळाची कंडीशन सुधारत आहे, जास्त गडबडून जाण्याचे काहीच कारण नाही. बाळाला चांगले बरे वाटेपर्यंत मी येथेच थांबणार आहे." डॉक्टरांनी त्यांना धीर दिला.
अखेर आणखी एका तासानंतर डॉक्टरांच्या प्रयत्नांना यश आले आणि बाळाच्या तब्येतीचा धोका टाळल्याचे डॉक्टरांनी जाहीर केले. सर्वांनी सुटकेचा निश्वास सोडला. आणखी दोन दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर शीतलला बाळाबरोबर घरी जाण्यास परवानगी मिळाली.
महिनाभर मुंबईत राहून शीतल पुन्हा रक्षालेखा सोसायटीमध्ये पुण्याला परतली.
सोसायटीमध्ये शीतलच्या बाबांनी बाळाचा जोरदार नामकरण समारंभ आयोजित केला होता. वेळात वेळ काढून मीही आईबरोबर बाळाला पाहण्यासाठी गेलो होतो. बाळाचे नाव ठेवले होते -'गणेश' !
वरील घटनेनंतर सुमारे दहा दिवसा नंतरची गोष्ट.
मी सकाळचे काम आटोपून मी नुकताच घरी परतलो होतो. दारात असतानाच माधुरीने निरोप दिला,
"अहो, आपल्या सोसायटीमधील शेवाळेंचा फोन आला होता. तुम्ही आल्यानंतर भेटण्यास येतो म्हणत होते."
शेवाळेंनी माझ्याकडे काय काम काढले असावे असा मी विचारच करीत होतो, तेवढ्यात शेवाळे दत्त म्हणून दरवाज्यात उभे ! बहुतेक माझी वाट पाहत बाहेरच थांबले असावेत असा मी अंदाज केला.
"या शेवाळे, आज काय काम काढलेत?"
"अहो डॉक्टर, आमच्या गणेश बाळासाठी तुमचा सल्ला घेण्यासाठी आलो आहे."
"अहो परवाच्या समारंभामध्ये तर छान दिसत होती त्याची तब्बेत !"
"होय पण त्यानंतर बरेच काही घडले आणि म्हणूनच तुमच्याकडे आलो आहे."
बहुतेक भरभर जिना चढून आल्यामुळे शेवाळेना दम लागला होता. थोडा वेळ थांबून ते सांगू लागले ,
" गेल्या आठवड्यामध्ये गणेशला सर्दी खोकला झाल्यामुळे सोसायटीमधील गांधी डॉक्टरांकडे नेले होते. त्यांनी डॉ. नवरंगे नावाचे बालरोगतज्ञ डॉक्टर बोलावले होते."
डॉ.जयंत नवरंगे हे केवळ माझे वर्ग मित्रच नव्हते तर माझ्या मुलांचे लहानपणचे डॉक्टरही होते. आमच्या वर्गातील अतिशय हुशार विद्यार्थी म्हणून व त्यानंतरच्या आयुष्यातदेखील एक नामवंत बालरोग तज्ञ म्हणून प्रसिद्ध होते. त्यांनी केलेले निदान शक्यतो चुकत नसे.
"काय म्हणाले,नवरंगे?" संभाषण चालू ठेवण्यासाठी मी म्हणालो.
"त्यांच्या लक्षात आले की बाळाच्या हृदयामध्ये एक प्रकारचा आवाज येतो आहे आणि त्याचे शुद्ध आणि अशुद्ध रक्त एकमेकात मिसळते आहे व त्यामुळे त्याचे हातपाय अधून मधून निळे दिसतात. ही सर्व लक्षणे दाखवितात की बाळाला जन्मतः हृदयविकार असावा. आम्ही सारे तर हादरून गेलो आहोत. गेले तीन दिवस आम्ही कोणीही धड झोपलेलो नाही. खरे म्हणावे तर आत्तापर्यंत कितीतरी निरनिराळ्या डॉक्टरांनी त्याला तपासले होते. पण अगोदर कोणाच्याच कसे लक्षात आले नाही? आमचे नशीबच म्हणायचे दुसरे काय."
