अन्या - २०

Submitted by बेफ़िकीर on 3 August, 2014 - 02:48

अंजना!

पूजा उपलेंचवारसोबत आश्रमात आलेली स्त्री अंजना असणार हे अन्याला माहीत होते. कमालीच्या उत्सुकतेने तो तिची वाट पाहात होता खरे तर! पण चेहर्‍यावर अध्यात्मिक भाव धारण करून बसलेला होता.

अल्पवयात अन्याने दुनिया पाहिली होती. जगाकडून पराकोटीचा तिरस्कार, घृणा मिळालेली होती. चोर्‍या केलेल्या होत्या. उपासमार आणि मारहाण रोजची होती. नंतर जगाला उल्लू बनवले होते. नंतर जगाने सुखाची बरसात केलेली होती. इग्या आणि पवारचा काटा काढला होता अन्याने! तावडे पाटलाला अद्दल घडवली होती. मशालकरला रतनकरवी ढगात पाठवला होता. लाहिरीकडून हिंदी वक्तृत्वकलेचे, व्यायामाचे आणि अध्यात्मिक वर्तनाचे धडे घेतलेले होते. समाजकार्य केले होते. बिबट पालन केंद्राचे लोकेशनच बदलले होते. सुकन्या मशालकरची स्वप्ने धुळीला मिळवली होती. रतनला वाळीत टाकून पुन्हा वलयांकित केले होते. एडामट्टी मणीचा पाहिजे तसा उपभो घेतला होता. सातारा गाजवला होता. मोबाईल फोनवरून सूत्रे हालवली होती. स्वतःच्या हातून स्वतःच्याच आईचा झालेला खून पचवला होता. त्या खुनाच्या आरोपातून सुटका करणार्‍या नाईकांनाच ऐनवेळी छुपा प्रचार करून निवडणूकीत हारवले होते आणि त्यांचे राजकीय करिअर जवळपास संपुष्टात आणले होते. एरवी छाडमाड स्थानिक नेता म्हणून मिरवणारा बागवान आता अन्याच्या कृपेने सत्ताधीश झाला होता. पूजा उपलेंचवारसारखी स्त्री स्वतःहून समर्पित तर झालीच होती वर आणखी एका मैत्रिणीला घेऊन आली होती. धनाच्या राशी आश्रमात ओतल्या जात होत्या. राजकारणाच्या वरच्या वर्तुळात अन्याच्या नावाला महत्व प्राप्त झाले होते. त्याचा पाठिंबा मिळणे हे सत्तेत येण्यासाठी आवश्यक ठरत होते. रतन आणि मणी आश्रमातून निघून गेल्या होत्या आणि आता त्यांची गरजही वाटेनाशी झाली होती. मणीला म्हणे दिवस गेलेले होते. अन्याला फरक पडत नव्हता.

अन्याची लोकप्रियता त्याच्या प्रत्येक पापागणिक वाढतच चालली होती. आता पेपरमध्ये त्याचे सुविचार छापून येणे, वाहने, सार्वजनिक जागा, हॉटेल्स अश्या ठिकाणी त्याची छायाचित्रे चिकटवलेली असणे हे आम झाले होते.

आयुष्यात शॉर्टकट्सवर विसंबून असलेल्या अडाणी व कर्तृत्वशून्य जनतेला डोके टेकायला एक पाऊल मिळाले होते अन्याच्या रुपाने!

पण एक यंत्रणा पुण्यात बसून ह्या सगळ्याचा विचार करत होती. एक यंत्रणा वीर गावात बसून ह्या सगळ्यावर विचार करत होती. आणि एक यंत्रणा डोंगरात राहून विचार करत होती.

