विषय क्र. २ महाराज

Submitted by नितीनचंद्र on 25 June, 2014 - 12:08

औंधकरांच्या घरी महाराज आले आहेत अशी कुणीतरी बातमी देताच मी नारायणपेठेतल्या एका अपार्ट्मेटमधले औंधकरांचे घर शोधुन काढले. एक बेडरुमचा साधासुधा फ्लॅट त्यांच्या चाहत्यांनी आणि भोळ्या भाविकांनी भरुन गेला होता. हॉल मधल्या एका बेडवर महाराज बसले होते. शेजारी साखरफुटाणे ठेवलेले होते. महाराजांच्या अंगात कफनी होती. वय साधारण २० च्या आसपास. दाढी वाढलेली केस वाढलेले आणि मुद्रा प्रसन्न होती.

आला गेलेला महाराजांना नमस्कार करत होता. महाराज हात वर करुन आशिर्वाद देत होते. औंधकरांची आणि माझी जुजबी ओळख. मी जाताच औंधकरांनी माझी ओळख करुन दिली. माझी नोकरी हुद्दा याचबरोबर माझा ज्योतिषाचा अभ्यास आहे हे सांगायला विसरले नाहीत. महाराजांची माझी पहिलीच भेट असल्यामुळे मी जरा लांबुनच नमस्कार केला. माझा बुजरेपणा पाहुन महाराजांनी मला जवळ बोलावले. माझ्या डोक्यावर हात ठेऊन आशिर्वाद दिले. मला शेजारी बसवुन घेतले. औंधकरांची आणि त्यांची बहुदा नेत्रपल्लवी झाली असावी. औंधकरांनी महाराजांची विश्रांतीची वेळ झाली असे निवेदन केले. आलेले भक्तगण आणि शेजारी पाजारी हळु हळु निघते झाले. तरी लोचटासारखे एक दोन मागे होतेच. एकाने मुलाचे लग्न जमत नाही म्हणुन जन्मकुंडली महाराजांच्या पुढे केली. महाराजांनी कुंडली हातात घेऊन मला आज्ञा केली.

"बघा बर कधी योग आहे ? "

मलाही जरा अवघडल्यासारखे झाले.

"बघा बघा सांगा त्यांना. ताटकळले आहेत." महाराजांनी जरा मोठ्या आवाजात आज्ञा पुन्हा एकदा उच्चारली.

बाबांच्या चेहर्‍यावर भाव जरी सौम्य होते तरी आवाजात जरब होती. त्यांची आज्ञा टाळणे मला जरा अशक्यच झाले.

त्या व्यक्तीच्या चेहेर्‍यावरचे भाव मी न्याहाळत होतो. महाराज जणुकाही सर्वज्ञ आहेत आणि या पत्रीकेत जरी विवाहाचे कठीण योग असतील तरी महाराजांच्या कृपेने ते सौम्य होतील हा भाव होता.

"दत्त महाराज म्हणजे शंकरमहाराजांचे अवतार आहेत. त्यांनी आशिर्वाद दिला म्हणजे हे लांबलेल लग्न सहज जमेल. महाराज आपला हात पत्रिकेला लागला म्हणजे झाल." पत्रीका माझ्या हातात आल्यानंतर अनेक वेळा बहुदा सडेतोड भविष्य ऐकल्यानंतर त्या व्यक्तीचा हिरमोड होण्याआधीच त्याने माझ्या भविष्य कथनात फारसा रस नसल्याचे सुचीत केल्यामुळे मी पत्रीका फारशी न तपासता वर वर बोलायचे मनाशी ठरवले.

" या वर्षी योग आहेत." अस म्हणुन मी पत्रीका त्या व्यक्तीच्या हातात दिली. त्या व्यक्तीने महाराजांना पुन्हा नमस्कार केला. महाराजांनी आपला हात वर करुन " काही काळजी करु नका. होईल सगळ व्यवस्थीत "अस म्हणत त्यांना निघण्याची आज्ञा केली. ती व्यक्ती आणि त्यांच्यासोबत आलेली व्यक्ती बाहेर पडले.