भावनातिशयामुळे शेवाळे थोडावेळ बोलताना थांबले आणि आम्ही बाळाला पहिल्या नंतरचे माझ्या आईने काढलेले उद्गार मला आठवले. माझ्या आईच्या निरीक्षणशक्तीचे प्रत्यंतर मला येत होते.
शेवाळे पुढे बोलत होते. "त्यांनी आम्हाला केईएम हॉस्पिटलमध्ये डॉ. मिलिंद गडकरी नावाच्या हृदयरोगतज्ञ डॉक्टरांकडे पाठवले. दुसऱ्याच दिवशी गडकरींनी बाळाला तपासून आम्हाला सांगितले की बाळाच्या हृदयामध्ये दोष आहे. त्यांनी बाळाच्या हृदयाची सोनोग्रफिदेखील केली. सोनोग्राफीमध्ये त्यांच्या अंदाजाप्रमाणेच हृदयविकार दिसत आहे. बाळाच्या हृदयावर तातडीने शस्त्रक्रिया करावी लागेल नाहीतर .." बोलतानाच रडू कोसळल्यामुळे शेवाळेंना पुढे बोलवेना.
"धीर सोडू नका"त्यांचा हात माझ्या हाताने दाबत मी म्हणालो.
"एवढ्या लहान जीवाचे त्यांनी मुंबईला जाऊन ऑपरेशन करावयाला सांगितले आहे. "
"मग त्यात काय हरकत आहे. आता जग खूप पुढे गेले आहे. मुंबईमध्ये आता मोठमोठी ऑपरेशन होऊ लागली आहेत. अगदी आजूबाजूच्या देशातील पेशंटदेखील केवळ ऑपरेशनसाठी मुंबईमध्ये येतात."
"डॉक्टर, केवळ उत्तम सोयींसाठी आम्ही पुणे सोडून तिच्या सासरी मुंबईला आणि तेही एवढ्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये ठेवले होते पण काय उपयोग झाला ते पाहिलेत ना. शिवाय जन्मानंतर दुसऱ्या दिवशी बाळाला जो त्रास झाला तो ही हृदयविकारामुळेच असल्याचे तेथील डॉक्टरांच्या लक्ष्यात आले नाही. त्यामुळे आमची बाळाला मुंबईला नेण्याची इच्छाच होत नाही."
शेवाळे म्हणत होते त्यात बरेच तथ्य होते. आईच्या पोटात असताना बाळाच्या शरीरामध्ये 'डक्टस आर्टरीओझस' नावाची एक छोटी रक्तवाहिनी कार्यरत असते. जन्मानंतर फुफ्फुसांचे काम चालू झाल्यानंतर या रक्तवाहिनीची गरज राहत नाही. निसर्ग ती बंद करतो. पण ज्या बाळांना जन्मतःच हृदयविकार असतो त्यांना ही रक्तवाहिनी म्हणजे एक वरदानच असते. ती बंद होण्याने त्यांची तब्बेत बिधडते. या बाळाला नेमका 'डक्टस आर्टरीओझस' बंद झाल्यानेच दुसऱ्या दिवशी त्रास झाला असण्याची शक्यता होती. 