आजोबा - थोडा अपेक्षाभंग

Submitted by सावली on 10 May, 2014 - 13:21

आज 'आजोबा' पाहीला. सिनेमा अर्थातच आवडला. विषय खुपच मस्त. असा विषय निवडल्याबद्दल अभिनंदन. आपणही आजोबाच्या प्रवासात गुंतुन जातो.

मात्र इथे कुणीच फारसे काही निगेटीव लिहीले नाहीये पण मला काही गोष्टी खटकल्या.

सुरुवातीच्या नावांच्या वेळी जे अ‍ॅनिमेशन दाखवले आहे ते बघुन लहान मुलांचा अ‍ॅनिमेशनपट सुरु होणार की काय असे वाटले. बरोबर असलेल्या लेकीलाही तसेच वाटले. अनिमेशन यापेक्षा कितीतरी जास्त चांगले करता आले असते असे वाटले.

शिवाचा पहिलाच सिन अगदीच अनावश्यक वाटला. शिवा आणि सुषमा एकमेकात खुप गुंतले आहेत हे वेगळ्या प्रकारे दाखवता आले नसते का? ( नंतर आजोबाच्या मागावर असलेला शिवा सुषमाला फोन करु नकोस सांगतो तेव्हा तो सुषमात इतका गुंतला होता तरी त्याला आता हे काम महत्वाचे वाटतेय असे दाखवायचे होते, त्यासाठी तो पहिला सिन होता असे मलातरी वाटले)

पुर्वा गावात रहायला जाते तेव्हा ते घर बघुन , तिथे डास आहेत हे ऐकुन होणारी तिची रिअ‍ॅक्शन अगदीच अनपेक्षित. जी फॉरेस्ट ऑफिसर / संशोधक अनेक वर्षे त्याच फिल्डमधे जीव ओतुन काम करतेय तीला गावात डास आहेत, लोड शेडींग होतं हे ऐकुन कसेसेस्च होते? ती पहिल्यांदाच फिल्डवर गेल्यासारखी रिअ‍ॅक्शन वाटली. ( मात्र पुढे सिनेमात तसे वाटले नाही. )

नंतर एका सिनमधे रात्री ती गावातल्याच बार मधे जाऊन ड्रींक ऑर्डर करते आणि पिते. ते ही पटले नाही. एक फॉरेस्ट ऑफिसर / संशोधक जी बिबळ्याच्या मागावर आहे, जीला बिबळ्याची नोंद आली तर रात्रीही बाहेर पडावे लागु शकते ती ड्रींक करेल असे वाटत नाही. जंगली प्राण्यांची घ्राणेंद्रीये तिक्ष्ण असतात त्यांना पर्फ्युम, अल्कोहोल असले वास तीव्रतेने जाणवतात त्यामुळे जंगली प्राण्यांचा अभ्यास करायला जंगलात जाताना संशोधक या गोष्टी टाळतात.

नंतर अ‍ॅनिमेशनमधे आजोबा शिकार करताना किंवा खाडी पार करताना दाखवला आहे. त्यातले अ‍ॅनिमेशन अगदीच बाळबोध वाटले. ते अधिक चांगले करणे / अव्हॉईड करणे शक्य नसेल झाले का? एका रेल्वे जवळच्या सिनमधेही अ‍ॅनिमेशन आहे बहुतेक पण ते ओरिजिनलशी बर्‍यापैकी ब्लेंड होते.

मला जरी सिनेमाच्या चित्रीकरणाविषयी फारसे कळत नसले तरी मागच्या वर्षी आलेल्या ट्रेलरवरुन सिनेमात खुपच चांगली सिनेमॅटोग्राफी असेल अशी अपेक्षा होती. पण माझ्यातरी अपेक्षा पुर्ण झाल्या नाहीत. मुख्यत्वे वाईड अ‍ॅंगल शॉट्स खुपच आऊट ऑफ फोकस वाटले / हवे तितके शार्प वाटले नाहीत. बरेच क्लोजअपस खुपच टाईट वाटले. एरियल शॉट्स पण एक्च डोंगर दोनतीनदा दाखवलाय आणि तेही शार्प आणि क्रिएटीवही वाटले नाहीत ( आठवा चे.ए. मधला दुधसागरचा एरियल शॉट , क्रिएटीव आणि शार्प ).

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सावली,

<पुर्वा गावात रहायला जाते तेव्हा ते घर बघुन , तिथे डास आहेत हे ऐकुन होणारी तिची रिअ‍ॅक्शन अगदीच अनपेक्षित. जी फॉरेस्ट ऑफिसर / संशोधक अनेक वर्षे त्याच फिल्डमधे जीव ओतुन काम करतेय तीला गावात डास आहेत, लोड शेडींग होतं हे ऐकुन कसेसेस्च होते? ती पहिल्यांदाच फिल्डवर गेल्यासारखी रिअ‍ॅक्शन वाटली. ( मात्र पुढे सिनेमात तसे वाटले नाही. ) > डासांबद्दलची ती प्रतिक्रिया 'तिरकस' होती. म्हणजे मलातरी ती तशी वाटली. आणि दिग्दर्शकानंही त्याच अर्थी ती चित्रीत केली आहे.

<नंतर एका सिनमधे रात्री ती गावातल्याच बार मधे जाऊन ड्रींक ऑर्डर करते आणि पिते. ते ही पटले नाही. एक फॉरेस्ट ऑफिसर / संशोधक जी बिबळ्याच्या मागावर आहे, जीला बिबळ्याची नोंद आली तर रात्रीही बाहेर पडावे लागु शकते ती ड्रींक करेल असे वाटत नाही. जंगली प्राण्यांची घ्राणेंद्रीये तिक्ष्ण असतात त्यांना पर्फ्युम, अल्कोहोल असले वास तीव्रतेने जाणवतात त्यामुळे जंगली प्राण्यांचा अभ्यास करायला जंगलात जाताना संशोधक या गोष्टी टाळतात. >

पूर्वा सातत्यानं जंगलात राहिलेली दाखवली नाहीये. तिचाही शहर-जंगल-आजोबा जिथे गेला त्या जागा, असा प्रवास सुरू आहे.