आता औंधकर , दत्त महाराज आणि औंधकरांचे घरचे लोक तेव्हडे घरात शिल्लक राहिले. माझे काम झाले होते. मी निघायची चुळबुळ करु लागलो.

" भाऊ, आज जोगळेकर आपल्याबरोबर प्रसाद घेतील " दत्त महाराजांनी आज्ञा केली. औंधकरांचे भाउ हे खास घरगुती नाव. महाराजांनी घरात जेवण आहेना, जोगळेकर जेवलेतर चालेल ना असा कोणताच प्रश्न विचारला नाही
.
घरात एखाद्या व्यक्तीचे जास्त जेवण केलेले आहे ना हे विचारायचे माझ्या मनात आले. बोलुन चालुन आमचा कोकणस्थी बाणा. न सांगता जर अर्धा दिवस सुट्टी काढुन घरी आलो तर एक तर कॅन्टीनलाच जेऊन घरी जायच किंवा तिथे जेवायच मनात नसेल तर फोन करु घरी जेवायला येतोय अस सांगायचा आमच्या घरचा रितीरिवाज.

" हो - हो " भाउंनी मान डोलावली आणि ते बहुदा पत्नीला सांगायला आत गेले.

दत्त महाराजांनी मला हॉलचा दरवाजा लाउन घ्यायला सांगीतले.

"खिशात सिगारेट आहे का ?" महाराजांनी मला विचारताच मी चमकलो.

" यात काही विषेश नाही हो, तुम्ही आलात तेव्हाच माझ्या नाकाने तुमच्या अंगाला येणारा सिगारेटचा वास टिपलाय" महाराज हसत म्हणाले.

"काढा - काढा कोणता ब्रॅड आहे ? " महाराजांनी मला परत सांगीतले.

मी गोल्ड फ्लेकच पाकीट काढल. माझ्या हातुन पाकिट घेत महाराजांनी वेगाने सिगारेट घेतली. मी काड्यापेटीतली काडी पेटवली आणि पुढे केली. महाराजांनी जोरदार कश घेत जेव्हा इन करुन रंगविहीन धुर बाहेर सोडला तेव्हा मी ओळखल की महाराज दर्दी आहेत.

"दत्त महाराज शंकरमहाराजांचे अवतार आहेत. त्यांना सिगारेट वर्ज नाही" औंधकरांनी बाहेर येत त्यांच्या सिगारेटच्या व्यसनाचे समर्थन केले. हॉलला जोडुन असलेल्या खिडकीतुन धुर बाहेर जात होता आणि महाराज माझ्याकडे एकटक पहात होते. महाराजांनी सिगारेट ओढणे म्हणजे काहीतरी चुकीचे चालले आहे का अस माझ्या मनात तर चाललय का हे ते तपासत होते. नशीब मला त्यांनी ओढायला सांगीतली नाही.

"भाऊ,एक कागद आणा" सिगारेट ओढता ओढता भाऊंना आज्ञा केली. भाऊंनी लगेच एक फुलस्केप पान असलेली वही पुढे केली त्यासोबत एक पेनही पुढे ठेवले. महाराजांनी सिगारेट संपवली आणि पत्रीका लिहण्यासाठी प्रथम एका पानावर श्री लिहले. त्याखाली दत्तमहाराज लिहुन जन्म वेळ, जन्मस्थळ आणि जन्मदिनांक लिहले. मग सराईतपणे पत्रीकेचे १२ चौकोन काढताच मला जाणवले की यांचा ज्योतिषाचा मुलभुत अभ्यास असावा. पत्रीकेचे चौकोन संपले. त्यात हर्षल नेपच्युन आणि प्लुटो सहीत नवग्रहांची मांडणी केली. सोबत वक्री ग्रह असल्याचे काही ग्रहांच्या समोर पत्रीकेत नमुद करायला ते विसरले नाहीत.

मला वाटल संपले पण नाही. त्यांनी प्रत्येक ग्रहाचे अंश, कला विकला नक्षत्र आणि उपनक्षत्र जेव्हा त्या कागदावर लिहले तेव्हा मला समजले की त्यांना ज्योतिष विषयाची बरीच माहिती आहे. माझ्या हातात पत्रीका ठेवत महाराज म्हणाले "बघा, काय म्हणतात आमचे ग्रह ?"