'डक्टस आर्टरीओझस' बंद करण्याचे काम निसर्ग एक औषधाद्वारे करतो. पण मानवाने आता प्रयोगशाळेमध्ये या औषधाचा परिणाम थांबविणारे प्रतीऔषध तयार केले आहे. हे जन्मानंतर दिल्याने 'डक्टस आर्टरीओझस' बंद होत नाही, उघडीच राहते आणि अशा बाळांना ऑपरेशनपर्यंत त्यांची तब्बेत बरी राहण्यासाठी मदत करते. पण हे औषध उपलब्ध असूनही जर जन्मतःच असलेल्या हृदयविकाराचे वेळीच निदान झाले नाही तर त्याचा काय उपयोग. अर्थात हे सर्व शेवाळेंना सांगणे म्हणजे त्यांच्या मनस्तापामध्ये भर घालण्यासारखे होते. त्यांनी बरोबर आणलेले सर्व रिपोर्ट मी काळजीपूर्वक पाहिले. गणेशला खरोखरच गंभीर असा हृदयविकार होता आणि त्याचे ऑपरेशन तातडीने करणे आवश्यक होते. या बालगणेशाला वाचविण्यासाठी शेवाळेंनी साक्षात श्री गणेशालाच साकडे घातले होते.
शेवाळे पुढे सांगू लागले," मी तुमच्याकडे येण्याचे कारण थोडे वेगळेच आहे. तुम्हाला 'इंटरनेट'विषयी खूप माहिती आहे असे मला अशोकने सांगितले. तुमच्या मदतीने मला या आजाराच्या ट्रीटमेंटसाठी जगात सर्वात उत्तम जागा कोठे आहे त्याचा सर्च घ्यायचा होता."
पंच्याण्णव साली मी आणि माझे मित्र सुधीर उर्फ 'डिजिटल कोठारी' यांनी पुण्यामध्ये डॉक्टरांना इंटरनेटच्या अद्भुत विश्वाविषयी माहिती देण्यासाठी 'वर्कशॉप' आयोजित केला होता. संपूर्ण महाराष्ट्रामधून सुमारे दीडशे डॉक्टरांनी त्यात भाग घेतला होता. इंटरनेटच्या युगाच्या भारतातील सुरुवातीचे दिवस होते ते !
"अगदी योग्य विचार आहे तुमचा. आपण अवश्य पाहू या. माझा कॉम्पुटर क्लिनिकमध्ये आहे. मी पटकन जेवतो आणि आपण लगेच जाऊ या.
माझे जेवण होईपर्यंत शेवाळे बाहेरच्या खोलीत बसले होते, नव्हे येऱ्याझाऱ्या घालत होते. माधुरीने त्यांच्या पुढे ठेवलेल्या अल्पोपहाराला त्यांनी स्पर्श ही केला नव्हता. ते आग्रहाच्या मनस्थितीमध्येच नव्हते !
कसे बसे जेवण पोटात ढकलून मी आणि शेवाळे माझ्या क्लिनिकच्या दिशेने निघालो.
सुमारे तासभर पीसीवर बसून आम्ही नेट सर्च केले. सर्वात उत्तम जागा होती , अमेरिकेमधील ह्यूस्टन शहर! ह्यूस्टन म्हणजे जगातील सर्वात मोठ्या अद्यावत हॉस्पिटल्स आणि डॉक्टर्सनी खच्चून भरलेले शहर, जणू वैद्यकीय पंढरीच! तेथील एक प्रसिद्ध हृदय शल्यविशारद डॉ. डेंटन कूली यांचा ई-मेल पत्ता आम्ही मिळवला आणि गणेशची सर्व केस थोडक्यात लिहून अमेरिकेत येऊन सर्जरी करण्याबाबत आणि लागणाऱ्या खर्चाबाबत विचारणा करणारा ई-मेल त्यांना पाठविला.
तोपर्यंत दुपारचे तीन वाजले होते. माझी क्लिनिकची वेळ झाली होती. मी शेवाळेंना म्हणालो," आपण आता त्यांच्या ई-मेलची वाट पाहू या. मला वाटते दोनतीन दिवसांत उत्तर येईल."
माझा हात हातात घेऊन ते म्हणाले," आभारी आहे, डॉक्टर, धन्यवाद!"
ते गेल्यानंतर मी माझ्या क्लिनिकच्या कामाला सुरुवात केली.
रात्री दहा वाजता माझे काम संपल्यानंतर मी पुन्हा कॉम्पुटर चालू केला.
