आमचे वायंगणकरसर

Submitted by अतुल ठाकुर on 17 May, 2014 - 21:20

मुक्तांगण म्हणजे एखाद्या महासागरासारखे आहे. तेथील प्रत्येक माणुस, मग तो रुग्णमित्र असो कि कार्यकर्ता, प्रत्येकाकडे अनुभवाचा प्रचंड साठा असतो. व्यसन ही गोष्ट्च इतकी गुंतागुंतीची असते की ती अनेक दृष्टीकोणातुन पाहता येते. स्वतः व्यसन करणार्‍याचा एक दृष्टीकोण असतो. बायकोचा वेगळा, आई वडिलांचा वेगळा, उपचारकाचा वेगळा. माणसाला व्यसनापासुन मागे खेचणारे मित्र वेगळे, त्याकडे नेणारे मित्र वेगळे. स्वतःहुन मुक्तांगणला येणारे वेगळे आणि मुक्तांगणला येऊनसुद्धा कशाला आपण येथे आलो हे माहित नसणारे वेगळे. या नानाविध दृष्टीकोणांमुळे मुक्तांगणच्या प्रत्येक कार्यकर्त्याला निरनिराळ्या तर्‍हेच्या माणसांशी दररोज तोंड द्यायला लागतं. फार काय, एकाच रुग्णाची पहिल्या आठवड्यातील वागणुक आणि दुसर्‍या आठवड्यातील वागणुक यात गुणात्मक फरक असतो. मुक्तांगणमध्ये दिसुन येणारं माणसांचं वैविध्य अफाट असतं. त्यामुळे मुक्तांगणमध्ये शिरल्यावर कुठल्याही कोपर्‍यात बसलेल्या माणसाशी तुम्ही बोलु लागलात तर थक्क होऊन जाल अशी माहिती आणि अशा गोष्टी ऐकायला मिळतात. मुक्तांगणमध्ये येणार्‍या माणसांची नीट झडती घेतली जाते. आता तेथे तंबाखु देखिल पूर्णपणे बंद केली आहे. त्यामुळे झडती कसुन घ्यावी लागते. त्यानंतर तुमचा मोबाईल आणि पैशाचे पाकीट डावीकडल्या रिसेप्शनमध्ये जमा करावे लागते. तेव्हा तुमची भेट होते एका गृहस्थांशी. त्यांचे वय पासष्टीच्या पुढे गेलेले आहे हे सांगुन विश्वास बसत नाही. ते दिलखुलास हसुन तुमचं स्वागत करतात. आणि माणसाच्या मनावर आलेला ताण निदान काही प्रमाणात तरी कमी होतो. ते असतात आमचे वायंगणकरसर!

तेथे तुम्ही दहा मिनिटे जरी बसलात तरी हा एकटा माणुस किती माणसांना लिलया तोंड देतो आहे हे दिसुन येतं. "अहो ती ढोबळेंची फाईल मिळाली नाही" मग वायंगणकरसर त्या फाईलचा चटकन नंबर शोधुन देतात. त्यानंतर अनेकदा त्या फाईलबद्दल ती मिळेपर्यंत नाना लोकांकडुन विचारणा होत असते. तेव्हा वायंगणकरसरांना पुन्हा नंबर पाहावा लागत नाही. तो पहिल्या वेळीच तोंडपाठ झालेला असतो. कुणी नवीन समुपदेशक येऊन आपल्याला कुठले पेशंट मिळाले आहेत त्याची चौकशी करुन जाते. तिच्याशी काही माफक थट्टा. तेवढ्यात ओपीडीसाठी माणसे येऊ लागतात. त्यांची रिसिट फाडणे. त्यांना इष्टस्थळी पाठवणे. आणि हे सारं कोरडेपणाने नाही. अतिशय आपुलकीने आणि प्रेमाने. त्याचवेळी तेथे राहणारे रुग्णमित्र खाली हिंडत असतात. त्यांच्यावर बारीक नजर ठेवणे. कारण त्यातलाच कुणीतरी नजर चुकवुन तेथे आलेल्या कूणाकडुन तरी मोबाईल फोन घेऊन आपल्या घरच्यांशी बोलु लागतो. तेव्हाच उपचार पूर्ण करुन घरी जाणारे देखिल असतात. त्यांच्या आईवडिलांच्या डोळ्यात आनंद मावत नसतो. त्यांना शुभेच्छा देणे, हसुन निरोप देणे हेही काम सरांचेच असते. जाणारा सरांशी हात मिळवल्याशिवाय जात नाही. त्याचवेळी फोनदेखिल सतत वाजतच असतो. त्यावर नम्रपणे उत्तर देणे हे काम सुरु असते. या सार्‍या जंजाळात आमच्यासारखी, संशोधनासाठी माहिती मिळवायला आलेली मंडळीदेखिल असतात. त्यांनादेखिल वायंगणकरसर पुरुन उरतात. हे पाहताना या माणसाचे काम किती महत्त्वाचे आहे याची चटकन कल्पना येत नाही. मात्र या कामाची माहिती मिळायला लागल्यावर मात्र थक्क व्हायला होतं.