<मुख्यत्वे वाईड अ‍ॅंगल शॉट्स खुपच आऊट ऑफ फोकस वाटले / हवे तितके शार्प वाटले नाहीत. बरेच क्लोजअपस खुपच टाईट वाटले. एरियल शॉट्स पण एक्च डोंगर दोनतीनदा दाखवलाय आणि तेही शार्प आणि क्रिएटीवही वाटले नाहीत >

एकच डोंगर तीनदा? मलातरी हे जाणवलं नाही. शार्पनेसबद्दल मात्र सहमत. पण चित्रपट कसा दिसतो व ऐकू येतो, हे चित्रपटगृहावरही अवलंबून असतं.

चित्रपटाची सुरुवात अ‍ॅनिमेशनने म्हणून अ‍ॅनिमेशनपट, हे अजिबातच पटलं नाही. चित्रपट सुरू होऊन काही मिनिटांनंतर हे अ‍ॅनिमेशन येतं. 'शाळा', 'तारे जमीन पर', 'गुपचूप गुपचूप' हे कुठे अ‍ॅनिमेशनपट होते?

पोस्ट इथे हलवल्याबद्दल थँक्स चिनूक्स. Happy

डासांबद्दलची ती प्रतिक्रिया 'तिरकस' होती. >> असेल तसे पण मग मला तरी ते तसे वाटले नाही. पण खरंतर तिने तो प्रश्नच विचारायला नको होता. पहिल्यांदा फिल्डवर जाणार्‍या शिवाने विचारला असता तर चालले असते. अशा कामात खडतर जीवन आहे हे इतर प्रकारे दाखवता आले असते

<पूर्वा सातत्यानं जंगलात राहिलेली दाखवली नाहीये. तिचाही शहर-जंगल-आजोबा जिथे गेला त्या जागा, असा प्रवास सुरू आहे.> त्या सिनच्या जस्ट आधी तर ती त्या गावातल्या घरातच दाखवली आहे. शिवाय बारमधे असताना आई फोन करते त्या संवादावरुन ती अजुन जंगलाजवळच्या गावात आहे असेच वाटते.

एकच डोंगर तीनदा? मलातरी हे जाणवलं नाही >> एका सोनेरी गवताळ डोंगराचा एरीयल शॉट आहे तो.

पण चित्रपट कसा दिसतो व ऐकू येतो, हे चित्रपटगृहावरही अवलंबून असतं. >> नक्कीच. मलाही आधी तसेच वाटले. पण क्लोज अप मधे शार्पनेस परफेक्ट होता. म्हणजे वाईड अँगलला लेन्स क्वालिटी / फोकस / अपेर्चर यातलं काहीतरी हुकलंय.

शाळा, गुपचुप हे सिनेमे पाहीले नाहीत. 'तारे जमिन पर' पाहीलाय . इनफॅक्ट त्याचे टायटलचे अ‍ॅनिमेशन आवडले होते असे आठवतेय. इतर अनेक सिनेमाना अ‍ॅनिमेशनच असते टायटलला. पण जर तुम्ही लहान मुलांचे भिम किंवा हल्लीचे मराठी बडबडगीते आनिमेशन पाहीले असेल तर तुम्हाला मी काय म्हणते ते लगेच लक्षात येईल. या लहान मुलांच्या कार्यक्रमात जसे अ‍ॅनि. असते तसेच इथेही दिसते ( तसेच जंगल इत्यादी )

ओह सायो.. म्हणजे मी एकटीच नाही तर.. हुश्श.

< त्या सिनच्या जस्ट आधी तर ती त्या गावातल्या घरातच दाखवली आहे. शिवाय बारमधे असताना आई फोन करते त्या संवादावरुन ती अजुन जंगलाजवळच्या गावात आहे असेच वाटते. >

चित्रपट अनेक दिवसांच्या कालावधीत घडतो. अगोदर लिहिल्याप्रमाणे ही पूर्वाची दैनंदिनी नक्की नाही. महाराष्ट्र टाईम्समधल्या परीक्षणातही पत्रकाराच्या बाबतीतला मुद्दा आहे. मधल्या जागा प्रेक्षकांनी भरायला काय हरकत आहे?

सुरुवातीच्या अ‍ॅनिमेशनशी गुहांमधल्या चित्रांचा संबंध आहे.

सायो थँक्यु. वाचले परिक्षण. डासांबाबतीत त्यांनाही तसेच वाटले आहे.
यशपाल शर्माबाबत जे लिहीलेय त्यात तो एकाच सिन मधे विरोध करतो. त्याचा विरोधाचा मुद्दा तसाच अर्धा रहातो पण ते ठिक आहे. ' गन लावुन' जंगलात भटकणे मलाही फारसे पटले नाही. नुसते भटकणे , अभ्यास करणे, वृत्तपत्रातल्या नोंदी ठेवणे हे ठिक आहे.

सुरुवातीच्या अ‍ॅनिमेशनशी गुहांमधल्या चित्रांचा संबंध आहे. >> हो चिनुक्स. हे ही कळले मला. पण मी म्हणतेय ते वेगळे आहे "अनिमेशन यापेक्षा कितीतरी जास्त चांगले करता आले असते."

चित्रपट अनेक दिवसांच्या कालावधीत घडतो. >> शेवट वगळता चित्रपट फक्त २९ दिवसात घडतो. कुठल्याच चित्रपटात २९च्या २९ किंवा प्रत्येक दिवशी काय झालं हे दाखवलेलं नसतं. तरिही मधे काही काळ गेला, दिवस बदलला , जागा बदलली हे अनेक गोष्टींच्या माध्यमातुन दाखवलं जात. प्रेक्षकांना कळतंही. पण इथे तसे वाटले नाही.

महाराष्ट्र टाईम्समधल्या परीक्षणातही पत्रकाराच्या बाबतीतला मुद्दा आहे. मधल्या जागा प्रेक्षकांनी भरायला काय हरकत आहे? >> काहीच हरकत नाही. पण स्थलकालाचा बदल अनेक छोट्या गोष्टीतुन टिपला गेला तर ते आपोआपच होतं. वेगळा विचार करावा लागत नाही.

<अनिमेशन यापेक्षा कितीतरी जास्त चांगले करता आले असते>

पैसा.

स्थलकालातला बदल, वेगळे दिवस मुद्दाम न दाखवणं हे मलातरी आवडलं. मी लिहितो याबद्दल थोड्या वेळाने. Happy

चांगलं अ‍ॅनिमेशन दाखवायचं तर पैसा लागतो हे चित्रपटाचा विषय निवडताना, कलाकारांची निवड करताना माहिती असेलच की. पैसा हे उत्तर तुझं आहे की निर्मात्यांमर्फत तू देतो आहेस मला माहिती नाही. पण प्रेक्षकांचा अपेक्षाभंग झाल्याचं त्यांनी सांगितल्यावर पैसे कमी पडले म्हणून क्वालिटीत तडजोड केली हे सांगणं मला तरी पटलं नाही.