याहू मेल उघडली. आणि काय आश्चर्य ! डॉ. कूलींचे उत्तर आले होते, केवळ सात तासांच्या आत आणि तेही पृथ्वीच्या दुसऱ्या टोकाहून !
मोठ्या उत्सुकतेने मी ई-मेल उघडले.
भरभर वाचून मी त्याचा प्रिंट-आऊट काढला आणि माधुरीला फोन करून शेवाळेना घरी येण्याचा निरोप देण्यासाठी सांगितले व मी घाईघाईने घरी निघालो.
घरी शेवाळे दाराबाहेरच माझी वाट पाहत उभे होते.
"काय ! एवढ्या लवकर उत्तर आले देखील. ह्या परदेशी डॉक्टरांचे कौतुक करावे तेवढे थोडेच. काय लिहिले आहे त्यांनी ?"
"शेवाळे, त्यांचे मेल मी वाचले आहे व त्याची एक प्रत तुमच्या माहितीसाठी आणलीदेखील आहे. त्यांनी तेथील हॉस्पिटल्सची माहिती पाठविली आहे पण दुसरी एक महत्वाची गोष्ट पण लिहिली आहे."
"म्हणजे काय ?"
"त्यांनी लिहिले आहे कि येथे ऑपरेशन आपल्याला खूपच महाग पडणार आहे. यापेक्षा त्यांनी एक दुसरी सूचना केली आहे."
शेवाळेंच्या भुवया उंचावल्या.
"ते पुढे लिहिताहेत, या प्रकारचे ऑपरेशन उत्तम प्रकारे करणारे एक डॉक्टर आणि त्यांची टीम भारतातच आहे.
डॉ. के.एम.चेरियन आणि हॉस्पिटल आहे मद्रास मेडिकल मिशन! एवढेच नव्हे तर त्यांनी फोन नंबर्स आणि पत्ताही दिला आहे. "
"काय करायचे? डॉक्टर मी तुम्ही म्हणाल तसे करणार आहे." शेवाळे.
"माझ्यावर फार मोठ्या निर्णयाची जबाबदारी टाकताय तुम्ही. चला माझ्याबरोबर." मी म्हणालो.
"चला पुन्हा क्लिनिकवर, डॉ. चेरियन यांची माहिती काढू यात." मी पुढे म्हणालो
मग त्या रात्री पुन्हा एकदा क्लिनिक, कॉम्पुटर आणि इंटरनेट सर्च !
मिळालेली माहिती खूपच आशादायी होती. डॉ. चेरियन यांनी अॉस्ट्रेलियामध्ये प्रशिक्षण घेतले होते. शहात्तर सालापासून बारा वर्षे कोरोम्बो येथे रेल्वे हॉस्पिटलमध्ये हजारो मुलांच्या यशस्वी हृदयशस्त्रक्रिया केल्या व तीच परंपरा मद्रास मेडिकल मिशन सारखी सेवाभावी संस्था काढून पुढे चालविली होती. थायलंड, श्रीलंका,बंगला देश इत्यादी अनेक देशांतून अनेक रुग्ण केवळ त्यांचे नाव ऐकून भारतात येत होते. त्यांना अनेक पदव्या, मानसन्मान तर मिळालेच होते पण भारत सरकारनेही 'पद्मश्री' देऊन त्यांच्या कार्याचा गौरव केला होता. खरोखर एवढा मोठा सर्जन आपल्या देशात असूनही आम्ही ही गुणवत्ता परदेशामध्ये शोधत होतो.
म्हणतात ना 'काखेत कळसा आणि .. '.
शेवाळे आणि कुटुंबीयांनी गणेशला मद्रासला नेण्याचा निर्णय घेतला. वेळ फार थोडा होता. पुन्हा त्रास झाल्यास कदाचित फार महाग पडणार होते. दुसऱ्याच दिवशीच्या ट्रेनने सर्वजण मद्रासला रवाना झाले.

