भीक देतो पण ढोंग आवर..

Submitted by ऋन्मेऽऽष on 26 July, 2014 - 05:34

गेल्या आठवड्याची गोष्ट. तो ट्रेनमध्ये सरपटत भीक मागत होता. फर्स्टक्लासचा डब्बा. खरे तर या डब्यात जास्त भीक मिळत नाही. आपल्या डब्यात भिकार्‍यांचा त्रास नको म्हणून फर्स्टक्लासची हुशार पब्लिक त्यांना भीक मिळायची सवय लावत नाही. अर्थात मी देखील दिली नाहीच. पुढचेच स्टेशन माझे होते. मी दारावर उभा राहिलो. तो सुद्धा सरपटत सरपटत दारावर आला. उतरणारे आणखी कोणीच नव्हते, तरीही मी बाजूला सरून त्याला जागा करून दिली. "तू उतर बाबा पहिला, उगाच उशीर झाला आणि गाडी चालू झाली तर माझे काय, मी आहे धडधाकट, मारेन आरामात उडी." आता हि दर्यादिली दाखवायचे आणखी एक कारण म्हणजे सतत सरपटल्याने त्याचे मळलेले कपडे. उगाच आपल्या शुभ्र विजारीला वा पॉलिश केलेल्या बुटांना त्याचा स्पर्श नको हा त्यामागचा हेतू.

असो, तर स्टेशन आले तसे तो गुडघा सरपटवत खाली कोसळला. मागोमाग मीही उतरलो. आता इथून त्याला नक्कीच पुढच्या डब्यात जायचे असणार. तो कसा हे जमवतो हे पाहण्यासाठी मी मागेच रेंगाळलो. पण बाजूचा डबा लेडीज फर्स्टक्लास होता, जवळपास रिकामाच, आणि त्यापुढचा दरवाजा बर्‍यापैकी लांब. आता याला हि ट्रेन सोडून पुढची ट्रेन पकडावी लागणार. धंद्याची पाच-दहा मिनिटे बुडाली. त्याच्यासाठी मलाच हळहळ वाटली.

पण इतक्यात अचानक काय तो दैवी चमत्कार, बाबाने दे दी अंधी औरत को आंख और लंगडे भिकारी को पैर. जय माता दी म्हणत तो उठला आणि तुरूतुरू चालत पुढच्या दरवाज्यापर्यंत पोहोचला. ट्रेन सुरु होणार न होणार तोच त्या दरवाज्यापाशी जाऊन पुन्हा एकदा कोसळला. घसपटतच पुन्हा एकदा ट्रेनचा दांडा पकडून ट्रेनने वेग पकडायच्या आधी आत शिरला. आतील ज्या संवेदनशील प्रवाश्यांनी त्याला असे चढताना पाहिले असेल त्यांनी नक्कीच एक रुपयाच्या जागी दोनाचे नाणे त्याच्या हाती चिकटवले असणार यात शंका नाही. पण इथे मी मात्र माझे दोन रुपये घालवले नाही यातच काय ते समाधान मानले. अन्यथा त्याच्या नावाने दोन शिव्या हासडूनच काय ते समाधान मानावे लागले असते.

या महानगरीत रोजच्या आयुष्यात भिकारी वा पाचदहा रुपयांच्या आर्थिक मदतीची अपेक्षा असलेले गरजू शेकड्याने भेटतात. प्रत्येकाला मदत करणे वा भीक देणे शक्य नसतेच. तरीही माणुसकी म्हणून वा पुण्य कमवायच्या कल्पनेतून आपण आपल्यापरीने जमेल ते करतोच. पण त्यातही मग अश्या ढोंगी भिकार्‍यांचे अनुभव, म्हणजे इतक्यांपैकी एखाद्याला निवडून त्याला केलेली मदतही फुकटच. आपल्या कोणीतरी फसवून लुबाडल्याची चरफड तर होतेच (भले ती रक्कम दोन-पाच रुपयांची का असेना) पण त्याचबरोबर ते पैसे मग एखाद्या खर्‍याखुर्‍या गरजवंतालाच दिले असते हि हळहळही असतेच.

इतर पर्यटनस्थळी स्थानिक लोक पर्यटकांना गंडवायला बघतात आणि इथे मुंबईत बाहेरचे लोंढे येऊन स्थानिक मुंबईकरांना कसा गंडा घालता येईल या धंद्याला लागतात. त्यामुळे इथे मदत हि नेहमी जपूनच करावी लागते. अर्थात माझे अनुभव मुंबईचे म्हणून मी मुंबईचा उल्लेख केला, पण कमीजास्त प्रमाणात जगभरात हे आढळत असेलच.

तरी याबाबत नेमके काय धोरण ठेवावे, मी अजूनही साशंक आहे. म्हणजे शंभर ढोंग्यांना भीक द्यावी लागली तरी चालेल मात्र एक गरजू उपाशी नाही राहिला पाहिजे, की राहिलाच एखादा गरजू उपाशी तरी चालेल पण कोणाच्या ढोंगाला आपण बळी पडता कामा नये ?? काय करावे ??