पुण्यात सोपान उदयचे संस्थापक मालुसरे आपल्या खुर्चीत बसून गंभीरपणे सगळे ऐकून घेत होते. एडामट्टी मणीने साद्यंत हकीकत त्यांना ऐकवली होती. ती स्वतः सोपान उदयच्या विचारांपासून कश्यामुळे दूर गेली, पुन्हा त्या विचारांच्या प्रभावाखाली येण्यास अन्याच्या आईचा अनैसर्गीक मृत्यू कसा कारणीभूत ठरला वगैरे सर्व काही तिने मालुसरेंना सांगितले. ह्या सगळ्या प्रकारात तिचे आणि अन्याचे शरीरसंबंध आल्याचे व तिला दिवस गेल्याचेही तिने कबूल केले. अन्याच्या आश्रमात काय काय गैरप्रकार घडतात आणि प्रतिमा सुधारत राहावी ह्यासाठी मुद्दामहून काय काय चांगले प्रकार केल्याचे दाखवले जाते हे मणीने मालुसरेंना ऐकवले.

ह्या सगळ्या प्रकारात अंधश्रद्धा किंवा जादू वगैरेचा फारसा समावेश नव्हता. चमत्कारांचा परिणाम नगण्य होता. जे होते ते निव्वळ अडाणी समाजाच्या भोळसट श्रद्धेमुळे व नगाला नग हवा तसा डोके टेकायला एक जिवंत अवतार हवा ह्या हेतूने झालेले दिसत होते. सोपान उदयने ह्यात पडावे असे फारसे काही नव्हते. मात्र काळ्या पैश्यातील व्यवहार, अनेक गुन्हे आणि अनैतिक आचार हे सगळेच तेथे चाललेले दिसत होते. निव्वळ अंधश्रद्धा नष्ट करणे हा संस्थेचा हेतू होता हे खरे होते. त्यामुळे आश्रमात चाललेल्या गोष्टी ह्या बेकायदेशीर होत्या हे माहीत असूनही त्यात स्वतःहून पडण्याचे संस्थेला तसे कारण नव्हते. ती टीप योग्य त्या अधिकार्‍याला दिली तरी पुरण्यासारखे होते. पण मालुसरे अधिक खोल जाऊन विचार करत होते. अन्याचे ह्या पदाला पोचणे ह्यामागे भोळ्या जनतेचा विश्वास बसेल असे काही ना काही खुळचट चमत्कारच कारणीभूत असल्याचे त्यांना आठवत होते. मागे जीप घेऊन तालुक्याच्या ठिकाणी अन्याचे भांडे फोडायला गेलेले असताना तेथून त्यांच्या सहकार्‍यांना धूम ठोकून पळून यावे लागले होते. हा अपमानही मालुसरेंच्या मनात सलत होताच.

एक माणूस खुळचट चमत्कार दाखवतो आणि समाजाचा देव म्हणून जगू लागतो हादेखील समाजाच्या अंधपणाचाच नमुना होता. हा प्रकार काठी किंवा लाथ मारून रोग किंवा व्याधी बरी करण्यासारखा नसेलही, पण हा मुळातच एक रोग होता. मालुसरेंचे मन त्यांना सांगत होते की आपले कार्यही अधिक व्यापक व्हायला हवे आहे. निव्वळ भांडे फोडणे इतकेच आपले कार्य असू नये. ज्या जनतेला विशेष काही चमत्कार पाहायची गरजही भासत नाही आणि तरीही ती जनता एका अडाणी माणसाला देवपदी बसवते त्या जनतेला डोळस करणे हेही आपले कार्य आहे.

एडामट्टी मणीच्या कथनातील प्रामाणिकपणा जाणवत असल्यामुळेच मालुसरेंनी तिला पुन्हा संस्थेच्या कार्यात स्वीकारलेले होते. मात्र आता तिच्या कार्यकक्षा अर्थातच मर्यादीत केल्या गेल्या होत्या. एक तर दोन महिन्यांनंतर ती काही काळ काम करू शकणारच नव्हती आणि दुसरे म्हणजे तिची पूर्वीची निष्ठा तिला सिद्धही करावी लागणार होती.

एडामट्टी मणीच्या अनुपस्थितीत लहानश्या युगीने काम बर्‍यापैकी सांभाळलेले होते. लोणंदला राहून दक्षिण व पश्चिम महाराष्ट्रामधील कार्यभार सांभाळणारी व संस्थेतील एक वरिष्ठ अधिकारी आशा पाटील आणि युगी अश्या दोघीही आत्ता मालुसरेंसमोर एडामट्टी मणीच्या शेजारी बसलेल्या होत्या.

