विषय क्रमांक एक - मोदी जिंकले, पुढे काय?

Submitted by बेफ़िकीर on 23 June, 2014 - 12:13

मोदी जिंकले, पुढे काय?

"पंजा आला, पंजा आला" आणि "येऊन येऊन येणार कोण, पंजाशिवाय आहेच कोण" अश्या घोषणा देत ट्रक फिरायचे सत्तरच्या दशकात! ऐंशीच्याही आणि नव्वदच्याही! ट्रकमध्ये बसलेले तरुण गुलालाने रंगलेले, काळेकभिन्न आणि गुंडांसारखे दिसणारे असायचे. रोज संध्या आणि दोन दोन तास पूजा करणारे माझे वडील घराच्या गॅलरीतून ते दृष्य पाहून खिन्नपणे आत वळताना सुस्कारा सोडत म्हणायचे: "पंजा आला, पंजाच येणार म्हणा, बामणं हवी आहेत कोणाला? पैसे खाता येणार नाही ना!"

बाबा खिन्न झालेले पाहून मला वाईट वाटायचे. त्यापेक्षा वाईट वाटायचे ते ह्याचे की त्या ट्रकमधील तरुणांसारखा आपल्या गांडीत दम नाही. मी आपला शाळेत जाऊन कुठल्यातरी वर्गमित्राला सांगायचो, 'बाई जिंकली म्हणतायत, पुन्हा वाईट दिवस येणार'! ऐकणारा कुलकर्णी आहे की पटवर्धन, कदम आहे की ओबीसी हे मलाही माहीत नसायचे आणि ऐकणार्‍यालाही धडपणे! चांगले दिवस म्हणजे काय आणि वाईट दिवस म्हणजे काय हे तेव्हा अजिबात समजायचे नाही.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ब्राह्मणांनी ब्राह्मणांसाठी चालवलेला ब्राह्मणांचा संघ आहे हे माझे बाळकडू! जी मुले ब्राह्मण नसतात ती सगळी 'मराठ्याची पोरे' इतकेच समजायचे वय होते ते! मग कधीतरी इंदिराबाई एन डी ए ला आल्या. त्या यायच्या आधीच एन डी ए मध्ये त्यांच्यासाठी बांधलेल्या सात खोल्या पाहायला मिळाल्या होत्या काकांमुळे! त्यांच्या आवरण्याच्या खोलीतील ड्रेसिंग टेबलसमोर असलेल्या तीन आरश्यांंमधून आपल्याच अगणित प्रतिमा बघताना मजा वाटली होती, पण आपल्याच अगणित प्रतिमा ह्या देशात वावरतात हे समजले नव्हते. कर्वेरोडच्या दुतर्फा गर्दीला आपला हात दाखवत प्रियदर्शिनी वेगवान गाडीतून गेली तेव्हा वाटले की च्यायला आपण आपल्या देशाचा चक्क पंतप्रधान बघितला. मग आणीबाणी आली. संघाला सबकुछ मानणारे इतस्ततः पळत सुटले. अनेकांनी पक्ष बदलला. त्यानंतर जनता पक्ष आला. आम्ही लहान मुले मोठ्या नातेवाईकांबरोबर रेडिओवर बातम्या ऐकत असताना 'जनता पक्षाचे हे हे इतक्या इतक्या मतांनी विजयी' असे ऐकू आले की टाळ्या वाजवत होतो. नेमके काय होत होते हे तेव्हा माहीत नव्हते. 'बाई पडली' हे दोन शब्द जणू 'काय, कसं काय?' ह्या तीन शब्दांचे पर्यायी शब्द झालेले होते.

मग इंदिरा गांधींची दुर्दैवी हत्या झाली, अमिताभ बच्चन राजकारणात येऊन अपयशाचा धनी झाला, बोफोर्स, क्वात्रोची हे शब्द कोणीही उच्चारायला लागले आणि शेवटी राजीव गांधींचीही हत्या झाली. सोनिया सर्वेसर्वा होतील असे वाटले होते तेव्हा म्हणे बच्चन कुटुंबियांनी त्यांना त्यापासून रोखले. चेहर्‍यावर कंटाळवाणे भाव असलेल्या नरसिंह रावांनी काय केले हे आज समजते, तेव्हा आम्ही 'व्ही पी सिंग खरा भारी माणूस' असे म्हणण्यात धन्यता मानत असू! अडवानींच्या रथयात्रेने सगळ्यांची धा'बी' दणाणलेली होती. काही दिवस त्यांचे, काही दिवस व्ही पी सिंगांचे आणि काही दिवस चंद्रशेखरांचेही सरकार येऊन गेले. कर्नाटकमधी एच डी देवेगौडांनाही ते पद भूषवायला मिळाले. एकुण देशाकडे जे नेत्रूत्व होते ते निवडून येत नव्हते आणि जे निवडून येत होते ते जेमतेम कुबड्या घेऊन उभे राहू शकत होते.