आभारी आहे,
ऋन्मेऽऽष

Group content visibility: 
Public - accessible to all site users

पैसे काढ्ण्याचा अजुन एक प्रकार आहे.......माझ्या बाबाना आलेला अनुभव........सकाळी भाजी घेत असताना १.सभ्य कपडे घातलेला माणूस आला ... हातात पावती पुस्तक.....म्हणाला नमस्कार.. मी XXXX( आड्नाव) ....कस बर आहे ना... मुलगा काय म्हणतोय तुमचा???? बाबा शान्तपणे " मला एक मुलगी आहे मुलगा नाही"....हा XXX पुढे " आमच्या गलीत देवीचा जागर आहे.. २५० ची पावती फाड्तो "..... बाबा " माझ्याकडे पैसे नाहीत" पुन्हा XXX " ठिक आहे १०० ची फाडा".....बाबा " माझ्याकडे पैसे नाहीत".... अस करत तो माणूस ११ रुपयावर आला. ......बाबा बिनधास्त नाहीवर ठाम .... ......

देवीला देणगी द्यायची असेल तर ती देवळात जाउन देता येते. आणि लोकाच्या श्रद्धेचा अस गैरफायदा घेउन अशी लोक पैसे उकळ्तात.. आणि लोक पण भीडेखातर देतात.

घरात पण येतात हि लोक.
माझे मामा बाहेर अंगणात बसले होते. त्यांना निट चालता येत नाही. एक माणूस आला आणि म्हणाला हि साहेब गाडीतल पेट्रोल संपल आहे जरा पैसे देता का ? वयोमानानुसार त्यांचे मन द्रवले कि आजून काही त्या माणसाने आर्जवे केली ते माहित नाहीत. पण मामा आत गेले & बेडरूम मधल्या कपाटातून पैसे काढत होते . तर हा माणूस आत गेला आणि त्याच्या हातात होते ते सगळे पैसे घेवून गाडीला किक मारून पळून गेला.
नशीब एवढेच कि त्यांना धक्का वैगरे मारला नाही . नाहीतर एक म्हणता एक झाले असते.

देणगी मागणे, मंदिराचा जीर्णोधार, उपचारासाठी मदत, अनाथ आश्रमासाठी मदत हे तर नेहमीचेच आहे. ह्या लोकांकडे पावती पुस्तक असते.पलीकडच्या गल्लीतील बंगले वाल्यांनी किती शे रुपयांची मदत केल्याचे दाखले पण असतात.

काल अजून एक अनुभव आला.
(देवा, जर याच स्पीडने अनुभव यायला लागले तर लोकांना मी फेकतोय असेच वाटावे)
असो, तर हा देखील ट्रेनमधीलच अनुभव. त्याचे झाले असे, गर्दीची वेळ नसल्याने आणि उतरणारे-चढणारे फारसे नसल्याने मी आरामातच ट्रेन पकडली. मी वर चढताच ट्रेन सुटली. चार पावले संथपणे चालतो न चालतो तोच मागून धाडकन आवाज आल्याने वळून पाहिले तर एक मळलेल्या कपड्यातील इसम धावत्या ट्रेनमध्ये उडी मारून चढलेला. त्याचा अवतार पाहून नेहमीसारखाच मनात पहिला विचार हाच आला की चढला अजून एक फुकट्या फर्स्टक्लासची गर्दी वाढवायला. मी जागेवर स्थानापन्न झालो ते आणखी एक चमत्कार बघायला. आता त्याचा भिकारी झाला होता. डोळे आंधळे असल्यासारखे किलकिले आणि देहबोली म्हणाल तर गेले चार दिवस खायला न मिळाल्यामुळे अंगात जराही त्राण नसल्यासारखी, जणू कधीही कोसळून पडेल. रांगत रांगत चालत नव्हता वा हातात आंधळ्याची काठी घेतली नव्हती एवढेच काये ते. पण चेहर्‍यावरचे भाव मात्र तेच तसेच दिनवाणे. मग काय, आता माझी सटकली रे. मी त्याला भीक द्यायचा प्रश्नच नव्हता पण इतर कोणीही देऊ नये असेही वाटले. मी शेजारच्या एकदोन माणसांकडे पाहत मोठ्याने म्हणालो, " चु # #, अभी ये चलती ट्रेन मे कूद के चढा और अभी अपने को चु # # बना रहा है" (शिवीगाळ बद्दल क्षमस्व, ऋन्मेष) पण मग आमच्याइथून काही मिळणार नाही हे ध्यानात येऊन तो गप मुकाट (मला खुन्नस वगैरे न देता) पुढच्या कंपार्टमेंटकडे वळला.

Pages