विश्वात्मा - दोन व्याख्यांमधला संघर्ष

Submitted by श्रद्धा on 16 June, 2014 - 08:30

'विश्वात्मा'मधल्या एका दृश्यात अमरीश पुरी ओरडतो, "मुझे वो डाई चाहिये डाई.." दॅट्स व्हाय, इन द एंड, ही डाईज! पण तो मुख्य मुद्दा नाही.
***
पहाडासारखा माणूस सनी देओल (हिमालयासारखा लिहिणार होते पण हिमालय दासानीशी आपली तुलना होणे धर्मेंद्रपुत्रास रुचले नाही तर??? अडीच किलोचा एकेक हात! असो.) हा पहाडांमध्ये राहायला गेल्याने इकडे शहरात वेताळटेकड्या माजतात आणि धुडगूस घालू लागतात. इकडे सनी 'मनोहर देव' नावाच्या अतिमवाळ नाव असलेल्या अतिजहाल डाकूला पिटण्यात मग्न! पण तोही मुख्य मुद्दा नाही.
***
सोनमची बहीण आणि चंकी पांडेचा भाऊ यांचं लग्न ठरलेलं असतं आणि होतं, तरी समोरासमोर आल्यावर ते (पक्षी: सोनमचंकी) एकमेकांना ओळखतही नसल्याचं दिसतं. (मुलगी पाहण्याचा कार्यक्रम झालेला नसतो की काय? पत्रिकाही छापल्या नसतात की काय? 'माज्या ताईच्या लग्नाला यायचं हं..' - चि. रेणुका. 'दादा, मला एक वहिनी आण.' - चि. आकाश) पण तोही मुख्य मुद्दा नव्हेच!
***
केनयात राहणारा पण भारतात बिझनेस करणारा (आयटीतलं आऊटसोर्सिंग पॉप्युलर व्हायच्या आधी हे आऊटसोर्सिंग जोर्राट.. अर्रर्र.. जोरात असावं.) अजगर जुर्राट वार्षिक सर्वसाधारण सभेसाठी भारतात आला असताना एक व्यापारी मदन भारद्वाजवर विसंबून (चि. आकाशचा भाऊ!) 'यहां का हमदर्द हो तो हम विदेश का सरदर्द क्यूं मोल ले?' असं म्हणून अजगराला डिवचतो आणि तो 'हमदर्द.. सरदर्द' अनुप्रास न आवडल्याने मारामारी सुरू होऊन त्यात नागदंश जुर्राटाचा (अजगराचा कनिष्ठ बंधू) बळी जातो. मग मदन भारद्वाजाचा काटा काढला जातो. ते काय चालतंच.
***
'खिचडी'फेम प्रफुल पारेख मोड ऑन -
मेन क्या है बाबूजी? मेन क्या है?
विश्वात्मा..

तर, मुळात सिनेमातल्या चांगल्या वाईट दोन्ही बाजूंच्या मुख्य व्यक्तिरेखांच्या 'विश्वात्मा' शब्दाच्या व्याख्येत तफावत असल्याने संघर्ष आणि सिनेमा निर्माण होतो.
सनी चालबिल लावून गायलेल्या -
'आदमी जिंदगी और ये आत्मा
ढूंढे सभी तुझको परमात्मा
ये मिलन जो कराये वो
विश्वात्मा..'
अशा मताचा असतो. तर जुर्राट बाकी फापटपसारा टाळून डायरेक्ट 'मीच विश्वात्मा' असं म्हणत असतो. आता सनीने गायलेल्या ओळी नीट वाचल्या तर त्यातूनही 'मीच विश्वात्मा' हेच तात्पर्य निघतं पण पाल्हाळ लावलं की लोक नाद सोडतात कारण मुद्दा नीट कळत नाही.

पंचवीस-सव्वीस वर्षांच्या सनीचे सख्खे वडील आलोकनाथ यांना अजून एक लहान आठदहा वर्षांचा मुलगा असतो, उतारवयात झालेला असल्याने तो शेंडेफळ आणि सनी जुर्राटला नडल्यामुळे नेमकं त्याचंच अपहरण करून अजगर जुर्राट त्याला मारून टाकतो. याच कारणामुळे आलोकनाथ सनीला घराबाहेर काढतात आणि हा पहाडासारखा माणूस पहाडात राहायला जातो. (असेच शब्द असलेला डायलॉग सिनेम्यात आहे.)

