त्रास

Submitted by संतोष वाटपाडे on 25 May, 2014 - 02:05

मला होईल तो होऊच दे तू त्रास आता
तुझ्यावाचून मी घेईन सारे श्वास आता...

तुझी जागा कुणाला मी कधी देणार नाही
मनाजोगा हवा आहे गळ्याला फ़ास आता

खर्‍या प्रेमामुळे आयुष्य़ जर बर्बाद होते
कसा ठेवू इथे कोणावरी विश्वास आता

जिथे जावे तिथे येतो थवा हा आठवांचा
नकोसा वाटतो एकांत या देहास आता

मुळाशी घाव तू घालून गेली काळजाच्या
पहा होणार नाते आपले खल्लास आता

जसा उद्धार सीतेचा कधी जाळात झाला
तसा होणार का उद्धार माझा खास आता...

पुन्हा नाही दिसायाचा तुला संतोष वेडा
प्रिये तू मोकळे हासून घे बिंधास आता...

-- संतोष वाटपाडे (नाशिक)

Group content visibility: 
Public - accessible to all site users

जिथे जावे तिथे येतो थवा हा आठवांचा
नकोसा वाटतो एकांत या देहास आता<<< दोन्ही ओळी स्वतंत्रपणे आवडल्या.

(अवांतर - गझल म्हणून सादर करणार असलात तर मात्र 'उद्धार सीतेचा' ह्या ओळीत वृत्त भंगलेले आहे) Happy