आता मला काय सांगावे असे असा पत्रीका पहाण्याआधीच प्रश्न पडला होता. मी त्यांच्यावरची नजर कादुन आता पत्रीकेवर एकाग्र केली. महाराजांचे वय साधारण २०-२१ . इतक्या लहान वयात वैराग्य देणारे कोणते ग्रह आहेत म्हणुन मी तन्मयतेने ग्रह त्यांची नक्षत्रे, सोबत महादशा तपासु लागलो.

काही क्षणात ही पत्रीका वैराग्य असलेल्या महाराजांची नसुन एखाद्या साध्या सुध्या व्यक्तीची असावी असा माझा ग्रह झाला. माझे हे अपुरे ज्ञान आहे हे मी मनाला बजावत होतो आणि आणखी एखादा ग्रह - ग्रहयोग असा असेल जो माणसाला महाराज बनवायला कारणीभुत असेल असा विचार करुन मी न बोलता पत्रीका तपासु लागलो.

" आमचे लग्न होईल का ?" असे महाराजांनी विचारताच मी चमकुन त्यांच्याकडे पाहिले.

महाराजांच्या चेहेर्‍यावरचे भाव एखाद्या दिनवाण्या बापुड्या माणसाप्रमाणे मला भासले. जे वाटले त्याची प्रचिती आली होती. मन मनात म्हणत होत की हे महाराज नाहीत. यांना वैराग्य सुध्दा आलेले नाही. मग काय असाव हे ?

इतक्यात महाराजांनी भाऊ, मला जरा टेरेसवर न्या अशी आज्ञा केली. भाऊ पुढे झाला. सर्वसाधारण अंगकाठी खाली दोनी पाय पोलीओग्रस्त आहेत हे जेव्हा भाऊंनी जेव्हा महाराजांना उचलुन हॉल सोबत असलेल्या ओपन टेरेसवर नेले तेव्हा समजले.

ओपन टेरेसवर असलेल्या खुर्चीवर जेव्हा महाराजांना भाऊंनी बसवले तेव्हा महाराजांनी आणखी एक खुर्ची आणा म्हणुन आज्ञा केली. भाऊंनी तत्परतेने एक प्लॅस्टीकची खुर्ची आणुन शेजारी ठेवली.

" बसा" महाराजांनी मला आज्ञा केली. मी आता पुन्हा पत्रीकेचे विवेचन होणार आणि मनात नसताना आपल्याला जे वाटतय ते अचानक तोंडातुन बाहेर पडले तर काय या काळजीने मी व्याकुळ झालो होतो. खर काय ते न समजता महाराजांच्या वैराग्याचा, साधनेचा नकळत अपमान झाला तर आपल्यावर संकट कोसळायचे हा विचार मनात घोळु लागला.

"पाहिलीत पत्रीका ?" हो महाराज

"मग सांगा आमचे भविष्य " महाराजांचे मगाचचे दीनवाणे भाव नाहिसे होऊन पुन्हा त्यांचा खास महाराज स्टाईल आवाज बाहेर येत होता.

"महाराज, आपण सर्वज्ञ आहात. पत्रीका - भविष्य ह्या सामान्य माणसांच्या गोष्टी आहेत. आपण महाराज आहात. तपस्वी आहात. हव ते घडवण्याची आपली क्षमता असताना पत्रीका कशाला पाहायची ?"

" महाराज " दिर्घ श्वास सोडत महाराजांनी हा शब्द उच्चारला.

" कुणी ठरवल आम्हाला महाराज ? कस ठरवल मी अवतार आहे आहे शंकर महाराजांचा ? मी सिगारेट ओढतो म्हणुन ? अहो मी कसला महाराज. माझे वडील माझ्या लहानपणीच वारले. त्याल मला पोलीओ झाला." महाराज बोलायला लागले. मी भितीने औंधकर कुठे आहेत पाहु लागलो.

नशीबाने औंधकर तिथे नव्हते. मग मी पुढे ऐकु लागलो.