अलिकडे काही प्रसिद्धव्यक्ती देखिल व्यसनमुक्तीसाठी मुक्तांगणमध्ये दाखल होतात. पत्रकारांना खमंग माहिती हवी असते. अशावेळी ते निरनिराळ्या क्लुप्त्या लढवतात. फोन करुन माहिती मिळवण्याचा प्रयत्न करतात. मात्र वायंगणकरसरांसमोर काहीही चालत नाही. हा माणूस येथे दाखल झाला आहे कि नाही ही देखिल माहिती सरांकडुन मिळत नाही. सरांची खरेखोटेपणा तपासण्याची स्वतःची एक पद्धत आहे. त्यानुसार ते फोनवरच्या माणसाला उघडं पाडतात. काहिवेळा रुग्णाचे नातेवाईक, मित्रमंडळी आणि इतरजण बंदी असतानादेखिल त्यांच्याशी फोनवरुन बोलण्याचा प्रयत्न करतात. हे मुक्तांगणच्या नियमात बसत नाही. रुग्णाला त्याचा ताणतणाव वाढवणारी माहिती मिळाली तर त्याची बरे होण्याची प्रक्रिया धोक्यात येऊ शकते. तो कदाचित घरी जाण्याचा हट्ट धरुन उपचारांना नकार देऊ शकतो. बरेचदा खोडसाळ फोन करणारे देखिल असतात. आणि वायंगणकरसर अशांना हातोहात पकडतात. "जगात व्यसनी माणसासारखा हुशार माणुन कुणीच नसतो" हे वायंगणकरसरांचे ठरलेले वाक्य आहे. आणि त्यामुळे ते अतिशय सावध असतात. शाहाळ्याच्या पाण्यात दारु आणण्यापासुन ते फरसाणात तंबाखु मिसळुन रुग्णाला देण्यापर्यंत येथे प्रकार घडतात. नातेवाईकांचे कपडे घालुन बाहेर जाण्याचा प्रयत्न करणारी मंडळीसुद्धा दिसुन येतात. त्यामुळे येथे सर्वांनाच डोळ्यात तेल घालुन काम करावे लागते. दाखल व्हायला येणारी माणसे हा आणखि वेगळा प्रकार असतो.