ह्या कुबड्या भारतीय प्रशासनाला तीस वर्षे पुरून उरल्या. सरकार कोणाचेही असो, पक्ष कोणताही असो, कुबड्या पाहिजेतच! मग त्या कुबडीचे नांव शरदराव पवार होते की मुलायमसिंहजी यादव हे अलाहिदा!

मात्र २०१४ मध्ये जादूची कांडी फिरली. कोणास माहीत किती हजार कोटी रुपये प्रचारावर खर्च करून नरेंद्रभाई मोदी पंतप्रधानपदी विराजमान झाले. त्यांचा नारा होता 'अच्छे दिन आनेवाले है'!

'अच्छे दिन'!

पाकिस्तानच्या नवाझ शरीफांना चार दिवस आमंत्रणाला उत्तर देता आले नाही. रस्तोरस्ती मोदींच्या प्रतिमांचे दहन करून काहींनी रेल्वे दरवाढीचा निषेध व्यक्त केला. शिवसेनेला आवाजच उरू नये इतके बहुमत भाजपला मिळाले. मोठमोठे मोहरे अक्षरशः 'कसेबसे' जिंकले. सुशीलकुमारांसारखे अनेक तर हारलेही!

भारत ह्या देशाने आणि जगाने इतिहास घडताना पाहिला. सर्वात मोठी लोकशाही नुसते मतदान करायला रस्त्यावर उतरली तर केवढा मोठा आणि खणखणीत सत्तापालट होऊ शकतो हे आपल्या बांधवांनीच जगाला दाखवून दिले. तीन दशकांनी 'स्वतःच्या' पायावर उभे राहू शकणारे सरकार आले. बहुधा, 'बामणांचे' सरकार आले. गांधी, नेहरू, इंदिराबाई, राजीव, सोनिया ह्यांच्या पक्षाला दहा टक्केही जागा मिळवता आल्या नाहीत.

पण...................पुढे काय?

नवाझ शरीफ आले आणि गेले. कराचीच्या विमानतळावर हल्ला केला गेला. इराकमध्ये चालू असलेल्या युद्धाची खरी झळ पोहोचायचीच आहे. गुजराथ मॉडेल म्हणजे काय हा प्रश्न उरलेल्या राज्यांंमधील नागरिकांच्या मनातही नाही. चीनचे परराष्ट्रमंत्री येऊन गेले. 'मोदी कुर्ता'ची यू एस मध्ये फॅशन आली, इतकी की ओबामाला फॅशन स्टेटमेंट्समध्ये दुसरी जागा मिळाली असे काही ठिकाणी छापून आले. विकेंद्रीत सत्तेचे केंद्रीकरण झाले. मंत्रीमहोदयांच्या शिकवण्या सुरू झाल्या. सकाळी नऊ ते रात्री नऊ असे काम करायला लागेल हे मंत्र्यांना समजले. मोदींनी घेतलेल्या लोकप्रिय निर्णयाचे श्रेय आधीच्या सरकारने घेणे आणि आधीच्या सरकारने राबवलेल्या अयशस्वी कार्यप्रणालीवर मोदी सरकारने अप्रिय तोडगा काढणे अशी भांडणे सुरू झाली.

बलात्कार आजही होत आहेत. रस्ते हा विषय ऐरणीवर आलेला नाही. गंगाशुद्धीकरण ही तमाम देशवासियांची निकड नाही. प्रवास आणि इंधन ह्यावरील खर्च वाढतच आहे. बाकीच्या देशांनी सत्तापालटाची दखल घेतली आहे हा फार तर सकाळच्या पहिल्या चहाच्या घोटाबरोबर गिळण्याचा आनंद आहे.

ठीक आहे, सव्वा महिनाच झाला आहे......पण......

चमत्कारांची अपेक्षा करणे वेडेपणा आहे. किंबहुना, मोदींना पंतप्रधानपदावरील माणसाच्या आयुष्याची शोकांतिका समजायलाच साडे चार वर्षे लागतील असे माझे मत आहे. व्यक्तीपूजक भारतीय समाजात तोलामोलाचा विरोधक समोर नसताना बहुमत मिळवणे ही उल्लेखनीय बाब असली तरी ती फार फार खासगी बाब आहे. त्याचा आम भारतीयाच्या जगण्याशी संबंध लावण्याइतपत आपला देश लहानसा नाही.

'मोदी जिंकले, पुढे काय?' ह्या प्रश्नाचे उत्तर आहे 'पुढे काहीही विशेष नाही'! एक माणूस, एक सत्ताधारी पक्ष बदलल्यामुळे भारतासारख्या देशाचा कायापालट तर सोडाच, हा देश कूसही बदलणार नाही. देश म्हणजे तुम्ही आम्ही!

