"शांतता राखा" असे का ओरडावे लागते ? (तरही)

Submitted by इस्रो on 19 May, 2014 - 10:26

"नीट वागा माणसांनो" का म्हणावे लागते ?
"शांतता राखा" असे का ओरडावे लागते ?

गोड कोणी आपल्याशी बोलतो जेव्हा जरा
काय आहे काम त्याचे ? ओळखावे लागते

भाबडा बनतो कधी अन भामटा दिसतो कधी
मुखवटे लावून मजला वावरावे लागते

चांगले वाईट घडते आपल्या जे जीवनी
"दैव अपुले, काय दुसरे ?" हे म्ह्णावे लागते

चांगली नाही सवय ही चांगले ठाऊक मग
का उगा शेजार दारी डोकवावे लागते

आपणच बघ आपल्याला आजमावे लागते
जायचे स्वर्गात जर आधी मरावे लागते

ना तसे नाते फळांचे मोसमाशी राहिले
मागणी येईल तैसे मोहरावे लागते

दाहते तोर्‍यात दिवसा व्योम ध्ररतीला किती !
सांजवेळी पण तयाला मावळावे लागते

अन्न, वस्त्रे अन निवारा मिळवण्या 'नाहिद' इथे
जे नको ते नेमके मज का करावे लागते ?

- नाहिद नालबंद
[ भ्रमणध्वनी : ९९२१ १०४ ६३०]

Group content visibility: 
Public - accessible to all site users

छानच नाहीदभाई

व्योम <<< टेक्नीकली करेक्ट नाही हा शब्द ह्या शेरात
व्योम म्हणजे आकाश /अवकाश ते मावळत नसते किंवा धरतीला दाहतही नसते मावळतो तो सूर्य दाहतो तो सूर्य
हा एक पुल्लिंगी शब्द आहे
दाहतो तोर्‍यात दिवसा सूर्य धरतीला किती >>> असे करू शकता नाहिदभाई

धन्यवाद Happy

प्रतिसादाबद्द्ल आपणा सर्वांचे आभार, धन्यवाद!
वैभवजी, व्योम बद्दल धन्यवाद. मी कट्यार काळजात घुसली या नाटकातलं ' तेजोनिधि लोहगोल...' हे
गीत ऐकले होते. त्यात एक ओळ आहे - हे दिनमणी व्योमराज- आणि व्योमराज म्हणजे सूर्य असे डोक्यात होते आणि तेच वापरले गेले. पण चूक लक्षात आणून दिल्याबद्दल धन्यवाद.