चित्रपटाचा विषय असा आहे की ट्रेलर्स यायला लागले तेव्हापासून प्रचंड उत्सुकता होती चित्रपट बघण्याची. आता पण चित्रपट बघणार मात्र रिव्ह्यु वाचून आताच थोडा अपेक्षाभंग झाल्यासारखं वाटतंय.

पैसा कमी पडला, हे 'अजून चांगलं करता आलं असतं' यावरचं उत्तर आहे. मला सुरुवातीचं अ‍ॅनिमेशन दर्जाच्या बाबतीत कुठेही कमी वाटलं नाही. चित्रपटाची पार्श्वभूमी ते उत्तमप्रकारे तयार करतं.

मी सावलीशी पूर्णपणे सहमत...खरंतर मी २ मे लाच हा चित्रपट पाहिला होता पण आधीच फुगा फोडायला नको म्हणून मी कुठेही लिहायचा मोह टाळला होता...पण आता विषय निघालाच आहे तर लिहीतोच...

सुजय डहाकेने म्हणल्याप्रमाणे एक कॉलमची बातमी चित्रपट म्हणून करणे हे खूप आव्हानात्मक होते आणि तसा प्रयत्न केल्याबद्दल अभिनंदन...मराठीत अशा प्रकारचे प्रयोग होत आहेत ही खूपच सकारात्मक गोष्ट आहे. पण दुर्दैवाने हा चित्रपट साफ गंडला आहे हे मान्य करायलाच हवे आणि त्यात हरकत काहीही नाही.
एका कॉलमच्या बातमीवरून चित्रपट कसा निघतो हे श्रीलंकेच्या मचान या चित्रपटाने सिद्ध केले आहे. त्याची तुलना करायची झाली तर पटकथा अतिशय सुमार आणि ठिगळे लावलेली आहे आणि तिथेच चित्रपटाचा तोल जातो. व्हाईट लायन हा एक अजून एक सुंदर चित्रपट.
ओम भूतकर आणि नेहा महाजनचा पहिलाच सीन बघून धक्का बसला..आणि याचे प्रयोजन या चित्रपटात काय हे काय शेवटपर्यंत कळले नाही. तीच बाब यशपाल शर्माची...त्याचे आक्षेप असेच टांगते ठेवत नक्की काय मिळाले ते कळत नाही. आणि त्या ठिकाणी उर्मिलाचा बचाव अगदीच तोकडा पडलाय. त्याने बंदूक घेऊन रानात फिरणे पण चित्रपटाच्या ट्रॅकशी अत्यंत विसंगत..
मेकींग ऑफ आजोबा मध्ये जवळपास प्रत्येकाने दिग्दर्शकाला सगळे चित्र कसे स्पष्ट होते असे ठासवले आहे पण चित्रपटात तरी अजिबात जाणवत नाही.
त्या चॅनेलवाल्या मुलीला एकदा झापल्यानंतर ती एवढी आमूलाग्र बदलते की लगेच त्यांच्याबरोबर जेवायला...काय अरे...किती तो हास्यास्पदपणा...
प्रेक्षकांनी गाळलेल्या जागा भरायच्या म्हणजे किती...
अॅनिमेशनबद्दल बाकीच्यांनी लिहीले आहे....त्यामुळे जास्त लिहीत नाही पण संभाजी उद्यानात गेल्यासारखा गेटमधून संजय गांधी नॅशनल पार्कमध्ये जाताना पाहून हसावे का रडावे ते कळेना...इतकी क्रिएटीव्हीटी

खरे सांगायचे झाले तर पूर्ण लांबीचा चित्रपट काढण्यापेक्षा १ तासाचा लघुपट उत्तम निघू शकला असता आणि त्यात असे पाणी घालावे लागले नसते.

सिंडरेला ++

पैसा कमी पडला मान्य. पण अ‍ॅनिमेशन महाग पडत असेल तर ते टाळुन संवादातुन, इतर कथानकातुन गोष्टं पुढे नेता येत होतीच ना.. त्यासाठी कमी पैशात होणारे बाळबोध अ‍ॅनिमेशन करणे जरुर नव्हते. आपल्याकडे अ‍ॅनिमेशन, ग्राफिक्स तंत्र आणि तंत्रज्ञांची इतकी कमी असेल तर कठीण आहे ( लोक्स ज्यांना आवड आहे त्यांनी नविन करियर म्हणुन बघायला हरकत नाही )

स्थलकालातला बदल, वेगळे दिवस मुद्दाम न दाखवणं हे मलातरी आवडलं. मी लिहितो याबद्दल थोड्या वेळाने. >>> ओके. वाट बघतेय.

आशुचँप,
गेटमधून संजय गांधी नॅशनल पार्कमध्ये >> तु लिहील्यावर हा सीन आठवला आणि जाम हसु आलं. लिहायचं राहुन गेलं होतं हे.

डिस्क्लेमर नंतर तु लिहीलेयस ते लिहायचे मी मुद्दाम टाळले होते. ( शेवटचे वाक्य सोडुन )

अमा, शेवट इतका निगेटीव्ह इम्पॅक्ट बनवत नाहीये इतकेच सांगु शकते.
शैलजा, एकदा बघायला हरकत नाही. लेकीबरोबर बघ. Happy
चिप दुसर्या प्रन्याने खल्ली तर >> माहिती नाही.

मीही काल सहकुटुंब सहपरिवार 'आजोबा' पाहिला.

एका बातमीवरून चित्रपट बनवण्याचं धाडस खरंच स्तुत्य आहे. आणि मराठीत असं धाडस केलं जातंय हे बघून नक्कीच फार बरं वाटलं. ऋषीकेश जोशीचा अभिनय नेहमीप्रमाणे छाप पाडतो.