भारतात काळे धंदे, खून, मारामारी इत्यादी करणारे जुर्राट कुटुंबीय केनयात मात्र इज्जतदार शेहेरी असतात. अजगर जुर्राट, नागदंश जुर्राट अशी नावं असूनही! सोनिया अशा निरुपद्रवी नावाची मुलगीही असते अजगराची. तिचं लग्न ठरलेलं असतं तपस्वी गुंजाल नावाच्या माणसाशी. (ह्याचं नाव ऐकून नवरा पुन्हा 'हायला.. ह्यालापण दोन आडनावंच आहेत. तपस्वी आणि गुंजाल.. नाव नाहीये.' असं म्ह्टला. 'ह्यालापण' अशासाठी की, त्याने असंच अजून एक उदाहरण पाहिलं आहे. 'टशन'मधला 'बच्चन पांडे'.) केनयातही शाळांमध्ये आठवीपासून पूर्ण हिंदी, पूर्ण संस्कृत आणि हिंदी+संस्कृत असे पर्याय असणार आणि याने हिंदी+संस्कृत घेतलं असणार, हे तपस्वी गुंजालचं बोलणं ऐकूनच कळतं. तो इतका संस्कृतयुक्त हिंदी बोलतो की अधूनमधून सबटायटलं दाखवावी लागावीत. नाव तपस्वी असलं तरी तो सासरा आणि मेव्हण्यासारखाच असतो! शिवाय त्याला बायकांचा नाद. भारतातून नाचगाण्याचे कार्यक्रम करायला तो दिव्या भारतीला बोलावतो कारण 'भाषासु मुख्या मधुरा दिव्या (गीर्वाण) भारती|' हे त्याने संस्कृतच्या पुस्तकात वाचून पाठ केलेलं असतं.

त्याअगोदर भ्रष्ट कमिशनरने सनी आणि चंकीला अजगराच्या पुढ्यात सोडायला म्हणून केनयात पाठवलेलं असतं. शिवाय सोनमही तिथं आलेली असते. तिथे सनीचंकीवर लक्ष ठेवायला नसीरुद्दीन शाहची नेमणूक होते. तो प्रामाणिक. त्याच्या बायकोचा जीव चि. राजनाथ अजगर जुर्राटमुळे गेलेला. पण हे फक्त त्याच्या मुलीने बघितलेलं असतं आणि त्या धक्क्याने रहस्योद्घाटन करायची वेळ येईपर्यंत तिची ऑलमोस्ट वाचा गेलेली असते. तपस्वी गुंजालमुळे दिव्या भारतीसुद्धा केनयात येऊन पोचल्याने कोरम पूर्ण होतो आणि सनीचंकी अजगराच्या साम्राज्याला सुरुंग लावायला सुरुवात करतात.

त्यात मध्येच 'दिल ले गई तेरी बिंदिया.. याद आ गया मुझको इंडिया..' अशी देशभक्तीपर गाणी येऊन जातात. ज्यात भारतीय ड्रेसअप करून जायचं म्हणून नसीरुद्दीन शहा चमचमत्या सिल्कचा निळा कुर्ता आणि निळं धोतर शिवाय डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्यासारखी पगडी आणि म्याचिंग उपरणं असा पोशाख करून जातो. गाण्याच्या कडव्यागणिक पगडी आणि उपरण्याचा रंग बदलतो. शेवटचे कॉम्बो निळ्यावर मॅजेंटा रंगाचे दिसल्यावर 'याहून भयाण पुढे काय असेल?' म्हणून आपण भेदरून बसतो पण तोवर गाणं संपतं.