वडील गेल्यावर लोकांचा स्वैपाक करुन आई घर चालवु लागली. आईला चिंता फक्त माझी होती. माझ कस होणार? त्यात मला सिगारेट ओढायची सवय लागली. मग मी एक एक क्लुप्त्या शोधुन आपले व्यसन भागवु लागलो. ही गोष्ट माझ्या आईच्या लक्षात आली आणि माझी सोय लावायची संधी तिने शोधली.

महाराज बनण्यासाठी तीने मला एका आश्रमात पाठवले. माझी लगेचच दिक्षा झाली. मुख्य महाराजही स्वतःला अवतार म्हणुन घेत. शालेय शिक्षण झालेल होत त्यात मला आश्रमात थोडस तत्वज्ञान आणि पुराणे याचे शिक्षण मिळाले. सोबत न शिकवता मोठे महाराज कसे बोलतात, कसा आशिर्वाद देतात याचा अभ्यास केला. .

पुढे मला द्रुष्टांत झाला की तु पुण्याला जा आणि स्वतंत्र गादी चालव. हा द्रुष्टांत प्रत्यक्ष शंकरमहाराजांनी दिला होता असे लोकांना माझ्या खास भक्तांनी सांगीतले त्यामुळे सिगारेट ओढली तरी प्रश्न येणार नव्हता. मग काय अल्पावधीत आमच चांगल जमल. या नाटकात आई पण सामिल आहे. ती स्वतः मला नमस्कार करते. मला महाराज म्हणते. याचा चांगला प्रभाव पडतो.

लोक येतात पाया पडतात, सोबत फळे, अन्य सामग्री आणतात. त्यांचा प्रश्न सुटो वा ना सुटो ते आपल्या भजनी लागतात याची गोडी लागली. मी प्रत्येकला मंत्र देतो आणि प्रतिक्षा करायला सांगतो. ५० टक्के लोकांचे प्रश्न आपोआप सुटतात ते पुन्हा येतात. काही नाही सुटले तरी येतात. मला दोष न देता आपल्या नशीबाला दोष देतात. काही येत नाहीत. माझ पोटापाण्याचा प्रश्न नाही. एका दानी माणसाने एक लहान जागा मठासाठी दिली आहे. तिथे भक्तांची उठबस असते. पण मला लग्न करायच आहे. मला संसारी महाराज व्हायच आहे. मलाही भावना आहेत.

मी सुन्न झालो होतो. पहिल्याच भेटीत हे महाराज अस काही ऐकवतील अस वाटल नव्हत.

मी ज्या ज्या माणसाशी बोललो त्यांनी अस करता येणार नाही म्हणुन सांगीतल. महाराज झाल्यावर ब्रम्हचारी व्हाव लागत. मग ते शंकराचार्य असोत की आणखी कोणी. याचा मला तिटकारा आहे. त्यातुन मी अपंग. हे महाराजपण सोडल तरी सुखासुखी माझ लग्न होईल अस दिसत नाही. भाऊंनी बरीच आपली स्तुती केली म्हणुन मी माझी पत्रीका तुम्हाला दाखवली.

"महाराज, मी पत्रीका घेऊन जातो आणि अभ्यास करु आठ दिवसांनी आपल्याला भेटतो " अस म्हणुन मी सुटका करुन घेतली. भाऊंनी दिलेल जेवण महाराजांच्या शेजारी बसुन जेवलो आणि तिथुन पळ काढला.

आज इतके वर्षांनी मला समजतय की महाराजांनी त्यावेळी प्रकट केलेली इच्छा किती साधी सोपी आणि रास्त होती. नंतर महाराजपणाच्या नावाखाली बाया बापड्यांवर अत्याचार करण्यापेक्षा महाराज ही उपाधी सोडुन संसारी व्हाव हा किती चांगला मार्ग होता. अनेक आश्रमात संन्यास देण्याआधी किमान दोन वर्षे असा काळ असतो की तुम्हाला पुन्हा संसारी व्हायला संधी असते. जेष्ठ शिष्य आणि मुख्य याकाळात या नविन व्यक्तीचे वैराग्य किती खरे आहे हे तपासत असतात. दुर्दैवाने अनेक मठ/ आश्रम असे आहेत जिथे ही व्यवस्था नाही. आला शिष्य की दिली दिक्षा की हो संन्याशी/ महाराज. कारण याचे प्रमुख स्वतः किती खरे वैराग्य बाळगुन असतात हा प्रश्न असतो.