तरीही चित्रपट बघताना काहीसा अपेक्षाभंग झाला.
ही समीक्षा किंवा चित्रपट परिक्षण वगैरे नाही. एक प्रेक्षक म्हणून हा चित्रपट बघितल्यावर काय वाटले, ते लिहिलंय.
अ‍ॅनिमेशन, विस्कळीतपणा यांविषायी सावली, आशुचँप यांनी लिहिलेले मुद्दे रिपीट करत नाही.
- बिबट्या विहिरीत पडल्याचा प्रसंग कंटाळवाणा वाटला. तो प्रसंग रोमांचकारी, उत्कंठावर्धक होऊ शकला असता.
- उर्मिलाची संवादफेक आहे त्यापेक्षा कितीतरी चांगली होऊ शकली असती. (तिचे मराठी अनेक ठिकाणी खटकते. पण ठीक आहे, तिला अमराठी दाखवली आहे तेंव्हा ते चालून जाते. पण कित्येक ठिकाणी नुसतेच बोलून दाखवल्यासारखे झालेत संवाद.)
- पहिल्या दहा दिवसांत आजोबाचा काहीच ठावठिकाणा लागत नाही. हे 'नो सिग्नल' वारंवार पडद्यावर दाखवून सांगितलंय. मला माहीत नाही हे अजून कसं दाखवता आलं असतं. पण आजोबाची चुटपुट लागण्याऐवजी तेच तेच परत बघून कंटाळा येतो.
- शेवटी जेंव्हा त्याचा अपघात होतो तेंव्हा 'पूर्वा रावां'ना फोन करून ज्ञानोबा आजोबाचा चीप क्रमांक विचारतो. तेंव्हा उर्मिला कपाटात ठेवलेल्या फाईल्स एकामागून एक भसाभसा बाहेर काढून त्या फाईलींमध्ये चीप क्रमांक शोधू लागते. रात्रंदिवस आजोबाचा ध्यास घेतलेल्या, पूर्णवेळ त्याच्या मागोव्याच्या खुणा शोधण्यात घरदार सोडून जंगलं तुडवणार्‍या संशोधिकेस 'आजोबा'चा चीप क्रमांक स्मरणात असावा, अशी अपेक्षा करायला हरकत नव्हती.
- अनेक ठिकाणी संधीप्रकाशात बिबट्याचं प्रोफाईल दाखवलं गेलंय. ते नकली बिबट्याचं आहे हे जाणवतं.

एकूण 'आजोबा' आणखी चांगला नक्कीच होऊ शकला असता.
('मेकींग ऑफ आजोबा' मध्ये दाखवलेलं गोंधळी थाटाचं गाणं (निसर्ग आपुला वाचवा) गाळलंय वाटतं.)

चिनूक्सच्या पोस्ट्स अशा समर्थन केल्यासारख्या, निर्माता दिग्दर्शकाची बाजू घेतल्यासारख्या का येत आहेत? मायबोली वगळता बाहेरील माध्यमाचे रिव्यूज उत्साहवर्धक नाहीत. केवळ विषयाचे नाविन्य आहे म्हणून ट्रीटमेन्ट मध्ये सवलती घेण्याचे आणि प्रेक्षकानीही त्या देण्याचे कारण नाही. तुम्ही व्यावसायिक स्पर्धेत उतरत आहात म्हणजे बाजाराचे निकष लोक तुम्हाला लावणारच. विषय वगळता क्लासेस आणि मासेस यांचा प्रतिसाद थंडच दिसतो आहे.
मराठी सिनेमाचे हे बजेटचे रडगाणे मला समजत नाही. सत्यजित राय किंवा साउथच्या कितीतरी क्लासिक दिग्दर्शकानी लो बजेट फिल्मा काढून आंतरराष्ट्रीय पातळीवर गाजवल्या आहेत . हा चित्रपट मला थीमने भारावून जा उन माध्यमाशी फारसा परिचय नसलेल्या लोकांनी काढलेला हौशी सिनेमा वाटतो.

चिनूक्सच्या पोस्ट्स अशा समर्थन केल्यासारख्या, निर्माता दिग्दर्शकाची बाजू घेतल्यासारख्या का येत आहेत? रोबिन्हूड +१ संपूर्ण पोस्टला अनुमोदन Happy

दुसर्या एका सिनेमाच्या बाबतीत सुद्धा मी आणि दुसर्या एका आयडीने सिनेमा आवडला नाही असे सांगितले तेव्हा पण चिनुक्स च्या अशाच प्रतिक्रिया होत्या निर्माता आणि दिग्दर्शकाची बाजू घेतल्या सारख्या Happy

रॉबीनहूड,
राय किंवा कासारवल्ली किंवा अदूर गोपालकृष्णन यांच्या कुठल्या लो-बजेट सिनेम्यात पंचवीस मिनिटांचं अ‍ॅनिमेशन आणि बिबटे आहेत? एका फ्रेममध्ये पक्षी दाखवायचे असले, तरी घ्याव्या लागणार्‍या ढीगभर परवानग्या, सेन्सॉरची आडकाठी इत्यादी राय यांच्या काळात होतं?

आणि बजेटचं रडगाणं कुठलाही निर्माता-दिग्दर्शक मुद्दाम गात नसतो. अगदी कमीत कमी पैशात सिनेमा करायचा म्हटला तरी बजेट अर्धा कोटीच्या घरात जातं. पोस्ट-प्रॉडक्शनसाठी स्टुडिओच्या विचित्र वेळा, त्यांची भाडी, त्यातून पैसे उरलेच तर मग जाहिराती, नंतर प्रीमियरसाठी थिएटरची भाडीही न परवडणे या सगळ्यांतून त्यांना जावं लागतं.

याच महिन्यात 'सलाम', 'एक हजाराची नोट' हे अप्रतिम सुंदर चित्रपट प्रदर्शित झाले. किती जाहिराती पाहिल्या या चित्रपटांच्या? किती खेळ आहेत यांचे? त्यांच्या वेळा काय? 'सलाम' २ मेला प्रदर्शित झाला. कालच दिग्दर्शक किरण यज्ञोपवीत यांचं 'बघायचा असेल तर लवकर बघा, पुढच्या आठवड्यात कदाचित नसेल' या अर्थी विधान होतं. याचा संबंध बजेटशी नाही तर कशाशी? 'सलाम'मध्ये अ‍ॅनिमेशन नाही. पण इतका सुरेख चित्रपट तयार करतानाही पैशाच्या काय अडचणी आल्या, हे ऐकलं की वाईट वाटतं.

आणि हे केवळ मराठी चित्रपटांपुरतं मर्यादित नाहीये. 'आँखो देखी' या अफलातून चित्रपटाला जाहिराती करता आल्या नाहीत. निर्मात्याकडे पैसे नसल्यानं दोन आठवड्यांत तो उतरवावा लागला.