वायंगणकरसरांसमोर एकदा आपल्या हवालदार पतीला घेऊन मुक्तांगणला दाखल करायला त्याची पत्नी आली होती. हवालदारसाहेव घुश्श्यातच होते. त्या रागात दाखल व्हायच्या दिवशीच "थोडीशी घेऊन" देखिल आले होते. सरांच्या कुठल्याच प्रश्नाला साहेब उत्तरच देईनात. पत्नीवर राग त्यामुळे कुठल्याही प्रश्नाला पत्नीकडे तिरपा कटाक्ष टाकुन "मला काय माहित? तिलाच विचारा. तिला जास्त माहित आहे" असे तिरसट उत्तर साहेब देत होते. काहीवेळ असे चालल्यावर वायंगणकरसर म्ह्णाले," अहो तिला विचारा काय म्हणता? त्या कुठे दारु पिताहेत?, तुम्ही पिताय त्यामुळे उत्तर तुम्हालाच द्यावे लागणार". असे म्ह्टल्यावर साहेब भानावर आले. दुसरे एक हवालदार आपण "हवालदार" आहोत म्ह्णुन आपल्याला उपचारांच्या शुल्कात सवलत असायला हवी असे म्हणु लागले. तेव्हा वायंगणकरसरांनी ब्रह्मास्त्र सोडले होते. "जेव्हा वाईनशॉप्समध्ये हवालदारांना खास सवलतीत दारु मिळायला लागेल तेव्हा आंम्ही येथेही तुम्हाला सवलत देऊ" हे वायंगणकरांचे वाक्य तो माणुस बहुधा आयुष्यात विसरणार नाही. व्यसन करताना अफाट खर्च करायचा, अगदी हजार, लाखात सुद्धा. तेव्हा मागेपुढे पाहायचे नाही. मात्र उपचाराचा प्रश्न आला की सवलतीची मागणी करायची. अशी अनेक माणसे येतात. वायंगणकरांकडे अशी अनेक उदाहरणे होती. बायको दागिन्यांच्या ओझ्याने वाकलेली आहे. स्वत:च्या बोटांमध्ये सोन्याच्या अंगठ्या आहेत. पण उपचारांमध्ये सवलत हवी आहे. चांगली नोकरी, चांगल्यापदावर असणार्‍यांना देखिल अशावेळी फसवणुक करण्याची बुद्धी होते.

त्यानंतर वायंगणकरसरांना तोंड द्यावे लागते ते उच्चशिक्षीत मंडळींशी. ही माणसे स्वतःला बदलण्यापेक्षा मुक्तांगणला बदलण्यासाठी आलेली असतात. शिक्षण, पद, प्रतिष्ठा डोक्यात असतात त्यामुळे आतला अहंकार आपल्याला काही व्यसन आहे हे मान्य करु देत नाही. ही माणसे आपल्याला सर्व ठाऊक आहे या भ्रमात वावर्त असतात. मग मुक्तांगण सुधारण्याची भाषा सुरु होते. मोठमोठे फीडबॅक दिले जातात. त्यात अगदी मुक्तांगणमध्ये स्विमिंग पुल हवा येथपर्यंत सुचना असतात. अशांसाठी वायंगणकरसरांकडे एक गोष्ट असते. एक साधु शिष्याला चिखलाने भरलेलं मडकं देऊन त्याला त्यात खीर घेऊन येण्यास सांगतो. शिष्य नेहेमीच्या घरी भिक्षा मागायला जातो आणि खीरीची भिक्षा मागतो. जेव्हा त्या घरातील बाई खीर घेऊन बाहेर येते तेव्हा ती चिखलाने भरलेलं मडकं पाहुन शिष्याला सांगते "यात खीर कशी वाढणार? आधी ते मडकं रिकामी कर. आणि नीट धुऊन आण. मग त्यात खीर वाढता येईल". हे सांगितल्यावर खरं तर यावर ऐकणार्‍याला आणखि स्पष्टीकरणाची गरज भासत नसणार. पण मुक्तांगणमध्ये येताना स्वतःचं डोकं रिकामी करुन आलं आणि तेथे घेत असलेल्या उपचारांना मोकळ्या मनाने स्वीकारलं तर बरे होण्याची प्रक्रिया जलद घडते हा तेथील सर्वांचा अनुभव आहे. वायंगणकरसर हे सांगत असताना मला फॉलोअप मिटिंगमध्ये निरनिराळ्या शंकाकुशंका काढणार्‍या बुद्धीमंताची आठवण होत होती.