पत्रीका पाहुन काय बोलाव काही वेळा प्रश्नच असतो. अगदी त्या ज्योतिषासारखा जिथे राजा एका पक्षाची मान हातात धरुन प्रश्न विचारतो सांग या पक्षाच आयुष्य किती आहे. खुप आहे म्हणाव तर राजा क्षणार्धात त्याची मुंडी मुरगाळेल आणि फारस नाही म्हणल तर राजा क्षणार्धात त्याला बंधनातुन मोकळ करेल.

महाराज जर खरे महाराज असतील आणि माझ्या ज्ञानाची परीक्षा घेत असतील तर इतक्या कमी कालावधीत आणि कमी वेळा भेटुन निर्णय देणे जरा कठीणच होते. ते स्वतः मी खरा महाराज नाही म्हणत होते. व्यावसायीक रिस्क घेत होते हे मला काही पटत नव्हते. फार ओळख आणि खात्री असल्याशिवाय कुणी महाराज अशी रिस्क घेणार नाही. त्यांच अर्धवट वयच त्यांना हे बोलायला भाग पाडत असाव.

भाऊंचा आठ दिवसांनी फोन आला. दुसर्‍या पत्रीकेच्या संदर्भात बोलण चालु होत. अजुन काय म्हणताय म्हणुन मी विषय वाढवला. मला दोन गोष्टी जाणुन घ्यायच्या होत्या. महाराजांनी जे काय स्पष्ट्पणे मला सांगीतल ते भाऊंनी ऐकल होत का आणि महाराजांचा मला काही निरोप आहे का . शेवटी मीच विषय काढला. महाराज कुठे आहेत म्हणुन. त्यावर भाऊ म्हणाले की त्यांना शंकरमहाराजांचा दृष्टांत झाला पुण सोडाव म्हणुन. कालच ते तिर्थयात्रा करायला बाहेर गेले आहेत. कधी येतील माहित नाही.

या गोष्टीला आज पंधरा वर्षे झाली. मी औंधकरांना टाळतो. कुणा ओळखीच्याकडे महाराजांविषयी चौकशी देखील करत नाही. खात्री आहे त्याच बर चालल असेल. त्यांच्या मुलभुत गरजा नक्कीच पुर्ण होत असतील शिवाय लग्नही झाल असेल. ओढुन ताणुन आणलेल वैराग्य सुध्दा संपल असेल. ती पत्रीकाच तशीच होती.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

.

वेगळे व्यक्तीमत्व. चांगलेच रेखाटलेय.

पण ही प्रवृत्ती मला अत्यंत तिरस्करणीय वाटते. त्या व्यक्तीची आणि भक्तगणांचीदेखील.

वैराग्य मुळींहून नाहीं | ज्ञान प्रत्ययाचें नाहीं |
सुचि आचार तोहि नाहीं | भजन कैंचें ||१२|| दासबोध १२-७
ऐसे प्रकारीचे जन | आपणास म्हणती सज्जन |
पाहों जातां अनुमान | अवघाच दिसे ||१३|| दासबोध १२-७

बुवाबाजीमुळे परमार्थाचे अपरिमित नुकसान झाले आहे.

पण नितीनचंद्र - तुम्ही हे व्यक्तिचित्र रेखाटलंय छानच ...
<<आज इतके वर्षांनी मला समजतय की महाराजांनी त्यावेळी प्रकट केलेली इच्छा किती साधी सोपी आणि रास्त होती. नंतर महाराजपणाच्या नावाखाली बाया बापड्यांवर अत्याचार करण्यापेक्षा महाराज ही उपाधी सोडुन संसारी व्हाव हा किती चांगला मार्ग होता.>>>> हा तुमच्या मनाचा मोठेपणा, चांगुलपणा आहे. तुम्ही अशा "महाराजांना" (?)ही समजावून घेतलेत ... ग्रेट ...

नितीनचंद्र,

व्यक्तीचित्रण मस्त जमलंय. वेगळा विषय आहे. तुम्ही म्हणता तशी महाराजांनी व्यक्त केलेली इच्छा नैसर्गिक आहे. तिच्यापायी भलते मार्ग न चोखाळणे हे सगळ्यांचे सुदैवच म्हणायला हवे.