ही पुण्यात बसलेली यंत्रणा एक योजना आखत होती. अवलिया बाबा ह्या नावाने वावरणार्‍या ह्या समाजकंटक माणसाचा पर्दाफाश करण्याची योजना! त्यासाठी मणीने ज्या पूजा उपलेंचवारची माहिती सांगितली होती तिच्यामार्फत आशा पाटीलने आश्रमात प्रवेश घ्यायचा असे ठरवलेले होते. दोन अडीच महिने आश्रमात राहून आपली निष्ठा सिद्ध करायची. अन्या पूर्ण कह्यात आला की स्वतःमार्फत संस्थेतील काही महत्वाचे व अनुभवी पदाधिकारी आश्रमात घुसवायचे. आगामी दत्तजयंतीच्या मुहुर्तावर अवलिया बाबा भाविकांना एक महान चमत्कार दाखवणार अशी हवा निर्माण करायची. कसला चमत्कार, कोणता चमत्कार हे गुप्त ठेवायचे. समांतररीत्या आश्रमापासून थोड्याच अंतरावर एक चौथरा बांधायला घ्यायचा. जोरदार हवा करायची की दत्तजयंतीला प्रत्यक्ष तो चमत्कार स्वतःच्या डोळ्यांनी पाहायला उपस्थित राहा. अन्याला आशाने काहीतरी भलतेच सांगून ठेवायचे चमत्कार म्हणून! आणि ऐन सोहळ्याच्या दिवशी जाहीर करायचे की आज महाराज जिवंत समाधी घेणार आहेत कारण त्यांचे अवतार्कार्य संपवायचा त्यांना आदेश मिळालेला आहे. तुडुंब गर्दीत नक्कीच पोलिस अन्यापर्यंत पोचून हा प्रकार रोखायचा प्रयत्न करतील. त्याक्षणी भाविकांच्या भावनांना हात घालायचा की पोलिस हे दैवी कृत्य रोखत आहेत व स्वतः अवलिया बाबा समाधी घेऊ इच्छित आहेत. प्रचंड गोंधळ उडाला की खुद्द मालुसरेंनी एका बाजूने मईकवरून अन्याची नाचक्की सुरू करायची की पोलिसांचे कव्हर घेऊन हा भोंदू स्वतःला वाचवत आहे. हिम्मत असेल तर समाधीत प्रवेश घेऊन दाखव वगैरे! भावना दुखावल्या गेल्या की दबाव वाढेल. ना अन्या समाधीत जायला तयार होईल ना त्याला बाहेर राहायला गर्दी मान्यता देईल. एक तर अन्याला आत जावे तरी लागेल किंवा आपण खोटे आहोत हे मान्य तरी करावे लागेल. ह्या असल्या कामाच्या दृष्टीने युगी अजून लहान व अननुभवी होती, त्यामुळे तिला नुसतेच सातार्‍यात स्थलांतरित होऊन कसे ना कसे आश्रमाशी निगडीत होऊन लक्ष ठेवण्याचे काम देण्यात आले. आणखीन कमीतकमी चार व्यक्ती आश्रमात घुसवणे व त्यांना निवडक पदांवर नेमवून घेणे आवश्यक होते. आशा हे काम लीलया करणार होती. आश्रमातील माणसे फोडण्याची योजना मात्र पूर्णपणे फेटाळण्यात आली होती. मालुसरेंना कोणताही धोका नको होता ह्यावेळी! हे कार्य म्हणजे संस्थेच्या कारकीर्दीतील आजवरचे सर्वात मोठे कार्य ठरणार होते.

एडामट्टी मणीचे अश्रू थांबत नव्हते आणि तिचे कोणी सांत्वनही करत नव्हते. तिच्याबदल सहानुभुती वाटत नव्हती कोणालाही! फक्त तिला पुन्हा सामावून घेण्यात आले होते इतकेच!

