आरसा न्याहाळतो आहे तुला

Submitted by जयदीप. on 13 May, 2014 - 13:39

केवढी गेली पुढे माझी मजल...
घेतली आहेस तू माझी दखल!

आरसा न्याहाळतो आहे तुला
एवढा झाला तुझ्यामध्ये बदल!

तू दिले ते सांडले हातातुनी
ओंजळी माझ्या कधी नव्हत्या सखल

जी मला मोहीम आहे वाटते
ती तुझ्या बागेतली आहे सहल

कोणत्या शब्दात तू लिहिले मला
आजही माझी मला नाही उकल

घेतले मी ठाम निर्णय कैकदा
अन् सुरू झाली मनाची चल - बिचल

जयदीप

Group content visibility: 
Public - accessible to all site users

जी मला मोहीम आहे वाटते
ती तुझ्या बागेतली आहे सहल

व्वा. काय शेर आहे.
तुकारामाची आठवण झाली: ढेकणासी बाज गड, उतरचढ केवढी

घेतला मी ठाम निर्णय की सुरू...
होत असते या मनाची चल - बिचल<<< अतिशय उत्तम खयाल, पण शेर तोडण्याची जागा नाही आवडली. सरळ एका वाक्यासारखा वाचावा लागत आहे शेर! गझलेच्या शेरात दोन्ही ओळी स्वतंत्र व परीपूर्ण असाव्यात असा एक प्रघात पाळला जातो असे म्हणतात. उदाहरणार्थ, 'घेतला मी ठाम निर्णय की सुरू' इतक्याच ओळीचा, मिसर्‍याचा नेमका अर्थ काही स्पष्ट होत नाही. दुसरी ओळही त्याच कंटिन्युएशनमध्ये वाचल्याशिवाय अर्थपूर्णता जाणवत नाही. असे होऊ नये.

केवढी गेली पुढे माझी मजल...
घेतली आहेस तू माझी दखल!
सुरेख मतला

जी मला मोहीम आहे वाटते
ती तुझ्या बागेतली आहे सहल
.....चांगला शेर