तारीख मृत्यूची कळाली काल चौघांना जशी

Submitted by बेफ़िकीर on 17 November, 2010 - 02:32

आईसमोरी थांबुनी मी शेवटी अभ्यासली
मी पोरका होणार ही जाणीव हृदयापासली

तारीख मृत्यूची कळाली काल चौघांना जशी
आम्हा तिघांना स्पर्शुनी आई कशीशी हासली

याच्यापुढे पाठीवरी फिरणार नाही हात तो
मी काल त्या हातावरी ही पाठ माझी घासली

मी वेगळा माणूस हे मानून मी मिरवायचो
ही निर्मिती आई तुझी जी आजवर जोपासली

जी घ्यायची अंगावरी, हातास जेव्हा लागली
आश्चर्य की ती शालही आईप्रमाणे भासली

त्यांच्या कुशीमध्येच मी आक्रंदलो बिलगूनसा
ज्या माणसांना मी कधी समजायचो मागासली

वाटायचे की खूप काही साधले आहे इथे
चाळीस वर्षे राहिलो, चाळीस वर्षे नासली

अक्षर तुझ्याशी बोलण्यासाठी सदा जी धडपडे
का 'बेफिकिर' झाली, तुझी आई कशाने त्रासली

Group content visibility: 
Public - accessible to all site users

सर्व सहृदय प्रतिसाददात्यांचा मनःपूर्वक ऋणी आहे.

भावनेच्या भरात मनातील विचार गझलतंत्रात लिहिलेले होते, मात्र बरेचसे विचार एका कवितेप्रमाणे आहेत हे जाणवल्यावर ही रचना मी अप्रकाशित केलेली होती, एका चर्चेच्या अनुषंगाने पुनर्प्रकाशित केली.

http://www.maayboli.com/node/49186#comment-3135634

-'बेफिकीर'!

काही अत्यंत व्यक्तिगत पातळीवरचे अनुभव काव्यात उद्रेकून येतात तेव्हा कवितेचं तंत्र कसं कुठून परस्पर सांभाळलं जातं कळत नाही.पण हे घडतं. शोकाला श्लोकत्व येणे वगैरे. हे सांकेतिक साच्यापलिकडचं काहीतरी असतं आणि मग ती कविता मनात घर करून राहते. त्यातलीच तुमची ही गझल बेफिकीर.

ओह!

तुमच लिखाण ब-याचदा इतक रिलेट होत की वाट्त
यातुनच तर गेलोय आपणही ,खपली ़
़खरवड्ल्या जाते
नि प्रतिसाद देणही सुचत नाही.

Pages