मुद्दा 'अ‍ॅनिमेशन अधिक चांगलं होऊ शकलं असतं' हा आहे. त्याचं उत्तर ' हो, होऊ शकलं असतं, पण मग पैसेही अधिक लागले असते' हे आहे.

चित्रपटात त्रुटी असणारच. अपेक्षाभंगही होऊ शकतो. पण अ‍ॅनिमेशनसारख्या मुद्द्यांची गाडी पैशाशी अडते, हे कृपया नाकारू नका.

चिनुक्स,
ढीगभर परवानग्या, सेन्सॉरची आडकाठी इत्यादी >> या गोष्टींचा प्रेक्षक का विचार करतील? तयार होणारी कलाकृती प्रेक्षकांनी बघावी आणि त्यावर टिपणी करावी. एखादे चित्र काढताना कोणता ब्रश वापरला होता , तो कुठुन आणला याचा चित्र पहाणार्‍याशी काही संबंध नसावा.

पण अ‍ॅनिमेशनसारख्या मुद्द्यांची गाडी पैशाशी अडते >> ( पुढची पोस्ट लिहीणार नव्हते पण पुन्हा पुन्हा हाच मुद्दा येतोय) मग पूर्वा रावची भूमिका करण्यासाठी नविन पण सक्षम अभिनय करणारे कुणीच मिळाले नाही का? तसेच शर्माची भुमिका सुद्धा एखाद्या नविन कलाकाराला देता आली असतीच. त्यात नक्कीच कमी बजेट लागले असते. शिवाय २५ मिनीटांचे अ‍ॅनिमेशन करायचेच हे कशाला? अगदी अ‍ॅब्स्लोक्युट गरजेच्याच ठिकाणी कमी वेळाचे अ‍ॅनिमेशन ठेवुन अ‍ॅनिमेशनचे बजेट जास्त समर्थपणे वापरता आले असते.
बजेट कमी असले तर अ‍ॅनिमेशनकारांची आणि दिग्दर्शकाची क्रिएटीविटी कमी कशाला व्हायला हवी? गेट मधुन घुसणारा बिबट्या , पोहत जाणारा बिबट्या ही अ‍ॅनिमेशन दृष्ये अजिबात अतिआवश्यक वाटली नाहीत. टायटलचेही. अ‍ॅनिम्स्शन्स न वापरताही टायटल्स सुयोग्य प्रकारे दाखवता आली असती.

त्याशिवाय सिन्सच्या क्लिअ‍ॅरिटीचे काय? त्याला तर वेगळे बजेट आवश्यक नव्हते. एरिअल शॉट्सना पैसे लागतात पण एकदा सिस्टीम लावल्यावर त्यात क्रिएटीवली आणि क्वालिटी काम करने शक्य होते.
आज घराघरात एच डी टीव्हि आणि बिग स्क्रीन असताना, शिवाय मुख्यत्वे सिनेमाच्या मोठ्या स्क्रीनसाठी केलेले शूट हाय क्वालिटी असावे अशी अपेक्षा करण्यात काय गैर?

लिहावं, नाही लिहावं अशा द्विधा मनःस्थितीत लिहितेय.

एक नवा प्रयोग म्हणून कौतुक जरूर आहे पण ....

सावली, आशुचँप, गजानन +१

चिनुक्स, काही बाबतीत मला तुझे म्हणणे पटते. परंतु अ‍ॅनिमेशन बाबतीत मला पटत नाही. अ‍ॅनिमेशनमधील माझा अनुभव अगदी लहान आहे हे मान्यच. परंतु तरीही जे काही पाहिल , केलं आहे ( उदा. मायबोली शीर्षकगीताची टिझर) त्यावरून लिहितेय. मान्य आहे की अ‍ॅनिमेशनचे क्षेत्र खूप खर्चिक आहे. परंतु नवोदित कलाकारांना घेऊन प्रयत्न केले तर यापेक्षा जास्त चांगते अ‍ॅनिमेशन होऊ शकते. फक्त नवोदितांची निवड करताना शोध, काळजी, प्रयत्न करावे लागतील. आज अनेक अ‍ॅनिमेशन शिकवणा-या संस्था आहेत. तेथील काही विद्यार्थी खरोखर कलाकार आहेत. परंतु त्यांचा शोध घ्यायला हवा, बारीक शोधनजर त्यासाठी हवी.

किंबहुना आहे त्याच अ‍ॅनिमेशन मध्ये थोडी कलात्मकता असती तरी हे बाळबोध पण टाळता आले असते. एकच एक एरियल फोटोग्राफला अ‍ॅनिमेट करतानाही वेगवेगळे अँगलने करता येते, इफेक्ट देता येतात. पण इथे त्याच फ्रेम्स रिपिट केल्यात की काय अशी शंका यावी एव्हढे अ‍ॅनिमेशन बाळबोध झालेय. तशात अ‍ॅनिमेट करावयाच्या फोटोचे रेझोल्युशन्पण लहान असावे ?त्यामुळे हवी ती क्लॅरिटीपण येत नाहीये.

आशु >>>संभाजी उद्यानात गेल्यासारखा गेटमधून संजय गांधी नॅशनल पार्कमध्ये जाताना पाहून हसावे का रडावे ते कळेना <<< अगदी. थिएटरमध्ये अनेकांनी आँ केले

या शिवाय मला एक मुद्दा फार खटकला. कोणत्याही व्यावसायिक चित्रपटाची पहिली अपेक्षा असते, की तो स्मुदनिंग असवा. नजरेला त्रास न होता चित्र दिसावीत. पण या चित्रपटाच्या अगदी सुरुवातीच्या फ्रेम पासून शेवट पर्यंत, जर्क्स जाणवत होते. खडबडीत रस्त्याचा फिल यावा म्हणुन हे जाणीवपूर्व केले असण्याची शक्यता आहे परंतु त्यातही एक सफाई हवी, इफेक्ट तर यावा पण बघणा-याला त्रास होता कामा नये.

अजून एक म्हणजे गजानन यांनी म्हटल्या प्रमाणे नो सिग्नल याची फ्रेम. ही आणि अशा अनेक फ्रेम्स इतक्या मोट्या ... अगदी पडदाभर दाखवल्या आहेत; की पडदा भर शोधावे लागते नक्की कुठे बघू. फ्रेम मधे अपसूक नजर फिरली पाहिजे;जे दिग्दर्शकाला दाखवायचे आहे तिथे. इथे आपण शोधत राहतो, काय बघू म्हणुन.

पटकथा लेखनात ढिसाळपणा जाणवला.

