एक होता गाव

Submitted by मंदार खरे on 31 July, 2014 - 05:00

एक होता गाव
माळ(रा)नी त्याचे ठाव
सात-आठ्शे घरे त्यात
सगळे सवे रंक राव

आदिवासींचा नव विकास
होणार होता कायापालट
बांधले इमले डोंगरात
रान करुन भुई सपाट

येत होती लाल माती
गावात कधी कधी घसरुन
होते गावकरी गाफिल
पथारी पाय पसरुन

एस टी प्रात:काळ गावी आली
प्रवाशांना शोधी बोलावुन
अख्खा गाव की हो गेला
डोंगराच्या कुशीत सामावुन

सगळाच चिखल डोंगर
माणसे जनावरर्ही चिखल
कुणी कुणा धीर द्यावा
कुणी घ्यावी कुणाची दखल

किती स्वप्न ती भंगली
किती नातीगोती पांगली
कुणी सुर्य त्यांना दाखवला
उगवण्या आधीच ग्रहणला

जिणं असं क्षण भंगुर
किड्या मुंग्यापरी झालं
कशाला केली रानतोड
कधी कोणाचं भलं झालं?

किती चढविले असे नरबळी
माणसा आता तरी लाज
केलास जर निसर्गाचा घात
उलटेल तो असा सव्याज

-मंदार खरे

Group content visibility: 
Public - accessible to all site users