चांगले काय झाले? मतदारांना स्वतःची ताकद समजली ह्या निवडणूकीतून! बहुधा व्यक्तीपूजा अगदी खालच्या आर्थिक स्तरापासून थोड्या वरच्या स्तरापर्यंत पोहोचली.

पण 'बामणं' आता पैसे खातात! 'अच्छे दिन' आणि 'बुरे दिन' असा फरक कोणालाच करता येत नाही. आज 'मराठ्यांच्या पोरांसोबतच' 'अर्धी खाकी चड्डी घातलेलेही' जल्लोष करतात.

फरक इतकाच की आता बाबा सुस्कारे सोडत नाहीत. फरक इतकाच की मी लहानपणी जी इच्छा मनात धरून असायचो ती आत्ता पूर्ण झाली आहे. फक्त काही मने सुखावली आहेत आणि काही मने दुखावली आहेत. भूमिका बदललेल्या आहेत.

तरीसुद्धा असे म्हणता येईल की भाषा, धर्म, प्रांत ह्यात इतके प्रचंड वैविध्य असणारा एक भौगोलिक प्रदेश आजवर जो काही विकास करत आला तसाच, त्याच वेगाने ह्याहीपुढे विकास करत राहील! ह्यात कोणत्याही पक्षाचे श्रेय नाही, कोणत्याही व्यक्तीचे श्रेय नाही. कित्येकदा तर 'जग जिथे चाललेले आहे' तिकडे धावणे इतकेच आपल्या हातात असते. आणि आपल्यापेक्षा अधिक प्रगत जग ह्या पृथ्वीवर केव्हापासूनच अस्तित्वात आहे.

मोदी सरकार येण्याला शुभशकुन मानण्यापेक्षा एका आम भारतीयाने फक्त इतकेच मानायला हवे आहे की वेळ काढून मतदानासाठी आपण बाहेर पडलो तर इतक्या बलाढ्य देशातही सत्तापालट करू शकतो, भले आपला वाटा खारीच्या पिल्लाचा असो!

धन्यवाद!

-'बेफिकीर'!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

उदयन.. | 23 June, 2014 - 22:03 नवीन

लेख चांगला पण अपुर्ण वाटतो बरेच सांगायचे राहून गेले असे वाटून जाते
<<<

Ghaagar mein saagar

Happy

बेफी लेख मोदींवर आहे पण पुढे काय यावर 2-3 च ओळी आहेत
चुका काढायचा प्रयत्न नाही पण। व्हीजन वर लिहीले असते तर बरे झाले असते
तुलना करण्यात तुमचा मोदी वरचा फोकस गेला
त्यापेक्षा पहीली कथा फोकस ने लिहीलीत

जुन्या काळातल्या स्मरणरंजनावर जरा जास्तच जोर दिलाय, एखादा परिच्छेद पुरेसा ठरला असता.
'पुढे काय' ते फारच त्रोटक / कमी वाटते आहे.

तरीसुद्धा असे म्हणता येईल की भाषा, धर्म, प्रांत ह्यात इतके प्रचंड वैविध्य असणारा एक भौगोलिक प्रदेश आजवर जो काही विकास करत आला तसाच, त्याच वेगाने ह्याहीपुढे विकास करत राहील! ह्यात कोणत्याही पक्षाचे श्रेय नाही, कोणत्याही व्यक्तीचे श्रेय नाही. कित्येकदा तर 'जग जिथे चाललेले आहे' तिकडे धावणे इतकेच आपल्या हातात असते. आणि आपल्यापेक्षा अधिक प्रगत जग ह्या पृथ्वीवर केव्हापासूनच अस्तित्वात आहे.

यावर बरेच काही लिहिता येईल.
लेख आवडला.
प्रस्तावना बरीच लांब झालीय त्या मानाने पुढे काय फारच त्रोटक.
की पुढे बहुदा काहीच विशेष नसल्याने मागचंच बरंच कायकाय लिहावं लागतंय कुणास ठाऊक.

लेख मोदींवर आहे पण पुढे काय यावर 2-3 च ओळी आहेत<<<

व्हीजन वर लिहीले असते तर बरे झाले असते<<<

जुन्या काळातल्या स्मरणरंजनावर जरा जास्तच जोर दिलाय, एखादा परिच्छेद पुरेसा ठरला असता.
'पुढे काय' ते फारच त्रोटक / कमी वाटते आहे.<<<

मला असे नम्रपणे वाटते की जे एका सामान्य माणसाला म्हणायचे ते मी म्हणालो आहे. खरंच काहीच फरक पडत नाही त्या पदावर मोदी आहेत की कोणी इतर ह्याने! माझे प्रश्न तसेच राहतात, राहिलेले आहेत.