भारतात जुर्राट आणि सन्ससोबत काम करणारी दुसरी गँग ब्लू ब्रदर्स गँग असते. त्यात बडा निळू, मझला निळू आणि छोटा निळू असे तीन भाऊ दाखवले आहेत. तर ही गँग भारतातून नोटांचा साचा घेऊन येते. त्याला ते 'डाई' म्हणत असतात. आता यांना साचा कुठला आणि डाय कुठला हेही कळत नाही, तरी नोटा छापायचा आत्मविश्वास दांडगा! राजनाथने छापलेली शकुनाची पहिली नोट हातात घेऊन अजगर म्हणतो, चार डोळ्यांनी पाहूनसुद्धा कुणाला कळणार नाही ही नकली नोट आहे. (मुलाच्या टपराट कामाची फाजील कौतुकं अजिबात करू नयेत, हे त्याला तेव्हा कळत नाही.) पुढच्याच क्षणी हातात भिंग घेतलेला सनी ती नोट निरखून पाहून 'निखालस नकली' हे डिक्लेअर करतो. (सनीचे दोन डोळे आणि भिंगाचा 'तिसराऽऽऽ डोळाऽऽ' मिळून बेरीज तीन भरते त्यामुळे अजगराने टाकलेली 'इफ(चार डोळे)' कंडिशन इन्वॅलिड होते.)

आता सिनेमा हळूहळू शेवटाकडे येऊ लागतो. भयाण दृश्ये आपल्या नेत्रपटलांवर आदळू लागतात. चि. राजनाथ जुर्राट एका दृश्यात केवळ झगमगीत निळी तोकडी स्विमिंग ट्रंक घालून उभा दिसतो. ते पाहून त्याने बाकी कुठलेही गुन्हे केले नसते तरी एवढ्या एका बाबीसाठी त्याला धोपटणे न्याय्य ठरले असते. नसीरुद्दीन शहाचा बॉस शरद सक्सेना आणि चंकी पांडे हे भीषण शॉर्ट्स (फुलपँट कापून शॉर्ट्स केल्यासारख्या! फाईव्हस्टारची 'पिताजी की पतलून..' अ‍ॅड 'विश्वात्मा'वरूनच सुचली असावी.) घालून वावरायला आणि मारामारी करायला लागतात. आपण जीव मुठीत धरून शेवटाची वाट पाहू लागतो. अजगराने चांगल्या बाजूच्या प्रत्येकाचेच काहीनाकाही वाकडे केले असल्याने शेवटी तो मरतो आणि विश्वात्मा व्हायची महत्त्वाकांक्षा असलेला त्याचा आत्मा अनंतात विलीन होतो.

तर चित्रपटाचे तात्पर्य काय? 'मीच विश्वात्मा असे म्हणणारा अहंकार हा माणसाचा सर्वांत मोठा शत्रू आहे.'

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आपली तुलना होणे धर्मेंद्रपुत्रास रुचले नाही तर??? अडीच किलोचा एकेक हात! असो >>>
तो 'हमदर्द.. सरदर्द' अनुप्रास न आवडल्याने मारामारी सुरू होऊन >>>
चि. राजनाथ जुर्राट एका दृश्यात केवळ झगमगीत निळी तोकडी स्विमिंग ट्रंक घालून उभा दिसतो. ते पाहून त्याने बाकी कुठलेही गुन्हे केले नसते तरी एवढ्या एका बाबीसाठी त्याला धोपटणे न्याय्य ठरले असते. >>> Lol

विश्वात्मा शब्दाच्या व्याख्यांवरचा वाद धमाल आहे.

जबरी. तरी इतर लेखांच्या मानाने लहान वाटला. आपण ३-४ जणांनी एकत्र पाहिलेला तो हाच ना? फायटिंग वगैरे सीन्स च्या अधूनमधून विश्व, आत्मा वगैरे चर्चा या चित्रपटाला एका वेगळ्या पातळीवर नेतात. व्हिलन लोकांचे आध्यात्मिक मोनोलॉग्स ऐकताना साहाय्यक व प्यादे टाइप व्हिलनवर्गाची "म्हणजे याला मारायचे, की नाही?" झालेली पंचाईत आपल्याला क्लिअरली जाणवते Happy

फारेंडा, हो हाच तो. अजून लिहायचे आहे. सध्या वेळ कमी मिळतो. वेळ मिळाला की अ‍ॅड करेन अजून थोडे.

बाकी त्या अचानक एका सीनमध्ये न दिसणार्‍या कंदिलांच्या दिसणार्‍या सावल्या यातल्याच. आणि 'दोन प्रेमिक (पक्षी: दिव्या आणि सनी)' पण यातलेच. Happy

ROFL

Lol भन्नाट तरी हात राखून लिहिल्यासारखे.. अजून लिही की माते!
बादवे ते शॉर्टस च्या ऐवजी शॉटर्स झालंय तेवढं बघतेस का?

Pages