'दर्शन' - श्रीमती बी. जयश्री यांच्या गायनाचा व मुलाखतीचा कार्यक्रम

Submitted by माध्यम_प्रायोजक on 25 June, 2014 - 05:59

उद्या, म्हणजे गुरुवार दि. २६ जून रोजी पुण्याच्या टिळक स्मारक मंदिरात ’दर्शन’ या एका अभिनव उपक्रमाची सुरुवात होत आहे. ज्येष्ठ कन्नड अभिनेत्री व गायिका श्रीमती बी. जयश्री यांचं गायन आणि नंतर श्रीमती ज्योती सुभाष व श्री. नासिरुद्दीन शाह यांनी त्यांची घेतलेली मुलाखत असा या उपक्रमातला पहिला कार्यक्रम आहे. प्रसिद्ध दिग्दर्शक श्री. उमेश कुलकर्णी यांची ’अरभाट निर्मिती’, ज्येष्ठ अभिनेत्री श्रीमती ज्योती सुभाष यांची ’चैतन्यवेध’ आणि सातत्यानं उत्तमोत्तम नाटकं प्रे़क्षकांसमोर आणणार्‍या तरुण रंगकर्मींची ’नाटक कंपनी’ या संस्थांनी एकत्र येऊन या कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे.

10177241_10152462039211558_8644454338442810994_n.jpg

बी. जयश्री या प्रसिद्ध दिग्दर्शक आणि कन्नड नाट्यचळवळीचे प्रणेते असलेल्या श्री. गुब्बी वीराण्णा यांच्या नात आहेत. इब्राहिम अल्काझी यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी ’नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा’तून रंगभूमीचं औपचारिक शिक्षण घेतलं. बंगळुरू येथील ’स्पंदन’ या नाट्यसंस्थेच्या संस्थापिका-संचालिका असलेल्या बी. जयश्री गेली अनेक वर्षं कन्नड नाट्यक्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी कन्नड चित्रपटांसाठी अभिनय आणि पार्श्वगायनही केलं आहे. त्यांना १९९६ साली संगीत नाटक अकादमी पुरस्कारानं गौरवण्यात आलं आणि २०१३मध्ये त्यांना पद्मश्री किताबानं सन्मानित केलं गेलं. २०१० सालापासून त्या राज्यसभेच्या खासदार आहेत.

’दर्शन’ या उपक्रमामागे आयोजकांचा काहीएक ठोस विचार आहे. महाराष्ट्राबाहेर कलाक्षेत्रात (यात दृश्यकलाही आल्या) कर्तृत्व गाजवणार्‍या अनेक दिग्गजांच्या कामाबाबत आपल्याला फार माहिती नसते. त्यांच्या कामाबद्दल, कामामागच्या विचाराबद्दल आपण अनभिज्ञ असतो. अनेक वर्षं, सातत्यानं एखाद्या कलेचा ध्यास घेऊन काम करत राहणं सोपं नसतं. नाटक, संगीत, चित्रकला, नृत्य अशा वेगवेगळ्या क्षेत्रांत महनीय कार्य केलेल्या कलावंतांच्या कलेचं दर्शन महाराष्ट्रातल्या रसिकांना घडवणं, त्यांच्या कामाची, त्यांच्या विचारांची ओळख करून देणं हा ’दर्शन’चा हेतू आहे. शिवाय निरनिराळ्या क्षेत्रांत काम करणार्‍या कलावंतांनी एकत्र यावं, कलेचा आस्वाद घ्यावा, नवीन काहीतरी घडवावं हाही एक हेतू आयोजकांच्या मनात आहे.

मायबोली.कॉम नेहमीच अशा उपक्रमांमध्ये सहभागी होत असते. याही कार्यक्रमाची माध्यम प्रायोजक मायबोली.कॉम आहे.

गुरुवारी, २६ जून, २०१४ रोजी हा कार्यक्रम पुण्याच्या टिळक स्मारक मंदिरात आयोजित केला आहे. वेळ - रात्री ९.३०. कार्यक्रमाच्या सुरुवातीला श्रीमती बी. जयश्री आपल्या साथीदारांसह गायन सादर करतील. कार्यक्रमाच्या उत्तरार्धात श्री. नासिरुद्दीन शाह व श्रीमती ज्योती सुभाष हे एनएसडीमधील त्यांचे वर्गमित्र त्यांची मुलाखत घेतील.

हा कार्यक्रम सर्वांसाठी खुला आहे.

तुम्ही सर्व या उपक्रमाला पाठिंबा द्याल, ही खात्री आहे.

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अमृतवल्ली,
कार्यक्रमाच्या ठिकाणी मायबोलीचा स्टॅण्डी असेल.. तिथे कोणी ना कोणी मायबोलीकर असतीलच.

माधव,
हा व या पुढचे कार्यक्रम महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या गावांमध्ये व्हावेत, अशी आयोजकांची इच्छा आहे.

चुकवू नका हा कार्यक्रम. सार्‍यांनी जरूर या.
जागा अर्थातच प्रथम येणार्‍यांस प्राधान्य- बेसिसवर. त्यामुळे लवकर या.