गुंते तमाम माझे उकलून पाहिले!

Submitted by profspd on 7 July, 2014 - 12:56

गुंते तमाम माझे उकलून पाहिले!
सारेच श्वास माझे उसवून पाहिले!!

तू अंबरी मनाच्या पळभर लकाकली.....
निमिषात त्याच तुजला निरखून पाहिले!

आयुष्य निसटलेले न्याहाळण्यास मी....
उलटून पाहिले ते सुलटून पाहिले!

होतोच लक्ष्य काही केल्या अखेर मी....
मी नेम पारध्याचे चुकवून पाहिले!

करतात फस्त शेते माझ्या मनातली....
पक्ष्यांस मी स्मृतींच्या उडवून पाहिले!

काळोख गच्च होता त्यांच्यात साठला....
मी झगमगाट त्यांचे जवळून पाहिले!

मी दलदलीत आर्थिक फसलो पहा पुरा ....
मी कैकदा स्वत:ला उभवून पाहिले!

त्याच्या उरात होती माझीच स्पंदने....
तो एक यार होता, कवळून पाहिले!

आलीच मोहजाले वाटेत आडवी.....
रस्ते कितीकदा मी बदलून पाहिले!

तू एक भेटवस्तू होती दिली मला.....
ते चक्क हृदय होते, उघडून पाहिले!

प्रत्येक शेर माझा वाटे अपूर्ण का?
पर्याय कैकवेळा सुचवून पाहिले!

मी नीलकंठ झालो साक्षात शेवटी....
मी वीष माणसांचे पचवून पाहिले!

-------प्रा.सतीश देवपूरकर
फोन नंबर: ९८२२७८४९६१

Group content visibility: 
Public - accessible to all site users

तू एक भेटवस्तू होती दिली मला.....
ते चक्क हृदय होते, उघडून पाहिले! <<<<<<मस्त धक्कातंत्र बाकी हल्ली तुम्ही ज्या शेरात चक्क हा शब्द वापरला आहे ते सगळे हिट ठरले आहेत

प्रत्येक शेर माझा वाटे अपूर्ण का <<<< हाही आवडला प्रामाणिक शेर !!

उभवणे म्हणजे उभे राहणे/ स्थापित होणे
लाक्षणीक अर्थ दारिद्र्य किंवा आजार यांतून सुटका होणे!

ओके

करतात फस्त शेते माझ्या मनातली....
पक्ष्यांस मी स्मृतींच्या उडवून पाहिले!

काळोख गच्च होता त्यांच्यात साठला....
मी झगमगाट त्यांचे जवळून पाहिले!

व्वा