विसरू नये असे एक स्थळ - 'आठवणीतली गाणी'-हे संकेत स्थळ

Submitted by किंकर on 14 May, 2014 - 19:22

संगीताचा आनंद घेण्यासाठी सुरांचे ज्ञान हवे हे जितके खरे, तितकेच शब्दांची माहिती पण असणे गरजेचे ठरते.म्हणजेच गीताची शब्द संगत अचूक असली कि त्या गीतातील गोडवा अमृतमय होतो.

आपल्याला अचानक कधीतरी कुठेतरी कोणत्याही कारणास्तव एखादे गाणे आठवते. कधी एखाद्या गीताचे धृवपद लक्षात असते, तर कधी एखाद्या गीताचा केवळ गायक कोण इतकेच माहित असते. कधी कधी फक्त चित्रपटाचे नाव माहित असते तर कधी संगीतकार सोडून काहीच लक्षात नसते. पण मन मात्र आत्ता ते गाणे पूर्ण शब्दांसह समोर असते तर किती बरे झाले असते असे म्हणत असते.

तुमच्या मनात काय आहे हे ओळखून तुमच्या गरजांची पक्की खुणगाठ बांधत,अलीबाबाच्या राज्यात राहून ही गाण्यांच्या खजिन्याची गुहा आपल्यासमोर उघडली आहे दुबई स्थित अलका विभास यांनी. आणि या जादुई गुहेत डोकावून सुवर्णशब्दांचा अनमोल खजिना लुटताना एकाच मंत्राची गरज आहे ती म्हणजे - गाण्याच्या आठवणीतून -'आठवणीतली गाणी' थोड्क्यात काय गाण्याच्या संबंधी काहीही आठवा आणि ते गाणे मनात साठवा.

गाण्याविषयी सर्व काही आणि तेही तुमच्या मनात नव्हे तर बोटात सामावून ठेवले आहे असे वाटायला लावणारे एक लाजवाब, आपल्या मातृभाषेतील अनेकविध गीतांची ओळख अनेक पद्धतीने करून देत गाण्यांचा विसर पडू न देणारे संकेत स्थळ म्हणजे 'आठवणीतील गाणी'!

आज १५ मे 'आठवणीतील गाणी' या संकेत स्थळाचा ११ वा वर्धापन दिन. गेल्या अकरा वर्षात हे संकेत स्थळ फक्त वाढले नाही तर परिपूर्णतेने आकाराला आले. आज हे संकेत स्थळ ४१ लाख चाहत्यांचा टप्पा ओलांडून ५० लाख चाहत्यांच्या जादुई टप्प्याकडे झेपावू लागले आहे. मला तर पूर्ण खात्री आहे नजीकच्या भविष्यात कोटीच्या कोटी उड्डाणे देखील सहज पार करेल.

आजच्या अकराव्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने या संकेत स्थळाच्या कार्याविषयी अतिशय कौतुक वाटते,कारण नवनिर्मितीमधून भाषा, साहित्य, संस्कृती यांची जपणूक होते, तसेच प्रमाणे भाषा, साहित्य, संगीत यातील दुर्मिळ विखुरलेली मौत्तीके संग्रहित करण्याच्या वृत्तीतून देखील परंपरा जपली जाते. म्हणूनच दुर्मिळ विसर पडत चाललेल्या या गीतरूपी खजिन्याची देखभालच हे संकेत स्थळ आपल्यासाठी करीत आहे.

मराठी भाषेतील जास्तीत जास्त गाणी शब्दरूपात देताना, हा संग्रह सर्वांना विनामुल्य खुला करताना ह्या संकेत स्थळ निर्मितीमागे संत तुकाराम यांनी त्यांच्या एका अभंगात नमूद केल्या प्रमाणे -

आम्हां घरीं धन शब्दाचींच रत्‍नें ।
शब्दाचींच शस्‍त्रें यत्‍ने करूं ॥१॥

शब्द चि आमुच्या जिवाचें जीवन ।
शब्दें वांटूं धन जनलोकां ॥२॥

तुका म्हणे पहा शब्द चि हा देव ।
शब्दें चि गौरव पूजा करूं ॥३॥

अशीच भावना असावी असे मनोमन वाटते .

मायबोली, तसेच इतरही अनेक मराठी संकेत स्थळे, विविध मराठी ब्लॉग, यांनी ज्या प्रमाणे आधुनिक तंत्रज्ञानाची कास धरत आपल्या मातृ भाषेस उर्जित अवस्था आणण्यात हातभार लावला आहे त्या प्रमाणे 'आठवणीतील गाणी' या संकेत स्थळाने आपल्या कृतीने हे कार्य अत्यंत निरपेक्ष भावनेने पुढे नेले आहे.