काही विशिष्ट पंथांत वेगळे मार्ग निषिद्ध नाहीत. अर्थात तो या कथेचा विषय नव्हे. सांगायचा मुद्दा असा की प्राप्त परिस्थितीतही महाराजांची मती ढळली नाही. ही रूपेरी किनार आहे.

आ.न.,
-गा.पै.

नितिनचंद्र,
योगायोगाने मला असेच एक महाराज माहिती आहेत, पुण्यात आमच्या घराजवळच रहायचे. आधी वाटले की तुम्ही त्यांच्याबद्दलच लिहिले आहे.
अगदी पोलिओ, शंकर महाराजांचा अवतार, इ.इ. सगळे तसेच
एवढेच नव्हे तर त्यांनी नंतर लग्न देखील केले.
पण फरक एवढाच की त्यांचे वडिल जिवंत होते, वडिलांचा स्वतःचा पत्रिकांचा अभ्यास खुप चांगला होता.

कंसराज,

महाराजाने कोणाचा गैरफायदा घेतलेला दिसत नाही. निदान कथेवरून तरी तसंच दिसतंय. महाराज अडकलेला आहे. तरीपण त्याने लोकांना वाईट मार्गाला लावलं नाही. मग त्याचा तिरस्कार कशाला करायचा?

आ.न.,
-गा.पै.

व्यक्तिचित्राच्या निमित्ताने एक वेगळे आणि जळजळीत सत्य मांडले आहे तुम्ही. पण ते अर्धवट राहिल्यासारखे वाटले. अर्थात तुम्हालाच पुढे काय घडले याची कल्पना नसल्यामुळे केवळ मनाला भिडले म्हणुन जे अनुभवले ते लिहिलेत ते जमलेले आहे.

सई,

खर आहे. पुढे काय झाले मला माहित नाही.

महेश,

हे तेच महाराज असण्याची शक्यता आहे. मला जेवढी माहिती होती तितके मी लिहले, यात कल्पनेचा फारसा उपयोग केलेला नाही,

अश्या खोट्या बुवा , बाबा , महाराजांचं प्रस्थ माजवायला आपणच जबाबदार असतो . पत्रिकेत आपल्याला स्पष्ट दिसत असूनही त्याला विरोध करण्याची आपली वृत्ती होत नाही ... म्हणून अश्या तिरस्करणीय वृत्ती समाजात निर्माण होतात .

अश्या खोट्या बुवा , बाबा , महाराजांचं प्रस्थ माजवायला आपणच जबाबदार असतो . पत्रिकेत आपल्याला स्पष्ट दिसत असूनही त्याला विरोध करण्याची आपली वृत्ती होत नाही ... म्हणून अश्या तिरस्करणीय वृत्ती समाजात निर्माण होतात .

फसवणुक होउनही काही लोक धजणार नाहीत इतका प्रभाव महाराज/ बाबांचा असतो. इथे तर मी मनात शंका घ्यायला भित होतो. कारण माझी तर फसवणुकही झाली नव्हती. पत्रीका हा काही शंका घ्यायला आधार नसतो.

>>हे तेच महाराज असण्याची शक्यता आहे.

पण तपशिलात जरा फरक आहे. माझ्या माहितीतल्या महाराजांचे वडिल हयात होते आणि ते आई, वडिल, भाऊ यांच्यासोबत रहात होते. तसेच त्यांना स्वतःला कोणतेही व्यसन नव्हते.
असो, अशा प्रकारचे लोक एकाहुन जास्त असू शकतील असे वाटते. धन्यवाद !

महाराजांच्य ढोंगीपणाबद्दल फक्त दिनेश. सोडल्यास कोणालाच राग किंवा तिरस्कार वाट्ला नाही ?
>>>
mala vatala mhanunch mi pratisad dila nahi

माझी तर फसवणुकही झाली नव्हती >> पण ईतरांची झाली होतीच. तुम्ही याविरुद्ध आवाज उठवायला हवा होता. समाजात अनेक बाबा/महाराज असेच उदयाला येतात.