मीही जुनीच आहे...!

Submitted by मुग्धमानसी on 9 June, 2014 - 08:09

मीही जुनीच आहे...

अस्वस्थ दमटलेल्या
मातीत खोल खोल
रुजलेली एक बोच
कुजलेली एक ओल
त्यातून उगवते मी
अन् उन्मळून जाते
हे रोज रोज घडते
तरिही हि मीच आहे...
मीही जुनीच आहे!

आकाश दाबूनी या
जमिनीस झाकताना
जात्यात सर्व दाणे
एकत्र भरडताना
मीही अधांतरी ही
या पोकळीत घुमते
मी नष्ट होत नाही
मी सान होत जाते
उधळून सर्व देते...
उरले जराच आहे...
मीही जुनीच आहे!

मीही जुनीच आहे...

उन्मत्त आरशाला
खोट्या जलाशयाला
मी वाचताच ये ना
कुठल्याच पंडिताला!
सुटली कठोर गणिते
शास्त्रेही क्लिष्ट कळली
माझीच भंगलेली
प्रतिमा कुणा न जुळली...!
जरी विस्कटून गेले,
तुमच्यातलीच आहे...
मीही जुनीच आहे...!

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सही..

.

Happy