अनावश्यक शब्द, अनावश्यक सीन्स, विड्यांचा अतिरेकी-अनावश्यक वापर, अचानक तीव्र भावना ( पत्रकाराला झापणे असो वा रडणे )... खरे तर मोठा चित्रपट असल्याने भरपूर वेळ होता ती ती सिच्युएशन तयार करायला.

काही ठिकाणी घिसाडघाई (पत्रकाराला झापणे, उर्मिलाचे समर्थन) अन काही ठिकाणी उगाचच निवांतपणा (सुरुवातीचा विहिरीचा शॉट, माळावरती दुर्बिणीने पाहणे ) एकंदर मला दिग्दर्शकाचा बाळबोधपणा जाणवला.

सुरुवातीच्या नावांच्या वेळी जे अ‍ॅनिमेशन दाखवले आहे ते बघुन लहान मुलांचा अ‍ॅनिमेशनपट सुरु होणार की काय असे वाटले.>>>>>सावलीचा हा एक मुद्दा सोडला तर इतर बहुतांशी मतांशी सहमत. 'शाळा', 'तारे जमीन पर', 'गुपचूप गुपचूप' यांचे सुरूवातीचे अ‍ॅनिमेशन पाहिल्यामुळे असेल बहुतेक.

कुठेही लिहायचा मोह टाळला होता..>>>>आशु +१ Happy

एकच एक एरियल फोटोग्राफला अ‍ॅनिमेट करतानाही वेगवेगळे अँगलने करता येते, इफेक्ट देता येतात. पण इथे त्याच फ्रेम्स रिपिट केल्यात की काय अशी शंका यावी एव्हढे अ‍ॅनिमेशन बाळबोध झालेय. तशात अ‍ॅनिमेट करावयाच्या फोटोचे रेझोल्युशन्पण लहान असावे ?त्यामुळे हवी ती क्लॅरिटीपण येत नाहीये. >>>>अवल +१

कदाचित आजोबाकडुन (आणि सुजयकडुन) प्रचंड अपेक्षा ठेवल्यामुळे असेल. Happy अर्थात प्रत्येकाचे मत वेगवेगळे, पण एकदा तरी अवश्य पाहण्यासारखा आहे. वरीलपैकी काही मुद्दे दुर्लक्षित केले तर तिकिटाचे पैसे फुकट जाणार नाही याची खात्री. Happy (सावलीनेही लिहिलंय कि "थोडा" अपेक्षाभंग). Wink

हॉलिवुड सारखी अ‍ॅनिमेशन हवी ही अपेक्षा करणे चुकिचे आहे. हॉलिवुड ची अ‍ॅनिमेशन लक्षात ठेवुन जर आपण भारतीय चित्रपट बघायला गेलो तर हमखास अपेक्षाभंग होतो हा अनुभव आहे..

आपल्या कडचे अ‍ॅनिमेशन चित्रपट (बाल गणेशा इत्यादी) आणि त्यांचे अ‍ॅनिमेशन चित्रपट (रिओ, कार्स) यात जमिन आस्मान चे अंतर आहे . तसेच
रजनीकांत चा कोच्चियन याचे इफेक्ट्स बघा आणि हॉलिवुड मधला "अवतार" हा चित्रपट बघा.. अवतार मधे अ‍ॅनिमेशन हे अ‍ॅनिमेशन वाटतच नाही जिवंत प्रतिमाच वाटतात . पण त्या अ‍ॅनिमेशन होत्या यावर विश्वास बसत नाही..
लाईफ ऑफ पाय मधील रिचर्ड वाघ हा पुर्णपणे अ‍ॅनिमेटेड होता .. ज्यांना माहीत नसेल त्यांना नक्कीच आश्चर्याचा धक्का बसतो. कारण तो कुठल्याही बाजुने अथवा हावभावामुळे अ‍ॅनिमेटेड वाटतच नव्हता. अस्सल खराखुरा जिवंत वाघ आपल्या समोर होता. आणि हे सगळे अ‍ॅनिमेशन भारतीयांनी तयार केलेले.
क्रिश२ चे सगळे स्पेशल इफेक्ट्स भारतातच रेड चिली च्या कलाकारांनी बनवलेले त्यामुळेच राकेश रोशन ला चित्रपटाचा खर्च परवडला..

भारतीय कलाकार तोडीस तोड आहे परंतु जो पर्यंत त्यांना आर्थिक पाठबळ नसेल तर त्यांना देखील मर्यादा येतातच ...

सावली आशुचँप गजानन अवल सर्वांशी सहमत. खूप व्यवस्थित मांडलेत मुद्दे.

लो बजेट मध्येच चित्रपट अधिक सशक्त बनायला नक्कीच वाव होता. अ‍ॅनिमेशनच्या सीन बद्दल फारशी काही तक्रार नाही. पण तरीही बाकी अनेक मुद्दे आहेत जे राहिल्याने चित्रपट अर्धवट राहातो. आणि वर सगळ्यांनी लिहिल्याप्रमाणे काही हास्यास्पद गोष्टींमुळे चित्रपटाचा सिरियसनेसच निघून गेला.

काही ठिकाणी उर्मिलाचा अभिनय आवडला तरी कथेत त्या डॉक्टरने डास, वीज ह्या संबंधी असे प्रश्न विचारणं खटकलं. शिवाय सगळ्यांनी म्हटलं त्याप्रमाणे शिवाचा तो पहिला सीन खूपच खटकला. काही संबंधच नव्हता.

त्या एकाच डोंगराचे दोन पेक्षा जास्त वेळा शॉट्स खटकले. त्यापेक्षा जमिनीवरचे जंगलातले शॉट्स घेतलेले पाहायला आवडले असते. अर्थात तसे न घेण्यामागे दिग्दर्शकाच्या काही अडचणी असतील- सरकारी इत्यादी असे आम्ही स्वतःलाच समजावले.

आजोबाने संगाराउ च्या गेटमधून प्रवेश करण्याचं अ‍ॅनिमेशन हास्यास्पद होतं. दुसर्‍या कोणत्या प्रकारे कळलं नसतं का प्रेक्षकांना?

ज्या एका आजोबासाठी सगळं सोडून धावपळ करताना दाखवलं आहे डॉ पूर्वा रावला ती चिप नंबर कसा विसरते आणि अशी वेड अअ डोक्यका शोधते?