'मोदी जिंकले, पुढे काय' ह्यावर काहीतरी स्वप्नरंजन करणे, आपल्या वैयक्तीक अपेक्षा नोंदवणे, काहीतरी खूप वेगळे होईल असे भाकीत करणे, हे खरेच योग्य ठरेल का?

ज्यांच्यासाठी रेल्वे भाववाढ सबकुछ आहे ते व्यक्त होतील, ज्यांच्यासाठी नाही ते थट्टा करतील.

एवढ्या मोठ्या देशाच्या एका सामान्य माणसाला पंतप्रधान कोण आहे ह्याने काही फरक पडतो असे खरेच वाटते का?

स्पर्धेसाठी हा विषय निवडणार्‍यांच्या अदाकारीची पहूंचही ज्या पदापर्यंत कधी असू शकत नाही तिथे अगदी मनातले, खरेखुरे लिहिले तर काय बिघडले? Happy

स्पर्धेसाठी हा विषय निवडणार्‍यांच्या अदाकारीची पहूंच..
<<
भुवई उंचावलेला भावला!
स्पर्धा आयोजकांच्या निवडीबद्दल डायरेट शंका?? वा!!

मोदीजी जिंकले पुढे काय ?

आता भला मोठा प्रश्न उभा ठाकला आहे, विरोधीपक्ष नेता कोण. जिंकलेल्या पक्षाचा नेता पं. प्र झाला सुद्धा !!

विरोधी पक्ष अजुन ही "ढूंढते रहो" करत आहेत. देश्याच्या राजकारणासाठी जवाबदार
विरोधी पक्ष नेता असणे आवश्यक असतो असा सुर काही नेत्यांनी लावला पण त्यांना बाजु मांडता आली नाही.

असो, आता मोदीजी जे काही निर्णय घेतील त्याचा विरोध करण्याची सर्व जवाबदारी मायबोलीवरल्या काही नीं
उचलली आहे.

तरीसुद्धा असे म्हणता येईल की ............ पृथ्वीवर केव्हापासूनच अस्तित्वात आहे.
हे छान आहे. माझा विश्वास आहे की कुणीहि निवडून येवोत नि काहीहि कायदे करोत, भारतीय जनतेच्या ऐहिक प्रगतीला आता कुणि थांबवू शकणार नाही.
सरकारने त्यांना मदत करणे यातच सरकारचे भले आहे. अर्थात सरकार जरी आडवे आले तरी पुढे जाणारी प्रगती थांबणार नाही.

लगोलग असला फालतू शेरा मारण्याचे काही कारण होते का ? Angry
(अंगाला हात लावायचे काही कारण होते का च्या चालीवर)

<<'मोदी जिंकले, पुढे काय?' ह्या प्रश्नाचे उत्तर आहे 'पुढे काहीही विशेष नाही'! एक माणूस, एक सत्ताधारी पक्ष बदलल्यामुळे भारतासारख्या देशाचा कायापालट तर सोडाच, हा देश कूसही बदलणार नाही. देश म्हणजे तुम्ही आम्ही!>>

अगदी मनापासून सहमत आहे भुषणजी ! कुठलीही सरकारे आली आणि गेली तरी जोवर आपली मनोवृत्ती, प्रवृत्ती बदलत नाही तोवर काहीच फरक पडणार नाहीये. आवडला लेख.....

शुभेच्छा !

दिलखुलास प्रतिसाद देणार्‍यांचे व निवडक दहांत घेणार्‍यांचे मनःपूर्वक आभार मानतो.

मी तर मोदी या विषयावर पहिली २ वर्ष निगेटिव्ह/पॉझिटिव्ह असं काहिही ठरवायचं नाही असच ठरवून टाकलय.
पण, तरिही लेखभावनेशी सहमती दर्शवित आहे.

लेख आवडला.
किमान आतातरी दोन्ही पक्षांकडून एकमेकांवर होणारी ठेवणीतील विशेषणांची बरसात बंद होईल अशी माफक अपेक्षा.

सामान्य माणसाच्या अपेक्षा फार छोट्या असतात. त्याला जीडीपी कितीने वाढला याच्याशी काहीही कर्तव्य नसतं. रोजच्या आयुष्यातील धकाधक कमी व्हावी, जीवनावश्यक वस्तू आवाक्याबाहेर जाऊ नयेत आणि शांत आणि सुरक्षीत वातावरणात दिवस घालवता यावा इतकीच त्यांची अपेक्षा असते. त्या दृष्टीने सामान्य आयुष्यात फारसा फरक पडेल असं वाटत नाही. पूर्वीच्या तुलनेत १०% जगणं सुसह्य झालं तरी जनता समाधानी राहील.