आज 'आठवणीतील गाणी' हे संकेत स्थळ नेत्रदीपक करण्यात अनेकांचा सहभाग असला तरी अलका विभास यांचा वाटा सिंहाचा राहिला आहे. आज मराठी साहित्य संगीत प्रेमींना हे संकेत स्थळ उपलब्ध करून देताना अलका ताईंनी अतुलनीय कार्य केले आहे. आज या संकेत स्थळाच्या ११ व्या वर्धापन दिनी हे संकेत स्थळ १११ वर्षे तळपत राहो अशाच आम्हा मराठी रसिकांच्या कडून शुभेच्छा !

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

दिवसाची शुभ सुरुवात "आठवणीतली गाणी" लेखन वाचनाने व्हावी या परते दुसरे सुख नाही. कोणत्याही कमर्शिअल लाभाचा विचार न करता केवळ मराठी गाण्यांच्या प्रेमापोटी मांडलेला हा थक्क करणारा पसारा आणि या आल्हाददायक प्रांतातून फिरताना जाणवते ते अलका विभास आणि त्यांना हार्दिक सहकार्य करणार्‍या त्यांच्या मित्रमैत्रिणीचे अथक असे कष्ट.

काय नाही या आठवणीतल्या गाण्यात ? चित्रपट, नाटक, स्वर, संगीतकार, गीतकार, रागदारी, ऑडिओ, व्हिडीओ, गीतप्रकार....अगदी मालिका गीतेही.....आणि त्यातही अनेक उपप्रकार....आद्याक्षरानुसार गाणी शोधण्याची सोय, अत्यंत सुंदर असा फॉन्ट वापरून लिहून काढलेली सारी गाणी....त्यांचा इतिहास.

मराठी संगीत श्रवण करणार्‍यांसाठी ही मेजवानीच आहे....आज अकराव्या वर्षात पदार्पण करीत असलेल्या या सुंदर संकेतस्थळाच्या भावी वाटचालींसाठी हार्दिक शुभेच्छा !

समयोचित आणि सुंदर लेख....

"आठवणीतली गाणी" हे संकेतस्थळ खरोखरच फार सुरेख आहे ...

या सुंदर संकेतस्थळाच्या भावी वाटचालींसाठी हार्दिक शुभेच्छा ! >>>>+१००...

’आठवणीतली गाणी’ हे खरंच सुंदर आणि माहितीपूर्ण असं संकेतस्थळ आहे ...माझ्या खास आवडीचं आहे हे संस्थळ.
११व्या वर्धापनदिनानिमित्त अलका विभास आणि त्यांच्या चमूचे हार्दिक अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी खूप सार्‍या शुभेच्छा!

शशांक आणि प्रमोद जी....

मला खात्री होतीच की तुम्ही दोघेही "आठवणीतली गाणी" च्या प्रेमात असणार. खरोखरी अप्रतिम असा खजिना आपल्यासमोर आहे. मी तुम्हाला वैयक्तिक विनंती करीत आहे की अकराव्या वर्षाच्या निमित्ताने या स्थळाच्या एकमेव संचालिका अलका विभास याना तुम्ही ई-मेल द्वारा पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा द्याव्यात. "आठवणीतली गाणी" इथेच तसा संदेश देण्याची व्यवस्था केली आहे. मी आत्ताच मेल पाठविला आहे.

अशोकजी, मी, इथे प्रतिसाद देण्याआधीच अलकाताईंना पाठवलाय संदेश!
हे संस्थळ माझ्यासाठी ’मर्मबंधातली ठेव’च आहे.

माझेही अत्यंत आवडीचे संकेतस्थळ आहे हे. मराठी गाण्यांच्या डेटाबेससाठी पहिली ( आणि बहुतांशी एकमेव ) पसंती 'आठवणीतली गाणी'लाच !

'आठवणीतली गाणी' ला ह्रदयपूर्वक शुभेच्छा Happy

"आठवणीतली गाणी" इथेच तसा संदेश देण्याची व्यवस्था केली आहे. >>>> बरं झालं अशोकराव तुम्ही इथे लिहिलंत ते .... मी आत्ता विचारच करीत होतो - अलकाताईंना कशा शुभेच्छा द्यायच्या याचाच .... Happy

प्रमोद जी..... सुंदरच ! वास्तविक मला ते समजायला हवे होते की तुम्ही माझ्या प्रतिसादापूर्वी तशा शुभेच्छा पोच केल्या असणारच. पण मला मनोमनी वाटले की त्या स्थळाला सातत्याने भेट देणार्‍या इथल्या सदस्यांनी एकदोन ओळीचे पत्र विभासमॅडमना पाठवावे....तशी सोयही आहेच....म्हणून मग तुमचे आणि शशांक यांचे नाव घेऊन तो संदेश पाठविला.....जो खरेतर सर्वांनाच लागू आहे.

आम्ही पण आहोत या प्रेमात सहभागी. आता तर आमच्या कन्येलादेखील या स्थळाचे (संकेतस्थळ) वेड लागले आहे. Happy

Give link

सर्वच प्रतिसाद कर्त्यांचे मनपूर्वक आभार ! आपण आपल्या प्रतिक्रियेतून या संकेत स्थळाविषयी व्यक्त केलेले प्रेम अचूक आहे पुन्हा एकदा धन्यवाद.