आभाळ

Submitted by मिल्या on 2 July, 2014 - 07:30

काल माझ्या अंगणात आभाळ आलं होतं.
त्याला पाहून माझा आनंद गगनात मावेना.

मी भारावून त्याच्या पाया पडलो.... त्यानेही माझ्या पाठीवरून हात फिरविला.

उभ्या अंगातून एक वीज सळसळत गेली...
पण ही वीज जाळणारी नव्हती तर उबदार होती...
अगदी गुलजार साहेबांच्या एखाद्या तरल कवितेसारखी.

मंत्रमुग्ध अवस्थेत मी चाचरतच आभाळाला म्हटलं, " माझ्याकडे तुला द्यायला काहीच नाही पण..."

आभाळ प्रेमळपणे हसलं अन् म्हणालं, " अरे बाळा, ... पाऊस कधी खालून वर जातो का? "

असं म्हणत त्याने माझा हात त्याच्या मुलायम हातात घेतला, गालावर प्रेमाने थोपटलं आणि एक पाऊस मला भेट म्हणून दिला.

कालपासूनचा प्रत्येक क्षण मी त्या पावसात चिंब भिजतोय...

आयुष्यात पुढे कितीही दुष्काळ पडला तरी पर्वा नाही...

कारण माझ्याजवळ आता माझा स्वत:चा असा पाऊस आहे.

काल माझ्या अंगणात आभाळ आलं होतं

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्तच रे मिल्या. त्या दिवशी गुलजारसाहेबांना तू व वैभव भेटुन आल्यानंतर चिंब भिजलेला मी बघीतला तुला. बाल्कनीची तिकीटे मिळाली म्हणुन खट्टु झालेला तू जेव्हा त्या पावसात नहालास तेव्हा खरच सातवे आसमाँमे था!! काय अप्रतिम झाला तो शो. Happy मेमोरेबल. Happy