cherianLH.png

पुढील कथाभाग शीतलने मला जसा सांगितला तसा तिच्याच शब्दात देत आहे.

आम्ही चोवीस तासांनंतर मद्रासमध्ये पोहोचलो. मद्रास मेडिकल मिशन आणि डॉ. चेरियन यांच्याबद्दल टॅक्सीवालाही खूप आदराने बोलत होता. आम्हाला भेटलेले डॉक्टर्सही आमच्याशी फारच सौजन्याने वागले. अशोक देशपांडेंनी डॉ. चेरियन यांची वेळ ठरविली होती. बरोब्बर त्या वेळी डॉक्टर चेरियन यांची भेट झाली. प्रथमदर्शनीच त्यांना पाहून हा माणूस माझ्या बाळाला ठीक करणार याबद्दल माझ्या मनाची खात्री पटली. त्यांनी बाळाची तपासणी केली, सर्व रिपोर्ट पाहिले आणि त्यांच्या सहकारी डॉक्टरांशी चर्चा केली. दुसऱ्याच दिवशी सकाळी बाळाची कॅथेटर टेस्ट होती. या टेस्टद्वारे बाळाच्या हृदयाची व त्यातील दोषाची नेमकी माहिती मिळणार होती व त्यानुसार ऑपरेशन ठरणार होते. दुसऱ्या दिवशी एवढ्या छोट्याशा बाळाची टेस्ट झाली. छातीवर दगड ठेवून बाळाला त्यांच्या हातात दिले. टेस्टचा रिझल्ट डॉक्टरांच्या मते चांगला होता. लगेच पुढच्याच दिवशी ऑपरेशन ठरले. रात्र संपता संपत नव्हती. बाळाला डोळ्यात सामाऊन घेत होते. ही रात्र संपूच नये असे वाटत होते. ऑपरेशनचा दिवस उजाडला. बाळाला आत नेले आणि आम्हा सर्वाचे जीव टांगणीला लागले. ऑपरेशन सात तास चालले. जगातले सर्वात मोठे पण संपणारे आणि क्लेशदायक सात तास ! ऑपरेशन संपवून डॉ. चेरियन हसतमुखाने बाहेर आले आणि आम्हा सर्वांचा जीव भांड्यात पडला.
"कॉंग्रचुलेशंस ! ऑपरेशन ठीक रहा. अब और दो दिन बच्चेको आयसीयुमें रखेंगे. लेकीन चीन्ताकी बिलकुल कोई बात नही, माय डॉक्टर्स विल लूक आफ्टर नाईसली !" एवढे म्हणून डॉक्टरांनी माझ्या खांद्यावर हात ठेऊन मला धीर दिला आणि आम्हाला नमस्कार करून ते निघून गेले. पुढचे दोन दिवस आम्ही कसे काढले ते केवळ आम्हालाच माहित. पण आता टेन्शन कमी झाले होते. आम्हाला बाळाकडे काचेतून पाहण्याची परवानगी होती. दोन दिवसानंतर बाळाला अंगावर पाजण्याची परवानगी मिळाली. आणखी पाच दिवस 'स्टेप डाऊन' वार्डमध्ये बाळाला ठेवले होते. बाळाची तब्बेत झपाट्याने सुधारत गेली. आणखी दोन दिवसानंतर आम्हाला डिसचार्ज मिळाला. बिलदेखील अगदी कमी होते. त्यांचे 'पॅकेज' अगदी सामान्य माणसाला परवडेल असे होते आणि सुविधा अत्त्युत्तम ! आम्ही आमच्या गणेशला घेवून पुण्याला परत आलो. त्यानंतर ठराविक वेळी त्यांना जाऊन भेटत असू. गणेशला पुढे काहीही प्रॉब्लेम आला नाही. आता तर तो पंधरा वर्षांचा तरुण झाला आहे आणि तब्बेत म्हणाल तर एकदम सलमान खानच !

cherian.png

आजपर्यंत डॉ. चेरियन यांना आणखी खूप सन्मान मिळाले. आतापर्यंत त्यांनी चाळीस हजार हृदय शस्त्रक्रिया केल्या. भारतातील पहिली हृदयारोपणाची व फुफ्फुसरोपणाची ही शस्त्रक्रियाही त्यांनीच केली. ग्रीस मधील वैद्यकीय आद्यपुरुष 'हिपोक्रेटीस' यांच्या जन्मस्थळी दगडावर नाव कोरले गेलेले डॉ. के.एम.चेरियन हे पहीले भारतीय डॉक्टर ! डॉ. के.एम.चेरियन यांचे लहान मुलाच्या हृदयविकार तपासणीचे कॅम्प्स संपूर्ण देशभर होत असतात. परमेश्वरकृपेने त्यांचा हा 'आरोग्य यज्ञ' आजपर्यंत अव्याहत चालू आहे आणि असाच चालू रहावा म्हणून त्यांना अनेक शुभेच्छा "

" जीवेत शरदः शतं " !

∞∞∞∞∞∞∞

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

खुप छान लेख. डॉक्टर मी तुम्हाला एक ई मेल केला होता. माझ्या आईला While Matter disorder हा आजार आहे.

माझी आई डॉक्टर Dr. Wadia Pettarusp कडे उपचार घेत आहे. हा आजार पुर्ण पणे बरा होत नाही असे डॉक्टर म्हणत आहेत. गूगल करुन पण पाहिले. आई आयुर्वेदिक औषध पण घेत आहे. रक्त चाचणी करुन घ्यावी का? काहीच काम करत नाही आहे. तब्येत खराब होत चालली आहे. तुम्ही काही सुचवु शकाल का?