वायंगणकरसरांसमोर येऊन मोठमोठ्या बाता मारणारे तर अनेक. सरांची स्वत्:ची अशी खास निरिक्षणे आहेत. व्यसनी रुग्ण अनेकदा गोष्टी फुगवुन सांगत असतो. फुशारक्या मारणे हे तर नेहेमीचेच. त्यामुळे तो सांगत असलेल्या अनेक गोष्टींची नातेवाईकांकडुन शाहनिशा करुन घ्यावी लागते. असाच एक रुग्णमित्र सारांजवळ तक्रार करत होता. येथे दाखल झाल्यामुळे माझे २५ हजारांचे फटाके घरात पडुन वाया जाणार. मी धंदा लावणार होतो. आता एवढं नुकसान झालं वगैरे वगैरे. त्याच्या घरी चौकशी केली असता " पंचवीस हजारांचे फटाके खरोखर घरात असते तर याला त्यावरच बसवुन आग लावली असती" असे उत्तर मिळाले. वायंगणकरसरांकडे गोष्टींचा प्रचंड साठा आहे. सांगण्याची सुरेख हातोटी आहे. सांगताना त्यांना शब्द शोधावे लागत नाहीत. एका विशिष्ठ ठसक्यात ते हकिकती सांगतात. नवीन येणारा रुग्ण हा त्यांच्या लेखी इतर अनेकांसारखाच एक नसतो. प्रत्येकाची वैशिष्ट्ये त्यांना माहित असतात. मला आश्चर्य वाटलं ते त्यांच्या न मावळणार्‍या हास्याचं. आणि त्यांच्या वागण्यातल्या आपुलकीचं. मनात सहृदयता, आत्मियता आणि रुग्णाबद्दल गाढ सहानुभुती असल्याशिवाय हे शक्यच नाही.

मात्र कटु अनुभवदेखिल आहेतच. मुक्तांगणमधुन बरे होऊन गेलेले काही रुग्णमित्र रस्त्यात भेटल्यावर ओळख दाखवत नाहीत. आपण मुक्तांगणला होतो हे त्यांना कुणालाही कळु द्यायचं नसतं. आपल्या व्यसनाची माहिती कूठेही कळु नये अशी त्यांची इच्छा असते. त्यामुळे पाहुन देखिल न पाहिल्यासारखं करणं असा प्रकार वायंगणकरसरांनी अनेकदा अनुभवला आहे. मात्र व्यसनमुक्त मित्रांची कुचंबणा वायंगणकरसर समजु शकतात. ते देखिल ओळख दाखवत नाहीत. किंवा कुणी दाखवावी असा आग्रह धरत नाहीत. पिल्लाने उडायला शिकल्यावर पुन्हा घरट्याकडे परतुन आईवडिलांची विचारपूस करणे हे घडतेच असे नाही. मुक्तांगणने पंख दिले. वायंगणकरसरांसारख्या माणसांनी त्यात उडण्याचं बळ दिलं. आता ती पिल्ले भरार्‍या मारु लागली आहेत. आकाशाला गवसणी घालु लागली आहेत याचाच आनंद वायंगणकरसरांना मोठा असतो. मिस्किलपणे हसणार्‍या वायंगणकरसरांच्या डोळ्यांत हा आनंद नेहेमी दिसतो

अतुल ठाकुर

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मुक्तांगणसारख्या ठिकाणी व्यसनमुक्तीसाठी दाखल होणारे लोक संस्थेच्या प्रेमापोटी आलेले नसणार हे तर उघडच आहे. एखाद्याला सर्वार्थाने व्यसनापासून मुक्ती हवी असते तर अन्य कित्येक बळजबरी केली म्हणून आलो आहोत इथे अशाच आविर्भावात परिसरात वावरत असतात हेही उघडच. फरसाणातून अभक्ष्य पदार्थांची सरमिसळ करून ते पदार्थ व्यसनापोटी भक्ष्य करू पाहाणारे वीर पाहिले की उमजून येते की यांची गाडी रुळावर आणण्यासाठी कोणत्या आणि कसल्या निष्ठेच्या गार्डची मुक्तांगणला गरज आहे आणि ती गरज वायंगणकरसरांसारख्या कठोर परिश्रम घेणार्‍याच्या रुपाने पुढे येऊन ती भागविली जात आहे याची कहाणी अत्यंत आपुलकीने सांगितली गेली आहे. वर्णनावरून निश्चित दिसून येते की वायंगणकरसर हे शिक्षक नसून शिस्तीचे भोक्ते तर आहेतच शिवाय "क्वालिफाईड अ‍ॅडमिनिस्ट्रेटर" आहेत. अशा प्रशासकाला सदैव चेहर्‍यावर हसू ठेवता येत नाही तर प्रसंगी कठोर शिस्तीचा बडगा आणि शब्दसुद्धा वापरावे लागतात...आणि त्याचे इष्ट परिणाम दिसत असणारच.

