आकांताआधी..

Submitted by भारती.. on 5 August, 2014 - 12:17

आकांताआधी ..

( मत्तकोकील वृत्त : गालगा ललगालगा ललगालगा ललगालगा )

वाट ही तिमिरातली दरडीतली चिखलाळल्या
रोखती सरसावती जणु भोवती भयसावल्या
रान निर्भर होउनी सर प्राशते चहुबाजुनी
गारशा झुळुकेत दाटत शीळ कर्कश कोठुनी

श्वास टाकत ही कुणी श्रमली व्यथा शिलगावली
क्षीणशी ठिणगी तरंगत एक अंधुक चालली
एक फिक्कट धूम्ररेघ पुढेपुढे उमटे विरे
जाग आणिक ना, अनावर थेंबकाजळ पाझरे

वाट ही दरडीतली वळते जिथे सखलाकडे
गाव दूर दरीतले दिसते जरा नजरेपुढे
काटक्या विझल्या चुलीतच, उंबरे चिडिचुप्पसे
कोणता अपराध सोसत रान झिंगत गप्पसे

दूरदूरच गाव, तो पुढची विडी शिलगावतो,
‘’मी पहाटत गाठतो घर’’ हे मना समजावतो ..

-भारती बिर्जे डिग्गीकर

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

श्वास टाकत ही कुणी श्रमली व्यथा शिलगावली
क्षीणशी ठिणगी तरंगत एक अंधुक चालली<<<

काटक्या विझल्या चुलीतच, उंबरे चिडिचुप्पसे
कोणता अपराध सोसत रान झिंगत गप्पसे <<<

माहौल बनानेवाली लाइने! सुंदर!

रान निर्भर होऊनी सर प्राशते चहुबाजुनी<<< वृत्तासाठी होनी करावे लागेल Happy

काहीशी गूढ म्हणता येईल अशी ही तुमची पहिलीच रचना वाचतो आहे. अर्थाचे अनेक पदर भेडसावत आहेत, पण अतिविचार तर होत नाहीये ना? या शंकेने जो दिसतो तोच अर्थ घ्यावा असेही वाटत आहे. छोटे सुनीत असले तरीही हळूहळू रंग गहिरे होत गेले आहेत. या डीटेलिंगमधली खासियत खास सिग्नेचर स्टाईलमधली.

चिखलाळल्या.... वेगळा शब्द.. वाचायलाही.

<<क्षीणशी ठिणगी तरंगत एक अंधुक चालली>>... इथे जरा रीपीटेशन वाटले.

>>><<क्षीणशी ठिणगी तरंगत एक अंधुक चालली>>... इथे जरा रीपीटेशन वाटले.<<<

मला असे वाटते की ह्या ओळीत 'एक' ह्या शब्दाऐवजी 'होत' हा शब्द अधिक चपखल झाला असता.

कृपया गैरसमज नसावा भारती, निव्वळ समोर आलेल्या रचनेवर बिनदिक्कत मत देण्याचा अधिकार ह्यापलीकडे काहीही करत नाही आहे मी! Happy

मस्त ! अमेय यांनी म्हटलंय त्याप्रमाणे थोडी गूढ आणि भयभीत मन:स्थितिकडे नेणारी रचना पहिल्या तीन कडव्यांमध्ये चढत्या भाजणीने दृश्य रेखाटत जाते.... आणि "दूरदूरच गाव, तो पुढची विडी शिलगावतो" या ओळीवर येताच वाचणारा भानावर येऊन एकदम मिळालेल्या कलाटणीने काहीसा चकित होतो.... सुनीत शैलीला अपेक्षित परिणाम अचूक साधलाय !

ओहोहो... भारती कसं शब्दचित्र आहे... पण त्याहीपलिकडे आहेच.
सरळपणे प्रतिसाद म्हणून काही नेमकं सुचू नये असं करून ठेवतेस.
मॅड.

कठिण वृत्त हाताळण्याचे तुमचे हे कसब पाहिले काव्यातला खरा आनंद कशात आहे हे जाणवते.....किती लिलया हाताळता तुम्ही. सहजता जाणवते प्रत्येक शब्दात प्रत्येक वाक्यात......सलाम

स्वामीजी आभार, हे वृत्त तुमच्यामुळेच कळलं . याबद्दल अधिक माहितीही मिळाली.
अमेय, बेफिकीर, आभार, मन:पूर्वक केलेल्या रसग्रहणासाठी आणि हो, अगदी बरोबर त्रुटी Happy ! बेफिकीर, तुमचा शब्दही अधिक सुंदर बसेल तिथे . पण राहू दे ही त्रुटी अशीच ,वृत्तदोष असता तर बदल केला असता Happy
दाद, दिनेश, संतोष , भरत , जाई ,तुमच्या प्रतिसादांमुळे वाटतं , याचसाठी केला होता.... !

श्रीयु,>>दीदी.तो कोण आहे सांग ना..>>

अमूर्तचित्र अधुरे आकार आणि रंगखेळ वागवतं, अर्थाची हुरहूर लावण्यासाठी. त्याचवेळी एका घटनेचे किती अर्थ असतात हेही जाणवून देण्यासाठी. ती हुरहूर तुला बेचैन करते आहे. तर हे एक कवितेतलं कथानक आहे, अलिकडच्या सत्य घटनेतील लोकांनी सांगितलेल्या अनुभवांवर आधारित..आकांत पुढे मांडलेला आहे नियतीने , ती दुर्घटना पहाटेच्या पोटात लपलेली आहे, पण तुला सांगू, निसर्ग आणि भवताल दुर्घटनेचे संकेत देत असतात, ते या कवितेत आहेत..

तो कोण आहे ? तो एक श्रमिक साधा माणूस आहे, थकून बिडी ओढत पहाटेपूर्वी पावसातच घराकडे रानातून निघालेला.. तो शेतकरी असेल किंवा कुणीही, पण उघड आहे की तो स्थानिक आहे तिथला,त्या वातावरणाला , त्या रस्त्याला तो परिचित आहे.

पण त्यालाही परिचित नाही नियतीचा कठोर निर्णय, पुढे वाढून ठेवलेला आकांत. ते गाव, ते घर तो कधीच गाठणार नाहीय, कारण ते शिल्लकच नसेल उत्पात होऊन.तोही शिल्लक राहिला तर नशिबानेच..

चिखलाळल्या , थेंबकाजळ ...नवे आणि सुंदर शब्द .

वाट ही दरडीतली वळते जिथे सखलाकडे
गाव दूर दरीतले दिसते जरा नजरेपुढे
काटक्या विझल्या चुलीतच, उंबरे चिडिचुप्पसे
कोणता अपराध सोसत रान झिंगत गप्पसे

वा..व्वा !

अर्थाचे अनेक पदर भेडसावत
आहेत<<<अगदी ! अगदी !

Happy

अभिनन्दन
वाचकाला अर्थाची हुरहुर लावण्यात यशस्वी झाल्याबद्दल!!!
गोडी अपूर्णतेची .....
कविता आवडली