शक्य असेल तर एक व्हीजीट शक्य आहे का? धन्यवाद.

आपल्याच क्षेत्रातील एका व्यक्तीबद्दल आदराने लिहिणे... याबद्दल तूमच्याबद्दल खुपच आदर वाटतो.
लेख नेहमीप्रमाणेच छान.

डॉ.चेरियन यांच्या कौशल्याला वंदन करत असताना मला या क्षणी अमेरिकेतील ह्यूस्टन शहरातील प्रसिद्ध हृदय शल्यविशारद डॉ. डेंटन कूली यांचाही इथे उल्लेख करणे महत्त्वाचे वाटते. भारतात इंटरनेट सर्व्हिसेस चालू झाल्या होत्या त्यावेळीही तुम्हाला उत्तर दोनतीन दिवसात येईल असे वाटत असता त्या मोठ्या माणसाने सहासात तासात सविस्तर उत्तर देवून भारतातच कुठे ते ऑपरेशन करण्याचा सल्ला दिला आणि तो किती यशस्वी ठरला हे तर पुढे सिद्ध झाले.

आशा आहे की गणेशच्या मातापित्यांनी डॉ.डेंटन कूली यांचेही ईमेलद्वारे आभार मानले असतील.

आजूबाजूला अशी बाळ बघितली आहेत
हे असे का याचे नेमके कारण आज कळाले
पुन्हा एकदा छान माहिती
डॉ चेरियन यांच्याबद्दल वाचून छान वाटले
खरोखर आधुनिक धन्वतरी !

डॉ कुली यांनाही सलाम .लेखाच शीर्षकही उत्तम

Dr khup chan lekh aahe....
Mazya bahavachya balahi heartproblem hota ,,,, khup prayatn kele tyani...agdi mahiti milele tya tya hospiatal madhe gheun gela balala...,.,shewati aurangabadmadhe 17 april 2014 la operation kele.....
Dr.ni operation sucessful zale mhanun hi sangitale pan 8-15 divas icu madhe asunhi bal wachale nahi....

tumhi lihileli Ek ek line wachat astana agdi shahre aale, satat bhavache bal dolysamor yet hote........,
tilahi asach koni devdut bhetla asta tar ti aaj aamchyat asti....

तुमची लिहिण्याची शैली खुपच छान आहे डॉक्टर साहेब.>>>> येस्स! तुमचे आणी शेवाळे तसेच इतर परिचीतान्चे सन्भाषण तर अगदी डोळ्या समोर उभा राहीला. जसे समोरासमोर एका हॉलमध्येच, गर्दीत आम्ही एक श्रोते म्हणून ऐकत आहोत असा भास झाला.:स्मित:

डॉ. कुली, डॉ. चेरीयन यान्च्यासारखी देवमाणसे जगात आहेत, म्हणून हे जग सुन्दर आहे. खरे आहे इन्टरनेटने जग आणी मानवी हृदये/ मने पण जोडली गेलीत.

डॉक्टरसाहेब,

डॉक्टर चेरियन यांना वंदन. योग्य सल्ला दिल्याबद्दल डॉक्टर कूली यांनाही अभिवादन. शिवाय या लेखाबद्दल तुम्हालाही धन्यवाद! Happy

गणेशच्या हृदयाला नक्की काय झालं होतं? झडप नादुरुस्त होती? की भिंतीत छिद्र होतं? ज्याचा शेवट गोड ते सारेच गोड. मी लेखाबद्दल बोलतोय. शेवटी दिलेला डॉ. चेरियनांचा फोटो कसला गोड आहे! Happy

आ.न.,
-गा.पै.

व्वा ! डॉ. चेरियन, डॉ. कूली यांना सलाम.

नेहमीप्रमणेच जागी खिळवून ठेवणारा लेख ! >> +१००.

या सुंदर लेखाकरता पुन्हा एकदा मनापासून धन्स - डॉ. साहेब.

सुंदर लेख डॉ. काका...

डॉ. चेरियन, डॉ. कूली यांना सलाम !!
हे खरे देवदूत च !!!

Pages