एका विशिष्ट ध्येयाने प्रेरीत होऊन अथकपणे काम करणार्‍या सरांना एखाद्या शांत संध्यासमयी "...मुक्तांगणमधुन बरे होऊन गेलेले काही रुग्णमित्र रस्त्यात भेटल्यावर ओळख दाखवत नाहीत..." हा प्रसंग समोर दिसला की मनोमनी किती वेदना होत असतील त्याबद्दल तेच सांगू शकतील.

सुंदर व्यक्तीचित्रण, अतुल....अशा व्यक्तीसमवेत तुम्हाला कार्य तसेच संशोधन करण्याची संधी मिळते ही बाब तुमच्या दृष्टीने आनंददायीच म्हणावी लागेल.

अशोकराव, प्रतिसादाबद्दल आभार. ही बाब अतिशय आनंददायी आहे हे खरेच. मात्र तो आनंद द्विगुणित झाला आहे तो माझ्याकडुन एक जाणीवपूर्वक योग्य निर्णय घेतला गेला यासाठीदेखिल. मुक्तांगण हे मला अपघाताने मिळालेले नाही. मी विचारपूर्वक विषयाची मांडणी केली होती. आमच्या प्राध्यापकांना तर कसलंच सोयर सुतक नव्हतं. सकारात्मक कार्यात फारसा रस देखिल नव्हता. त्यामुळे तेथुन अशा संस्थेची शिफारस होणे जवळपास अशक्यच होते. डिपार्टमेंटमधले सगळेच "चिंता करतो विश्वाची" अशा अविर्भावात वावरत असतात.

सुरेख लिहिलंय ...

अशा वायंगणकरसरांसारख्या व्यक्ति मिळणे हे त्या संस्थेचे भाग्यच म्हणायचे ...
वायंगणकरसर हे खरे कर्मयोगी ....

छान लिहिलं आहे. संस्था अशा लोकांमूळेच चालतात पण त्यांची दखल सहसा घेतली जात नाही. त्यांना पण हे वाचायला द्याच.

संस्था काय किंवा कार्यालये काय, अशा एखाददुसऱ्या समर्पित माणसाच्या नि:स्वार्थ कामावरच चालत असतात. ही माणसे आपले व्यक्तिगत आयुष्य शिल्लकच न ठेवता संस्थेच्या अस्तित्वात विरघळून गेलेली असतात.
अशोक नायगावकरांची ती कविता आठवतेय -
'कल्याणकारी द्वारपालांच्या मनात फुलतात स्वप्नांचे करुणासागर
तशी मंदचपल वेगाने उभी रहातात प्रत्यक्ष संस्थांची
सनातन आणि अपरिहार्य अस्तित्वे
संस्था असीम त्यागाच्या अनावर ओढीतून
दरवळणाऱ्या वासासारख्या धुंद करतात आसमंत
संस्था टाळता येत नाहीत कितीही टाळू म्हटले तरी
एकलेपणाच्या व्यसनाला भुरळ घालतात संस्था
मृदंगासारख्या तालावर घुमतात ..

अशा एकांड्या शिलेदारांवर लिहिणे महत्वाचे कारण ते कोणत्याही प्रसिद्धीच्या फिकिरीत नसतात.. धन्यवाद अतुल.

छान लिहिले आहे.
फरसाण आणि तंबाखू यांचा संबध प्रथमच कळला:-) कधीतरी मुक्तांगणामधे जायचा (भेटायला, उपचारासाठी नव्हे ) योग यावा.

अहो सुसुकु, मलादेखिल ते प्रथमच कळले. लोक नशा करण्यासाठी काय काय करतात ते पाहिल्यावर डोक गरगरायला लागतं.

पावावर जॅम लावावा त्याप्रमाणे, बाम, आयोडेक्स पावावर थापुन खातात. त्याने नशा येते म्हणतात. मला तरी हे माहित नव्हतं. या सार्‍या गोष्टीं बाळगण्यावर तेथे बंदी आहे.