आणि सगळे एक एक करून आजोबाला पाहयला येतात आणि पूर्वा त्याच्या डोक्यावरून हात फिरवत असते तेव्हाचा तिचा अभिनय. यक. किती तो फिल्मीपणा.

पण ह्याच बरोबर मी हा सिनेमा माझ्या सहा वर्षाच्या मुलाच्या दृष्टीकोनातून पाहिला. त्याला प्रत्येक सीन समजावत होते. तो आजोबात खूप इन्व्हॉल्व्ह झाला इतका की आजोबा आता नाही आहे हे कळल्यावर त्याला रडू आलं आणि मग बराच वेळ खूप अपसेट होता. इतकेच नव्हे तर सिनेमा म्हणून विस्कळीत आहे थोडा डॉक्युमेंटरी सारखा आहे असं वाटणारे आम्ही दोघं मी आणि नवरा दोघांच्याही डोळ्यात क्षणभर पाणी आलं.

मला वाटतं ह्या सिनेमात एण्टरटएनमेण्ट व्हॅल्यु शोधण्यापेक्षा ह्या सिनेमात आपण किती इन्व्हॉल्व्ह होतोय हे पाहयला हवं. हा सिनेमा मॅन अ‍ॅनिमल कॉन्फ्लिक्टचा मुद्दा सगळ्यांसमोर आणतोय हे पाहायला हवं.

हा चित्रपट पाहाताना खूप अपेक्षा होत्या.

कथा मॅन अ‍ॅनिमल कॉन्फ्लिक्ट ह्या अनुषंगाने वाढवली असती तर कदाचित जास्त प्रभावी झाली असती. उर्मिलाचा आणि पत्रकारांचा कॉन्फ्लिक्टचा सीन यशपाल शर्मा आणि उर्मिलाचा कॉन्फ्लिक्टचा सीन सुद्धा अधिक प्रभावी करता अला असता. तिथे उर्मिलाने प्रश्न विचारायला हवा होता, वन्य प्राण्यांचा वावर असलेल्या ठिकाणी तुझी मुलगी जीव द्यायला गेलीच कशाला? तुझ्या घरात जर उद्या वाघ घुसला तर तू काय त्याला मांडीवर बसवून गाई गाई करशील का? मग तुझ्याइतकी बुद्धी नसलेल्या जनावराने काय करायचं अशी तुझी अपेक्षा आहे? तेवढा फटकळपणा डॉ पूर्वा राव ह्या पात्रात नसेल ह्यावर विश्वासच बसत नाही.
आरे कॉलोनीतील ज्या घरातून लहान मुले बिबट्याने उचलली आहेत त्याबद्दल यशपाल शर्मा बोलतो तिथेही काही एक्सप्लनेशन येणे गरजेचे होते. त्याकरता थोडा अभ्यास थोडा वेळ थोडे सीन्स द्यायला हवे होते. डॉ राव ह्या रिसर्चरही दाखवल्या आहेत त्यामुळे त्यांच्या रिसर्च मध्ये आणि रिपोर्ट मध्ये ह्या गोष्टी आल्यात हे प्रेक्षकांना दिसायला हवे होते.

माझ्या माहितीत असे काही लोक आहेत ज्यांनी आरे कॉलोनीतील आदिवास्यांकडून भाड्याने जागा घेतल्या आहेत. तिथे रात्री दिवे किंवा घरात पाणी किंवा टॉयलेटस ह्या सोयींचीही वानवा आहे. काही घरांना तर दारेच नाहीत. त्यांच्याकडून मी जे ऐकले आहे ते असे की आदिवासी लोक आपले मूल/ घरातले माणून जनावराने नेले तर त्यावर शोक करतात पण त्या जनावरावर खुन्नस नाही धरत त्यांच्या संस्कृतीने त्यांना वाघाला गेलेला बळी स्वीकारायला शिकवले आहे. मुळात जनावरापासून त्याच्या विहाराच्या जागेपासून लांब कसे राहायचे ह्याबद्दल त्यांचे ज्ञान खूप सुस्पष्ट आहे. परंतु जेव्हापासून आदिवासींच्या व्यतिरिक्त नागरीक तिथे राहू लागल्यापासून हा प्रॉब्लेम खूप वाढला आहे.
संगाराउच्या बाजूला असणार्‍या टाटापॉवरजवळच्या म्हाडाच्या वसाहतीत किती तरी वेळा बिबट्या आणि सिंह येऊन गेलेत. तिथल्या लोकांच्या घरासमोर बसून त्यांनी विश्रांती घेतली आहे. आता नॅशनल पार्कला बांधलेल्या उंच भिंतीमुळे ते आता बंद झाले आहे परंतु तिथल्या लोकांना कधी त्या जनवरांचा त्रास नाही झाला. कारण असे की बिबट्या किंवा सिंह आला तर घरात बसून राहायचे गोंधळ करायचा नाही असे त्या लोकांनी ठरवून ठेवले होते.

हे सांगायचा मुद्दा असा की जेव्हा डॉ पूर्वा राव मॅन अ‍ॅनिमल कॉन्फ्लिक्ट बद्दल बोलतात एका आजोबाला वाचवायचा प्रयत्न करतात तेव्हा त्या फक्त आजोबा वर कॉन्सन्ट्रेट करताना दाखवल्यात. फक्त आजोबावरच प्रेम आहे का त्यांचं? बाकी बिबट्यांचं आणि बाकी जनावराचं काय? सिनेमा आजोबावर असला तरी हे मुद्दे यायला हवे होते. कारण अपेक्षा होती समाज प्रबोधनाची. असं मला तरी वाटतं. शिवाय जनावरांच्या आजूबाजूला वावरलेलल्या ह्या सामान्य नागरिकांच्या मुलाखती घेऊन इतरांनी त्यांचा अ‍ॅप्रोच कसा बदलायला हवा तेही दाखवायला हवे होते. ठाण्यात कांदिवली बोरिवली भांडूप मुलुंड ह्या आताच्या शहरी भागातआणि इतर ग्रामीण भागात जिथे बिबट्या वारंवार दिसतो तिथे लोकांनी बिबट्या दिसल्यावर पॅनिक न होता काय करायला हवे हे पूर्वाच्या सभेत किंवा तिच्या नागरिकांना दिलेल्या प्रशिक्षणातून दिसायला हवे होते.