अबोल झालेली युगि मान खाली घालून निश्चलपणे बसली होती. मालुसरेंच्या सेवकाने सर्वांसाठी गवती चहा आणला. चहाचा घोट घेऊन आशा पाटीलने पूजा उपलेंचवारच्या घरी फोन लावला व तिला सांगितले......

"आज मला जरा गावाला यायला लागलंन्, उद्या जाऊया काय बाबांच्या दर्शनाला?"

पूजा उपलेंचवारने आनंदाने होकार दिला व आशा पाटीलने फोन ठेवला.

युगीच्या पायाखालची जणू वाळूच सरकली. ज्या आश्रमात जाऊन एडामट्टी मणीसारखी व्यक्ती विचारांपासून ढळते, पूर्णपणे भलत्याच मार्गाला लागते, गरोदर राहते आणि शेवटी पश्चात्ताप पावून परत संस्थेत येते, त्या आश्रमात आशाताई स्वतःहून निघाल्या आहेत? आणि आपणही त्या आश्रमाशी कसे ना कसे निगडीत व्हायचे आहे?

ही एक अत्यंत गुप्त मीटिंग होती...... आणि त्याहूनही गुप्त मीटिंग चालू होती वीर गावात......

=============

सुकन्याताईंच्या घरामागे ज्या जागेत मशालकरांचा झोपाळा होता तेथे आता नुसतीच बसण्याची व्यवस्था होती. त्या जागेत आता सुकन्या मशालकर, तावडे पाटील आणि स्वतः नाईक बसलेले होते. सुकन्या सगळ्यात लहान आणि अननुभवी असली तरी तिच्या धमन्यांत मशालकरांचे रक्त आहे हे नाईक आणि तावडे पाटील विसरलेले नव्हते.

वीर गाव आणि तालुका ह्यांच्यातील दळणवळण, रस्ता व त्यांचे सातार्‍याशी जोरकस कनेक्शन लावणे ह्या नियोजनाबाबत चर्चा आहे असे पसरवण्यात आले होते.

प्रत्यक्षात चर्चा सुरू होती ती अवलिया बाबांचे हुकुमी कार्ड हातातून निसटलेले असून ते पुन्हा हातात कसे येईल ह्यावर! हे हुकुमी पान सातार्‍यात असल्यामुळे व सातार्‍यातील सत्ता आता बागवानाकडे असल्यामुळे ते पान ह्या तिघांपैकी कोणालाच वापरता येत नव्हते.

सुकन्याच्या उपस्थितीचा विचारही न करता नाईक शिवीगाळ करत होते. त्यांनी अन्याला अन्याच्याच आईच्या खुनातून वाचवलेले असूनही अन्याने मात्र ऐनवेळी विकृत धूर्तपणा दाखवून नाईकांच्याच पैशांनी नाईकांनाच हारवलेले होते. हा वर्मी लागलेला घाव नाईक उभ्या जन्मात विसरू शकले नसते. मशालकरांच्या मृत्यूत अन्याचा व रतनचा हात आहे ही बातमी त्या तिघांना तर केव्हापासूनच ज्ञात होती. त्यामुळे सुकन्या फार आधीपासूनच अन्याच्या जीवावर उठायला तयार होती. तावडे पाटील मात्र धोरणी होता. त्याला बिबट पालन केंद्र मिळालेले होते. तेवढे एक अन्याने बरे केले होते त्याच्यामते! तसेच, तावडे पाटलाला हेही माहीत होते की अन्यासंदर्भात एकत्र झालेले आपण तिघे हे काही कायमस्वरुपी मित्र नाही आहोत. वेळ पडली तर ह्यांच्यातल्याच एखाद्याच्या खांद्यावर पाय ठेवून वर चढावे लागणार आहे, तेव्हा फार झोकून देण्याचे कारण नाही. परस्पर अन्या हाताशी येत असला तर उत्तम!

एक विशिष्ट योजना आकाराला येत होती. दत्तजयंतीच्या दिवशी तालुक्याच्या गावी अवलियाबाबांची वार्षिक पालखी सातार्‍याहून येत असे. यंदाच्या वर्षी महोत्सव जाहीर करायचा. तुफान गर्दी उभी करायची. गावोगावीची जनता, पत्रकार वगैरे जमा झाले की भर सभेत बिनदिक्कतपणे निवेदन द्यायचे की आजच्या सुमुहुर्तावर अवलिया बाबा स्वेच्छेने सातार्‍याहून कायमचे तालुक्याला वास्तव्यास येत आहेत. गर्दीतील आपणच घुसवलेले शेकडो भाविक प्रचंड जयजयकार करतील. दबाव वाढेल तसे मग अन्या काहीच म्हणू शकणार नाही. तावडे पाटलांनी तालुक्यात महाराजांसाठी सातार्‍याहूनही मोठा आश्रम बांधायची घोषणा करायची. सर्वत्र हवा निर्माण करायची की आता बाबा तालुक्यातच राहणार! अन्यालाही भुरळच पडली पाहिजे इतका मोठा देखावा करायचा. आणि एकदा का अन्या तालुक्यात सेटल झाला की मग त्याला नजरकैदेत ठेवल्यासारखे करून त्याच्याकरवी आपली कामे करून घ्यायची. त्याचबरोबर त्यालाही भयंकर अद्दल घडवायची.

पुण्यातील एक संस्था अन्याचे भांडे फोडायची योजना करत होती. वीर गावात एक त्रिकूट अन्याला पुन्हा नियंत्रणात आणू त्याला अद्दल घडवायची योजना करत होते......

आणि त्याच संध्याकाळी...... तालुक्याच्या आणि वीर गावाच्या मधोमध असलेल्या, भयंकर झाडीने वेढलेल्या डोंगराळ प्रदेशात एक तिसरीच योजना विचारांत घेतली जात होती.

============

ही योजना महाभयंकर होती......

तालुक्याला पालखी निघण्यापूर्वी सातार्‍यातील आश्रमात दत्तजयंतीनिमित्त जो प्रचंड मोठा सोहळा होणार होता, त्या सोहळ्याला भाविकांची अभूतपूर्व झुंबड उडणार हे ह्या अंधारात बसलेल्या पाचही जणांना माहीत होते. गांजाच्या नशेत हे पाचहीजण अंधारातच बघत कुजबुजत होते. शेवटी योजना ठरली. चार भल्या मोठ्या पातेल्यांमध्ये जी बुंदी ठेवली जाईल तिच्यात वीष कालवायचे. कसे कालवायचे, कोणी कालवायचे हे नंतर पाहू, पण कालवायचे. ते वीष खाऊन विषबाधा होऊन अनेक भाविक मेले पाहिजेत. अवलियाबाबाचा अवतार संपुष्टातच यायला हवा त्या घटनेने! भले निष्पाप नागरीक मेले तरी चालतील, पण अन्याला आयुष्यातून कायमचा उठवायचा म्हणजे उठवायचा.

ते पाच जण होते......

इग्या, पवार, भामाबाई, रतन आणि लाहिरी महाराज!

दत्तजयंतीला अडीच महिने राहिलेले होते...... आणि आजच आशाचा आश्रमात प्रवेश झालेला होता......

योजना कोणाचीही सफल झाली तरी प्रश्न अन्यासमोरच उभा ठाकणार होता......

की ह्याहीवेळी...... आजवर दिली तशीच...... नशीब अन्याचीच साथ देणार होते?

=====================

-'बेफिकीर'!

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

बेफिकीर, आता आन्याची ष्टोरी वयात आली म्हणायचं! Happy भामाबाई आणि युगी कोण हे साफ विसरून गेलो होतो. मागचे भाग चाळून काढले मगच संगती लागली. पुढील भाग जरा पटापट येऊ द्या. Happy
आ.न.,
-गा.पै.

छान झालाय हाही भाग. पण बर्‍याच गोस्टी विसरायला झाल्या होत्या. Sad

मशालकरांच्या मृत्यूत अन्याचा व रतनचा हात आहे ही बातमी त्या तिघांना तर केव्हापासूनच ज्ञात होती. त्यामुळे सुकन्या फार आधीपासूनच अन्याच्या जीवावर उठायला तयार होती. << सुकन्याने रतनला मदत केली होती ना?