शिवाय कोणालाही मग तो माणूस असो की जनावर त्याला व्हिलन बनवायला आपला मिडिया पहिली भूमिका बजावतो. कसे त्याची झलक आपण आजोबा मधे पाहिली आहेच. ह्याचही थोडं डिटेलिंग झालं असतं तर सिनेमा पाहाणार्‍या प्रेक्षकांना अधिक ज्ञान मिळालं असतं. एक कथा म्हणूनही चित्रपट अधिक अपील झाला असता.

व्यावसायिक चित्रपट म्हणून पाहिल्याने चित्रपटाबद्दलच्या अपेक्षा वाढतात. पण एवढं सगळं वाटूनही चित्रपट आवडला कारण आम्ही - मी आणि लेक त्या आजोबात खूपच जास्त इन्व्हॉल्व्ह झालो होतो.

>आणखीन एक सुचवावे वाटते. योग्य अयोग्य माहिती नाही. मायबोली प्रायोजक असल्याने तिने प्रसिद्धी, >प्रचार जरूर करावा . पण डिफेन्ड का करावे? मागेही एका चित्रपटाच्या वेळेस मला हा अनुभव आलेला. आणि >ही जर मायबोलीची भूमिका/ जबाबदारी/ बंधनं असतील तर तसे स्पष्ट मांडावे. म्हणजे मग अशा प्रतिक्रिया >आपोआपच लिहिल्या जाणार नाही. स्पष्ट धोरण म्हणून काही मांडावे, सर्व मायबोलीकर त्याचे स्वागतच >करतील.

अवल,
खूप महत्वाचा मुद्दा मांडलात. मायबोलीने डिफेन्ड करणे योग्य नाही. असे कुठले बंधन किंवा धोरण नाही. उलट प्रत्येक प्रेक्षकाला जे वाटले तेच लिहले जावे अशी अपेक्षा आहे. यात बर्‍या वाईट दोन्ही प्रकारच्या प्रतिक्रियांचे स्वागत आहे. यात धोरणाची बाब एकच आहे कि एखाद्या कथेमागे रहस्य असेल (Climax असेल) तर ते फक्त इथे जाहिर करू नये. कारण चित्रपट चांगला असो वाईट असो, र॑हस्यभंग अगोदरच झाला असेल , तर हवा तसा अनुभव घेता येत नाही. त्या मुळे त्या एका बाबतीत मायबोली आग्रही असेल.

पण दुसरा एक प्रश्न आहे त्यावर नक्की उत्तर माझ्याकडे नाही. जर एखादी प्रतिक्रीया पटली नाही तर माध्यम प्रायोजक यात स्वयंसेवक म्हणून काम करणार्‍या कुणालाही, एक व्यक्ती म्हणून उत्तर द्यायची इच्छा असेल तर त्यांनी ती कशी द्यायची? म्हणजे जर प्रेक्षकांनी हवे ते लिहण्याचे स्वातंत्र्य आपण त्यांना देत असू तर या स्वयंसेवकांनी मात्र हवे ते लिहायचे नाही हे योग्य होणार नाही, पण त्यांनी ते तसे लिहले तर मायबोली ते डिफेंड करते आहे असा समज होऊ शकतो. हे माझे वैयक्तीक मत आहे असे ते लिहून त्यांनी सुरुवात केली तरी "हे डिफेंड करणेच आहे" असा समज होऊच शकतो. अगोदर म्हटल्याप्रमाणे माझ्याकडे उत्तर नाही. पण प्रश्न आहे खरा.

(हे मी वेबमास्तर म्हणून मायबोलीचे अधिकृत धोरण कसे आहे आणि त्यात काय अडचणी आहेत हे सांगण्यासाठी लिहतो आहे. हे माझे वैयक्तीक मत नाही)

>>>आजोबा आता नाही आहे हे कळल्यावर त्याला रडू आलं आणि मग बराच वेळ खूप अपसेट होता. इतकेच नव्हे तर सिनेमा म्हणून विस्कळीत आहे थोडा डॉक्युमेंटरी सारखा आहे असं वाटणारे आम्ही दोघं मी आणि नवरा दोघांच्याही डोळ्यात क्षणभर पाणी आलं.<<<

हे वाचून छान वाटलं वेल, कोणत्याही कथेने रसिकाच्या मनावर अल्पकाळापुरतातरी परिणाम घडवायलाच हवा, रसिक क्षणभर आहे तिथेच थांबून भावनिक व्हायला हवा किंवा गुंतायला हवा.

हा चित्रपट पाहिलेला नाही. वर अनेकांनी चांगल्या - वाईट बाजू सांगितलेल्या दिसत आहेत. पण बहुतेकांनी विषयाची निवड ह्याबाबत स्तुती केलेली दिसते.

बाकी बजेट, अ‍ॅनिमेशनच्या दर्जावर त्याचा परिणाम, अश्या अनेक गोष्टींमधले काही कळत नाही, त्यामुळे नुसतेच वाचत आहे.

धन्यवाद!

स्वयंसेवक जर मायबोलीच्या प्रशासनापैकी एक असतील तर 'मायबोली डिफेंड करत आहे' हा समज होणे फार सोपे होऊन बसेल.

एक तर 'माध्यम प्रायोजक' ह्या आय डी ने वाचकांच्या अभिप्रायावर 'ऑफिशियल मायबोली' उत्तरे द्यावीत किंवा 'एक व्यक्ती म्हणून मत द्यायचे असले' तर स्वतःच्या पहिल्या प्रतिसादात डिस्क्लेमर द्यावा की 'ही सर्व माझी वैयक्तीक मते असून ती मायबोलीची अधिकृत मते समजली जाऊ नयेत'.

एक तर 'माध्यम प्रायोजक' ह्या आय डी ने वाचकांच्या अभिप्रायावर 'ऑफिशियल मायबोली' उत्तरे द्यावीत किंवा 'एक व्यक्ती म्हणून मत द्यायचे असले' तर स्वतःच्या पहिल्या प्रतिसादात डिस्क्लेमर द्यावा की 'ही सर्व माझी वैयक्तीक मते असून ती मायबोलीची अधिकृत मते समजली जाऊ नयेत'. >>> अनुमोदन

बेफि खटकलेल्या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून एकदा तरी पाहावा हा चित्रपट असा नक्की आहे.

वेब मास्तर उत्तर मिळाले कारण मी पण तोच प्रश्न विचारणारच होते पण विचारावा कि नाही ते समजत नव्हते.
माध्यम प्रायोजकांच्या स्वयंसेवकांची पण भूमिका समजली Happy
थोडासाच अपेक्षाभंग असेल तर बघावा का ? अस वाटतच आहे Happy

Pages